शुक्रवार दि.३१ जानेवारी २०२५

ब्रेक फेल…
ट्रकचा झाला खुळखुळा
सात लाखांचे नुकसान

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
दिल्लीहून गोव्याच्या दिशेने बांधकाम स्टील घेऊन जाणाऱ्या ट्रकचे देव कांडगाव नजीक उतारावर ब्रेक फेल झाल्याने ट्रकचे टायर सुटून ट्रक ओढ्यात कोसळून सुमारे सात लाखांचे नुकसान झाले आहे. यामध्ये ट्रक चालकासह क्लीनरही जखमी झाला आहे.
याबाबत क्लीनर सुग्रीव धानूक रा.शैसराम, ग्वालियर, मध्य प्रदेश यांनी दिलेली माहिती अशी…
दिल्ली येथे बांधकाम स्टील भरून गोव्याच्या दिशेने गारगोटी मार्गे जाणारा ट्रक देव कांडगाव नजीकच्या उतारावर आल्यानंतर ट्रकचे ब्रेक फेल झाले व चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला. ट्रक जोरदार आपटल्याने टायर सुटून ट्रक पासून बाजूला झाले व ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. हे नुकसान सुमारे सात लाख रुपये इतकी आहे. चालक आशिष गुरजर रा. मुरैना, ग्वालियर,मध्य प्रदेश व गुरु दयाल भारती रा.उत्तमापूर मध्य प्रदेश हे देखील जखमी झाल़े आहेत.

वनविभागाकडून गव्याला जीवदान

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आंबाडे (ता. आजरा) येथे कोरड्या विहीरीत पडलेल्या गव्याला वनविभागाने ग्रामस्थांच्या मदतीने जीवदान दिले आहे. विष्णु शिवणगेकर यांच्या विहीरीत गवा पडला होता. आज दुपारी जेसीबीच्या सहाय्याने चर मारून गव्याला बाहेर काढले व जंगलात सोडून देण्यात आले.
शिवणगेकर यांची शेतात कोरडी विहीर आहे. या विहीरीत रात्री गवा पडला. त्याला विहीरीतून बाहेर पडता येत नव्हते. याची माहीती शिवणगेकर यांनी वनविभागाला दिली. वनविभागाने जेसीबीच्या सहाय्याने गव्याला बाहेर काढले. सुमारे तीन तास गव्याला बाहेर काढण्याचे काम सुरु होते.
उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद, सहाय्यक वनसंरक्षक नवनाथ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आजरा परिक्षेत्र वनाधिकारी मनोजकुमार कोळी, धनगरमोळाचे वनपाल भरत निकम, पारपोलीचे वनरक्षक संजय दंडगे, धनगरमोळ्याचे वनरक्षक दीपक कदम व वनजीव बचाव पथक घाटकरवाडी यांनी मदत मोहीमेत भाग घेतला. गवा बाहेर पडल्यावर जंगलाच्या दिशेन निघून गेला.

आजरा शहर व परिसरात टायफाईडसदृश्य व काविळीच्या रुग्णात वाढ

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरासह परिसरात टायफाईड (विषमज्वर) सदृश्य रुग्ण वाढले आहेत. यामध्ये काविळीचेही रुग्ण सापडल्याचे आरोग्य विभागातून सांगण्यात येते. खाजगी दवाखान्यात देखील उपचार घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
पटेल कॉलनीमध्ये रुग्ण सापडल्यामुळे येथे आरोग्य विभागाच्यावतीने तातडीने सर्व्हेक्षण मोहीम राबविण्याबरोबर पाणी नमुने तपासण्यासाठी पाठविले आहेत.
शहरात आठवडाभरापासून टायफाईड सदृश्य रुग्णांची संख्या वाढली आहे. त्याचबरोबर काही भागात काविळीचे रुग्ण मिळाले आहेत. यामध्ये पटेल कॉलनीमध्ये दोन रुग्ण मिळाले आहेत. आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. त्यांनी घरोघरी सर्व्हेक्षण सुरु केले आहे. पाणी उकळून व गाळून पिण्याचे आवाहन केले आहे. पटेल कॉलनीला बुरुडे जॅकवेलमधून पाणी पुरवठा होतो. येथील पाणी शेवाळलेले आहे. याबाबतचे पत्र आरोग्य विभागाने बुरुडे ग्रामपंचायतीला दिले आहे.
कांही रुग्णावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहरातील पाणी योजनेला गळतीमुळे दूषित पाणी व पाणी पुरवठा योजनेच्या पाण्यामध्ये मिसळत असल्याचे पुढे येत आहे.

दया नको, हक्काचे पैसे द्या…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सरकार कितीही निर्दयी आणि निष्ठुर वागले तरी महात्मा गांधींनी दिलेल्या सत्याग्रहाच्या अस्त्राचा वापर करून आम्ही आमचा हक्क मिळवू असा असा इशारा आज विधवा, परित्यक्ता, अपंग, निराधार स्त्री – पुरुषांच्या ठिय्या आंदोलनावेळी बोलताना कॉ. संपत देसाई यांनी दिला. आज विधवा परितक्त्या स्त्रियांच्या हस्ते महात्मा गांधींच्या प्रतिमेला पुष्पहार घालून तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली.
कॉ. संपत देसाई पुढे म्हणाले, या देशातल्या प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेने दिला आहे. समान संधी आणि हक्काचे सरंक्षण या कायद्याने राज्य आणि केंद्र सरकारकडून पेन्शन सुरू झाली. पेन्शन हा आमचा हक्क असून कुणी आमच्यावर दया करीत नाही. लाडक्या बहिणींना केवळ मतांसाठी न मागताही १५०० रुपये प्रमाणे एकदम चार महिन्याचे पैसे दिले. पण आमचे हक्काचे पैसे मिळावेत यासाठी आम्हाला लढावे लागते हे वाईट आहे. गांधींनी दिलेल्या सत्याग्रह आणि अहिंसेच्या मार्गाने लढून आम्ही आमचे हक्क नक्कीच मिळवून घेऊ.
यावेळी कॉ. शांताराम पाटील यांनी मनोगत व्यक्त करून पाठिंबा दिला. आंदोलनाचे नेतृत्व सरिता कांबळे, निवृत्ती फगरे, मुकुंद नार्वेकर, शंकर हाळवणकर, पार्वती जाधव, सुशीला होरंबळे यांनी केले.
तहसील कार्यालयाच्या वतीने नायब तहसिलदार श्री. म्हाळसाकांत देसाई यांनी लेखी पत्र देऊन आठ दिवसात सर्वांच्या खात्यात पेन्शन जमा होईल असे सांगितले.
यावेळी शिवाजी चव्हाण, जनाबाई सुतार, सुनील सासुलकर, माया पाटील यांच्यासह विधवा परित्यक्ता, अपंग, स्त्री पुरुष मोठ्या संख्येने हजर होते.
पुढील महिन्यात आरोग्यमंत्री आणि पालकमंत्री प्रकाश आबिटकर व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खा. शाहू महाराज, आ. सतेज पाटील यांच्या उपस्थितीत विधवा परित्यक्ता अपंग स्त्री- पुरुषांची परिषद घेण्याची ठराव एकमुखाने करण्यात आला.

जनता बँकेला सलग सात वेळा बँको ब्ल्यु रिबन सर्वोत्कृष्ट बँक ॲवार्ड

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजऱ्यातील जनता सहकारी बँकेला बँको ब्ल्यु रिबन ॲवार्डने पुन्हा एकदा सन्मानित करणेत आले. रु. ३५० कोटी ठेवी असणाऱ्या देशभरातील सर्व बँकांच्यामधून सर्व आर्थिक निकषामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेबद्दल दि. २८ जानेवारी रोजी लोणावळा येथे आविज पब्लिकेशन ‘बँको’ यांनी भरविलेल्या शिखर परिषदेमध्ये उत्कृष्ट बँक म्हणून सन्मानित करणेत आले. सदरचा पुरस्कार रिझर्व बँकेचे चिफ जनरल मॅनेजर भार्गेश्वर बॅनर्जी यांचे हस्ते व बँकोचे पदाधिकारी अविनाश शिंत्रे आणि अशोक नाईक यांच्या उपस्थितीत बहाल करणेत आला. यावेळी बँकींग तज्ञ अतुल खिरवाडकर उपस्थित होते.
सदरचा पुरस्कार बँकेचे चेअरमन श्री मुकुंददादा देसाई, संचालक श्री महादेव टोपले, श्री. रणजित देसाई व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. एम. बी. पाटील यांनी स्विकारला.
बँकेच्या एकूण ठेवी रु. ३८० कोटी व कर्जे रु. २६० कोटी असून बँकेचा शुन्य टक्के नेट एन.पी.ए. आहे. बँकेच्या एकूण २० शाखा कार्यरत असून परत मुंबई येथे शाखा चालू करणेसाठी रिझर्व बँकेकडे प्रस्ताव पाठविला आहे .
बँकेच्या एकूण २० शाखा पैकी १२ शाखा स्वमालकीच्या इमारतीमध्ये कार्यरत आहेत. बँकेकडे सर्व प्रकारचे अद्यावत टेक्नॉलोजी उदा. स्वतःचे डी.सी व डी.आर सेंटर, मोबाईल बँकींग, आय.एम.पी.एस, गुगल पे, फोन पे, पेटीएम, ई कॉम, पॉज, रिसायकलर ए टी एम मशिन, मायक्रों ए टी एम, आर.टी.जी.एस, एन.ई.एफ.टी. इ. सुविधा आहेत असे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.बी. पाटील यांनी सांगितले.

मुंबईस्थित भादवणकर थेट विमानाने आले गावच्या यात्रेला

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
भादवण ता. आजरा येथील मुंबई स्थित चाकरमानी थेट विमान बुक करून गावच्या महालक्ष्मी यात्रेला आले असल्याने भादवणकरांच्या या नाद खुळा उपक्रमाची चर्चा सध्या सर्व महाराष्ट्रभर सुरू आहे.
हवाई दलात वरिष्ठ अधिकारी म्हणून सेवेत असणाऱ्या भादवणमधील बी. आर. पाटील यांच्या कल्पनेतून पुढे आलेला उपक्रम ग्रामस्थांच्या सहकार्याने पार पडला. यानिमित्त अनेकांची आयुष्यात प्रथमच हवाई सफर झाली आहे. आमदार सतेज पाटील यांनी सर्व भादवणकरांचे कोल्हापूर विमानतळावर स्वागत केले.
यात्रेला विमान बुक करून येणाऱ्या भादवणकरांचा नाद खुळा…
भादवण विकास सोसायटीच्या चेअरमनपदी संभाजी कांबळे.. व्हा. चेअरमनपदी दत्तात्रय पाटील

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
भादवण वि. का. स. (विकास )सोसायटीच्या चेअरमनपदी संभाजी विठ्ठल कांबळे यांची तर व्हा. चेअरमनपदी दत्तात्रय अंबाजी पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी अध्यासी अधिकारी जे. एन. बंडगर होते. चेअरमन मारुती देसाई व व्हा. चेअरमन दशरथ डोंगरे यांनी राजीनामा दिल्यानेने रिक्त झालेल्या पदावर ही निवड करण्यात आली. यावेळी नूतन पदाधिकारी यांचा सत्कार गटनेते उपसरपंच संजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी अशोक गुरव, पांडुरंग केसरकर, मारुती देसाई, दशरथ डोंगरे, दत्तात्रय पाटील, एम. टी. मुळीक संचालिका रुक्मिणी पाटील, रत्नाबाई केसरकर यांच्यासह सभासद उपस्थित होते, आभार सचिव सुभाष पाटील यांनी मानले.

आजरा साखर कारखान्याची ३१ डिसेंबर अखेरची ऊस बिले जमा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चालू हंगामात आजअखेर ७४ दिवसात २,३०,००० मे.टन ऊसाचे गाळप झाले असुन कारखान्याकडे दि.१६. डिसेंबर ते ३१ डिसेंबर अखेर गाळप झालेल्या ऊसाची बिले प्रतिटन रु.३१००/- प्रमाणे रु.१५ कोटी ३६ लाख विनाकपात ऊस पुरवठादार शेतक-यांच्या सेव्हींग खातेवरती जमा करण्यात आली आहेत. तरी संबंधित ऊस पुरवठादार शेतकरी यांनी आपल्या बँकेशी संपर्क साधून बिलाची रक्कम उचल करावी अशी माहिती कारखान्याचे चेअरमन श्री. वसंतराव धुरे यांनी दिली.
यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन श्री. मधुकर देसाई, जिल्हा बँकेचे संचालक तथा बैंक प्रतिनिधी श्री.सुधीर देसाई, संचालक श्री. विष्णू केसरकर, श्री. उदयसिंह पोवार, श्री. मुकुंदराव देसाई, श्री. मारूती घोरपडे, श्री. सुभाष देसाई, श्री. अनिल फडके, श्री. दिपक देसाई, श्री.रणजित देसाई, श्री.संभाजी पाटील (हात्तीवडे), श्री.शिवाजी नांदवडेकर, श्री. राजेंद्र मुरुकटे, श्री.राजेश जोशीलकर, श्री.गोविंद पाटील, संचालिका सौ. रचना होलम, सौ.मनिषा देसाई, संचालक श्री. काशिनाथ तेली, श्री.संभाजी दत्तात्रय पाटील, श्री.अशोक तडेकर, श्री.हरी कांबळे तसेच कारखान्याचे तज्ञ संचालक श्री. नामदेव नार्वेकर, श्री. रशिद पठाण, शासन नियुक्त प्रतिनिधी श्री. दिगंबर देसाई आणि प्र. कार्यकारी संचालक श्री.व्ही.के. ज्योती व अधिकारी उपस्थित होते.

साईट : दत्त मंदिर समोर सोमवार पेठ आजरा संपर्क : ९५२७९७३९६९

शिरसंगीचे विजय वांजोळे यांची ऑनररी लेफ्टनंटपदी पदोन्नती

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शिरसिंगी ता.आजरा गावचे सुपुत्र विजय विठ्ठल वांजोळे यांची ऑनररी लेफ्टनंटपदी पदोन्नती झाली. त्याबद्दल शिरसंगी परिसरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
गेले तीस वर्षे विजय वांजोळे हे भारतीय सैन्य दलात कार्यरत आहेत. सध्या ते १७ मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट मध्ये सुभेदार म्हणून कार्यरत आहेत. अगदी प्रतिकूल परिस्थितीत कष्टाच्या जोरावर विजय याने हे यश संपादन केले असल्याचे विजय वांजोळे यांच्या आई रुक्मिणी विठ्ठल वांजोळे यांनी सांगितले.

आज शहरात….
यशोदा फाउंडेशनच्या वतीने गुंडू दादू हरेर यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत निरामय क्लिनिक, सुभाष गल्ली, आजरा येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर…


