मंगळवार दि. १२ ऑगस्ट २०२५

नो डॉल्बी… नो लेसर
विधायक उपक्रमांनी गणेशोत्सव साजरा कराउपविभागीय अधिकारी रामदास इंगवले यांचे आवाहन
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
डॉल्बीसह लेसरला कोणत्याही परिस्थितीत परवानगी मिळणार नसून गणेशोत्सव कालावधीत विधायक उपक्रमांना प्राधान्य द्यावे. कोणतेही अनुचित प्रकार मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून होणार नाहीत याची खबरदारी घ्या असे आवाहन गडहिंग्लजचे उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले यांनी केले. आजरा येथे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित विविध मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बैठकीत ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी यमगर म्हणाले, गणेशोत्सव हा अतिशय पवित्र असा सण असून या कालावधीत गणेश आगमनासह विसर्जन मिरवणुका शांततेत काढाव्यात. वीज वितरण कंपनीसह इतर सर्व परवानग्या मंडळांनी तातडीने घ्याव्यात. या कालावधीत शक्यतो सार्वजनिक गणेश मुर्त्यांच्या ठिकाणी मंडळांनी आपापले स्वयंसेवक नेमावेत पुरुष व महिलांकरिता स्वतंत्र दर्शन रांगा तयार कराव्यात. या कालावधीत समाज माध्यमातून कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह मजकूर प्रसारित होणार नाही याची काळजी घ्यावी. यावर्षी पुन्हा गणराया अवार्ड सुरू होत असून मंडळांनी विधायक उपक्रमांची जोड देऊन या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे.

उपविभागीय पोलिस अधिकारी इंगवले पुढे म्हणाले, आक्षेपार्ह मुर्त्या व देखावे असणार नाहीत याची खबरदारी घ्यावी मिरवणुका वेळेत पूर्ण होतील याची काळजी घ्यावी. विद्युत रोषणाई करताना चांगल्या दर्जाचे साहित्य वापरण्यात यावे. मूर्ती स्थापन परिसरामध्ये जुगारासारखे प्रकार घडणार नाहीत याचीही काळजी घ्यावी असे आवाहन केले.
तहसीलदार समीर माने यांनी या कालावधीत कुठेही कोणताही प्रकारचा अनुचित प्रकार घडल्यास तातडीने प्रशासनाशी संपर्क साधावा. तालुक्याला शांत गणेशोत्सवाची परंपरा आहे या कालावधीत सामाजिक कार्यक्रमांना भर देऊन विधायक उपक्रम राबवावेत. शासकीय योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याची ही संधी आहे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शक्यतो या योजनांवर आधारित उपक्रम राबवावे असे सांगितले.
यावेळी वीज वितरण कंपनीचे अष्टेकर नगरपंचायतीचे कर निरीक्षक निहाल नायकवडी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सुर्वे यांच्यासह विविध मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘रवळनाथ’ ने दिले कालेकर कुटुंबाला दुःखातून सावरण्यासाठी बळ
पेरणोली येथील कुटुंबीयांना तातडीची मदत

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पेरणोली (ता. आजरा) येथील श्री. मच्छिद्र नारायण कालेकर यांचे आकस्मिक निधन झाले. त्यामुळे आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असणाऱ्या कालेकर कुटुंबियांसमोर कुटुंबप्रमुखाच्या निधनाने मोठी आर्थिक समस्या देखील निर्माण झाली. या संदर्भातील माहिती घेऊन श्री रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष श्री. एम. एल. चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने कालेकर कुटुंबियांची चौकशी केली आणि रु. १५ हजारांची आर्थिक मदत दिली. श्री रवळनाथ हौसिंग फायनान्स सोसायटीचे ब्रॅण्ड ॲंम्बेसिडर माजी राजदूत व विदेश मंत्रालयाचे माजी सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या चांगुलपणाची चळवळ या उपक्रमातंर्गत रवळनाथतर्फे ही मदत देण्यात आली.
मच्छिद्र कालेकर हे भुमिहीन शेतकरी असल्यामुळे गावी शेतमजुरी आणि पशूपालन करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. झोपडीवजा घरात राहणारा त्यांचा आई, पत्नी, मुलगा व विवाहीत मुलगी असा परिवार आहे. गेल्या दोन महिन्यापासून ते आजारी होते. त्यांच्या वैद्यकीय उपचारासाठी घरातील पशूधनाची देखील कुटुंबियांना विक्री करावी लागली. त्यामुळे कालेकर कुटुंबिय सर्वबाजुंनी आर्थिक संकटात सापडले आहे.
रवळनाथ मार्फत नेहमीच समाजातील अपघातग्रस्त, जळीतग्रस्त, गरीब आणि संकटांत सापडलेल्या दुर्बल घटकांसाठी सहकार्य केले जाते. अशा प्रसंगी माणुसकीच्या नात्याने हतबल होणाऱ्या बांधवांना धीर देण्याचे काम नेहमीच रवळनाथकडून केले जाते. रवळनाथच्या या मदतीबद्दल कालेकर कुटुंबियांनी तसेच ग्रामस्थांनी कृतज्ञता व्यक्त केली. रवळनाथचे संचालक प्राचार्य डॉ. आर. एस निळपणकर यांनी देखील वैयक्तिक रु. ११ हजारांची आर्थिक मदत दिली.
याप्रसंगी संचालक प्रा. व्ही. के. मायदेव, सीईओ श्री. डी. के. मायदेव, यांच्यासह पेरणोलीच्या सरपंच सौ. प्रियांका जाधव, माजी सभापती श्री. उदयराज पवार, श्री. वसंत तारळेकर, श्री. टी. एस. गडकरी, ग्रा. पं. सदस्या सुनिता कालेकर, श्री. रणजीत कालेकर व कालेकर कुटुंबीय, ग्रामस्थ उपस्थित होते.

सरोळी येथे डिजिटल क्लासरूम चे उद्घाटन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
विद्या मंदीर, सरोळी ता.आजरा येथील ‘डिजिटल क्लासरूम’ चे चंदगड विधानसभा मतदारसंघ महिला संयोजिका सौ. भारतीताई जाधव यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री.शिवाजी पाटील यांच्या संकल्पानुसार मतदारसंघातील सर्व शाळा डिजिटल व्हाव्यात जेणेकरून येथील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण मिळेल. त्यांच्या प्रगत शैक्षणिक दृष्टीकोनाचा फायदा मतदारसंघातील सर्व शाळांना देण्यासाठी त्यांचे सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत.
यावेळी श्री.जयवंत सुतार, सरपंच सौ.प्रज्ञा पाटील, माजी सरपंच श्री.एम.टी. पाटील, माजी सरपंच श्री.अकाराम देसाई, श्री.संभाजीराव सरदेसाई, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. सतीश पाटील, मुख्याध्यापक श्री.एजरे सर, श्री.प्रवीण पाटील, श्री.महेश सुतार, संवेदना फाउंडेशन चे श्री.धनाजी सावंत, श्री.जीवन आजगेकर, श्री.कृष्णा खाडे , श्री.सागर पाटील, पालक, विद्यार्थी व इतर मान्यवर उपस्थित होते.

आरदाळ येथे निराधार आजोबांच्या घराला हेल्पिंग हँड्स फाउंडेशनकडून लोखंडी पत्र्यांचे छप्पर

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
हेल्पिंग हँड्स फाउंडेशन, उत्तूर यांच्या पुढाकारातून आरदाळ येथील निराधार गंगाधर कांबळे या आजोबांच्या घरावरील जुने मोडकळीस आलेले खापरी छप्पर काढून लोखंडी पत्र्यांचे छप्पर बसवण्यात आले. समाजातील निस्वार्थी मदतीच्या हातांमुळे हा उपक्रम यशस्वी झाला.आरदाळ येथील वयोवृद्ध आजोबांचे मागे पुढे कुणीही नसल्याने, त्यांच्या घराचे छप्पर पूर्णपणे गळके झाले होते. पावसामुळे राहणे धोकादायक बनले होते. ही बाब समजताच हेल्पिंग हँड्स फाउंडेशनच्या सदस्यांनी पाहणी करून व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. त्याला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या कामासाठी मंगेश शिंत्रे (शिंत्रे कन्स्ट्रक्शन), रणजीत घेवडे, शुभम धुरे, अजिंक्य पाटील, प्रथमेश तेली, तौशिक लमतुरे, प्राजक्ता सपाटे, विश्वनाथ सावेरकर, तसेच नाव न सांगता मदत करणारे नागरिक पुढे आले. लोखंडी रॉड, साहित्य, वेल्डिंग आणि आर्थिक मदत अशा विविध स्वरूपात योगदान मिळाले.
श्रमदानासाठी सैगल ढालाईत, मनोज भाईगडे, रणजीत घेवडे, सौरभ वांजोळे, अभिषेक जाधव, ओमकार खाडे, वैभव गुरव, तौसिफ लमतुरे यांचा विशेष सहभाग होता. तसेच शिंत्रे कन्स्ट्रक्शन आणि गोल्डन फॅब्रिकेशन यांनी तांत्रिक व साहित्य सहकार्य केले.हेल्पिंग हँड्स फाउंडेशनचे सर्व सदस्य या उपक्रमात महत्त्वपूर्ण सहभाग घेतला. सर्वांच्या सहकार्याने अल्पावधीत छप्पर बदलण्याचे काम पूर्ण झाले.काम पूर्ण झाल्यानंतर आजोबांना दरवर्षीप्रमाणे यंदाही जीवनावश्यक वस्तूंचा कीट देण्यात आले.

पं.दिनदयाळ विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पंडित दीनदयाळ विद्यालय, आजरा मध्ये रक्षाबंधन उत्साहात साजरा करण्यात आले. रक्षाबंधन या सणाबद्दल सौ .सुनीता कुंभार यांनी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. यानंतर विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना राख्या बांधून भावाला आपल्या कर्तव्याची, आपल्या रक्षणाची आठवण करून दिली. भावांनी आपल्या बहिणींसाठी छोटीशी भेट देऊन आपल्या कर्तव्याशी बांधील राहण्याची ग्वाही दिली.रक्षाबंधनाचे औचित्य साधून विद्यार्थिनींसाठी मेहंदी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. आपल्या कलेचे प्रदर्शन केले. कार्यक्रमांमध्ये सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आनंदाने सहभाग घेतला. तसेच या कार्यक्रमासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

सुतार लोहार समाजातर्फे वृक्षारोपण

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा रेंज मधील परिमंडळ उत्तर, आजरा नियत क्षेत्र आजरा मधील कंपार्टमेंट नंबर १५१ ए मध्ये श्री विश्वकर्मा सेवाभावी सुतार व लोहार समाज संस्था आजरा यांच्या माध्यमातून सुमारे ५० वेगवेगळ्या जातीची झाडे वृक्षारोपण करण्यात आले.त्यामध्ये जांभळ, आंबा, फणस , दालचिनी, नारळ, उंबर, अशी समाज संस्था यांचेमार्फत श्री टी. एस. लटके वनरक्षक आजरा व वनसेवक अध्यक्ष अभिजीत सुतार , उपाध्यक्ष बाबासाहेब सुतार सचिव संजय सुतार खजिनदार संतोष सुतार तसेच शशिकांत सुतार सर , रमेश सुतार उदय लोहार, मनोहर लोहार तसेच वन्यजीव बचाव पथक उपस्थित होते.

नगरपंचायतीकडून गणेश मुर्त्या विसर्जन स्थळांची पाहणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर गणेश मुर्त्या विसर्जन परिसर सुरक्षित असणे आवश्यक आहे यासाठी आजरा नगरपंचायतीच्या वतीने अधिकारी वर्गाने आज ठिकठिकाणीच्या स्थळांची पाहणी केली.
जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार श्रींच्या मूर्ती विसर्जनासाठी शहरांमध्ये चार ठिकाणी कृत्रिम कुंड उभारण्यात येणार असून निर्माल्य नदीपात्रात न टाकता निर्माण कुंडात टाकण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. येणारा गणेशोत्सव सर्वांनी आनंदाने साजरा करून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी सुरज सुर्वे यांनी केले आहे.
अधिकाऱ्यांनी मूर्ती विसर्जन स्थळांची पाहणी करून येथे सुरक्षेच्या दृष्टीने विद्युत सुविधेसह आवश्यक ती उपाययोजना करण्याच्या सूचना कर्मचारी वर्गास केल्या आहेत.
आज आजऱ्यात…
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व आजरा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी ११ वाजता ‘भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील प्रति सरकारचे योगदान’ या विषयावर खेळताना विचारवंत प्रा. राजा माळगी यांचे व्याख्यान...


