

उर्दू हायस्कूल भ्रष्टाचार प्रकरणी आज-यात मोर्चा
नोकर भरतीसह गैर कारभाराच्या चौकशीची मागणी

आजरा येथील उर्दू माध्यमाच्या डॉ. झाकीर हुसेन अँग्लो उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मोठा भ्रष्टाचार असून प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांसह काही मंडळींनी चुकीचे रेकॉर्ड तयार करणे, बोगस नोकर भरती करणे, चुकीच्या सहीने शाळा सोडल्याचे दाखले देणे असे प्रकार अवलंबले असून यामुळे शाळेचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप करत मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने आजरा तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. संबंधितांची चौकशी न झाल्यास शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून मोर्चास सुरुवात झाली. विविध घोषणा देत मोर्चात सहभागी झालेले कार्यकर्ते आजरा तहसील कार्यालयासमोर आल्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.
सभेसमोर बोलताना मुक्ती संघर्ष समितीचे संग्राम सावंत म्हणाले, शाळा वाचवण्याच्या दृष्टीने व गैर कारभार थांबावा म्हणून प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली परंतु या प्रशासकाला हाताशी धरून नोकर भरती सह विविध गैरप्रकार केल्याचे पुरावे आपल्याकडे आहेत त्यामुळे प्रशासकांना प्रथम निलंबित करावे व या सर्व प्रकाराची चौकशी निपक्षपातीपणाने व्हावी असे मत व्यक्त केले.
प्रा. राजा शिरगुप्पे म्हणाले, अल्पसंख्यांकांची असणारी ही एकमेव शाळा व कनिष्ठ महाविद्यालय टिकून रहावे यासाठी हे आंदोलन छेडण्यात आले आहे. शाळेतील एकंदर कारभार पाहता शाळा भविष्यात बंद पडण्याचा धोका आहे. यासाठी शिक्षण विभागाने तातडीने शाळेतील गैरव्यवहारासारखी प्रकरणे चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी. या सर्व प्रकारात काही शिक्षकांवर अन्याय झाला अशा शिक्षकांना न्याय देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचेही स्पष्ट केले.
संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी न झाल्यास आमरण उपोषण केले जाईल असा निर्धारही यावेळी आंदोलनकर्त्यानी व्यक्त केला.
यावेळी पंचायत समिती सदस्य बशीर खेडेकर, अमित खेडेकर,संजयभाऊ सावंत, संजय घाटगे, अबूसईद माणगावकर आदींची भाषणे झाली.
मोर्चामध्ये स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
त्यांनी आरोप फेटाळावेत…
या प्रकरणांमध्ये प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला आहे. त्याचे पुरावे आपल्याकडे असून संबंधितांनी सदर आरोप फेटाळल्यास संघटनेच्या कामातून जाहीर निवृत्ती घेऊन असे आव्हान संग्राम सावंत यांनी यावेळी केले.



