मंगळवार दि.१८ मार्च २०२५


बुरुडे येथील एकाची आत्महत्या

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
बुरुडे ता. आजरा येथील प्रकाश विश्वनाथ कोरे ( वय ३८ वर्षे ) याने राहत्या घराच्या तुळईला गळफास घेऊन आत्महत्या केली.
याबाबतची वर्दी विश्वनाथ नागाप्पा कोरे यांनी आजरा पोलिसांत दिली आहे. प्राथमिक तपासात दारूच्या नशेमध्ये सदर आत्महत्या केली असल्याचे पुढे येत असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
प्रकाश याच्या पश्चात पत्नी व दोन मुले, वडील, भाऊ असा परिवार आहे.

अखेर जगदीश परत आला…
कुटुंबियांसह गावकऱ्यांचा जीव भांड्यात पडला..

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
जोमकाईदेवी यात्रेच्या निमित्याने चिमणे येथून घरातून गेलेला मूकबधिर जगदीश दगडू कांबळे हा तब्बल सहा दिवस झाले तरी घरी परतला नसल्याने संपूर्ण चिमणेकरांनी त्याची शोध मोहीम राबवली होती. अखेर काल सकाळी जगदीश निपाणी बस स्थानकावर एका भाजी विक्रेत्याला आढळून आला. जगदीश सापडल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांचा जीव भांड्यात पडला.
उत्तुर येथून बेपत्ता झाल्यानंतर त्यांने गडहिंग्लज, संकेश्वर, कारदगा पुन्हा संकेश्वर, निपाणी असा प्रवास केल्याचे स्पष्ट झाले आहे.
अपरिचित वाहन चालकांनी मूकबधिर जगदीशला कदाचित पुढे प्रवासाला जायचे असेल असे गृहीत करून सहानुभूतीपोटी शक्य तेथे पोहोचवण्याची व्यवस्था केली. सोमवारी सकाळी तो उलट – सुलट प्रवास करत पुन्हा निपाणी बस स्थानकावर पोहोचला. तिथून त्याला घरी आणण्यात आले.
यात्रेत खरेदी केलेल्या प्रसादासह इतर साहित्य त्याच्यासोबतच होते. जगदीश परत आल्याने कुटुंबीयांसह जगदीशवर प्रेम करणारे चिमणेकर सुखावले.

हारूर येथे विकासकामांचा शुभारंभ…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
ग्रुप – ग्रामपंचायत कानोली – हारूर येथे १५ लाख रुपयाच्या निधीचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमच्या अध्यस्थानी सरपंच सौ. सुषमा पाटील होत्या,
२५/१५ योजनेतील विकास कामाचा शुभारंभ भाजपा ओ बी. सी. सेलचे तालुका प्रमुख जयवंत सुतार आणि अनिकेत चराटी यांच्या हस्ते झाले, तर दलित वस्ती कामाचा शुभारंभ सरपंच सौ. सुषमा पाटील यांच्या हस्ते झाला.
यावेळी बोलताना जयवंत सुतार म्हणाले, आमदार शिवाजीराव पाटील यांनी तालुक्यासाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन दिले होते, त्याची पूर्तता आम्ही त्यांच्या माध्यमातून करीत आहोत, यापुढेही आम. शिवाजीराव पाटील आणि अशोकआण्णा चराटी यांचे सहकार्यायातून निधी देण्याचे आश्वासन दिले.
स्वागत व प्रास्ताविक सुभाष पाटील यांनी केले, यावेळी उपसरपंच स्वप्निल आर्दाळकर यांनी मनोगत व्यक्त केले, यावेळी ग्रा. प
सदस्य सुधीरकुमार पाटील, चंद्रकांत पाटील, अनिल पाटील, दिपाली सुतार, माया लोहार, यांच्यासह, गजरगाव सरपंच आनंदा कांबळे,सुरेश रेडेकर, विलास सुतार, मिलिंद पालकर, गणपती कळसकर, मारुती कदम,एम. टी. पाटील, प्रकाश पाटील, बाळासो चव्हाण सयाजी सावंत संतोष सावंत, साहिल पाथरवट, दिलीप पाटील, दिनकर पाटील, राजू पाटील, गोपाळ भोगण, रावसाहेब पाटील सी. ए. पाटील उपस्थित होते.आभार सुरेश रेडेकर यांनी मानले.


सहकारी संस्थांच्या प्रगतीसाठी ध्येय निश्चिती हवी : श्री. अशोक नाईक
रवळनाथ संस्था समुहातर्फे संचालक व कर्मचारी प्रशिक्षण

गडहिंग्लज : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सर्वत्र सहकार क्षेत्राबाबत साशंक वातावरण असताना अशा परिस्थितीत सहकारी संस्थांना प्रगती करावयाची असल्यास अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि डिजीटलायझेशनचा वापर करणे गरजेचे आहे. आपल्या संस्थेच्या कार्यप्रणाली नुसारच असणारी सॉफ्टवेअर प्रणाली अद्ययावत करून पघ्यायला हवी. तसेच सहकारी संस्थांनी पुढील पाच ते दहा वर्षांची उद्दीष्टये निश्चित करून कार्यरत राहिल्यास संस्थांची प्रगती निश्चित होईल, असा सल्ला पुणे येथील सहकार उभ्यासक तथा गैलेक्सी इन्मा प्रा.लि.चे संचालक श्री. अशोक नाईक यांनी दिला
श्री रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटी आणि श्री महालक्ष्मी वूमेन्स को-ऑप. क्रेडीट सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ निमित्त संचालक व कर्मचारी यांच्यासाठी एक दिवशीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सॉफ्टवेअर कसे वापरावे आणि कर्मचारी अर्थव्यवस्था या विषयी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष श्री. एम. एल, चौगुले होते. कोल्हापूर येथील चार्टर्ड अकौंटंट श्री. संजय व्हनबट्टे, रकळनाथच्या उपाध्यक्षा सौ. मीना रिंगणे व महालक्ष्मी वुमेन्स सोसायटीच्या उपाध्यक्षा सौ. प्राची मायदेव यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. संजय व्हनबट्टे महणाले, सहकारी संस्थांबद्दलचा आयकर खात्याचा दृष्टीकोन सकारात्मक आहे. परंतु सहकारी पतसंस्थांच्या करा संदर्भात निगडीत काही कायद्यांमध्ये धोरणात्मक बदल होण्याची गरज आहे. त्यासाठी सर्व स्तरातून पाठपुरावा सुरु असून तसे बदल झाल्यास निश्चितच सहकार क्षेत्राला आणखी गती मिळेल.
श्री एम. एल. चौगुले म्हणाले, संस्थेच्या प्रगतीमध्ये कर्मचारी हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. प्रशिक्षीत कर्मचारीच ग्राहकांना व सभासदांना उत्तम सेवा देवू शकतात, त्यामुळेच वेळोवेळी संचालकांसह कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते.
रवळनाथचे सीईओ श्री. डी. के मायदेव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, इनचार्ज प्रशासन अधिकारी सौ. प्रज्ञा पाटील यांनी अतिथी परिचय दिले. कु. सीमा माने यांनी सुत्रसंचलन केले. सिस्टीम मॅनेजर श्री. विजय सुगडे यांनी आभार मानले.
यावेळी रवळनाथच्या उपाध्यक्षा सौ. मीना रिंगणे, संचालक प्राचार्य डॉ. आर. एस. निळपणकर, प्रा. विजय आरबोळे, प्राचार्य, डॉ. दत्ता पाटील, श्री. महेश मजती, संचालिका श्रीमती उमा तोरगलनी, श्री महालक्ष्मी बुमेन्स को-ऑप. क्रेडीट सोसायटीच्या उपाध्यक्षा सौ. प्राची मायदेव, संचालिका सौ. श्रद्धा निळपणकर, सौ. अलका आरबोळे, सौ. ममता मजती, सौ. मधुमती पोतदार, व कुडाळ शाखा सल्लागार श्री. अजय चव्हाण आणि संचालक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


आजऱ्यात रक्तदान शिबिर संपन्न

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
धर्मवीर संभाजीराजे बलिदान मासाच्या निमित्त्ताने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आजरा विभाग यांच्या तर्फे दि. १६ मार्च रोजी रक्तदान शिबीर घेणार आले.
वैभवलक्ष्मी ब्लड बँकेचे संचालक श्री. अनमोल कामत यांचे हस्ते धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज, संत श्रेष्ठ जगतगुरू तुकोबाराय व संत गोरा कुंभार यांच्या प्रतिमा पूजन करुन प्रेरणा मंत्राने रक्तदान शिबिरास सुरुवात झाली.
यावेळी तब्बल १०३ धारकऱ्यांनी या रक्तदान केले. याकरिता वैभवलक्ष्मी ब्लड बँक, कोल्हापूर व कुंभार समाज संस्था, आजरा यांचे मोलाचे सहकार्य लाभले. ध्येयमंत्राने रक्तदान शिबिराची सांगता झाली.

ग्राहक तक्रार निवारण पार्श्वभूमीवर आज बैठक

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
ग्राहक पंचायत, आजरा आणि तहसीलदार आजरा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्राहक हक्क दिनाच्या निमित्ताने ग्राहकांना सजग करण्यासाठी आणि पुरवठा विभाग, विज वितरण विभाग. आरोग्य विभाग. महसूल विभाग.अशा विविध विभागांचे अधिकारी उपस्थित राहून ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करणार आहेत. तरी ज्यांना आपलीं तक्रार मांडायची आहे त्यांनी आज मंगळवारी सकाळी ११ वाजता तहसीलदार कार्यालयातील सभागृहात उपस्थित रहावे असे आवाहन ग्राहक पंचायत, आजरा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

साईट : दत्त मंदिर समोर सोमवार पेठ आजरा संपर्क : ९५२७९७३९६९

निधन वार्ता
उत्तम दोरूगडे

सोहाळेवाडी ता. आजरा येथील उत्तम दत्तू दोरुगडे ( वय ४० वर्षे ) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगी असा परिवार आहे.
गंगुबाई हाळदकर

आरदाळ ता. आजरा येथील गंगुबाई बाबूराव हाळदकर (वय ८२ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात मुलगा,सूना, नातवंडे असा परिवार आहे. आजरा सूतगिरणीचे कर्मचारी पांडुरंग हाळदकर यांच्या या आई होत.
रक्षाविसर्जन आज मंगळवारी सकाळी नऊ वाजता आरदाळ येथे आहे.
शांताबाई सासुलकर

पेरणोली ता. आजरा येथील शांताबाई रघुनाथ सासुलकर (वय ७२) वर्षे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले, मुली, जावई,सूना, नातवंडे असा परिवार आहे.



