
आजऱ्यातील एकाला जनावरांचे मांस नेताना रंगेहात पकडले …एकजण फरारी
आंबोली येथे वन विभाग व पोलीस खात्याची संयुक्त कारवाई

जनावराच्या मांसाची बेकायदेशीररित्या वाहतूक केल्याप्रकरणी आंबोली येथील पोलिसांनी आजऱ्यातील एकाला ताब्यात घेतले आहे, तर अन्य एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला. ते मांस गवा रेड्याचे असावे, असा वन अधिकाऱ्यांचा प्राथमिक अंदाज आहे. ही घटना काल रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास घडली. इर्शाद नुरमुहम्मद बेपारी (वय ४४, रा. आजरा, ) असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे.
दरम्यान पुढील कारवाईसाठी हा गुन्हा वनविभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. तर हे मांस तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे, अशी माहिती आंबोली वनक्षेत्रपाल विद्या घोडके यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, आंबोलीत रात्री ड्युटी करीत असलेल्या आंबोली पोलिस ठाण्याचे हवालदार दत्ता देसाई व त्यांचे सहकारी दिपक शिंदे, मनिष शिंदे, राजेश गवस, अभिषेक सावंत आदींनी मारुती ओमनी कार कोल्हापुरहून सावंतवाडीच्या दिशेने संशयास्पद रीतीने येताना दिसली. यावेळी त्या गाडीला थांबण्यासाठी त्यांनी इशारा केला असता त्या चालकाने पाऊस व धुक्याचा फायदा घेत तेथून सावंतवाडीच्या दिशेने भरधाव वाहन हाकत पळ काढण्याचा प्रयत्न केला.
यावेळी गाडी तातडीने वनविभागाच्या नाक्याकडे अडविण्यात आली. गाडीची तपासणी केली असता त्यात पिशव्यामध्ये भरलेले मांस दिसून आले. मांसासह इर्शाद याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबतची माहिती आंबोली वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली.
संबंधित मांस हे नेमके कोणत्या प्राण्याचे आहे ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असून ते मांस गवा रेड्याचे असल्याचा अंदाज आहे. त्यानुसार ताब्यात घेण्यात आलेल्या इर्शाद यांच्यावर कारवाई करण्याचे काम सुरू असून पळून गेलेल्या अन्य संशयितांचा शोध सुरू आहे.







