बुधवार दि.२९ जानेवारी २०२५


गवसे परिसरात वाघाचा वावर…
तलाव परिसरात डरकाळ्या देत सोडल्या अस्तित्वाच्या खुणा…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गवसे (ता. आजरा) येथील तलाव परिसर वाघाच्या डरकाळ्यांनी हादरून गेला असून वाघाने आपल्या अस्तित्वाच्या खुणा कायम ठेवल्या आहेत. गवसे तलावातील दलदलीमध्ये त्याचे ठसे मिळून आले. त्याच्या वावराने परिसरात भितीचे वातावरण आहे.
चाळोबा जंगल, किटवडे, पारपोली परिसरात गेले दोन महीने वाघ वावरत आहेत. त्यांने जंगलात रेडे व वन्यप्राण्यांची शिकार केली आहे. दोन दिवसापूर्वी गवसे परिसरात वाघच्या डरकाळीचे आवाज ग्रामस्थांना ऐकण्यास मिळाले. त्याच्या पावलाचे ठसे गवसे तलावातील दलदलीत मिळून आले आहेत. वनविभागाने याबाबत दुजोरा दिला आहे. त्यांने जंगलात कुठे शिकार केली आहे का याचा शोध घेतला जाणार आहे.
पश्चिम भागात वावर असणाऱ्या दोन वाघांचे यापूर्वीच पारपोली परिसरात दर्शन झालेले आहे. वन विभाग अलर्ट मोडवर गेला आहे.
आठ ते नऊ इंचाचे ठसे…
वन विभागाने घेतलेल्या पंजाच्या ठशांच्या मापामध्ये सुमारे आठ ते नऊ इंचाचे पंजे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आजऱ्यात शुक्रवारी मोफत नेत्र तपासणी शिबिर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
यशोदा फाउंडेशनच्या वतीने नॅब नेत्र रुग्णालय, मिरज ज्येष्ठ नागरिक संघटना, सर्व श्रमिक संघटना, शाखा- आजरा यांच्या संयुक्त विद्यमाने श्री. गुंडू दादू हरेर यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त शुक्रवार दिनांक ३१ जानेवारी रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत निरामय क्लिनिक, सुभाष गल्ली, आजरा येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
शिबिरामध्ये मोफत नेत्र तपासणी, चष्मा नंबर तपासणी ,मोफत (लेन्ससह) मोतीबिंदू ऑपरेशन या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. येते वेळी रेशन कार्ड,आधार कार्ड झेरॉक्स घेऊन यावे असे आवाहन डॉ. सुदाम हरेर, संजय घाटगे, शांताराम पाटील, महादेव होडगे आदींनी केले आहे.

आजरा येथे संत अँथोनी प्रार्थनास्थळ मुर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त मिरवणूक…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथील रोजरी चर्च परिसरात संत अँथोनी प्रार्थना स्थळामध्ये मूर्ती प्रतिष्ठापने निमित्त ख्रिश्चन बांधवांच्या वतीने मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली.
या मिरवणुकीमध्ये अल्विन बरेटो, सिंधुदुर्ग प्रांत बिशप,फादर मेल्विन प्राचार्य फादर ॲंथोनी, फादर विल्सन यांच्यासह ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

प्रा. सुखदीप चौगुले यांना ‘ द्रोणाचार्य ‘ पुरस्कार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शिव कॉलनी, आजरा येथील पुणेस्थित प्रा. सुखदेव म्हंकाळी चौगुले यांना ‘ द्रोणाचार्य ‘ पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
मेंढोली हे मूळ गाव असणारे चौगुले हे एम.ई. (मेकॅनिक) असून पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड रिसर्च, पुणे येथे प्राध्यापक म्हणून सेवेत आहेत.
गेली अनेक वर्ष सोसायटी ऑफ ऑटोमेटिव्ह इंजिनीयर्स एस. ए. इ. इंडीया या अखिल भारतीय स्पर्धेत विद्यार्थी संघाचे मार्गदर्शक व समन्वयक म्हणून ते काम करीत असतात.२०२५ मध्ये झालेल्या इंदोर/ मध्य प्रदेश येथे त्यांना त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरी व तांत्रिक कौशल्याच्या निकषावर अखिल भारतीय द्रोणाचार्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.
त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.


लाटगाव मध्ये विद्यार्थ्यांनी भरवला आठवडी बाजार…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
विद्या मंदिर लाटगाव शाळेतील विद्यार्थ्यांनी अनोखा उपक्रम राबवत आठवडी बाजार भरवला.
विद्यार्थ्यांना आर्थिक व व्यवहार ज्ञानासोबतच वाढती बेरोजगारी पाहता व्यवसायाचे बाळकडू प्राथमिक शाळेपासून मिळावे यासाठी लाटगाव शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुधीर सुपल, उपाध्यक्ष अरविंद सरदेसाई, मुख्याध्यापक डी.आर. कोळी, ए.एस.पाटील , ऋतुजा गावडे यांनी हा उपक्रम राबवला, या उपक्रमाचे कौतुक सर्व ग्रामस्थांसह पंचक्रोशीत केले जात आहे.
याप्रसंगी सरपंच वामन सुतार, रणजीत सरदेसाई,महादेव कांबळे, मेजर समीर उपस्थित होते.

साईट : दत्त मंदिर समोर सोमवार पेठ आजरा संपर्क : ९५२७९७३९६९

रामपूर बागीलगेतील महालक्ष्मीची मूर्तीची शिरसंगी येथून उत्साहात पाठवणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शिरसंगी येथील महालक्ष्मीची मूर्तीची पाठवणी चंदगड तालुक्यातील रामपूर बागिलगे या ठिकाणी करताना यात्रेचे स्वरूप आले होते. यावेळी मोठ्या उत्साहात नूतन मूर्तीचे पाठवण करण्यात आली . रामपूर/बागीलगे तांबुळवाडी गुडेवाडी व नरेवाडी, धुमडेवाडी मौजे जट्टेवाडी या सात गावची महालक्ष्मीची मूर्ती सिरसंगी येथील मूर्तीकार पांडुरंग सुतार यांनी लाकडी शिल्पांमध्ये तयार केली आहे.
हरिपाठ महिला मंडळाच्या भजनाने टाळ मृदंग वाजवत गावातून मिरवणूक काढण्यात आली . ह.भ.प. बाळासाहेब सुतार यांनी मूर्तीचे विधिवत पूजन केले.यावेळी मूर्तीकार पांडुरंग सुतार यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.


