सोमवार
१३ जुलै २०२६


अर्ध्यावरती डाव मोडला…
चिमुकलीला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज अपयशी

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
दुसऱ्या अपत्याला जन्म देताना उत्तूर येथील विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. शितल जगदीश कागीनकर (वय ३५ मुळगाव मलिग्रे ता. आजरा ) असे मृत मातेचे नाव आहे.
प्रसूतीदरम्यान प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना तातडीने कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू करत प्रसूती केली. प्रसूतीनंतर गोंडस मुलीचा जन्म झाला. मात्र, आईची प्रकृती अधिकच खालावत गेल्याने डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही त्यांना वाचविण्यात अपयश आले.एका बाजूला चिमुकलीने जगात पहिले पाऊल टाकले, तर दुसऱ्याच क्षणी आईची कायमची साथ हरपल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नवजात बालिका जन्मताच आईविना पोरकी झाली, तर सहा वर्षांच्या मोठ्या मुलीच्या डोक्यावरूनही आईचे छत्र हरपले. शितल कागीनकर यांच्या पश्चात पती, सहा वर्षांची मुलगी, नवजात कन्या तसेच आई-वडील असा परिवार आहे. कष्टाळू स्वभाव व सतत हसतमुख असणाऱ्या शितल यांच्याबाबत घडलेल्या या घटनेमुळे उत्तूर व मलिग्रे परिसरात हळहळ व्यक्त होत असून कागीनकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
आई-वडिलांपाठोपाठ पत्नीचाही मृत्यू…
जगदीश कागीनकर यांचे आई वडील हयात नाहीत. त्यामुळे पत्नी शितल यांचाच त्यांना आधार होता. तिचाही मृत्यू झाल्याने जगदीश त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

आजऱ्यात बिबट्याची दहशत, पोळगावात हत्तीचा धुमाकूळ ; वनविभागाची दमछाक

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यात वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकरी आणि वनविभाग दोघेही अडचणीत सापडले आहेत. आजरा शहरात बिबट्याचे दर्शन झाल्याने वनविभाग अलर्ट मोडवर असतानाच पोळगाव येथे हत्तीने शेतात घुसून मोठे नुकसान केले आहे.
शंकर मुळीक आणि विनायक मुळीक यांच्या शेतातील ऊस, भात, केळी आणि नारळाची झाडे हत्तीने तोडून टाकली. खरिपाची तयारी सुरू असताना पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
एकीकडे बिबट्याच्या हालचालींमुळे नागरिक भयभीत आहेत, तर दुसरीकडे हत्तीच्या धुमाकुळामुळे शेतीचे नुकसान वाढले आहे. त्यामुळे वनविभागाला एकाचवेळी दोन आघाड्यांवर काम करावे लागत आहे.बिबट्याला पकडायचे की हत्तीला हुसकावून लावायचे अशी अवस्था वन खात्याची झाली असून वन कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे.

रवींद्र भोसले यांचे निधन

आजरा येथील गर्ल्स हायस्कूल मधील शिक्षक रवींद्र भोसले/ मुळगाव महागाव यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ५७ वर्षे होते.
निसर्गप्रेमी व कलेची आवड असणारे भोसले यांचा इंग्रजी विषय अध्यापनात विशेष हातखंडा होता.
त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे.

आजरा तालुक्यात पाऊस गायब ; भातरोपलावणीत व्यत्यय
शेतकरी चिंतेत

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गेल्या आठ दिवसांपासून आजरा तालुक्यातून पावसाने पूर्णपणे पाठ फिरवली आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात जोरदार बरसलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागत आणि ऊस बांधणीची कामे पूर्ण केली होती. मात्र आता पाऊस गायब झाल्याने भात रोप लावणीची कामे खोळंबली आहेत.
रोपे तयार झाली असली तरी पाण्याअभावी ती शेतात लावता येत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. वेळेवर लावणी न झाल्यास उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. भाजीपाला आणि इतर पिकांनाही पाण्याचा ताण जाणवू लागला आहे.
हवामान विभागाने पुढील काही दिवसांत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली असली तरी शेतकरी मात्र आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत. काहीजण मोटरपंपच्या सहाय्याने पाण्याची व्यवस्था करून रोप लावणी आटोपून घेताना दिसत आहेत.

निधन वार्ता
गणपती कुंभार


फोटो क्लिक…


आजचे पंचांग
दिनांक : १३ जुलै २०२६
वार : सोमवार
माह (अमावस्यांत) : ज्येष्ठ
माह (पूर्णिमांत) : आषाढ
ऋतु : वर्षा
आयन : दक्षिणायन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : चतुर्दशी तिथी (सायंकाळी ०६.४९ पर्यंत) त्यानंतर अमावस्या
नक्षत्र : आर्द्रा नक्षत्र (१४ जुलै पहाटे ०२.५१ पर्यंत) त्यानंतर पुनर्वसू नक्षत्र
योग : ध्रुव योग (दुपारी ०३.५९ पर्यंत) त्यानंतर व्याघात योग
करण : विस्ती भद्रा करण (सकाळी ०८.३९ पर्यंत) त्यानंतर शकुनी करण
चंद्र राशी : मिथुन राशी
सूर्य राशी : मिथुन राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी ०७.४८ ते सकाळी ०९.२७ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१८ ते दुपारी ०१.११
सूर्योदय : सकाळी ०६.१०
सूर्यास्त : सायंकाळी ०७.१९
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

