सोमवार दि.१७ फेब्रुवारी २०२५


मारामारी …
एक जखमी…सहा जणांविरोधात गुन्हा नोंद

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शेतीच्या खंडाच्या वादाचे पर्यवसान मारामारीत होऊन यामध्ये सिद्धेश पांडुरंग नार्वेकर ( वय ४२,रा. बाजारपेठ, आजरा) हे डोक्याला मार लागून जखमी झाले .याप्रकरणी सिद्धेश पांडुरंग नार्वेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विनोद उत्तम बिल्ले, प्रशांत चंद्रकांत बिल्ले, अक्षय अनिल बिले, विराज विनोद बिल्ले व विवेक पांडुरंग बिल्ले (सर्व रा.शिवाजी नगर,आजरा ) यांनी नार्वेकर यांच्या घरात घुसून सिद्धेश यांना शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असल्याचे आजरा पोलिसांनी सांगितले.
तर याबाबत अक्षय बिल्ले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सिद्धेश नार्वेकर यांच्या विरोधातही गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांच्या मार्गदर्शनाखाली आजरा पोलीस स्टेशनचे राजेश शिकलगार पुढील तपास करीत आहेत.

बुरुडेच्या उपसरपंचपदी सुनील बागवे

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
बुरुडे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी श्री. सुनील रामचंद्र बागवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी लोकनियुक्त सरपंच श्रीमती वैशाली गुरव, सदस्य संजय कांबळे, मानसी पेंडसे, मनीषा तेंडुलकर, तंटामुक्त अध्यक्ष मारुती देशमुख, उपाध्यक्ष धोंडीबा रेडेकर, दशरथ संदीप होन्याळकर. रामचंद्र होन्याळकर व ग्रामस्थ उपस्थित होते.


मॉर्निंग वॉक महागात पडले…
चोरट्याने दीड तोळ्याचे मंगळसूत्र लांबवले…

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मॉर्निंग वॉक साठी उत्तूर – गारगोटी मार्गावर गेलेल्या उत्तूर येथील सौ.गंगा सचिन घोरपडे या महिलेचे दीड तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात दुचाकीस्वारांनी हातोहात लांबवले.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी …
नेहमीप्रमाणे सौ. घोरपडे या मॉर्निंग वॉकसाठी पहाटे पावणे पाचच्या सुमारास गारगोटी रस्त्यावरून चालल्या असता तेथे आलेल्या दुचाकीस्वारांनी मोबाईलवर पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्या जवळ जाऊन गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेऊन गारगोटीच्या दिशेने दुचाकीवरून पलायन केले.
याबाबतची फिर्याद सौ.गंगा सचिन (रामदास) घोरपडे यांनी पोलिसात दिली आहे.


रानडुकराची शिकार…
दोघांना अटक

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शिरसंगी (ता.आजरा) येथे स्फोटक बॉम्ब गोळ्यांच्या सहाय्याने रानडुकराची शिकार केल्याप्रकरणी मंजुनाथ धरम रजपूत व जेमिनी मंजू रजपूत ( दोघेही राहणार हक्कीपक्की कॅम्प, होसुडी सदाशिवपुरा, ता.जि. शिमोगा ,कर्नाटक) यांच्यावर परिक्षेत्र वनअधिकारी आजरा यांनी वन्यजीव संरक्षण अधिनियम नुसार वनगुन्हा नोंद केलेला आहे.
सदर दोन्ही आरोपींना मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आजरा यांच्यासमोर उभा केले असता त्यांनी २ दिवसाची वन कोठडी दिली आहे.
सदरची कारवाई ही जी.गुरूप्रसाद, उपवनसंरक्षक कोल्हापूर वनविभाग कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली एम.व्ही. कोळी वनक्षेत्रपाल आजरा, संदिप शिंदे, वनपाल दक्षिण आजरा, शकिल मुजावर वनपाल उत्तर आजरा, भरत निकम वनपाल धनगरमोळा, वनरक्षक तानाजी कळविकट्टेकर,प्रविण बेलवळेकर, बाळासाहेब पाटील, दयानंद शिंदे, संजय दुंडगे, श्रीम. कल्पना पताडे, श्रीम. अस्मिता घोरपडे यांनी केली असून पूढील तपास चालू आहे.


एका मित्राचे निधन…
अनेक मित्र धावले कुटुंबीयांच्या मदतीला …

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मलिग्रे ता.आजरा येथील मनोहर धोडिबा बुगडे अकस्मिक निधन झाले.सदरचे वृत्त त्यांच्या मित्र परिवाराला समजतात १९८९ सालच्या बारावी झालेल्या समवयस्कर मित्र परिवाराने स्थापन केलेल्या ‘काॅलेज कट्टा ‘ या ग्रुपच्या माध्यमातून तातडीने बुगडे यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांची विचारपूस केली. बेताची आर्थिक स्थिती असणाऱ्या बुगडे यांच्या परिवाराला वर्गणी जमा करून आर्थिक मदत केली व आपल्या मित्राच्या पक्षात त्याच्या कुटुंबीयांना आधार देण्याचे काम केले.
काॅलेज कट्टा ग्रुप मध्ये पंचवीस सदस्य असून स्वतःची नावे प्रसिद्धीपासून अलिप्त ठेवणाऱ्या या मित्र परिवाराचे कौतुक होत आहे.


थोडे हटके
मेणबत्तीच पेटवा…

ज्योतिप्रसाद सावंत
अलीकडे तरुणाईचे, स्वयंघोषित नेत्यांचे वाढदिवस म्हणजे ज्या परिसरात हे वाढदिवस साजरे होतात तेथील लोकांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरू लागले आहेत. कर्कश आवाजातील दुचाकीचे हॉर्न, संगीताच्या नावावर चाललेला धिंगाणा आणि रात्री- अपरात्री तरुणांचा जल्लोष (इतरांची डोकेदुखी) असा प्रकार सर्रास पहावयास मिळत आहे. मग असा वाढदिवस एखाद्या स्वयंघोषित नेत्याचा, फाळकूट दादाचा अथवा युवा नेत्याचा असेल तर बोलायचे कामच नाही. या मंडळींच्या वाढदिवसाला रंगीत- संगीत पार्ट्यांची जोड नसेल तर तो वाढदिवस कसला…?
वाढदिवस तुम्ही करा हो त्याला आमचा आक्षेप नाही. आणि आम्ही आक्षेप घेतला म्हणजे तुम्ही वाढदिवस करणार नाही अस थोडच आहे. वाढदिवस करताना मेणबत्तीच पेटवा म्हणजे झालं. असे सांगण्याचे कारण म्हणजे वाढदिवस प्रसंगी केली जाणारी आतषबाजी आजूबाजूचे शिवार, जंगल, घरे यांना आग लावणारी ठरू शकते. आतषबाजी करताना या गोष्टींचे भानही असणे आवश्यक आहे. नुकताच असा एक प्रकार शहरात घडल्याची सध्या जोरदार चर्चा आहे.
तुमच्या वाढदिवसाला आमच्या शुभेच्छा आहेतच… फक्त तुमच्या वाढदिवसामुळे एखादे घर, शिवार अथवा जंगल पेटणार नाही याची तेवढी काळजी घ्या एवढीच आमची अपेक्षा…

साईट : दत्त मंदिर समोर सोमवार पेठ आजरा संपर्क : ९५२७९७३९६९

निधन वार्ता
सावित्रीबाई पाटील

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
एरंडोळ तालुका आजरा येथील सावित्रीबाई कृष्णा पाटील ( वय ८५ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पाच विवाहित मुले ,एक विवाहित मुलगी,सूना, जावई , नातवंडे असा परिवार आहे. एरंडोळच्या सरपंच सौ. पाटील यांच्या त्या सासू होत.



