mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या


 

आजरेकर टोल देणार नाही …
टोल वसुलीचा एक कागदही हलवू नका : आमदार प्रकाश आबिटकर

.          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       संकेश्वर-बांदा महामार्गाच्या पार्श्वभूमीवर तालुकावासीयांचे अनेक प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहेत.महामार्गाचे काम पूर्ण झाले नसतानाही टोल नाका उभारणीच्या हालचाली सुरू आहेत. तालुका वासियांच्या भावना तीव्र असताना टोलचे भूत लादले जाऊ नये. याबाबत शासन पातळीवर आपण टोलमुक्तीसाठी जरूर प्रयत्न करू असे आश्वासन देत तातडीने टोल वसुली नाक्यासह इतर यंत्रणेचे काम थांबवण्याच्या सूचना आमदार प्रकाश आबिटकर यांनी अधिकाऱ्यांना केल्या. ते आजरा तहसील कार्यालयात टोलबाबत आयोजित बैठकीत बोलत होते.

     महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता मधाळे, भुदरगड आजरा प्रांताधिकारी वसुंधरा बारवे यांची प्रमुख उपस्थिती होती.

     तालुकावासियांच्या वतीने भूमिका स्पष्ट करताना कॉ. संपत देसाई म्हणाले, महामार्गाच्या कामासाठी जर केंद्र शासनाने निधी दिला असेल तर टोल आकारणी कशासाठी? तरीही निधीचे कारण सांगून टोल आकाराने होत असेल तर राज्य शासनाने केंद्र शासनाला पैसे देऊन निधीचा विषय निकाली काढावा. आजरा तालुक्यातील नागरिक कोणत्याही परिस्थितीत टोल भरणार नाहीत. या टोलच्या संदर्भात केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत बैठक होऊन टोलबाबत धोरण ठरण्याची गरज आहे. मुळातच हा राष्ट्रीय महामार्ग आहे हे आम्ही मान्य करत नाही.

      यावेळी झालेल्या चर्चेत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुकुंद देसाई, जिल्हा बँक संचालक सुधीर देसाई, सुधीर सुपल,अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे, भाजपचे सुधीर कुंभार, प्रभाकर कोरवी, संजय पाटील, माजी उपनगराध्यक्ष विलास नाईक, अमानुल्ला आगलावे यांच्यासह नागरिकांनी सहभाग घेतला.

     यावेळी तहसीलदार समीर माने, आजरा साखर अध्यक्ष वसंतराव धुरे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयवंत शिंपी, गटविकास अधिकारी ढमाळ, आजरा नगरपंचायत मुख्याधिकारी सुरज सुर्वे, जनार्दन टोपले, विष्णुपंत केसरकर, भाजपचे तालुकाध्यक्ष बाळ केसरकर, दशरथ अमृते, विजय पाटील, अभिषेक शिंपी, जी. एम. पाटील, जितेंद्र भोसले, शांताराम पाटील, दशरथ अमृते, रशीद पठाण, प्रकाश मोरुस्कर, बंडोपंत चव्हाण, पांडुरंग सावरतकर, जोतिबा आजगेकर, वाय. बी. चव्हाण, जोतिबा चाळके यांच्यासह विविध गावचे सरपंच, नागरिक, महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.

शक्तीपीठला विरोध…

      भागातील रस्त्यांचा विकास व्हावा याकरता निधीची मर्यादा असल्याने. घसघशीत निधी मिळेल या अपेक्षेने शक्तीपीठ मार्गाची आपण मागणी केली होती. परंतु या मार्गाला विरोध असेल तर आपणही जनतेसोबत आहोत त्यामुळे शक्तीपीठचा विषय आता संपला असल्याची माहिती यावेळी आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली.

छ. शिवराय महाराज व राजर्षी शाहूंचे विचार दिल्लीपर्यंत पोहोचवण्याचे काम मतदारांनी केले : आम.सतेज पाटील

आजरा येथे खा.शाहू छत्रपतींचा आभार दौरा

          आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     लोकसभा निवडणुकीत शाहू छत्रपतींना घसघशीत मतदान करून घटना बदलण्याचा प्रयत्न हाणून पाडत कोल्हापूरकरांनी छत्रपती शिवाजी महाराज व राजश्री शाहूंचा विचार दिल्लीपर्यंत पोहोचवण्याचे काम केले आहे. यामुळे विरोधकांचे लोकशाही संपवण्याची षडयंत्र संपुष्टात आले आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांनी केले. नूतन खासदार शाहू छत्रपतींच्या आजरा तालुक्यातील आभार दौऱ्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

       आजरा येथील शिवाजीराव सावंत सभागृहात खासदार शाहू छत्रपतींचा सत्कार समारंभ पार पडला. यावेळी बोलताना आमदार पाटील पुढे म्हणाले आता केंद्र सरकारकडून जिल्ह्यासाठी काही आणता येईल का यासाठी प्रयत्न करावे लागतील तालुका वाशी यांच्या सोयीसाठी आजारा येथे खासदार यांचे संपर्क कार्यालय सुरू करण्यात येईल. ज्या उत्साहाने मतदारांनी मतदान केले आहे त्याच उत्साहाने त्यांची कामे मार्गी लावण्यासाठी पुढील पाच वर्षात प्रयत्न केले जातील. सध्या आजरा येथील सुरू असलेल्या टोलमुक्तीच्या आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

      प्रास्ताविकपर भाषणात बोलताना कॉ. संपत देसाई यांनी ४०५ चा नारा देणाऱ्यांना जमिनीवर आणण्याचे काम मतदारांनी केले असल्याचे सांगत तालुक्यामध्ये मानव व वन्यजीव प्राणी यांच्यातील संघर्ष संपुष्टात आणणे, तालुक्याला टोल मुक्त करणे व शक्तिपीठ मार्ग रद्द करणे यावर प्रमुख लक्ष देण्याची मागणी केली.

       राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) व्ही.बी. पाटील यांनी विधानसभेच्या तीनही जागा महायुतीकडे असून विद्यमान तीनही आमदारांना पराभूत करण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन केले.

      यावेळी बोलताना खासदार शाहू छत्रपती म्हणाले, तालुक्याच्या विकासाचा आराखडा तयार केला जाईल प्राधान्याने तालुक्यामध्ये भात संशोधन केंद्र व काजू बोंड प्रक्रिया केंद्र उभारणीसाठी शासन दरबारी आपण पाठपुरावा करू. तालुका वासियांनी भरभरून मतदान करून आपल्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आपण निश्चितच प्रयत्न करू असेही त्यांनी सांगितले.

    तालुकावासीयांच्यातर्फे खास. शाहू छत्रपती यांचा भव्य सत्कार करण्यात आला.

     यावेळी गोकुळच्या संचालिका अंजनाताई रेडेकर,जयवंतराव शिंपी, उमेश आपटे, रशीद पठाण, नौशाद बुड्ढेखान,उदयराज पवार, अभिषेक शिंपी, विद्याधर गुरबे, राजू होलम,संजय भाऊ सावंत,रवींद्र भाटले ,संभाजी पाटील, संतोष मासोळे, मसणू सुतार व,सौ. राजलक्ष्मी देसाई, सौ रचना होलम, सौ.संजीवनी सावंत, संतोष मासोळे, विठ्ठलराव देसाई,धनाजी शिंदे, किरण कांबळे ,रणजीत देसाई, विश्वास जाधव, संजय तर्डेकर, प्रभाकर कोरवी, युवराज पोवार ,संकेत सावंत, अशोक तर्डेकर विक्रम देसाई, शांताराम पाटील, उत्तम देसाई, समीर गुंजाटी, विलास जोशीलकर, निलेश घाटगे, अमित खेडेकर, आरिफ खेडेकर यांच्यासह तालुकावासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 सर्फनाला प्रकल्प पूर्णत्वाकडे जात असल्याचे समाधान:
आमदार आबिटकर

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

सर्फनाला प्रकल्पात यावर्षी पाणी अडवणार आहे. प्रकल्पात या वेळी ६६ टक्के पाणीसाठा केला जाईल. आजरा तालुक्याच्या पश्चिम भागातील लाभक्षेत्रातील २० गावांना याचा लाभ होणार असून सुमारे २७०० हेक्टर जमिन ओलीताखाली येईल. असे आमदार प्रकाश आबिटकर यांनी सांगीतले.

      आमदार आबिटकर यांनी सर्फनाला धरणस्थळावर अधिकाऱ्यांसोबत पहाणी दाौरा करून झालेल्या कामाची माहीती घेतली व काही सूचना केल्या. ते म्हणाले, सर्फनाला प्रकल्प गेली वीस वर्षे रखडला होता. प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासह विविध कामे अपूरी होती. कामाला गती येत नव्हती. सुधारीत प्रशासकीय मान्यता आणण्याबरोबर प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यावर भर दिला आहे. पारपोली, गावठाण या गावांच्या घरांचा निवाडा झाला होता. त्यासाठी ४० कोर्टी रुपये मंजूर करून घेतले. यामु‌ळे शेळप व देवर्डे येथील प्रकल्पग्रस्तांच्या वसाहतीमध्ये धरणग्रस्तांना घरे बांधता आली. त्यामु‌ळे घळभरळीचे काम पूर्ण करता आले आहे. हा प्रकल्प ६७० दश लक्ष घनफूट क्षमतेचा आहे. यंदा या प्रकल्पात ६६ टक्के पाणीसाठा केला जाईल. प्रकल्पग्रस्तांचे शंभर टक्के पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्नशील आहे. बहुतांश प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लागले आहेत. कांही जणांचे प्रश्न आहेत ते टप्प्याटप्प्याने मार्गी लावू. २०१४ पूर्वी काढलेल्या संघर्ष यात्रेमध्ये सर्फनाला, धामणी व नागणवाडी हे प्रकल्प मार्गी लावण्याचे उद्दीष्ट ठेवले होते. नागणवाडीचे गतवर्षी पाणीपूजन झाले. सर्फनालाचे लवकरच होईल, त्यानंतर धामणी प्रकल्पाचे पाणी पूजन करणार आहे. शेतकरी व जनतेच्या हितासाठी केलेले संकल्प पूर्ण करण्याचे समाधान वेगळेच असल्याचे त्यांनी सांगीतले.

     कार्यकारी अभियंता रोहीत बांदिवडेकर यांनी स्वागत केले. आमदार आबिटकर यांचा सत्कार श्री. बांदिवडेकर यांनी केला. उपविभागीय अभियंता स्वाती उरुणकर, कनिष्ठ अभियंता प्रकाश येसणे, सुशील पाटील, संभाजी कुंभार, पाटबंधारे शाखा अधिकारी श्री. आबिटकर, प्रकाश मिटके, उपसरपंच प्रकाश कविटकर, जितेंद्र भोसले, संतोष भाटले हे पाहणी दौऱ्यात सहभागी झाले होते.

पोश्रातवाडी गावठाण मधून पाणंद रस्त्याची मागणी

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       पोश्रातवाडी ता.आजरा येथील गावठाण मधून पाणंद लोकांना ये-जा करणेसाठी रस्ता नसलेने लोकांची गैरसोय होत आहे तरी सदर गावठाण मधून पाणंद रस्ता करावा या मागणीचे निवेदन जनसेवा समाजसेवक नरसु शिंदे संस्थेच्या वतीने नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई यांचेकडे देण्यात आले.

      सदर निवेदनावर नरसु शिंदे, रवळू पाटील, विष्णू पाटील, विजय अमृस्कर, गणपती पाटील, तानाजी पाटील यांच्या सह्या आहेत.

विद्युत उपकेंद्रांच्या कामाची आ.  आबिटकर यांचेकडून पहाणी


           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा (भादवण ) आजरा शहर आणि पेरणोली गवसे विभागा मध्ये विजेचा दाब नेहमी कमी होऊन शेतकऱ्यांच्या पाणी उपसा पंपाची आणि छोट्या मोठ्या उद्योजकांची विज व घरगुती विज वारंवार खंडीत होत होती. आजरा शहरात नविन विज कनेक्शन द्यायला लोड क्षमताच शिल्लक नव्हती त्याच प्रमाणे भादवण पंचक्रोशी मडिलगे दोन्ही हाजगोळी, सोहाळे ,खेडे, मुंगूसवाडी व इतर गावांना कमी क्षमतेन विज पुरवठा होत होता हि बाब लक्षात घेऊन आमदार आबिटकर यांच्या प्रयत्नाने मासेवाडी आजरा येथे ५ .m.v.a क्षमतेचे विद्युत उपकेंद्र तयार होत असून तात्कालीन पालक मंत्री दिपक केसरकर यांचेकडे पाठपुरवठा करून चार कोटी ऐंशी लाख रु. चा निधी लावला आहे. सदर उपकेंद्रामुळे संबंधीत गावाबरोबरच वझरे, महागोंड, वडकशिवाले ,हालेवाडी या गावांना सुद्धा याचा लाभ होणार असून पंधरा ऑगस्ट पर्यन्त काम पूर्ण होऊन प्रत्यक्ष सबंदीत गावे त्या उपकेंद्रावरती जोडली जाणार आहेत त्यांच्या पहिल्या टप्याची पहाणी आज करणेत आली.

    यावेळी शिवसेना तालुका प्रमुख संजय पाटील, श्री आडके, कार्यकारी अभियंता गड. विभाग श्री मिसाळ , पाटील ग्रामसेवक जगताप जितेंद्र भोसले उपस्थित होते

अर्श गारमेंट चे आजऱ्यात उद्घाटन

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा शहरातील श्री. यासिन मानगांवकर यांनी नव्याने सुरु केलेल्या अर्श गारमेंट्स या उद्योगाचे नगरसेवक अभिषेक शिंपी यांच्या हस्ते हस्ते उद्घाटन करण्यात आले.

       या गारमेंट व्यवसायामुळे आजरा शहरातील मुस्लिम समाजातील तब्बल ३५ महिला भगिनींना रोजगार मिळणार असल्याचे यासिन यांनी सांगितले.

      केवळ द्वेशाचे, इर्षेचे व एकमेकांचे उणे काढण्याचे राजकारण आम्हाला कधीच मान्य नाही त्या उलट रोजगार आणि लोकांचे आर्थिक उत्पन्न वाढवणारे कल्पक कार्यक्रम घेणे हेच खरे आमचे ध्येय आहे असे अभिषेक शिंपी यांनी स्पष्ट करत या व्यवसायासाठी मार्गदर्शन करणारे श्री. मलिक लमतुरे यांचे व यासिन चे कौतूक केले. व नविन व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या.

     यावेळी माणगांवकर यांचे कुटुंबीय व मित्रपरिवार उपस्थित होता.

हरपवडे येथील रासूबाई मंदिर खुले करून नवीन स्थानिक सल्लागार उप समितीला स्थगिती द्यावी

रासूबाई देवस्थान स्थानिक सल्लागार उप समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      हरपवडे येथील रासुबाई मंदिर हे गुरव समाज (पुजारी) व स्थानिक राजकीय नेते मंडळी यांनी स्वतःच्या स्वार्थ व वर्चस्वासाठी मंदिराला कुलूप लावून देवीची पूजा आरती बंद केली आहे.हरपवडे येथील रासूबाई मंदिर खुले करून नवीन स्थानिक सल्लागार उप समितीला स्थगिती द्यावी. अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे लेखी पत्राद्वारे करण्यात आली आहे.

      स्थानिक नेतेमंडळी यांनी गावची दिशाभूल करून मंदिराच्या नावाने राजकारण करून मंदिराच्या नावाखाली वर्गणी व देणगी जमा करून ती हडप केली आहे असून २००३ व सन २०१४ या कालावधीसाठी ग्रामपंचायत ताब्यात असल्याने दोन वेळा उपसमिती बदलण्यात आली व त्याची नोंद देवस्थान व्यवस्थापन समिती कोल्हापूर यांचेकडे न करता तीस वर्षे गावाला अंधारात ठेवण्यात आले. पण तेच लोक गेली सात वर्षे मंदिराला विरोध करून असून वारंवार खोट्या तक्रारी करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

       कार्यरत असलेल्या उपसमितीने या संघर्षातून मंदिराचे काम पूर्ण केले आहे व दिनांक २६ जानेवारी २०२४ च्या ग्रामसभेत सत्तेचे दुरुपयोग करून अरेरावी करत बेकायदेशीर उपसमिती बनवण्यात आली आहे असेही या पत्रात म्हटले आहे.

      यावर संजय हळवणकर, श्रावण धाटोंबे, राजाराम पाटील, बाबासो पाटील, दत्तात्रय पोवार, रामराव जाधव ,वसंत लटम, जयराम कांबळे, धनाजी सावंत, हिंदुराव पोवार, श्रीधर हळवणकर, मारुती केळुसकर, अर्चना जाधव आदींच्या सह्या आहेत.

पावसाने शहराची वाताहात


           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

        गुरुवारी सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने संपूर्ण शहरवासीयांची वाताहात झाली. शहरातील मुख्य बाजारपेठेसह शिवाजीनगर ते बस स्थानक परिसरात प्रचंड पाणी झाल्याने याचा शहरवासीयांना मनस्ताप सहन करावा लागला.

         मान्सूनच्या पहिल्याच पावसाने शहरवासीयांची झालेले हालत पाहता तातडीने नगरपंचायत प्रशासनाने व राष्ट्रीय महामार्ग विभागाने पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.


 

संबंधित पोस्ट

३१ डिसेंबर रोजी कुरकुंदेश्र्वराची यात्रा…

mrityunjay mahanews

Breaking News

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा तलाठ्याच्या प्रतापांची तक्रार थेट आयुक्तांकडे…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!