mrityunjaymahanews
अन्यआजरा तालुका विशेषकोल्हापूरराजकीयरोजगारसामाजिकस्थानिक

सातच्या बातम्या

शुक्रवार दि.२६ सप्टेंबर २०२५

तालुक्यातील ऊस उत्पादकांनी संपूर्ण ऊस ‘आजरा’ला द्यावा : अध्यक्ष मुकुंदराव देसाई यांचे आवाहन

तब्बल अडीच तास चालली कारखान्याची वार्षिक सभा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा कारखाना स्थापनेपासून संघर्षातून वाटचाल करीत आहे. कारखान्याला आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी शेतकऱ्यांनी पिकवलेला संपूर्ण ऊस कारखान्याला पाठवावा. त्याचबरोबर सभासदांनी पंधरा हजार रुपयांची शेअर्स रक्कम पूर्ण करून सहकार्य करावे. असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई यांनी केले.

गवसे (ता. आजरा) येथील कारखाना कार्यस्थळावर वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याची ३५ वी वार्षिक सभा पार पडली. अध्यक्ष मुकुंदराव देसाई अध्यक्षस्थानी होते. या वेळी सर्वाधिक ऊस उत्पादन घेतलेल्या २१ शेतकऱ्यांचा संचालक मंडळाच्या हस्ते गौरव झाला.

उपाध्यक्ष सुभाष देसाई यांनी स्वागत केले. संचालक शिवाजीराव नांदवडेकर यांनी श्रध्दांजली ठराव मांडला. अध्यक्ष देसाई म्हणाले, सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे सरासरी ऊस उत्पादनात घट होत आहे. याचा परिणाम म्हणून कारखान्याच्या गळीताचे दिवस कमी होत आहेत. केवळ साखर उत्पादन करून चालणार नाही. उपपदार्थ निर्मिती करावी लागेल. इथेनाल व डिस्टलरी उभा करण्यासाठी कारखान्याला इको सेन्सीटिव्ह झोन मधून बाहेर पडावे लागेल. गवसे व आल्याचीवाडी ही गावे वगळावी लागतील. यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय पर्यावरणमंत्री भुपेंद्र यादव यांची भेट घेतली असून त्यांनी सकारात्मकता दर्शवली आहे. भविष्यात प्रेसमड पासून सीबीजी प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न आहेत. कार्यकारी संचालक संभाजी सावंत यांनी नोटीस वाचन केले. कार्यालयीन अधिक्षक अनिल देसाई यांनी मागील इतिवृत्ताचे वाचन केले.

तानाजी देसाई यांनी गतवर्षीच्या १२.४० साखर उताऱ्यानुसार एफआरपीची रक्कम द्यावी अशी मागणी केली.एफआरपीनुसारन कारखाना २ कोटी १० लाख रुपये देणे लागतो. कार्यकारी संचालक श्री. सावंत म्हणाले, ज्या त्या वर्षाच्या साखर उताऱ्यानुसार एफआरपीची रक्कम द्यावी असे राज्य व केंद्रशासनाचे पत्र आहे. अन्य कारखान्याप्रमाणे निर्णय घेवू. ताळेबंदामध्ये शेतकऱ्यांची देय रक्कम दाखवलेली नाही. त्यामुळे ताळेबंद चुकीचा असल्याचा आरोप तानाजी देसाई यांनी केला. उणे नेटवर्थमुळे देय रक्कमेचा उल्लेख नसल्याचा खुलासा मुख्य लेखापाल प्रकाश चव्हाण यांनी केला. एकीकडे भागभांडवल वाढीवण्यासाठी आवाहन संचालक मंडळ करीत असतांना दुसरीकडे २७०० सभासद अपात्र ठरवण्यासाठी न्यायालयात धाव घेतली. त्या सभासदत्वाची रक्ममही परत नाही. त्यांना साखरही नाही व सभासदत्व ही नाहीयाकडे गोकुळच्या संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर यांनी सांगितले.

सुनील शिंदे यांनी संचालकाच्यामुळे कारखान्यावर ही वेळ आली आहे. कारखान्यातील चोरीबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. एनसीडीसीकडून कर्ज घेतले. पण हप्ते फेडण्याबाबत ठोस धोरण घ्यावे लागेल. यासह विविध गोष्टीची विचारणा केली.

माजी अध्यक्ष प्रा. सुनिल शिंत्रे यांनी कारखान्यातील सायलो व अन्य तांत्रिक सुधारणामुळे अनावश्यक खर्च झाला पण यातून कोणताही फायदा झाला नाही. का. संपत देसाई, व्ही. जी. कातकर, शांताराम पाटील, प्रा. तानाजी राजाराम, संजय देसाई, राजेंद्र देसाई, युवराज पोवार, गुरु गोवेकर, तुळशीराम पोवार यांनी सुचना मांडल्या. जिल्हा बँक प्रतिनिधी सुधीर देसाई, संचालकासह तालुका संघाचे अध्यक्ष महादेव पाटील, उपाध्यक्ष दौलती पाटील, सखाराम केसरकर, आनंदा कुंभार, विठ्ठल देसाई, शिरीष देसाई, गणपतराव सांगले, रंगराव माडभगत, दिनेश कांबळे, रोहन जाधव, प्रकाश मोरुस्कर अनिकेत कवळेकर, बी.टी. जाधव, विक्रम देसाई यांच्यासह विविध संस्थाचे प्रतिनिधी, सभासद उपस्थित होते.

अध्यक्ष देसाई यांची दिलगीरी

आजरा तालुक्याचे प्रतिनिधीत्व करणारे व कारखान्याला वेळोवेळी सहकार्य करणारे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार शिवाजीराव पाटील, आमदार सतेज पाटील यांचे फोटो अहवालात अनावधानाने राहीले असून त्याबाबत दिलगीरी व्यक्त करत असल्याचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई यांनी सांगीतले.

बोगस ताळेबंदावर आधारित सभाही बोगस 

शिवसेना शिंदे गटाचा आरोप 

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने वार्षिक सभेसमोर ठेवलेला अहवाल हा धादांत खोटा आहे. लेखापरीक्षकाला हाताशी धरून सभासदांची ही केलेली फसवणुक आहे. सभासदांच्या मालकीची १२ कोटीं २४ लाखांची देणी कारभाऱ्यांनी परस्पर भागभांडवल व राखीव निधीला वर्ग केली आहे. याला जबाबदार कोण? अशी विचारणा करीत आजची सभा बोगस ताळेबंदावर झाल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाने पत्रकार परिषदेत केला. कारखान्याला आर्थिक मदत करणारे मुख्यमंत्र्यासह पालकमंत्री प्रकाश आबिटकर, चंद्रकात पाटील यांचा अहवालावर फोटो नसल्याबाबतही निषेधही केला.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख संजय पाटील म्हणाले, कारखाना ही कोणत्याही एका पक्षाची खासगी मालमत्ता नाही हे लक्षात ठेवावे. कारखान्याने सादर केलेल्या अहवालात तफावत असून त्रुटी आहेत. खर्चाच्या नावाखाली शेती कार्यालये बंद केली आहेत. कारखान्यात चोरी झाली पण त्यांचा छडा लावलेला नाही. कारखान्यात विस्तारीकरणाच्या नावाखाली पैसे उचलले जात आहेत. संचालक मंडळाने आठ दिवसात अहवाल खोटा असल्याबाबत शुध्दीपत्रक नाही काढले तर संबंधीत विभागाकडे रितसर तक्रार करणार आहे.

इंद्रजीत देसाई म्हणाले, कारखान्याच्या ताळेबंदाबाबत लेखी तक्रारी दिल्या पण त्याची दखल घेतली जात नाही. दरवर्षी असेटस् वाढवून खोटा ताळेबंद सादर केला जात आहे. यंदा दाखवेला १ कोटी ४२ लाखांचा नफा खोटा आहे. ज्यांना जनतेने नाकारले, ज्यांची कारखान्याला कोणतीही मदत नाही त्यांचे फोटो अहवालावर छापले आहेत.

उपजिल्हा प्रमुख राजेंद्र सावंत यांनी कारखान्यातील कारभावर टिका केली. या वेळी विजय थोरवत, संतोष भाटले, धनंजय पाटील, संजय डोंगरे, नितीन यादव, तानाजी उंडगे, राहूल देसाई यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत सोहाळे येथे महाश्रमदान

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

“स्वच्छता ही सेवा २०१५” अंतर्गत सोहाळे ग्रामपंचायतीचा “एक दिवस – एक तास – एक साथ” उपक्रम उत्साहात पार पडला.

गटविकास अधिकारी श्री. सुभाष सावंत यांची प्रमुख उपस्थितीत ही विशेष स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली.या मोहिमेत ग्रामपंचायत सदस्य, शाळकरी विद्यार्थी, महिला बचतगट, युवक मंडळे, स्वयंसेवी संस्था तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग घेतला.

या मोहिमेअंतर्गत गावातील प्रमुख रस्ते, शाळा व अंगणवाडी परिसर, देवस्थान, स्मशान शेड, बसथांबा आदी ठिकाणी एकत्रितपणे स्वच्छता करण्यात आली. गावातील प्रत्येक नागरिकाने घरासमोरील व सार्वजनिक ठिकाणचा कचरा गोळा करून स्वच्छतेस हातभार लावला. 

यावेळी मार्गदर्शन करताना गटविकास अधिकारी श्री. सुभाष सावंत यांनी “गावाच्या प्रगतीसाठी स्वच्छता ही पहिली पायरी आहे. एक दिवस, एक तास गावासाठी दिला तर आपले गाव केवळ स्वच्छच नव्हे तर आरोग्यदायी व आदर्श गाव म्हणून ओळखले जाईल. सर्वांनी मिळूनच सहभाग घेतल्यास हा उपक्रम यशस्वी होऊ शकतो असे स्पष्ट केले.

सरपंच सौ.भारती डेळेकर यांनी प्लास्टिकचा वापर कमी करण्याचे आवाहन केले. त्याच बरोबर या उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये स्वच्छतेबाबत सकारात्मक दृष्टीकोन निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीने या पुढेही प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी सामूहिक स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. स्वच्छता ही केवळ एकदिवसीय मोहीम न राहता दैनंदिन सवय होणे आवश्यक असल्याचे त्यांनी व्यक्त केले.

या उपक्रमामुळे गावातील सामाजिक एकोपा बळकट झाला असून, नागरिकांनी “आपले गाव – आपली जबाबदारी” या भावनेने स्वच्छतेचे व्रत हाती घेण्याचे आश्वासन दिले.

या कार्यक्रमासाठी श्री. सूर्यकांत नाईक उप अभियंता बांधकाम, श्री. बसवराज गुरव
, गटशिक्षणाधिकारी,विस्तार अधिकारी श्री. कुंभार, श्री. विलास पाटील , पंचायत समिती कडील सर्व अधिकारी कर्मचारी, ग्रामपंचायत अधिकारी, रणदिवे , बी.आर. सी श्री. सर्जेराव घाटगे, श्री. कुंडलिक शिर्सेकर त्याचबरोबर आजरा महाविद्यालय व व्यंकटराव ज्यु. कॉलेज कडील NSS व NCC विदयार्थी, विद्यामंदिर सोहाळे शाळेचे शिक्षक व विद्यार्थी, ग्रा.प उप सरपंच श्री वसंत कोंडुसकर व ग्रामपंचायत सर्व सदस्य,कर्मचारी, अंगणवाडी सेविका मदतनीस,आशा सेविका, पोलीस पाटील,गावातील सर्व शासकीय- निमशासकीय अधिकारी, कर्मचारी, युवा मंडळे, महिला बचत गट आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अखेर उत्तूर–कडगाव रस्ता दुरुस्तीला सुरुवात; संंथगतीमुळे नागरिक संतप्त


उत्तूर: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा (मंदार हळवणकर)

आठ महिन्यांहून अधिक काळ ठप्प असलेले उत्तूर–कडगाव रस्त्याचे दुरुस्ती काम अखेर सुरू झाले आहे. मात्र कामाचा वेग अत्यंत संथ असून तो फक्त जनक्षोभ शांत करण्यासाठी सुरू केल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

कृष्णा व्हॅली–उत्तूर ते कडगाव या आठ किमी रस्त्याची खुदाई करूनही पर्यायी मार्ग तयार करण्यात आलेला नाही. परिणामी वाहनधारक गेल्या काही महिन्यांपासून जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. पावसाळा, लक्ष्मी यात्रा आणि वाढती वाहनसंख्या लक्षात न घेता हे काम सुरू केल्याने गैरसोयींमध्ये अधिक भर पडली आहे.महिनाभरापूर्वी तहसिलदारांनी बैठक घेतली होती, मात्र संबंधित अभियंता हजर राहिले नाहीत. उपस्थितांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रत्यक्षात मनुष्यबळ व यंत्रसामुग्री पाहता हे काम आठ दिवसांत पूर्ण होऊ शकले असते. तरीही आतापर्यंत फक्त कडगाव–गोडसेवाडी दरम्यान एक किलोमीटरचा रस्ता झाला असून उर्वरित काम कासवगतीने सुरू आहे.

वास्तविक दोन्ही बाजूंनी काम सुरू करून रस्ता लवकरात लवकर खुला करणे आवश्यक होते. पण सध्या फक्त एका बाजूनेच काम सुरू आहे. या गतीने काम महिनाभराहून अधिक काळ चालेल, असा अंदाज आहे. दरम्यान, मुमेवाडी–उत्तूरमार्गे गोव्याला जाणाऱ्या तसेच कोल्हापूर व पुणे गाड्यांची लक्षणीय संख्या लक्षात घेता पर्यायी मार्ग किंवा तीन किमी रस्ता तयार करणे गरजेचे होते. पण भर वाहतुकीच्या भागात काम संथगतीने सुरू असून अधिकारी फोन उचलत नाहीत. काम सुरू आहे एवढ्यावरच नागरिकांना समाधान मानावे लागत आहे.

निधन वार्ता
चाळू पोवार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

मलीग्रे ता. आजरा येथील चाळू शंकर पोवार ( वय ५६ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

हरपवडे सोलर वाहिनीचे लोकार्पण

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

३३/११ के व्ही गवसे उपकेंद्र येथे ११ के व्ही हरपवडे सोलर वाहिनीचा लोकार्पण सोहळा पार पडला. भारतातील २४५८ मेगावॉट क्षमतेच्या एकूण ४५४ सौर ऊर्जा प्रकल्पांचे ऑनलाइन प्रणाली द्वारे लोकार्पण मा . नरेंद्र मोदी, प्रधान मंत्री भारत सरकार व मा. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या  हस्ते पार पडले.

हरपवडे ग्रामपंचायत हद्दीत ४ मेगावॉट क्षमतेचा हा प्रकल्प उभारण्यात आला आहे, सदरच्या सौर प्रकल्पामुळे ३३/११ के व्ही गवसे उपकेंद्रमधून विद्युत पुरवठा होणार्‍या गवसे पंचक्रोशीतील १०२५ कृषी ग्राहकांना दिवसा वीज पुरवठा देणे शक्य होणार आहे. सदर आयोजित कार्यक्रम कार्यकारी अभियंता, गडहिंग्लज विभाग श्री.संजय पोवार यांच्या अध्यक्षतेखाली झाला तसेच सदर कार्यक्रमास अधीक्षक अभियंता,कोल्हापुर मंडळ श्री. गणपती लटपटे ,मुख्य अभियंता,कोल्हापुर परिमंडळ श्री.स्वप्निल काटकर यांचे मार्गदर्शन लाभले.

या सोहळ्याप्रसंगी उपस्थित सरपंच ग्रामपंचायत हरपवडे श्री. सागर पाटील यांचा सदर महत्वकांक्षी प्रकल्पास जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच नवीन वाहिनीचे उद्घाटन कार्यकारी अभियंता श्री.पोवार यांच्यासह सरपंच ग्रामपंचायत हरपवडे श्री.सागर पाटील,श्री.गोविंद गुरव माजी सरपंच ग्रामपंचायत हरपवडे, श्री.मुकुंद तानवडे , डॉ. धनाजी राणे प्रतिष्ठित नागरिक आदी ग्रामपंचायत सरपंच यांच्या उपस्थित करण्यात आले.

दिवसा शेतीस विद्युत पुरवठा उपलब्ध होणार असल्याने उपस्थित प्रतिष्ठित नागरिक तसेच शेतकरी यांनी आनंद व्यक्त करून महावितरणचे आभार मनोगतातून व्यक्त केले.सदर प्रकल्पाचे काम हे मे. MSKVY Third Solar SPV ltd. मुंबई यांनी यशस्वी रित्या पार पाडले आहे. लोकार्पण सोहळ्याप्रसंगी उप.कार्यकारी अभियंता,उप विभाग आजरा,आजरा उपविभागातील सर्व सहाय्यक अभियंता,सर्व जनमित्र, कर्मचारी, सदर प्रकल्पाचे प्रतिनिधी व बहुसंख्य लाभार्थी शेतकरी सदर सोहळ्यास उपस्थित होते.

तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत आजरा हायस्कूलचे यश


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये १७ वर्षे वयोगटात आजरा हायस्कूलच्या खेळाडूंनी अनेक क्रीडा प्रकारांमध्ये यश संपादन करत यशाची परंपरा कायम ठेवली. मुले व मुली या दोन्ही संघानी प्रथम क्रमांकाची अनेक पारितोषिके प्राप्त केली विजयी खेळाडू पुढील प्रमाणे….

१०० मीटर धावणे ( मुले )
प्रथम – महंमद अय्याज यासीन माणगावकर द्वितीय – सिद्धेश प्रकाश कांबळे
(मुली)
प्रथम – दीपा रामचंद्र गावडे
द्वितीय – राधिका महादेव बांदिवडेकर २०० मीटर धावणे
(मुले)
प्रथम – अनंत संतोष गिरी
(मुली)
द्वितीय – साक्षी गंगाराम गावडे

४०० मीटर धावणे (मुली)
प्रथम – विजयालक्ष्मी विश्वनाथ पाटील
तृतीय – श्रेया गजानन पाटील
(मुले)
तृतीय – सिद्धिक मजबू लाल वाडीकर

८०० मीटर धावणे
( मुली )
प्रथम – मयुरी मारुती डोणे

१५०० मीटर धावणे प्रथम – आदित्य अंकुश लाड
लांब उडी (मुली)
प्रथम – दीपा रामचंद्र गावडे
उंच उडी (मुली)
द्वितीय – दीपा रामचंद्र गावडे
( मुले) तृतीय – महंमद अय्याज यासीन माणगावकर
गोळा फेक (मुली) द्वितीय – समीक्षा बाळू रानमाळे
भालाफेक ( मुली )
द्वितीय – दीपा गोपाळ नाईक

४ x१०० मीटर रिले ( मुले )
प्रथम क्रमांक – सिद्धेश प्रकाश कांबळे, सार्थक अरुण अजगेकर,अनंत संतोष गिरी, सिद्धिक वाडीकर, मोहम्मद अयाज माणगावकर, मुली – प्रथम क्रमांक दीपा रामचंद्र गावडे, साक्षी गंगाराम गावडे, विजयालक्ष्मी विश्वनाथ पाटील, श्रेया प्रदीप पाचवडेकर,मयुरी मारुती डोणे

४x१०० मीटर रिले मुली – प्रथम क्रमांक +दीपा गावडे, साक्षी गावडे, विजयालक्ष्मी पाटील, श्रेया पाचवडेकर, मयुरी डोणे
मुले – द्वितीय क्रमांक सिद्धेश कांबळे, सार्थक अजगेकर,अनंत गिरी, मोहम्मद अयाज माणगावकर, सिद्दिक वाडीकर

या सर्व खेळाडूंना एम. एस.गोरे, सौ. एम.पी. चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले तर संस्थेचे अध्यक्ष अशोकअण्णा चराटी,संचालक मंडळ मुख्याध्यापक ए. एल. तोडकर उपमुख्याध्यापिका एच. एस. कामत पर्यवेक्षक ए.आर.व्हसकोटी यांचे प्रोत्साहन लाभले. या खेळाडूंची जिल्हास्तरासाठी निवड झाली आहे.

पंडित दीनदयाळ विद्यालयात ‘स्वच्छ भारत अभियान घनकचरा व्यवस्थापन ‘कार्यशाळा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

पंडित दीनदयाळ विद्यालयामध्ये स्वच्छ भारत अभियान घनकचरा व्यवस्थापन  अंतर्गत स्वच्छ भारत अभियान टप्पा क्रमांक दोन स्वच्छता पंधरवड्यानिमित्त कार्यशाळा घेण्यात आली. मान्यवरांचे स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक संजीव देसाई , विजय राजोपाध्ये यांनी केले. श्रीधर आणि ललित यांनी विद्यार्थ्यांना कचरा म्हणजे काय? घनकचऱ्याचे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम, कचऱ्याचे प्रकार समजावून सांगितले .यासाठी त्यांनी विविध स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांना कचऱ्याचे वर्गीकरण कसे केले जाते याविषयी माहिती सांगितली.

घनकचऱ्याचे प्रकारानुसार कोणत्या कचऱ्याचे कोणत्या गटांमध्ये वर्गीकरण केले जाते याविषयी चर्चासत्र घेतले. प्रत्यक्ष स्पर्धा घेऊन प्रात्यक्षिक घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना कचरा वर्गीकरण कसे करावे याविषयी महत्त्वाची माहिती समजली. विद्यार्थ्यांना विविध प्रश्न विचारून त्यांच्यामध्ये घनकचऱ्याविषयी जागृती निर्माण केली. घनकचरा साचल्यामुळे कोणते दुष्परिणाम होतात यामध्ये प्रामुख्याने घनकचऱ्यामुळे हवा प्रदूषण ,जल प्रदूषण माती प्रदूषण कसे होते याची प्रात्यक्षिकासह त्यांनी माहिती सांगितली. याचबरोबर कचरा व्यवस्थापन व ग्लोबल वार्मिंग यांचा संबंध सांगितला .घनकचरा वाढल्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग कसे होते, त्याचे दुष्परिणाम पर्यावरणाला मानवाला कसे भोगावे लागत आहेत या संदर्भात विद्यार्थ्यांना विविध कृतीतून समजावून सांगितले.

घनकचऱ्याचे व्यवस्थापन कसे करावे ,त्याचा पुनर्वापर कसा करावा ,कमीत कमी घनकचरा कसा होईल याची दक्षता कशी घ्यावी याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेस विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी -विद्यार्थिनी, नगरपंचायतीचे कर्मचारी जयवंत कांबळे उपस्थित होते.

दुर्गामाता दर्शन
नवरात्र उत्सव मंडळ, मलीग्रे

अध्यक्ष : अथर्व बुगडे                         उपाध्यक्ष : रणजीत बुगडे
सचिव : राजेश कोकितकर
मूर्ती देणगीदार : शामराव बाबू जाधव व परिवार
मूर्तिकार : जोतिबा पांडुरंग कुंभार (मलिग्रे)

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजऱ्यात जिल्हा बँकेकरिता कांटे की टक्कर …’ डी फॅक्टर’चा फॉर्म्युला सुरू

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!