mrityunjaymahanews
अन्य

Ground Report

हात्तिवडे-मलिग्रे गटात काट्याची टक्कर

विष्णुपंत विरुद्ध प्रा. शिंत्रे सामना रंगणार


              ✍️✍️✍️ज्योतिप्रसाद सावंत

     आजरा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष विष्णुपंत केसरकर यांच्या बालेकिल्ल्यात विद्यमान अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे यांनी केसरकर यांना थेट आव्हान दिल्याने हात्तिवडे- मलिग्रे उत्पादक गटात काट्याची टक्कर अपेक्षित आहे. नवख्या उमेदवारांना घेऊन प्रा. शिंत्रे हे केसरकर, अनिल फडके यांच्यासारख्या जुन्या व मातब्बर उमेदवारांना टक्कर देण्यासाठी ण्यासाठी सज्ज झाले आहेत.

       गेली तीस वर्षे केसरकर हे या उत्पादक गटातून कारखान्यात प्रतिनिधित्व करीत आहेत त्यांची या उत्पादक गटावर चांगली पकड आहे. गेल्या दोन तीन वर्षांमध्ये केसरकर व प्रा.शिंत्रे यांच्यातील संबंध बऱ्यापैकी ताणले गेले याची प्रचिती वेळोवेळी येत होती.अनुत्पादक व ब वर्ग इतर संस्था गटातून यापूर्वी निवडून आलेले प्रा. सुनील शिंत्रे यांनी यावेळी मात्र या उत्पादक गटातूनच निवडणूक लढवण्याचा निर्णय सुरुवातीपासून घेतला. या निर्णयामुळेही केसरकर व शिंत्रे यांच्यातील संबंध दुरावण्याचे आणखी एक कारण ठरले.

     अनिल फडके सलग दोन वेळा या उत्पादक गटातून कारखान्यावर निवडून गेले आहेत तर तालुका खरेदी विक्री संघाचे माजी संचालक संभाजी पाटील (हात्तिवडे), सुरेश सावंत आनंदा बुगडे यांना मात्र विजयापर्यंत पोहोचण्यासाठी बरीच खटपट करावी लागणार आहे.

      या उत्पादक गटामध्ये इतर गटांच्या तुलनेत सर्वात कमी म्हणजे ४०८५ इतके मतदान आहे. बहुतांशी मतदार हा बाहेरगावी आहे. प्रा. शिंत्रे यांना याच मतदारसंघात रोखण्यासाठी राष्ट्रवादीने जोरदार फिल्डिंग लावली आहे तर रवळनाथ विकास आघाडीने विष्णुपंत केसरकर यांना ‘ लक्ष्य ‘ बनवले आहे.केसरकरांना त्यांच्या बालेकिल्ल्यातच रोखण्यात प्रा.शिंत्रे यांना यश येणार का ? याकडे संपूर्ण सभासद वर्गाचे लक्ष लागून आहे.


मयत व बाहेरगावचे सभासद ठरत आहेत उमेदवारांच्या दृष्टीने डोकेदुखी

                     आजरा:प्रतिनिधी

आजरा साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. शेवटच्या टप्प्यात प्रचारात चांगलीच रंगत आली आहे. मतांची गोळा बेरीज सुरू असताना मयत, बाहेरगावी असणारे व पत्ता न सापडणारे सभासद उमेदवारांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरू लागले आहेत. कारखान्याकडे एकूण २५ हजार १८१ ‘ अ ‘ वर्ग सभासद आहेत तर अनुत्पादक ‘ ब ‘ वर्ग सभासदांची संख्या ७६०३ इतकी आहे. सद्यस्थितीस एकूण सुमारे चार हजार सातशे सभासद मयत आहेत. तर काम- धंद्यानिमित्य मुंबई, इचलकरंजी, पुणे, कोल्हापूर येथे असणाऱ्या सभासदांची संख्याही मोठी आहे.

     सध्या दिवाळीची सुट्टी संपली आहे. त्यामुळे मतदान प्रक्रियेला सामोरे जाण्यासाठी बाहेरगावचे सभासद येतीलच याची खात्री देता येत नाही. दोन्ही आघाड्यांकडून मतदार आणण्याकरता जोरदार प्रयत्न सुरू आहेत. परंतु मुंबईस्थित मतदारांना या प्रक्रिये करीता किमान दोन दिवसांचा कालावधी द्यावा लागणार आहे. सुमारे २००० मतदार मुंबई येथे असल्याचे समजते. त्यामुळे याचा एकूण परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर होणार आहे.एकूण ६५ ते ७०% मतदान होण्याची शक्यता आहे.

     मयत सभासदांच्या वारसांनी वेळीच वारस नोंद न घातल्यामुळेही अनेकांना मतदानापासून वंचित रहावे लागणार आहे.

एक मत पडणार तीन हजार रुपयांना

    मुंबईस्थित मतदारांना आणण्याकरता लक्झरी गाड्यांची व्यवस्था करण्याचे काम सुरू आहे. प्रवास खर्च व नाश्ता-जेवणाचा खर्च धरल्यास हे एक मत सुमारे तीन हजार रुपयांना पडणार आहे.


संबंधित पोस्ट

बहिरेवाडी येथे मुलाकडून वृद्ध बापाचा खून…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या…

mrityunjay mahanews

चाफवडे हायस्कूल स्थलांतरास विरोध कायम…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!