mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या


दहा जूनला इशारा मोर्चा
टोलला ताकदीने विरोध करण्याचा निर्धार

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     संकेश्वर बांदा महामार्गावरील मसुदी येथे टोल वसुली नाका उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे ज्या अर्थी टोल नाका उभारला जात आहे त्या आर्थिक टोल वसुली सुरू होणार आहे या टोल वसुलीला विरोध करण्याचा निर्धार आजरा येथे रवळनाथ मंदिर सभागृहात झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत करण्यात आला या पार्श्वभूमीवर सोमवार दिनांक १० जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून तहसील कार्यालयावर मोर्चा ने जाऊन संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याचा निर्णयही घेण्यात आला. यामध्ये सकारात्मक निर्णय न झाल्यास पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्याचे ठरले.

विरोध का…?

१. महामार्गाचे हे काम केंद्र सरकारच्या निधीतून झाले असून ते बांधा, वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर झालेले नाही.
२. हे काम निकृष्ट दर्जाचे आहे. मुळातच हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग होऊ शकतो का ? हा महत्त्वाचा मुद्दा आहे.
३. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी, खडी, मुरूम, माती याचा मोठ्या प्रमाणावर रस्त्याकरता वापर करण्यात आला आहे. एवढे योगदान तालुक्याचे असताना पुन्हा कराचे भूत मानगुटीवर का ?
४. साखर कारखान्याच्या अलीकडे सदर टोलची उभारणी असल्याने याचा अप्रत्यक्ष तोटा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. वाहन चालक सदर टोलची वसुली संबंधित शेतकऱ्यांकडून करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
५. टोल आकारणी करताना स्थानिक तालुकावासीयांना विश्वासात घेतलेले नाही.

     यावेळी झालेल्या चर्चेत कॉ. संपत देसाई, प्रभाकर कोरवी,बंडोपंत चव्हाण, वसंतराव धुरे, अल्बर्ट डिसोजा,ज्योतिप्रसाद सावंत, दशरथ अमृते, परशुराम बामणे, विलास नाईक आदींनी भाग घेतला.

     बैठकीस मारुती मोरे, जनार्दन टोपले, अनिकेत चराटी,सुधीर सुपल, जोतिबा चाळके, विजय थोरवत, रशीद पठाण, काशिनाथ मोरे, आबासाहेब पाटील, मानसिंगराव देसाई, रणजीत सरदेसाई, डॉ .सागर पारपोलकर, शांताराम पाटील, सुरेश पत्की, युवराज जाधव, सलिम लतीफ, वाय.बी. चव्हाण, पांडुरंग सावरतकर ,जोतिबा आजगेकर, देवदास बोलके किशोर म्हापसेकर, शरीफ खेडेकर,गुरु गोवेकर यांच्यासह तालुका वासीय उपस्थित होते.

कृष्णकांत निकाडे यांना जीवनगौरव

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     जीवन विद्या मिशनतर्फे सद्गुरू श्री. वामनराव पै यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार श्री. सद्गगुरू श्री. वामनराव पै यांच्या कन्या मालनताई आणि श्री. प्रल्हाद पै यांच्या हस्ते कृष्णकांत निकाडे यांना देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

     श्री. कृष्णकांत निकाडे हे कोल्हापूरचे /बेलेवाडी येथील निवासी असून, त्यांची कारकीर्द मुंबईत घडली आहे. या सोहळ्यासाठी श्री. यश प्रल्हाद पै आणि चि. निखिल यश पै यांची विशेष उपस्थिती होती. तसेच सर्व पुरस्कारप्राप्त मान्यवरांचे कुटुंबीयही उपस्थित होते.

पगार कशाचा…?
कामावर हजर रहाण्याचा की कामे करण्याचा…?
तालुक्यातील परिस्थिती

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     आजरा तालुक्यातील बहुतांशी शासकीय कार्यालय गेले दोन महिने ओस पडली आहेत. लोकसभा निवडणुकीच्या नावावर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अभावी ओस पडलेली ही कार्यालये पाहिल्यानंतर शासन नेमके या मंडळींना पगार कशाचा देते असा सवाल उपस्थित होत आहे. केवळ हजेरी भरण्याकरता जर अधिकारी ,कर्मचारी हजर रहात असतील तर तालुकावासीयांच्या प्रश्नांचे काय ? हा प्रश्नही महत्त्वाचा आहे.

     कर्तव्यदक्ष अशी अपवादात्मक मंडळी सोडली तर बहुतांशी कार्यालयातील टेबल व खुर्च्या ओस पडलेल्या दिसतात. सध्या नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने विविध दाखल्यांसाठी विद्यार्थी वर्ग व त्यांच्या पालकांचे तर खरिपाचा हंगाम सुरू झाल्याने शेतकरी वर्ग अपुरी कामे पूर्ण करण्यासाठी शासकीय कार्यालयांचे उंबरे झिजवू लागला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर पाहू, साहेब भागात गेले आहेत, कर्मचारी रजेवर आहेत नंतर या… अशा ठराविक पठडीतील उत्तरे ऐकून तालुकावासीय कंटाळले आहेत. मुळातच पाच दिवसांचा आठवडा त्यात सोमवारी शक्यतो विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने सर्व यंत्रणा ठप्प असाच कांहीसा प्रकार दिसत आहे.

    लोकसभा निवडणुकीचा निकाल आज लागत आहे. किमान उद्यापासून तरी शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आपापल्या खुर्च्यावरील धूळ झटकून तालुकावासीयांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आसनस्थ व्हावे अशी रास्त अपेक्षा करण्यास कांहीही हरकत नाही.

‘गांधीगिरी’ ने आंदोलन करणार..

     ज्या शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन वेळेत खुर्च्या रिकाम्या दिसतील अशा कर्मचाऱ्यांना त्यांचा यथोचित सत्कार करून त्यांना खुर्चीवर बसवून तालुकावासीयांची कामे मार्गी लावून त्यांचे प्रश्न सोडवण्याची हात जोडून विनंती करण्याचे अनोखे आंदोलन शिवसेना ( उबाठा गट) तर्फे हाती घेण्यात येणार असल्याचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील यांनी सांगितले.


 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

उत्तूर येथून चोरीस गेलेल्या चारचाकीसह 17 लाखाचा मुद्देमाल ताब्यात अनेक ठिकाणच्या चोऱ्या उघडकीस…दोघे जेरबंद….

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

एसटी चालकाला मारहाणप्रकरणी सातजणांविरोधात गुन्हा नोंद…

mrityunjay mahanews
error: Content is protected !!