

सर्फनाला प्रकल्पात यावर्षी पाणीसाठा करणार :आ .आबिटकर

आजरा: प्रतिनिधी
आजरा तालुक्यातील सर्व पाटबंधारे प्रकल्प पूर्ण झाले आहेत. फक्त सर्फनाला प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचे कांही प्रश्न मार्गी लागण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. हे प्रश्न मार्गी लावून यावर्षी या प्रकल्पाची घळभरणी करून कोणत्याही परिस्थीतीत पाणीसाठा केला जाईल. अशी ग्वाही आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली. या परिसराचे रुपडे पालटणार असून शेतकऱ्यांनी सद्यस्थितीत एक गुंठाभरही जमीन विकू नये असे आवाहनही त्यांनी केले.
घाटकरवाडी (ता. आजरा) येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी विभागीय कार्यालय गडहिंग्लज उपविभाग आजरा अंतर्गत आंबोली (जि. सिंधूदुर्ग) येथे नवीन रोहीत्र व विद्युत वाहीनीचा लोकार्पण सोहळा आमदार आबिटकर यांच्या हस्ते झाला. गडहिंग्लज विभागाचे कार्यकारी अभियंता वीरकुमार अडके, आजऱ्याचे उपविभागीय कार्यकारी उपअभियंता मिसाळ, सर्फनाल्याचे कनिष्ठ अभियंता शरद पाटील, कल्याणराव निकम प्रमुख उपस्थित होते.

आमदार आबिटकर म्हणाले, संकेश्वर बांदा महामार्गासह शक्तीपिठ महामार्ग या भागातून जाणार आहे. निसर्ग संपदा भरपूर आहे. येथे हत्ती संगोपन केंद्र झाल्यास विकासाला गती मिळणार आहे. भविष्यात या भागाला चांगले दिवस येणार असून शेतकऱ्यांनी गुंठाभर जमिनही विकू नये.
आजरा कारखान्याचे संचालक गोविंद पाटील म्हणाले, इको सेन्सिटिव्ह झोनमधून घाटकरवाडी, सुळेरान, धनमोळा, किटवडे ही गावे वगळावीत त्यामुळे विकासाचा मार्ग खुला होईल. हत्ती संगोपन केंद्र उभारण्यासाठी आमदार आबिटकर यांच्या पाठीशी राहू. जागा उपलब्ध असल्याने येथे विकासाचे प्रकल्प आणावेत, शेतीला दिवसा वीज द्यावी. किटवडे सरपंच लहू वाकर, सुळेरान सरपंच शशिकांत कांबळे, दाभिलचे सरपंच युवराज पाटील, श्रावण कांबळे, संदिप कांबळे, श्रावण वाझे, मायकेल फर्नाडीस, विजय थोरवत, संतोष भाटले, जयसिंग पाटील, शंकर पाटील, भिकाजी सांवत, डॉ. धनाजी राणे, हंबीरराव आडकुरकर संदेश पाटील, ओंकार राऊत, संतोष भाटले यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
किटवड्याची ओळख जगात पोचवणार…
आजरा तालुक्यातील किटवडे हे गाव प्रति चेरापूंजी म्हणून आळखले जाते. यावर्षी कार्यकर्त्यांसह देशभरातील प्रसारमाध्यमांना बोलावून भर पावसात जल्लोष करून किटवड्याची वेगळी ओळख जगासमोर आणणार असल्याचेही आमदार आबिटकर यांनी सांगीतले.
पिक पध्दतीत बदल करा…
आजरा तालुक्याच्या पश्चिम भागात सातत्याने अतिवृष्टी होत असल्याने पावसाचे प्रमाण व पावसाळ्यात पोषक अशी परिस्थिती लक्षात घेवून केवळ ऊसावर अवलंबून न राहता. या हवामानात टिकणारी इतर पिकेही घ्यावीत. याकरीता कृषी महाविद्द्यालयातील संशोधकांची मदत देण्यात येईल. शेतक-यांनी याचा फायदा घ्यावा. असे आवाहनही आमदार आबिटकर यांनी केले.

पेरणोलीत महिलांनी जलजीवनचे काम बंद पाडले

आजरा : प्रतिनिधी
पेरणोली ता. आजरा येथील रवळनाथ काँलनीत जलजीवनच्या योजनेपासून बहुतांश कुटुंब वंचित राहीत असल्याने जेसीबीच्या सहाय्याने सुरू असलेले जलवाहीनीचे काम महिलांनी थांबवले.
पेरणोलीत जलजीवनमधून गेले वर्षभर जलवाहिनी बसवण्याचे काम सुरू आहे.येथील रवळनाथ काँलनीत चार दिवसापासून जलवाहिनीचे काम सुरू आहे.काँलनीत अर्ध्यापर्यंत जलवाहिनी बसवण्यात येत असल्याने संतप्त महिलांनी जेसीबीच्या सहाय्याने सुरू असलेले काम बंद पाडले.जोपर्यंत पूर्ण काँलनीत योजना लागू करत नाही तोपर्यंत काम थांबवण्याचा इशारा महिलांनी दिला आहे.
काम थांबवण्यात ग्रामपंचायत माजी सदस्या विमल गुरव,शालन येरूडकर,अंजना जोशीलकर,सुनिता सावंत,सुनिता येरूडकर,गिता दळवी,गिता सुतार,सुरेखा गुरव,सुरेखा जाधव आदी अ समावेश होता.

आजरा तहसील कार्यालयावर शुक्रवारी धरणे आंदोलन

आजरा : प्रतिनिधी
देश पातळीवरील कर्मचारी कृती समिती व शेतकरी संघर्ष समिती माध्यमातून देशाभरात एक दिवसाचे वेगवेगळ्या मागण्यांसाठी आंदोलन होत असल्याने, आजरा येथील सर्व श्रमिक संघटना,पेन्शनर, गिरणीकामगार व काजू उत्पादक शेतकरी यांचे वतीने शुक्रवार दिनांक १६फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनाद्वारे कंत्राटी, मानधनी, तात्पुरती या नेमणुका बंद करून, शासनाने कायम स्वरूपात रिक्त जागांवर ताबडतोब भरती करावी,कर्मचाराना किमान वेतन २६०००/- व किमान बोनस १००००/- दिला पाहीजे, सर्व पिकांना उत्पादन खर्चाच्या दिड पट हमी भाव मिळावा, काजू बियांना २००/- रूपये हमी भाव मिळावा, गिरणी कामगारांना मुंबई येथे मोफत घरे मिळाली पाहीजेत, इ पी एफ ९५ च्या पेन्शनधारकांना किमान ९०००/- पेन्शन व महागाई भत्ता मिळाला पाहीजे या मागण्या करण्यात येणार असल्याचे
काॅ. शांताराम पाटील यांनी सांगितले .

सरपंच ओळखपत्र वितरण कार्यक्रम

आजरा: प्रतिनिधी
सरपंच परिषद मुंबई (महाराष्ट्र) यांच्या पाठपुराव्याने पंचायत समिती आजरा यांचे कडुन आजरा तालुक्यातील सर्व ७३ सरपंचांना ‘सरपंच ओळखपत्राचे ‘ वाटप गट विकास अधिकारी संजय ढमाळ यांचे हस्ते करणेत आले.
सक्षम ग्रामपंचायत व सन्मानित सरपंच या उद्द्देशाने कार्यरत असलेल्या सरपंच परिषद मुंबई (महाराष्ट्र) ने सरपंचांचा सन्मान वाढविणेचा एक भाग म्हणून त्यांचा ओळखपत्र प्रदान कार्यक्रम घेणेत आला. जिल्हयातील सर्व तालुक्यातील सरपंचाना ओळखपत्र वितरणाची व्यवस्था लवकरात लवकर पूर्ण करवून घेण्याचा मानस जिल्हाध्यक्ष जी.एम. पाटील यांनी आपल्या मनोगतात बोलून दाखविला.
राज्य सरचिटणीस राजू पोतनीस यांनी सरपंच परिषदेच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी परिषदेने कंबर कसली आहे असे सांगितले.
यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात शिवाजी गणपती पाटील सरपंच ग्रा. पं. कोरीवडे,सौ.प्रियांका जाधव इत्यादीना गट विकास अधिकारी यांचे हस्ते ओळखपत्रे प्रदान करणेत आली. राजर्षी शाहू प्रतिष्ठाण, महाराष्ट्र राज्य पूणे,यांचे मार्फत देणेत आलेला ‘आदर्श सरपंच पुरस्कार सोहाळेच्या सरपंच सौ. भारती कृष्णा डेळेकर ,युवराज दत्तू पाटील सरपंच, दाभिल यांना श्री.स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट शिरूर, नाशिक यांचा आदर्श सरपंच पुरस्कार,कोळींद्रे गावास,. जि.प. कोल्हापूर यांचेकडील महा अशआवास योजना २०२२-२३ जिल्हास्तरीय तृतिय क्रमांक मिळाल्याने या सर्वांचे अभिनंदन पुष्पगुच्छ देऊन गट विकास अधिकारी संजय ढमाळ, यांचे हस्ते , सहाय्यक गट विकास अधिकारी दिनेश शेट व परिषदेच्या पदाधिका-यांचे उपस्थितीत करणेत आला.
यावेळी विविध गावचे सरपंच व सरपंच परिषदेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ग्रामसेवक मुरली कुंभार व आभार ग्रामसेवक सचिन गुरव यांनी मानले.

पोळगाव येथे आरोग्य शिबिर

आजरा : प्रतिनिधी
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पोळगाव येथे आजरा तालुका शिवसेना (उ.बा.ठा.)च्या वतीने आरोग्य शिबिर घेण्यात आले.शिबिरामध्ये विविध रुग्णांची तपासणी मान्यवर डॉक्टरांच्या मार्फत करण्यात आली.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील शिवसेना तालुकाप्रमुख युवराज पोवार, शिवसेना तालुकाप्रमुख संजय येसादे, पोळगाव च्या सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.

मुखपृष्ठ प्रसिद्धी समारंभ उत्साहात

आजरा: प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने ज्ञानाची आस, गुणवत्तेचा विकास, व्यावसायिकतेचा ध्यास या अनुषंगाने “आजचा निश्चय, पुढचं पाऊल” या पुस्तिकेचे मुखपृष्ठ समारंभ पूर्वक आमदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आले.
मराठा समाजाला आज ज्ञानसंपत्ती, गुणात्मकतेची व्यावसायिकतेची मोठी गरज आहे. त्यासाठीची ही जनजागृती मोहीम आहे. या पुस्तिकेमध्ये ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानातील स्वीकारार्ह बदल, आरक्षण, विवाह सोहळे, कुटुंबसंस्था, जमिनीचे रेकार्ड कसे ठेवाल, प्रगत शेती, विधिसाक्षरता, अर्थसाक्षरता, नको नुसत्याच MPSC च्या बाटा, स्मार्ट फोन सोशल मिडियाचा वापर, विविध प्रकारचे शासकीय दाखले, केंद्र व राज्य सरकारच्या व विविध महामंडळांच्या कर्ज योजना, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या शासकीय आणि खाजगी १२५ शिष्यवृत्तींची माहिती, प्रक्रिया उद्योग, वसतिगृह, निर्वाह भत्ता, अशी उपयुक्त माहिती या पुस्तिकेत प्रसिध्द करण्यात येणार आहे.
या पुस्तिकेच्या माध्यमातून राज्यभरात महासंघाचे कार्यकर्ते प्रत्यक्ष कुटुंबाना भेट देऊन वितरीत करणार आहेत. त्यामुळे सुमारे ३ लाख व्यक्तींपर्यंत समाज संघटन व सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, व्यावसायिक जागृतीसाठी हा उपक्रम असून आपल्या जिल्ह्यामध्ये महासंचाचे सर्व पदाधिकारी सभासद हे जनजागृतीसाठी परोपर संपर्क साधणार आहेत. या पुस्तिकेच्या माध्यमातून QR Code च्या द्वारे नामवंत व्यक्तींच्या समाजाला संदेश तसेच विविध प्रकारची माहिती महासंघातर्फे बांधवांपर्यंत पोहोचवली जाणार आहे असे मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष मारुती मोरे यांनी सांगितले.
यावेळी मराठा महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

आजऱ्यात नाट्यछटा स्पर्धेचे आयोजन

आजरा:प्रतिनिधी
कै.शुभांगी वायंगणकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ आजरा येथे मंगळवार दिनांक २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरा येथे सकाळी १०.३० वाजता तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी नाट्यछटा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धा दोन गटात होणार असून इयत्ता पहिली ते पाचवीचा पहिला गट व सहावी ते नववीचा दुसरा गट असून विजेत्या स्पर्धकांना रोख बक्षीस, स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात येणार असल्याचे वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. अशोक बाचूळकर यांनी सांगितले सांगितले.




