गुरुवार दि.८ जानेवारी २०२६


आजरा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी पूजा डोंगरे…?

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी पालकमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांच्या कट्टर समर्थक सौ. पूजा अश्विन डोंगरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते.
तो पूजा या प्रभाग २ मधून विजयी झाल्या असून त्यांनी या प्रभागातून नगरसेवक पदाचे उमेदवार अशोक अण्णा चराटी यांना घसघशीत मताधिक्य दिले आहे. याचबरोबर पाच वर्षात पाच नगरसेवकांना उपनगराध्यक्ष पदाची संधी दिली जाणार असल्याचेही समजते.
स्वीकृत सदस्य पदाबाबत उत्सुकता…
नगरपंचायतीमध्ये दोन स्वीकृत सदस्यांना संधी दिली जाणार आहे. सत्तारूढ मंडळींना एक तर काँग्रेसला एक असे हे दोन स्वीकृत नगरसेवक राहतील. या पदावर आवरणे लावण्याकरिता अनेकजण प्रयत्नशिल आहेत.

ज्येष्ठ नागरिकांना शासकीय माहिती देण्यासाठी तालुक्यात मेळावा घेणार ; शशिकांत सावंत

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांना शासकीय कार्यालयात सन्मान मिळणे करीता व शासनाच्या सेवा सुविधा समजाजून घेण्याकरीता तालुक्यात शासकीय अधिकारी समवेत जेष्ठ नागरिकांचा मेळावा घेणार असेल्याचे शशिकांत सावंत, पंचायत समिती निवृत अधिकारी यानी आजरा येथील जेष्ठ नागरीक संघटना बैठकीच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना व्यक्त केले.
व्यकंटराव हायस्कूल येथे झालेल्या या सभेत प्रास्ताविक प्रा. सुरेश बुगडे यानी केले. जेष्ठ नागरीक सेवा संघाचे सचिव कृष्णा सुतार होनेवाडी यानी संघ कार्यकारणी परिचय करून देत जेष्ठ नागरिकांचे गाव पातळीवर नियोजन व उपक्रम या संदर्भात माहीत दिली.
काँ. शांताराम पाटील यांनी तालुक्यातील सर्व गिरणीकामगार हे जेष्ठ नागरिक असून शासकीय योजने बरोबर आरोग्य शिबीर घेऊन जेष्ठाचे प्रश्न समजावून घेणे आवश्यक असलेचे सांगितले. यावेळी तालुका अध्यक्ष महादेव होडगे,सदाशिव वांजोळे, निवृती कांबळे यानी मनोगत व्यक्त के़ले.
यावेळी जोतिबा जाधव, विजय पाटील, जानबा धडाम, लक्ष्मण गुरव, गोविंदा शेडे, चंद्रकांत सरबंळे, काँ. संजय घाटगे यांच्यासह जेष्ठ नागरिक उपस्थित होते आभार ईश्वर गिलबिले यांनी मानले.

बुद्धभाई पटेल यांचे निधन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथील सॉ मिल व्यावसायिक मुळजी/बुद्धभाई देवजी पटेल यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. निधन समयी त्यांचे वय ६७ वर्षे होते.
त्यांच्या पश्चात मुलगा योगेश, मुलगी भावना, व भाऊ पुरुषोत्तम देवजी पटेल यांच्यासह मोठा परिवार आहे.
शिवाजीनगर येथील स्मशानभूमी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नैसर्गिक शेतीच देश समृद्ध बनवेल : राहुल टोपले

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आपली नैसगिक, पारंपारिक शेतीच भविष्यात देशाला समृध्द आणि सामर्थ्यशाली बनवेल असे प्रतिपादन नैसर्गिक शेती तज्ञ राहुल टोपले यांनी केले
श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरा यांच्यावतीने आयोजित व्याख्यानमालेत नैसर्गिक शेती तज्ञ श्री. राहुल टोपले यांचे ‘नैसगिक शेती आणि विषमुक्त जीवन’या विषयावर ते बोलत होते.
टोपले म्हणाले, हरीतक्रांती नंतर पिकांचे उत्पादन वाढीसाठी देशात रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला. कंपोस्ट खतांचा कमी झाला, रासायनिक खत’ व किटकनाशकांचा अतिरिक्त वापर केला गेल्याने आपली समृध्द नैसर्गिक कृषी परंपरा व्हास व्हायला सुरवात झाली. सद्याची शेती ही भांडवलदारांच्या हातात असून रासायनिक खते, औषधे यांच्या वापरामुळे तयार होणारे अन्नधान्यही विषारी होत आहे. रासायनिक, विषारी अन्न खाऊन आपले शारीरिक मानसिक आरोग्य बिघडत आहे कॅन्सर, हार्ट अटॅक सारख्या रोगांचे वाढते प्रमाण हे रसायनयुक्त अन्नाचे परीणाम आहेत. निसर्गातील माती, पाणी या घटकांचा योग्य वापर करून अधिक उत्पन्न मिळविता येते. पारंपारीक शेतीसाठी व मानवी आरोग्यासाठी देशी गाईचे अनन्यसाधारण महत्व आहे. याकरीता देशी गोवंशाची वाढ करणे आवश्यक आहे मिशन ऑरगॅनिक या आपल्या संस्थेमार्फत शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचे मार्गदर्शन होत असून लाखो शेतकरी पारंपारीक शेतीकडे वळले आहेत.
अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष श्री. वामन सामंत होते. वाचनालया च्यावतीने देण्यात येणाऱ्या उत्कृष्ठ वाचक पुस्कार श्री.गजानन भिमराव अपसंगी (चाफवडे) यांना तर बालवाचक पुरस्कार कु. कादंबरी पांडुरंग धुरी (हाळोली) यांना देऊन गौरविण्यात आले .
कार्यक्रमाला मुकुंदराव देसाई, नगरसेवक अनिकेत चराटी, सुधीर कुंभार, आप्पा पावले, मानसिंग देसाई , जितेंद्र शेलार, सुनिल शेवाळे, मारूतीराव मोरे, काका देसाई, मनोहर गव्हाणकर, सुनिल पाटील, शिवाजीराव देसाई, संभाजीराव इंजल, विजय राजोपाध्ये, माधुरी टोपले, नगरसेविका स्मिता कुंभार, उज्वला गुंजकर, शर्मिला सातोसकर, रमा केळकर, डॉ. अंजनी देशपांडे, डॉ. गौरी भोसले, रविंद्र हुक्केरी, संभाजीराव इंजल, बंडोपंत चव्हाण, सुभाष विभुते, महंमदअली मुजावर, विनायक आमणगी, गीता पोतदार, सुचेता गडडी ग्रंथपाल चंद्रकांत कोंडुसकर यासह मोठ्या प्रमाणावर आजरेकर रसिक श्रोते उपस्थीत होते.
संचालक संभाजीराव इंजल यांनी पाहुण्यांचा परीचय करून दिला. विजय राजोपाध्ये यांनी सुत्रसंचालन करून आभार मानले.

शिक्षणतपस्वी जे. पी. नाईक पतसंस्था व विद्यावर्धिनी पतसंस्थेमार्फत नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा नगर पंचायतीचे नूतन लोकनियुक्त नगराध्यक्ष अशोकअण्णा चराटी व नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार शिक्षण तपस्वी डॉ .जे. पी. नाईक पतसंस्था व विद्यावर्धिनी पतसंस्थेच्या वतीने करण्यात आला.
श्री. दयानंद उपासे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. विदयावर्धिनी संस्थेचे संस्थापक चेअरमन बळवंत शिंत्रे यानी प्रास्ताविक केले.
आजरा नगरपंचायतीच्या रस्ते , गटर्स, वीज, पाणी या प्राथमिक गरजांच्या रखडलेल्या कामांची येत्या पावसाळ्यापूर्वी पूर्तता करण्याची जबाबदारी आपली असुन ती पूर्ण करण्याची हमी नगराध्यक्ष अशोकअण्णा चराटी यांनी दिली.
यावेळी श्री. सुभाष विभुते, प्रा. डॉ. शिवशंकर उपासे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास ताराराणी आघाडीचे नूतन नगरसेवक उपस्थित होते.पांडुरंग शिप्पुरकर यानी मानले.
कार्यक्रमाला ताराराणी आघाडीचे नगरसेवक, दोन्ही संस्थेचे संचालक मंडळ व कर्मचारी उपस्थित होते.

छाया वृत्त

गांधीनगर व क्रीडा संकुलनजीक कचरा जमा करण्यासह तो जाळण्यास नगरपंचायतीकडून प्रतिबंध केला जात आहे. येथील कचरा जाळण्याची प्रक्रिया पूर्णपणे थांबवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अन्याय निवारण समितीने प्रदूषण व आरोग्य प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर सदर मुद्दा गेले काही दिवस उचलून धरला होता.
आजचा नाट्यप्रयोग
इटोपिया…
सादरकर्ते :- लोकरंगभूमी शांतिनिकेतन सांगली
वेळ :- सायं.७-०० वा.


