रविवार दि.१ जून २०२५


शहरातील नळ पाणीपुरवठा योजनेच्या जोडण्यांचा ताळमेळ नाही…
सुरू केलेल्या भागातील पाणी गटर्स मध्ये

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
दारातून पाईपलाईन जाते आहे, आम्हालाही कनेक्शन द्या… असे म्हणत आजरा शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेची कनेक्शन ढीगभर झाली असून पाणीपुरवठा योजनेच्या कनेक्शन बाबत पुन्हा एक वेळ ये रे माझ्या मागल्या… असे म्हणण्याची वेळ शहरवासीयांवर येणार आहे. दिलेल्या जोडण्यांना चाव्या नसल्याने पाणी सुरू केल्यानंतर ५० टक्के पाणी हे पुन्हा गटर्ससमध्ये मिसळताना दिसते.
जुन्या नळ पाणीपुरवठा योजनेची नेमकी कनेक्शन किती होती ? त्यात बेकायदेशीर कनेक्शन किती होती ? याचा कुठेही काहीही कसलाही ताळमेळ शेवटपर्यंत लागला नाही.
नव्या पाणीपुरवठा योजनेची नवीन कनेक्शन देण्याचे काम जोरात सुरू आहे. पण ज्यांना कनेक्शन जोडली जात आहेत त्यांचे मूळ कनेक्शन होते का ? त्यांनी अनामत रकमा भरल्या आहेत का ? जुने कनेक्शन कायदेशीर होते का ? याची कुठेही खात्री करून घेतली जात असताना दिसत नाही. त्यामुळे पुन्हा एक वेळ बेकायदेशीर कनेक्शन ठीक ठिकाणी घेतली जाण्याची शक्यता कांही जाणकार बोलून दाखवत आहेत.
एकीकडे सुकाळ तर दुसरीकडे दुष्काळ कायम…
शहरामध्ये कांही ठिकाणी इतके पाणी सोडले जाते की पाणी गटर्समधून वाहून जाताना दिसते तर दुसरीकडे कांही नवीन वसाहतींना पाणीच नाही अशी अवस्था आहे. त्यामुळे पाणी आहे त्यांना सुकाळ व ज्यांना पाणी येत नाही त्यांना आजही पाण्याचा दुष्काळ आहे.

तुकड्या टिकवण्यासाठी तालुक्यातील शिक्षकांची धडपड…पदरमोड करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गावागावात असणाऱ्या प्राथमिक व माध्यमिक शाळांना विद्यार्थ्यांचे नवीन प्रवेश मिळवताना शिक्षकांना चांगलीच धावपळ करावी लागत असून विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी प्रसंगी वह्या, पुस्तके, गणवेश, एसटी पास मोफत देण्याची सोय पदरमोड करून शिक्षकांकडून उपलब्ध करून दिली जात आहे. कांही शाळांनी तर शिक्षकांना नवीन प्रवेशांचे टार्गेट ठरवून दिले आहे.
प्राथमिक शिक्षकांसह माध्यमिक शिक्षकांवर संच मान्यतेची/अतिरिक्त ठरण्याची टांगती तलवार आहे. कुटुंबनियोजनासारख्या प्रकारांचा अवलंब होत असल्याने विद्यार्थ्यांची नैसर्गिक संख्या कमी झाली आहे. शहरी भागासह ग्रामीण भागामध्येही कुटुंबामध्ये एखाद दुसरे अपत्य असणाऱ्या कुटुंबांची संख्या मोठी आहे. काम- धंद्यानिमित्त चाकरमानी शहराकडे स्थलांतरित होत आहे. एकीकडे विद्यार्थी संख्या रोडावली असताना प्राथमिक व माध्यमिक इंग्रजी, मराठी माध्यमांच्या खाजगी शाळांचा सुळसुळाट झाला आहे. यामुळे विद्यार्थी मिळवताना शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांच्या भव्य व आकर्षक इमारती विद्यार्थ्यांअभावी भकास बनत चालल्या आहेत. शहरी भागातील शाळांनी ग्रामीण भागातील विद्यार्थीही आपल्याकडे कसे येतील यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणजे तालुक्याबाहेरील अनेक शाळांची वाहने गावोगावी विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत येण्यासाठी उपलब्ध करून दिली जात आहेत.
याचा सर्वात मोठा फटका कमी विद्यार्थी असणाऱ्या व काठावरच्या तुकड्या असणाऱ्या शिक्षकांना बसणार असून ते अतिरिक्त ठरण्याच्या भीतीने पालकांची घरोघरी जाऊन भेट घेऊन विद्यार्थ्यांना आपल्याच शाळेत पाठवण्यासाठी आग्रही दिसत आहेत.
जि.प.ची ५२५ शिक्षक पदे कमी
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडील सुमारे ५२५ शिक्षकांची पदे कमी झाली आहेत. शासनाच्या संच मान्यतेच्या आदेशाचा फटका बसला आहे.
आनंदराव नादवडेकर पतसंस्थेकडून दोन कुटुंबांना प्रत्येकी १५ लाखांची कर्जमाफी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शिक्षकांची शिखर संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आनंदराव नादवडेकर प्राथमिक शिक्षक पतसंस्थेने आपल्या दोन दिवंगत सभासदांच्या कुटुंबांना मोठा आधार दिला आहे. संस्थेच्या मयत कल्याण निधीतून (मृत्यु निधी) कै. गणपती दिवेकर आणि कै. सुनील सोनार या दोन मयत सभासदांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १५ लाख रुपयांची कर्जमाफी मंजूर करण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयाची माहिती संबंधित कुटुंबीयांना लेखी पत्राद्वारे नुकतीच देण्यात आली.
यावेळी आयोजित कार्यक्रमात संस्थेचे चेअरमन श्री. सदाशिव दिवेकर यांनी स्वागत केले. या प्रसंगी व्हाईस चेअरमन श्रीमती शुभांगी पेडणेकर, शिक्षक बँक संचालक शिवाजी बोलके, मार्गदर्शक सुभाष विभूते,आनंदा भादवणकर, शिक्षक समिती अध्यक्ष व संचालक एकनाथ गिलबिले, आनंदा पेंडसे, तुकाराम तरडेकर, मनोहर कांबळे, अनिल गोवेकर, धनाजी चौगुले, भारती चव्हाण, सुरेखा नाईक तसेच मॅनेजर तुकाराम प्रभू, रघुनाथ भोगूलकर, आनंदा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

मुंबई – पंजाब आज हाय व्होल्टेज ड्रामा

आयपीएल चषकातील अंतिम फेरी गाठण्यासाठी मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्स पंजाब असा महत्त्वाचा सामना आज नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे होत आहे. सायंकाळी ७.३० वाजता होणाऱ्या या सामन्यावर पावसाची संकट असून सामना रद्द झाल्यास नव्या नियमानुसार पंजाब अंतिम फेरीत पोहोचणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हा सामना व्हावा अशी मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांची अपेक्षा आहे.

छायावृत्त…

गोकुळचे नवीन अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांचा आजरा तालुक्यातील राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींच्या उपस्थितीत के.पी. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

छाया वृत्त

राज्यस्तरीय आदर्श शिक्षण संस्था चा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. प्रकाश नामदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते स्वीकारताना स्वामी विवेकानंद शिक्षण व संस्कृती प्रसारक मंडळ, आजराचे अध्यक्ष प्रा.डॉ.सुधीर मुंज व शिक्षक




