mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

 

  वरिष्ठांचे दुर्लक्ष…?

भाजपात खदखद

              आजरा : मृत्युंजय महान्यूज

        आजरा येथे नुकत्याच पार पडलेल्या भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात तुमच्या पालकमंत्र्यांचा आम्हाला त्रास आहे… समरजीतराजे घाटगेच आमचे लोकसभेचे उमेदवार असतील… अशी विधाने वरिष्ठ नेत्यांच्या साक्षीने भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोकअण्णा चराटी यांनी केली. चराटी यांचे हे बोलणे म्हणजे भाजपाच्या इतर वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना गरजेच्या वेळी दुर्लक्षित केल्याने प्रातिनिधीक स्वरूपात व्यक्त केलेली खदखद असेच म्हणावे लागेल.

       वास्तविक आजरा तालुक्यात भाजपाची पाळेमुळे गेल्या कित्येक वर्षापासून रुजली आहेत .जिल्ह्यात भाजपाचे नाव नसताना आजरा तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मात्र भाजपा जिवंत ठेवण्याचे व भाजपाला खतपाणी घालण्याचे काम केले. पंतप्रधान मोदी यांच्या लाटेमुळे इतर पक्षातील अनेक मंडळी भाजपाच्या या प्रवाहात सामील झाली आहेत. त्यांनी देखील भाजपाला तालुक्यात पुढे नेण्याचे काम समर्थपणे चालवले आहे.

       असे असताना कार्यकर्त्यांना ज्या-ज्या वेळी वरिष्ठ नेते मंडळींची गरज भासेल त्या- त्या वेळी या मंडळींनी हातचा राखून काम केल्याचे दिसते. त्यांना स्वतंत्र लढण्याची ताकद न मिळाल्याने बऱ्याच वेळा स्थानिक तडजोडी करण्याशिवाय पर्याय राहिलेला दिसत नाही. यामुळे कधी शिवसेनेचे संभाजी पाटील, सुनील शिंत्रे तर कधी आम.सतेज पाटील समर्थक अभिषेक शिंपी तर कधी काँग्रेसच्या अंजनाताई रेडेकर यांना सोबत घेऊन विविध निवडणुकांना सामोरे जाण्याची वेळ कार्यकर्त्यांवर आली. यापूर्वी परस्पर विरोधात लढलेल्या मंडळींसोबत हात मिळवणी केल्याने मने जुळताना अनेक अडचणी निर्माण होत असल्याचे दिसते.

      तालुका खरेदी विक्री संघ, जिल्हा बँक,आजरा साखर कारखाना निवडणुकीत वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक पातळीवर प्रचारात सहभागी होण्यापासून सोयीस्करपणे बाजू काढली. राज्यात व केंद्रात सत्तेत असणाऱ्या भाजपाचा जिल्हा उपाध्यक्ष आजरा साखर कारखाना निवडणुकीला सामोरे जात असताना भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची एकही सभा होऊ शकली नाही. एकीकडे राष्ट्रवादीचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील, माजी आमदार के. पी. पाटील हे थेट सभा घेताना दिसत असताना भाजपा कार्यकर्ते मात्र वरिष्ठ नेत्यांच्या भूमिकेमुळे हतबल दिसत होते. परिणामी या निवडणुकीत धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागेल.

      वरिष्ठ नेते मंडळी जर ताकद देत नसतील तर यापुढे निवडणूक रिंगणात कोणाच्या जीवावर उतरायचे ? असा प्रश्नही आता सामान्य कार्यकर्ते उपस्थित करत आहेत. नगरपंचायत निवडणुकीसह जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत भाजपा समोर मोठे आव्हान उभे ठाकणार आहे. चराटी यांच्या विधानाची वरिष्ठांनी गांभीर्याने दखल घेऊन स्थानिक कार्यकर्त्यांना बळ देण्याची गरज प्रकर्षाने अधोरेखित होऊ लागली आहे.

आता चिन्हावरच निवडणुका लढवा…

     यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये भाजपाने पक्षचिन्हावर निवडणूक लढवण्याचे टाळले होते. याचा फटकाही वरिष्ठ नेते प्रचाराला येण्यात बसत होता. यापुढे तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपाने थेट चिन्हावर लढवाव्यात जेणेकरून चिन्हासाठी तरी वरिष्ठ नेते मंडळी तालुक्यात निवडणुकांदरम्यान येऊन भाजपा कार्यकर्त्यांना ताकद देतील अशी अपेक्षा आता कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

लोकसभेसाठी आजऱ्यातील तरुणाला मिळाली उमेदवारी

                 आजरा : मृत्युंजय महान्यूज

       गरिब सेनेच्या वतीने आजऱ्यातील तरुण हाफिज इरफान चाॅंद यांना कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून पक्षाची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा पक्षाचे अध्यक्ष सतिष भंडारे यांनी कुरुंदवाड येथे केली.

       इरफान चाॅंद हे आजऱ्यातील अनेक सामाजिक कामात अग्रेसर असतात.त्यांच्या कामाची दखल घेत गरिब सेनेने त्यांना उमेदवारी दिली आहे. प्रथमच आजरा तालुक्यातून लोकसभा निवडणुकीला एक तरुण सामोरा जात आहे.

पेरणोली,गवसे परिसरात संविधान बचाव दिंडीला प्रतिसाद

              आजरा : मृत्युंजय महान्यूज

        पेरणोली व गवसे परिसरात संविधान दिंडीला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.दिंडीत पश्चिम भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.महागोंड येथून सकाळी ९ वाजता दिंडीला सुरवात झाली.वझरे येथून पेरणोलीत दिंडी झाल्यानंतर सभा घेण्यात आली.यावेळी डाँ.उल्हास त्रिरत्ने यांनी नागरिकत्व कायदा देशविरोधी असून समाजात भेदभाव करणारा असल्याचे सांगितले.

      यानंतर हरपवडे,कोरीवडे,देवकांडगाव येथे संविधानाची प्रत हातात घेऊन दिंडी काढण्यात आली .

       दिंडीमध्ये पेरणोलीच्या सरपंच प्रियांका जाधव,उदय पवार,उत्तम देसाई,तानाजी देसाई,कृष्णा सावंत,हरिबा कांबळे,सुरेश कालेकर,सचिन देसाई, दिनेश कांबळे,इनास फर्नांडीस,दिपक लोखंडे,मयुरेश देसाई,रोहीदास दारूडकर,बाळू कोडक,मनोहर कांबळे,मारूती कांबळे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

‘ व्यंकटराव ‘ मध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ

              आजरा : मृत्युंजय महान्यूज

        आजरा महाल शिक्षण मंडळ आजरा संचलित .व्यंकटराव कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय आजरा मध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ २०२३-२४ हा कार्यक्रम आपल्या संस्थेचे अध्यक्ष श्री. जयवंतराव शिंपी यांच्या हस्ते व प्राचार्य डॉ. सुभाष शेळके यांचे अध्यक्षतेखाली पार पडला .

        सर्व विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके वितरण तसेच विविध क्षेत्रात विशेष कामगिरी केलेल्या प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला.

          या समारंभ प्रसंगी संस्थेचे सचिव श्री. एस. पी. कांबळे, संचालक श्री. अभिषेक शिंपी, श्री. पांडुरंग जाधव, श्री. सुनील देसाई, श्री. सुनील पाटील, व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा चे प्राचार्य श्री. आर. जी. कुंभार, सर्व प्राध्यापकवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.

विठ्ठल दुध संस्थेची निवडणूक बिनविरोध

               उत्तूर : मृत्युंजय महान्यूज

          चिमणे (ता.आजरा) येथील विठ्ठल दुधसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. निवडणूक निर्णय आधिकारी म्हणून बी. बी. गुरव यांनी काम पाहिले.संस्थेच्या चेअरमनपदी प्रमोद तारळेकर व व्हा.चेअरमन पदी संतोष आजगेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संचालक पदी सुधाकर शिवणे, गोविंद खेडेकर, अलका तारळेकर,हौशाबाई पाटील,कुंडलिक गुरव,गुणवंता मांग,शिवाजी तवंदकर यांची निवड झाली.


संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

पवित्र क्षेत्र श्री रामतीर्थ आजरा येथे धबधब्याशेजारी लघुशंका , अश्लील चाळे

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

error: Content is protected !!