

टोल रद्द आंदोलनाची आज ठरणार दीशा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
संकेश्वर- बांदा महामार्गावर आजरा तालुक्यातील मसोली येथे उभारण्यात आलेल्या वसुली नाक्या बाबत तालुका वासीयांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मुळातच आम्ही टोल भरणार नाही अशी भूमिका तालुकावासीयांनी घेतली असून तालुकावासीय टोलच्या पार्श्वभूमीवर आक्रमक झाले आहेत. याबाबत आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आज सोमवार दिनांक ३ जून रोजी रवळनाथ मंदिर, आजरा येथे साडेअकरा वाजता तालुकावासीयांची सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे.
सदरची टोल वसुली तालुक्यातील वाहनधारकांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरणार आहे. आजरा साखर कारखान्याकडे जाणाऱ्या वाहनांसह पश्चिम भागातील रहिवाशांना तालुक्याच्या ठिकाणी ये-जा करताना मोठ्या अडचणी होणार आहेत. हा महामार्ग बांधा, वापरा व हस्तांतरित करा अशा धोरणाने बांधण्यात आला नसून त्याला शासनाने पैसा पुरविला आहे. महामार्गाच्या उभारणीत तालुकावासीय शेतकऱ्यांनी मोठे योगदान दिले आहे. अनेकांच्या शेतजमिनी या मार्गाकरिता वापरण्यात आल्या आहेत. अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही तर महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असताना टोल आकारणीची घाई का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आजच्या या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरणार असल्याने बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

सर्वसामान्यांना पत निर्माण करून देणारी श्रमिक पतसंस्था : डॉ. भारत पाटणकर श्रमिक पतसंस्थेच्या नूतन इमातीचे उद्घाटन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
जगाच्या बाजारात ज्यांना पत नव्हती अशा सामान्य माणसांनी एकत्र येऊन श्रमिक पतसंस्थेची स्थापना केली. खऱ्या अर्थाने लोकशाही जपताना या संस्थेच्या संचालक मंडळाने गेल्या २५ वर्षांच्या काळात गरीबांना पत निर्माण करून दिली असल्याचे प्रतिपादन श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी केले. आजरा येथील श्रमिक पतसंस्थेच्या नूतन इमारत उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
स्वागत चेअरमन कॉ. संजय घाटगे यांनी केले. प्रास्ताविकात संस्थापक अध्यक्ष कॉ. संपत देसाई यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला. यावेळी गोकुळच्या संचालिका अंजनाताई रेडेकर म्हणाल्या, कोणतीही आर्थिक संस्था चालविणे हे आव्हान आहे, अशा काळात श्रमिक पतसंस्थेने उत्कृष्ट वाटचाल केली आहे. संस्थाचालकांनी निरपेक्षपणे काम केले तरच संस्था नावारूपाला येतात. असे काम केल्यामुळे ही संस्था रौप्यमहोत्सवी वर्षात स्वः मालकीच्या इमारतीमध्ये सुरू होत असल्याचे सांगून संस्थेच्या कामकाजाबाबत कौतुक केले. तर आपल्याकडून संस्थेला सदैव सहकार्य राहील अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
यानंतर आजरा कारखान्याचे संचालक अशोक तर्डेकर यांनी मनोगतातून संस्थेच्या वाटचालीचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी म्हणाले, आजरा तालुक्यातील धरणांमध्ये विस्थापित झालेल्या आणि श्रमिक लोकांनी एकत्र येत या संस्थेची स्थापना केली. तर गोरगरीब, श्रमिक, कष्टकरी आणि धरणग्रस्तांसाठी आयुष्यभर काम करीत असलेल्या डॉ. भारत पाटणकर यांच्या हस्ते या संस्थेच्या इमारतीचे उद्घाटन झाले हा दुग्धशर्करा योग असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात आजरा तालुक्यातील सहकार आदर्श असल्याचे सांगून सचोटीने काम केल्यास संस्था नावारूपाला येतात. श्रमिक पतसंस्था सहकारातील आदर्श संस्था असल्याचे सांगून त्यांनी संस्थेचे पदाधिकारी, संचालक मंडळ, सभासद व कर्मचाऱ्यांचेही कौतुक केले.
या कार्यक्रमाला व्हा. चेअरमन विष्णू मांजरेकर, संचालक मारूती चव्हाण, प्रकाश कालेकर, नारायण सुतार, मसणू कांबळे, बाबू येडगे,सौ. मनिषा गुरव, शारदा पाटील यांच्यासह कॉ. शांताराम पाटील, वंदन जाधव, कॉ. संजय तर्डेकर, के. एच. पाटील, श्रीमती भारती कांबळे, नारायण भडांगे, दशरथ घुरे, मारूती पाटील, यांच्यासह संस्थेचे सभासद, हितचिंतक, व्यवस्थापक बाळासाहेब पाटील कर्मचारी तानाजी मिसाळ, मनिषा देसाई आदि उपस्थित होते. संचालक राजाराम पोतनीस यांनी आभार मानले.

जनता बँकेच्या कळंबा शाखेचे उद्घाटन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
जनता सहकारी बँक, आजराच्या एकोणिसाव्या कळंबा शाखेचे उद्घाटन उत्साहात पार पडले.
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवत बँकेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम प्रसंगी बँकेचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई उपाध्यक्ष बापू टोपले संचालक जयवंतराव शिंपी, रणजीत देसाई, अमित सामंत, पांडुरंग तोरगले शाखाधि कारी एच. बी कांबळे, एम. बी. पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी, जयवंत ग. कोडक, शशिकांत सु. नार्वेकर, संतोष मा. पाटील, एकनाथ ग. शेटके (विभागीय संचालक कोल्हापूर), बाबाजी. नाईक, शिवाजीपाटील, सौ. रेखा देसाई अॅड. शंकर निकम, विक्रमसिंह देसाई सौ. नंदा केसरकर, संभाजी एम. अस्वले – (C.A.) (तज्ञ संचालक) महेश दि. कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

जलमापक सक्ती रद्द करा… अन्यथा आंदोलन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पाणीपट्टीमध्ये वाढ दहापट करण्याबरोबर जलमापक यंत्र बसवण्यासाठी सरकारने जो घाट आतला आहे त्यामुळे शेतकरी उध्वस्त होणार आहे. त्यांने शेती करू नये असे या धोरणाचा भाग आहे. या विरोधात लढा संघटीत केला आहे. सुनवाई घेवून पूर्वीच्या पध्दतीने पाणीपट्टी नव्या नियमानुसार होत नाही. जलमापक यंत्र (वाटर मीटर) सक्ती रद्द केली जात नाही तोपर्यंत बेमुदत आंदोलन केले जाईल. असा इशारा श्रम्दचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.भारत पाटणकर यांनी दिला आहे.
आजरा येथील पत्रकार परिषदेत माहीती देताना ते म्हणाले,नव्या नियमानुसार पाणीपट्टी प्रति एकरी १२ हजार रुपये आकारली जाणार आहे. पिकांतून मिळणारे उत्पन्न व उत्पादनासाठी येणारा खर्च याचा ताळमेळ बसत नाही. प्रति एकरी ११२० रुपये असणारी पाणीपट्टी दहा पट होणार आहे. शेतकऱ्यांने खर्चाचे गणीत कसे बसवायचे. उसाच्या पिकातून महीन्याला केवळ सहा हजार शेतकऱ्यांना पदरात पडतात. त्याच्या मजूरीचाही खर्च यातून भागत नाही. शेतकऱ्यांना उध्वस्त करण्याचा हा डाव आहे. महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन कोल्हापुर व श्रमिक मुक्ती दल एकत्रीत काम करीत आहेत. जलदर ठरवितांना महाराष्ट्र जल नियंत्रक प्राधिकरणच्या नियमामध्ये शेतकऱ्यांच्या जाहीर सुनावण्या घेण्याचे बंधन होते. यातील सुनवाईचे कलम हटवल्याने शेतकऱ्यांचा विचार होत नाही. त्यामुळे सुनवाई घेण्याची गरज आहे. जोपर्यंत शासनाच्या सिंचन योजनावर मीटर्स बसलिले जात नाहीत तोपर्यंत घनमापनासाठी मीटर्स सक्ती व दंडात्मक कारवाई करू नये. शासकीय उपसा योजनाना ८१ टक्के वीजबिल शासन तर १९ टक्के वीजबिल शेतकरी पाणीपट्टीतून भरले जाते. तोच नियम खासगी व सरकारी उपसा सिंचन योजनांना लागू करावा. लोकल फंड वसुली बंद करावी. शेतसाऱ्याबरोबर शेतकरी लोकल फंड भरत असतात. यासह अनेक मागण्या मुख्यसचिव जलसंपदा विभागाकडे केल्या आहेत.
येत्या (ता.६) याबाबत बैठक होत आहे. यामध्ये सकारात्मक निर्णय न झाल्यास बेमुदत आंदोलन केले जाईल असा इशारा त्यांनी दिला. यावेळी राज्य कार्याध्यक्ष काळे, संपत देसाई, अशोक तर्डेकर, संजय घाटगे, प्रकाश मोरुस्कर, नामदेव फगरे, दशरथ घुरे, राजेंद्र कांबळे आदी उपस्थित होते.

निधन वार्ता
पार्वती पाचवडेकर

येथील श्रीमती पार्वती हरी पाचवडेकर ( वय ९८) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पाच विवाहित मुले,एक मुलगी एक मुलगा असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवार दिनांक पाच रोजी नऊ वाजता आजरा येथे आहे.



