
मसोली नजीक मालवाहू टेम्पो खड्ड्यात कोसळला
एक जखमी
आजरा -आंबोली मार्गावर मसोली ते हाळोली दरम्यान असणाऱ्या वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने मालवाहू टेम्पो रस्त्याशेजारील खड्ड्यात कोसळून चालक शुभम भोसले (रा.इचलकरंजी) हा जखमी झाला असून यामध्ये टेम्पोचे मोठे नुकसानही झाले आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, सदर मालवाहू टेम्पो स्लाइडिंगचे अल्युमिनियम साहित्य घेऊन कोल्हापूरहून सावंतवाडीच्या दिशेने चालला होता. रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास प्रचंड धुक्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने चालकाचा टेम्पोवरील ताबा सुटला व टेम्पो रस्त्याशेजारील खड्ड्यात कोसळला. यामध्ये वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे चालक भोसले हा देखील जखमी झाला आहे.
आजऱ्यात सरपंचपदासाठी १६९ तर सदस्यपदासाठी ८७९ अर्ज

आजरा तालुक्यात ३६ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक लागली आहे. अर्ज भरणीच्या अखेरच्या दिवशी सरपंचपदासाठी १६९ तर सदस्यपदासाठी ८४९ अर्ज दाखल झाले आहेत. आज अखेरच्या दिवशीही अर्ज भरण्याकरीता तहसीलदार कार्यालयाचा आवार गर्दीने फुलून गेला होता.
पाचव्या दिवशी सरपंचपदासाठी ८० तर सदस्यपदासाठी ४६७ अर्ज दाखल झाले आहेत. आज अर्ज भरणीचा शेवटचा दिवस असल्याने निवडणूक लागलेल्या गावातील इच्छुकांनी मोठ्या संख्येने अर्ज दाखल केले. जवळपास सर्वच ग्रामपंचायतीसाठी आज अर्ज दाखल झाले आहेत.
दरम्यान लाटगाव, मासेवाडी, पोळगाव, आवंडी या ग्रामपंचायतींची बिनविरोध निवडणुकीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे या व्यतिरिक्त अन्य पाच ग्रामपंचायती ही बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

बोलण्यात चूक झाली असेल, पण हा विषय संपवावा !
चंद्रकांत पाटलांची उदयनराजेंना हात जोडून विनंती

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडले आहे. संभाजीराजे भोसले आणि उदयनराजे भोसले यांनीही याबाबत आक्रमक भूमिका घेत भाजपला खडे बोल सुनावले आहे. उदयनराजे उद्या रायगडावर जाऊन आपली भूमिका स्पष्ट करणार असून याच पार्श्वभूमीवर बोलताना भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी उदयनराजे यांना हा विषय संपवण्याची विनंती केली आहे.
उदयनराजे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. आमच्यासाठी ते आदरणीय आहेत. ‘श्रीमंत छत्रपती उदयनराजे’ याच्याशिवाय त्यांचा उल्लेख करणे बरोबर नाही. माझी राजेंना हात जोडून विनंती आहे. ज्या राज्यपालांनी शिवनेरी किल्ल्यावर पायी जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले. त्यांच्याकडून बोलण्यामध्ये एखादी गोष्ट चुकीची झाली असेल. त्यांना माझी विनंती आहे की हा विषय आता कुठेतरी संपवावा लागेल, अशी विनंती चंद्रकांत पाटील यांनी उदयनराजे यांना केली.
राज्यपालांच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अनादर करण्याचा विषय असू शकत नाही, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी राज्यपालांची पाठराखणही केली.
…तर मला स्वत:ला शिवरायांचे वंशज म्हणण्याचा अधिकार नाही…
उदयनराजेंनी व्यक्त केली खदखद
दरम्यान, उदयनराजे 3 डिसेंबर रोजी रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळावर जाऊन त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधत आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. छत्रपतींचा अवमान करणाऱ्यांविरोधात आज आवाज उठवला नाही, तर मला स्वत:ला शिवरायांचे वंशज म्हणण्याचा अधिकार नाही, असे उदयनराजे म्हणाले.
(Source:wp :chat news)




