



खानापूर येथे हत्तीचा धुमाकूळ
ऊस व भात पिकाचे प्रचंड नुकसान

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
खानापूर तालुका आजरा येथे गेले दोन दिवस हत्तीने धुमाकूळ घातला असून ऊस व भात पिकाचे मोठे नुकसान केले आहे. एकीकडे पावसाच्या जोरदार हजेरीने शेतकरी अडचणीत आला असतानाच दुसरीकडे हत्तीचा धुमाकूळ सुरू झाल्याने हातातोंडाशी आलेली पिके वाया जात असल्याने शेतकरी वर्ग हतबल झाला आहे.
गेले दोन दिवस हत्तीने कृष्णा रामू राणे, प्रशांत शंकर गुरव, नामदेव गुंडू गुरव, कुंडलिक विठोबा धनवडे, नामदेव विठोबा धनवडे, जेरोन लेक्स डिसोजा, सुशीला फिलिप डिसोजा, प्रकाश पांडुरंग जाधव यांच्या बोरूटी नावाच्या शेतामध्ये धुमाकूळ घातला असून यामध्ये भात व ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
वनविभाग हत्तींचा कायमस्वरूपी बंदोबस्त करणार तरी कधी? असा प्रश्न आता सर्वसामान्य शेतकरी उपस्थित करू लागला आहे.
रानडुकरांच्या त्रासाने भुईमूग उत्पादक वैतागला…
खानापूर भागात हत्तीचा धुमाकूळ सुरू असताना मडिलगेसह वझरे, पेरणोली भागामध्ये रानडुकरांनी धुमाकूळ घातला आहे. रानडुकरांच्या या त्रासाने भुईमूग उत्पादक शेतकरी वैतागून गेला आहे.


आजऱ्यात पावसाचाच ‘गरबा’

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यात गुरुवारी दिवसभर पावसाचाच ‘गरबा’ आजरावासीयांनी अनुभवला. यामुळे अखेरच्या टप्प्यातील नवरात्रोत्सवाचे कार्यक्रम अनेक मंडळांना आटोपते घ्यावे लागले.
गुरुवारी सकाळपासूनच दिवसभर पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. पावसामुळे नवरात्र उत्सव मंडळांच्या मंडपामध्ये पाणीच पाणी झाले होते. यामुळे खुल्या मैदानातील कार्यक्रमावर मर्यादा आल्याचे स्पष्टपणे जाणवत होते.
रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. सलग तीन दिवस तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने भात पिक उत्पादकांचे मात्र धाबे दणाणले आहे. हातातोंडाशी आलेले भात पीक वाया जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने पावसाने आता विश्रांती घ्यावी अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
आमदार आबिटकर यांचे कार्यक्रम रद्द
आमदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नातून व निधीतून होणाऱ्या विविध विकास कामांचा शुभारंभ व झालेल्या विकास कामांचे उद्घाटन आज आयोजित करण्यात आले होते. परंतु पावसामुळे हे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.


आजऱ्यात आयटीआयला ‘मृत्युंजय ‘कारांचे नाव

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाने काढलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील १०६ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या नावात बदल केला आहे. त्यानुसार आजऱ्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला प्रसिध्द साहित्यिक ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत यांचे नाव मिळणार आहे. यापुढे शिवाजी सावंत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था या नावाने ओळखली जाणार आहे.
राज्यात ४१९ शासकीय, तर ५८५ खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था कार्यरत आहेत. त्यापैकी १०६ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या नावात बदल करून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती तसेच समाजसुधारकांची नावे देण्याच्या प्रस्तावाला ४ ऑक्टोबर २०२४ मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा समावेश आहे.
ग्रामीण रुग्णालयाचे काय…?
वीस वर्षांपूर्वी ‘मृत्युंजय’कारांच्या निधनानंतर तातडीने आजरा ग्रामीण रुग्णालयाचे मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत ग्रामीण रुग्णालय असे नामकरण करण्यात आले होते. पण अद्याप कागदोपत्री ‘मृत्युंजय’कारांचा उल्लेख कोठेही आढळत नाही. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयाच्या कागदपत्रांवर तसा बदल करावा अशी मागणी ‘मृत्युंजय’ कार प्रेमी नागरिकांकडून केली जात आहे.


आजऱ्यात आज डोक्यावरच्या आरतीचा थरार…

यआजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
ग्रामदैवत श्री रवळनाथ मंदिर आजरा येथे विजयादशमीनिमित्त आज शुक्रवारी सायंकाळी ७.३० वाजता डोक्यावरील जागर आरतीचा थरार आजरेकरांना अनुभवावयास मिळणार आहे. नवरात्र उत्सव कालावधीतील हा एक प्रमुख धार्मिक कार्यक्रम मानला जातो.
यावर्षी श्री रवळनाथ मंदिराच्या नूतन वास्तूचे काम सुरू आहे. तरीदेखील डोक्यावरील आरतीचे भक्तगणांना औत्सुक्य लागून आहे.


रामतीर्थ येथे पर्यटकांकडून कर आकारणी करू नये…
अन्याय निवारण समितीची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
रामतीर्थ हे आजरा तालुक्यातील एक सुप्रसिद्ध असे पर्यटन स्थळ आहे. स्थानिक तसेच बाहेरगावचे पर्यटक मोठ्या संख्येने या पर्यटन स्थळाला भेट देत असतात. आजरा- गडहिंग्लजला या मार्गावरुन रामतीर्थ कडे जाणाऱ्या रस्त्यावर अंदाजे ३०० मीटर अंतरावर चौकी तयार करून रामतीर्थ मंदीराकडे जाणाऱ्या वाहानामधील पर्यटकाकडून प्रतेकी रु. दहा प्रमाणे कर आकारणी करणेत येत आहे. सदर कर आकारणी ही अन्याय स्वरूपाची असल्याने ती त्वरित बंद करावी अशी मागणी अन्याय निवारण समितीच्या वतीने परिक्षेत्र वनाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सदर कर आकारणीचे प्रयोजन काय ? सदर रस्ता जिल्हा परिषद अंतर्गत शासन खर्चातून झालेला आहे सदर रस्त्याची देखभाल दुरुस्ती सुध्दा शासन करते मग ही कर आकारणी कशासाठी व या कराच्या मोबदल्यात आपण कोणत्या सुविधा पुरवता या बद्दलची माहीती अवगत करावी. सध्या चालू असलेल्या पर्यटन कर वसूली बाबत पर्यटक नाखूष असून रामतीर्थला येथे फक्त मंदीर व तेथे धबधबा आहे हे पहाण्यासाठी वाहनातील प्रत्येक पर्यटकाकडून विनाकारण रु. १० चा भुर्दंड आहे असा विचार करून पर्यटक जाणेचे टाळत आहेत. तेंव्हा सदर पर्यटन कर ताबडतोब बंद करून पर्यटकांना विना मोबदला जाऊ द्यावे. अशी मागणीही या निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे,पांडुरंग सावरतकर, रवी भाटले,जावेद पठाण, नितीन कांबळे, वाय. बी. चव्हाण, राजू विभुते, जोतिबा आजगेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.


आज-याचे धुरांडे आज पेटणार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे सण २०२४-२५ या २६ व्या गळीत हंगामाचे बॉयलर अग्निप्रदीपन, होम हवन विधी आज शुक्रवार दि. ११ आक्टोंबर रोजी सकाळी नऊ वाजता कारखान्याचे अध्यक्ष वसंतराव धुरे यांच्या अध्यक्षतेखाली, संचालक सुभाष देसाई व सौ. विजयालक्ष्मी सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष मधुकर कृष्णा उर्फ एम. के. देसाई यांनी दिली.


आजऱ्यात उद्या श्री महादुर्गामाता दौड

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथे शनिवार दि.१२ ऑक्टोबर,२०२४ रोजी दुर्गादौडची सांगता महा दुर्गादौडने होणार आहे.यामध्ये अनेक गावातुन हिंदुत्ववादी कार्यकर्ते व धारकरी सहभागी होणार आहेत. सकाळी ठीक ६:३० वाजता या महादुर्गामाता दौडची सुरुवात श्री शिवतीर्थ आजरा येथून होणार असून सर्वांनी अधिक अधिक संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान,आजरा तर्फे करण्यात आले आहे.

मलिग्रे येथे ऊस उत्पादक शेतकरी व तोडणी वाहतूकदार यांची बैठक संपन्न

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मलिग्रे ता. आजरा येथील मल्लिकार्जून मंदिरामध्ये ऊस उत्पादक शेतकरी व तोडणी वाहतूकदार यांची बैठक आजरा साखर कारखाना संचालक अशोक तर्डेकर याच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
प्रास्ताविक कॉ. संजय घाटगे यांनी केले. यावेळी माजी संचालक पांडूरंग सावंत यांनी आजरा कारखान्याने क्रम पाळीने ऊस तोड करावी, तोडणी ओढणीचे योग्य नियोजन करावे, तर पोलिस पाटील मोहन सावंत यांनी खुद्द तोड करणारे शेतकरी यांनाही वाढीव तोडणी हप्ता मिळावा आणि ऊस तोड सलग करून, शेती पाणंदं खुले करावेत, तर वाहतूकदार यांनी आपल्या अडचणी व येणा-या प्रश्नावर चर्चा करून आमच्याही कांहीं समस्या असल्या तरीही गाव ठरवेल त्याप्रमाणे आम्ही काम करू असे अश्वाशित केले. या वर्षी गावाचा संपूर्ण ऊस आजरा साखर कारखान्याला घालण्याचा निर्धार व्यक्त करून, तसा ठराव एकमताने मंजूर केला.यावेळी संचालक अशोक तर्डेकर यांनी आजरा कारखाना अडचणीतून वाटचाल करीत असताना देखील योग्य नियोजन करून ऊस उत्पादक शेतकरी व तोडणी वाहतूकदार याचे प्रश्न मार्गी लावण्याचे आमचे प्रयत्न राहतील त्याचप्रमाणे आपल्या हक्काचा कारखान्याचा गणित हंगाम यशस्वी होण्यासाठी सभासद, उत्पादक शेतकरी, तोडणी वाहतूकदार तसेच कारखाना कामगार यांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.
यावेळी सदा माणगावकर, माजी सरपंच गजानन देशपांडे, शिवाजी भगुत्रे, विश्वास बुगडे ,सुरेश बुगडे, प्रकाश सावंत, दिलीप बुगडे , दत्ता परीट, ऊदय देशपांडे, विजय कागिनकर , धनाजी बुगडे, सागर बुगडे याच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.
आभार मा. सरपंच अशोक शिंदे यांनी मानले.


तालुकास्तरीय शासकीय शालेय खो- खो, क्रीडा स्पर्धेत ‘व्यंकटराव ‘चे यश..

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुकास्तरीय शासकीय क्रीडा स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या यामध्ये व्यंकटराव हायस्कूलच्या १७ वर्षे वयोगटातील मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक मिळवून उज्वल सुयश संपादन केले.
यामधील सहभागी खेळाडू (मुले)-
जुनेद असिफ मुल्ला,अफान इकबाल हकीम,
तन्सीर इसहाक शेख, स्वप्निल दत्तात्रय पाटील, सुयश सागर भालेकर, मंथन प्रेमानंद हरमळकर, भास्कर ज्ञानोबा पाटील, प्रथमेश महादेव पाटील, कुणाल उत्तम माने, केंफ वाहिदुल्ला इंचनाळकर, तन्मय सहदेव पाटील, ओमकार अनिल कदम, आदित्य प्रभाकर पाटील, वेदांत दयानंद निउंगरे, विनायक सुधाकर परीट, समर्थ शामराव निऊंगरे, हुजेर आरिफ माणगावकर.
जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेसाठी निवड झालेल्या या यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी, सर्व संचालक मंडळ, प्राचार्य आर.जी.कुंभार, पर्यवेक्षिका सौ. व्ही. जे. शेलार यांचे प्रोत्साहन लाभले. व क्रीडा शिक्षक सुनील पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

(Advt.)
लवकरच आपल्या सेवेत… आजच ॲडव्हान्स बुकिंग करा..
तुमच्या स्वप्नातील घर, तुमच्या बजेटमध्ये…”आपलं घर* ” शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सर्व सोयीनीयुक्त…
✅ शाळा, कॉलेज, बॅंका , स्टँड, हॉस्पिटल, होटेल्स, भाजी मार्केट, पेट्रोल पंप, मेन मार्केट फक्त 2 मिनिटांवर
✅ 1 आणि 2 BHK फ्लॅट्स
✅ इतर अनेक सुविधा
🏡साईटचा पत्ता :
समर्थ कृपा रेसिडेन्सी , भगवा रक्षक चौक, सोमवार पेठ, दत्त मंदिरा समोर, आजरा
☎️ संपर्क –
+91 9527 97 3969



