mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

गुरुवार दि.३० जानेवारी २०२५  

ऊस तोडणी सुरू असतानाच हत्तीने केला शेतात प्रवेश…
कामगारांची पळापळ

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      मलिग्रे ता. आजरा येथील दिलीप बुगडे यांच्या शेतामध्ये ऊसतोड सुरू असताना अचानक हत्तीचे आगमन झाल्याने ऊसतोड कामगारांची चांगलीच धांदल उडाली. हत्तीने उभ्या उसामध्ये धुमाकूळ घालत ऊस, पाण्याची टाकी, पाईप लाईन सह इतर साहित्याचे मोठे नुकसान केले.

      गेले दोन दिवस बुगडे यांच्या शेतामध्ये ऊस तोडणी सुरू आहे. बुधवारी ऊस तोडणी सुरू असतानाच हत्तीचे आगमन झाले. हत्ती आलेला पाहून ऊस तोडणी कामगारांनी उसातून पळ काढला. रात्री उशिरापर्यंत हत्ती तोड सुरू असलेल्या उसातच होता. त्यामुळे ऊसतोड थांबवण्यात आली.

निष्क्रिय वन खाते…

      हत्तीचे ऊस पिकात आगमन झाले असून हत्तीकडून प्रचंड त्रास सुरू आहे असे वन खात्याला कळवूनही वन खात्याचे कोणीही या परिसराकडे फिरकले नसल्याने व वेळीच हत्तीला हुसकावून न लावल्याने शेती पिकाचे मोठे नुकसान तर झालेच पण त्याचबरोबर इतरही नुकसान झाले असल्याचा आरोप आजरा साखर कारखान्याचे संचालक राजू मुरकुटे यांनी केला आहे. वनविभागाच्या कारभाराबाबत वरिष्ठांकडे दाद मागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आजरा अर्बन बँकेस ” बँको ब्लू रिबन – २०२४” पुरस्कार

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा अर्बन को-ऑप. बॅंकेने (मल्टीस्टेट)  गेली ६४ वर्षे अत्यंत उत्कृष्ठ बैंकिंग सेवा देत मार्च २०२४ अखेरच्या संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये अर्बन बँकामधून सर्व निकषामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी केले बद्दल (ठेवी रु.८५० कोटींच्या वरील बँक) आजरा अर्बन बँकेस अविस पब्लिकेशन यांचे मार्फत दिला जाणारा “बँको ब्लू रिबन-२०२४” चा पुरस्कार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे चिफ जनरल मॅनेजर भार्गेश्वर बॅनर्जी यांचे हस्ते व बॅंकोचे पदाधिकारी अविनाश शिंत्रे आणि अशोक नाईक यांचे उपस्थितीत देणेत आला. यावेळी बँकोचे ज्युरी अतुल खिरवाडकर उपस्थित होते.

      सदर पुरस्कार बँकेच्या वतीने बँकेचे संचालक रमेश कुरुणकर, डॉ. दीपक सातोसकर, सुनील मगदुम, किशोर भुसारी, सुर्यकांत भोईटे यांनी स्विकारला.

      आजरा अर्बन बँकेने बँकिंग हा केवळ व्यवसाय म्हणून न मानता समाजपयोगी आणि सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचविण्यासाठी बँकेचे सर्व व्यवस्थापन आणि कर्मचारी कार्यरत आहेत यासाठी या बँकेचे कौतुक होत आहे. शेतीपुरक उद्योग, छोटे व्यावसायिक व उद्योग यांना अर्थ पुरवठा हा केंद्र बिंदू मानून बँकेने आतापर्यन्त जवळपास रु.१६०० कोटीच्या वर व्यवसायाचा टप्पा पार केला आहे. स्वभांडवलावर मल्टी स्टेट दर्जा प्राप्त करणारी जिल्ह्यातील आजरा बँक ही एकमेव बँक असून शेड्यूल बँकेकडे वाटचाल सुरू आहे. बँकेत आधुनिक अशा FCO कार्य प्रणालीच्या माध्यमातून सेव्हिंग खाती उघडण्याबाबतची व केंद्र शासनाची PMFME (सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग) व PMEGP व राज्य शासनाची अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना, मोबाईल बँकिंग, Google Pay, PhonePe, Paytm, QR Code तसेच Whatsapp Banking च्या माध्यमातून सर्व ग्राहकांना आपल्या बँकेतील त्यांच्या सर्व खात्यांचे statement पाहणे, चेक बुक रिक्वेस्ट देणे, खाते ब्लॉक करणे इ. सुविधा उपलब्ध आहेत.

 जानकी मडगावकर/ सातोसकर पुणे शहर भाजपा महिला मोर्चाच्या उपाध्यक्षपदी

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      येथील सौ. जानकी मडगावकर (सातोसकर) यांची पुणे शहर भाजपा महिला मोर्चाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सौ. हर्षदा फरांदे अध्यक्षा, भाजपा महिला मोर्चा संपूर्ण पुणे शहर यांनी त्यांच्या निवडीचे पत्र नुकतेच दिले आहे.

      एम.बी.ए. झालेल्या सौ.जानकी यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून फौंडेशन स्थापन केले आहे. ब्ल्यू स्टोन एच. आर. सोलुशन कंपनी आणि जानकी प्रॉपर्टीज शिवाय महिला सक्षमीकरणावर त्या कामं करत आहेत . आतापर्यंत त्यांनी या माध्यमातून अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

      येथील आजरा अर्बन बँकेचे संचालक डॉ. दीपक सातोसकर यांच्या त्या कन्या आहेत. त्यांच्या या निवडी बद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

       शेतक-यांना ऍग्रीस्टॅक नोदणीचे आजरा तहसीलदारांचे आवाहन

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       जिल्हा प्रशासनामार्फत ऍग्रीस्टॅक नोंदणीची मोहीम राबविण्यात येत असून आजरा तालुक्यातील सर्व खातेदार शेतक-यांनी आपले आधार कार्ड व आधार लिंक असलेला मोबाईल नंबर,७/१२ किंवा ८ अ नागरी सेवा सुविधा केंद्रात नोंदणी करून घेण्याचे आवाहन आजरा तहसीलदार समीर माने यांनी प्रसिद्धीपत्रकातून केले आहे.

       जे शेतकरी नोंदणी करतील त्यांना यापुढील पीएम किसान,नमो महासन्मान योजना,नैसर्गिक आपत्ती मदत, पीक विमा लाभ,लाडकी बहीण योजना व शासनाच्या कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ मिळणार आहे.

       शेतक-यांनी वेळेत नोंदणी करून घ्यावी. तसेच गावचे तलाठी,ग्रामसेवक कृषी सहाय्यक, संस्था सचिव यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहनही माने यांनी केले आहे.

गिरणी कामगारांचा आजरा येथे सोमवारी मेळाव्याचे आयोजन

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     गिरणी कामगाराना मुंबईत मोफत घरे मिळाली पाहीजेत, यासाठी संघटना शासनाच्या विरोधात आवाज उठवत आहे. शासनाने मुंबई बाहेर घरे देण्याचा जीआर काढला असून, गिरणी कामगारांना सोडतीत घर लागले असलेचे सांगून, काही एजंट फसवणूक करण्यासाठी, कागदपत्राची मागणी करून, दिशाभूल व फसवणूक करीत आहेत. यासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी काॅ. अतूल दिघे सोमवार दिनांक ३ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता किसान भवन, आजरा येथे उपस्थित राहणार असलेचे काॅ. शांताराम पाटील यानी सांगितले, यावेळी तालुक्यातील सर्व गिरणी कामगारांनी उपस्थित रहावे असे आवाहन केले.

      यावेळी नारायण भंडागे, बाबू केसरकर, निवृत्ती मिसाळे, महादेव होडगे, आबा पाटील, नारायण राणे, पांडूरंग परीट, गणपती ढोणूक्ष, रघुनाथ कातकर, शंकर राऊत, हिंदूराव कांबळे याच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते.

 

घर घर संविधान अंतर्गत पेरणोलीत चर्चासत्र

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      घरघर संविधान अंतर्गत चर्चा सत्रात ॲड. निष्ठा त्रिरत्ने यांनी केंद्रीय प्राथमिकशाळा पेरणोली येथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

      बालकांचे हक्क , समाजातील लैंगिक शोषण व सावधगिरी यांच्याशी संबंधित असणारे कायदे याविषयी मार्गदर्शन केले.

     यावेळी मुख्याध्यापिका सौ. अनुष्का गोवेकर श्रीम. कविता मगदूम सौ. सुमित्रा सावरतकर सौ. सुप्रिया पाटील श्रीम.गायत्री नळकांडे शिक्षक वृंद व केंद्र प्रमुख रावसाहेब देसाई व विद्यार्थी उपस्थित होते.

साईट : दत्त मंदिर समोर सोमवार पेठ आजरा संपर्क : ९५२७९७३९६९

 वेळवट्टी येथे कबड्डी स्पर्धांचे आयोजन

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      स्वराज्य प्रतिष्ठान, वेळवट्टी यांच्या वतीने
वेळवट्टी येथे कब्बड्डी स्पर्धांचे शनिवार दि. ०१ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता आयोजन करण्यात आले आहे.

      स्पर्धेतील प्रथम चार क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे ५००१/-, ३००१/-, २००१/- रुपये रोख व चषक देण्यात येणार आहे. यासह उत्कृष्ठ चढाई,उत्कृष्ठ पकड याकरीताही बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
अधिक माहितीसाठी ज्ञानेश्वर प्रभू (९६०७४१२१७४) गुरुराज गुरव, (७८७५४९४७१३) संस्कार कळेकर (९०२१९०८६१७) हर्ष शिंदे (९८८१६१२१८६) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

निधन वार्ता
राजाराम कुराडे

          उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     उत्तूर येथील राजाराम यल्लाप्पा कुराडे (वय ७६ वर्षे) यांचे अल्पश: आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले , मुलगी, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे. ग्रामपंचायत सदस्य संभाजी कुराडे यांचे ते वडील होत.

      रक्षाविसर्जन शुक्रवार दिनांक ३१ रोजी आहे.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

दैव बलवत्तर म्हणून वाचली महिला ; गव्याच्या हल्ल्यात थोडक्यात बचावली

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

mrityunjay mahanews
error: Content is protected !!