

त्यांनी अखेर मृत्युला कवटाळले…
होनेवाडी येथील सखाराम पाटील यांचा मृत्यू…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
अपमान जिव्हारी लागल्याने नैराश्यातून विष प्राशन केलेल्या होनेवाडी ता.आजरा येथील सखाराम जोती पाटील या ६५ वर्षीय व्यक्तीचा अखेर गडहिंग्लज येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.
याबाबत पाटील यांचे कुटुंबीय व पोलीसांकडून मिळालेली माहिती…
सखाराम पाटील यांना गावातील एका व्यक्तीने शेती कामाकरिता बोलावले होते. परंतु सखाराम हे कामाकरिता न गेल्याने संबंधिताने त्यांना कामावर का आला नाही ? असा जाब विचारत इतर उपस्थितांसमोर अपमानास्पद वागणूक दिली. हा प्रकार सहन न झाल्याने नैराश्यातून सखाराम यांनी विष प्राशन केले. त्यांच्यावर गडहिंग्लज येथे पाच दिवस उपचार सुरू होते उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
सखाराम यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन विवाहित मुली, सून, जावई नातवंडे असा परिवार आहे.
अधिक चौकशी करता सखाराम यांना अपमानास्पद वागणूक देणाऱ्या होनेवाडी येथील संबंधिताविरोधात सखाराम यांनी दिलेल्या मृत्युपुर्व जबाबावरून गुन्हा नोंद केल्याचे समजते.

रवळनाथ पतसंस्थेच्यावतीने खा. शाहू छत्रपती यांचा सत्कार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथील श्री रवळनाथ पतसंस्थेच्यावतीने कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून श्रीमंत छत्रपती शाहू छत्रपती यांची खासदारपदी निवड झालेबद्दल त्यांचा व आमदार सतेज पाटील यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक जयवंतराव शिंपी होते.
खासदार छत्रपती शाहू व आमदार सतेज पाटील आजऱ्याला आभार दौऱ्यानिमित्त आले असता त्यांनी संस्थेला सदीच्छा भेट दिली. सुरुवातीला संस्थेच्यावतीने खासदार शाहू छत्रपती व आमदार पाटील यांचे औक्षण करण्यात आले. त्यानंतर संस्थेच्या सभागृहात सत्कार कार्यक्रम पार पडला. स्वागत संस्थेचे अध्यक्ष अभिषेक शिंपी यांनी करुन संस्थेच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतला. खासदार शाहू छत्रपती व आमदार पाटील यांनी संस्थेच्या कामकाजाचे कौतुक केले. खासदार शाहू छत्रपती यांचा जयवंतराव शिंपी यांच्या हस्ते तर आमदार सतेज पाटील यांचा अहंमदसाब मुराद यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आले.
कार्यक्रमास व्ही.बी.पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष समीर गुंजाटी, संचालक किरण कांबळे, विक्रम पटेकर, विश्वास जाधव, विलास कुंभार, इब्राहीम इंचनाळकर, सुधीर नार्वेकर, युसूफ गवसेकर, मजीद मुराद, सौ. माधुरी पाचवडेकर, अर्चना मराठे, सचिन शिंपी, सुनील पाटील, मंजूर मुजावर यासह सभासद उपस्थित होते. आभार मॅनेजर विश्वास हरेर यांनी मानले.

स्वामी विवेकानंद पतसंस्थेत तीन नूतन संचालकांची निवड

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथील स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्थेच्या रिक्त झालेल्या तीन संचालक पदावर अनुक्रमे सारिका नाथ देसाई (आजरा), गणपत धोंडीबा जाधव (होनेवाडी) व शिवाजीराव जिवबा येसणे ( मडिलगे) यांची निवड करण्यात आली आहे. नूतन संचालकांचा सत्कार सहाय्यक निबंधक सुजयकुमार येजरे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष जनार्दन टोपले, उपाध्यक्ष दयानंद भुसारी व सर्व संचालकांसह सरव्यवस्थापक अर्जुन कुंभार, सुकाणू समिती सदस्य अरुण देसाई, सुधीर मुंज, मलीककुमार बुरुड, उत्तम कुंभार उपस्थित होते.
उपाध्यक्ष दयानंद भुसारी यांनी आभार मानले.

आमदार प्रकाश आबिटकर आज आज-यात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
राधानगरी भुदरगड चे आमदार प्रकाश आबिटकर हे आज शनिवारी आजरा येथे विविध कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
सकाळी साडेदहा वाजता येथील शिवाजीनगर रहिवाशांकडून हॉटेल मॉर्निंग स्टार मधील सभागृहात विशेष सत्कार समारंभ त्यानंतर नगरपंचायत आजरा येथे नूतन पाणीपुरवठा योजनेच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठकीस ते उपस्थित राहणार आहेत.




