mrityunjaymahanews
अन्य

मंगळवार – सातच्या बातम्या

मंगळवार 

१४ जुलै २०२६

हत्या की आत्महत्या…?
लाटगावच्या अस्मिता चा सासुरवाडीत संशयास्पद मृत्यू

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

लग्न झाल्यापासून सासरच्या मंडळींनी पैशासाठी दिलेला त्रास, मुलगी जन्माला आली म्हणून नवरा, सासू-सासरे नणंदेकडून होणारा छळ याला कंटाळून महिन्यापूर्वी जग बघितलेल्या बाळाचं बारसं होण्याआधीच २३ वर्षीय विवाहितेने आत्महत्या करून जीवन संपवलं, ‘अस्मिता प्रतीकसिंह काटकर’ /पूर्वाश्रमीचे नाव कु. अस्मिता अजितसिंह सरदेसाई (लाटगाव ता.आजरा) असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचं नाव आहे. याप्रकरणी अस्मिताच्या आईनं दिलेल्या फिर्यादीनुसार सासरच्या तिघांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी…

कोल्हापुरातील सायबर चौकात असणाऱ्या काटकर पार्क येथे राहणारे प्रतिकसिंह काटकर यांच्याशी अस्मिताचा वर्षभरापूर्वी विवाह झाला होता. महिन्यापूर्वी प्रतीक सिंह आणि अस्मिता यांच्या पोटी मुलीचा जन्म झाला होता, तिच्याच बारशाची लगबग घरात सुरू होती. मात्र रविवारी दुपारी अस्मिताने राहत्या घरी बेडरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. यानंतर अस्मिताच्या आईने अस्मिताचा पती प्रतीकसिंह वीरेंद्रसिंह काटकर, सासू मनीषा वीरेंद्रसिंह काटकर, सासरे वीरेंद्रसिंह काटकर, नणंद ऋतुजा काटकर यांच्यावर आत्महत्येला प्रवृत्त केल्याची तक्रार राजारामपुरी पोलीस ठाण्यात दाखल केली. यावरुन गुन्हा दाखल करुन, अस्मिताचे पती प्रतीकसिंह काटकर, वीरेंद्रसिंह काटकर आणि मनीषा काटकर यांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मुलीच्या जन्मामुळे सासरच्या लोकांकडून होणारा शारीरिक आणि मानसिक छळ आणि मुलाच्या अपेक्षेने आधीच खरेदी केलेले कपडे या तणावातून हे पाऊल उचलल्याचा आरोप आई-वडिलांनी केला आहे. आम्हाला न्याय मिळेल का ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

नवीन पिढीने शेतीचा वसा पुढे चालवावा…

पालकमंत्री प्रकाश आबिटकर

शेती कामात पालकमंत्री गुंतले

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

नवीन पिढीलाही शेतीची आवड निर्माण व्हावी, त्यांना शेती कामाची माहिती व्हावी. कृषी संस्कृतीचा वसा आणि वारसा नव्या पिढीकडे सुपूर्द व्हावा यासाठी ‘ माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ हा उपक्रम राबविला आहे असे प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. शेतकऱ्यांनी दर्जेदार उत्पादन घ्यावे असा सल्लाही त्यांनी दिला.

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जालिंद पांगिरे, प्रांताधिकारी हरिष सूळ, तहसीलदार समीर माने, उपविभागीय कृषी अधिकारी किरण पाटील, जिल्हां परिषदेचे कृषी अधिकारी राजेंद्र माने, गटविकास अधिकारी सुभाष सावंत, तालु‌का कृषी अधिकारी भूषण पाटील, शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय पाटील, सरपंच चंद्रकांत गुरव व मनोज गुरव मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री आबिटकर थेट शेतात उतरले. त्यांनी पॉवरट्रीलरच्या सहाय्याने चिखलणी करण्याबरोबरच शेतकऱ्यांसोबत भात लावण केली. सुगंधी घनसाळ तांदळाचे माहेरघर म्हणून तालुक्याची ओळख आहे. मसोली येथे शेतकरीही मोठ्या प्रमाणात घनसाळचे उत्पादन घेतात. शेतकरी प्रचंड कष्ट घेत असतो. बळीराजासाठी आपण वेळ देण्याबरोबरच त्याच्या विकासासाठी प्रयत्न होणं गरजेचे आहे, यावेळी संजय पाटील, विजय थोरवत, सुरेश होडगे, नेताजी कातकर, शरीफ खेडेकर, नाथा देसाई, धनंजय पाटील, सचिन इंदुलकर , महेश दळवी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शालेय विद्यार्थिनीही या उपक्रमात पालकमंत्र्यांसोबत सहभागी झाल्या होत्या.

झाडाखाली बसून घेतला आस्वाद...

यावेळी पालकमंत्री यांनी स्वतः बांधण्यासह रोप लावणी केली व सहकाऱ्यांसोबत झाडाखाली बसून भाकरी भाजीचा आस्वाद घेतला.

‘तो’ बिबट्याच…
वन विभागाकडून शिक्कामोर्तब


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

गेल्या आठवडाभरात चांदेवाडी व आजरा परिसरात धुमाकूळ घालणारा प्राणी हा बिबट्याच असल्याचे वनविभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये त्याची छायाचित्रे बंदिस्त झाल्याने अखेर शिक्कामोर्तब झाले आहे.

योगेश नाना गुंजकर
यांचे शेतात पिंजरा व कॅमेरा कॅमेरा लावला असता जवळ उसात लपून बसलेला बिबट्या सायंकाळी ७.३८ वा पिंजऱ्याजवळ येऊन गेला त्यावेळी त्याचा ट्रॅप कॅमेरात फोटो आला त्यानंतर तो खेडे हद्दीत समीर देशपांडे यांचे शेतात गेला.

गुंजकर यांच्यासह चांदेवाडी ग्रामस्थ तो पट्टेरी वाघ असल्याचे म्हणत होते पण वनविभाग बिबट्यावर ठाम होते.खात्री करणेसाठी ट्रॅप कॅमेरा लावला. श्री. कृष्णा डेळेकर (वनपाल उत्तर आजरा) व श्रीमती प्रियांका पाटील (वनरक्षक) यांनी कॅमेरा तपासणी केली असता त्यामध्ये सापळ्याभोवती फेऱ्या घालताना बिबट्या दिसून आला.

एक की दोन..‌.?

यापूर्वीही रामतीर्थ परिसरामध्ये बिबट्याने दर्शन दिले आहे. काही तरुणांनी तर दोन पिलांसह बिबट्याला पाहिल्याचा दावा केला आहे. यामुळे बिबट्या एक आहे की जोडी आहे याबाबत अद्यापही संभ्रमावस्था आहे.

नरवीर शिवा काशीद पुण्यतिथी सोहळा आजरा व उत्तूर येथे उत्साहात संपन्न

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

स्वराज्यरक्षक नरवीर शिवा काशीद यांच्या पुण्यतिथीनिमित्त आजरा येथील शिवतीर्थावर अभिवादन आणि पुण्यतिथी कार्यक्रम उत्साहात पार पडला. या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून नरवीर शिवा काशीद यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले.या कार्यक्रमाला आजऱ्याचे नगराध्यक्ष श्री. अशोक अण्णा चराठी आणि सरपंच परिषद अध्यक्ष इंजि. जी. एम. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यासोबतच मराठा महासंघ आजरा तालुका पदाधिकारी आणि नाभिक समाज संघटना आजरा तालुका यांचेही विशेष सहकार्य व उपस्थिती लाभली.यावेळी नाभिक समाज संघटनेचे तालुका अध्यक्ष श्री. आकाश शिंदे, उपाध्यक्ष श्री. गौतम भोसले व श्री. निलेश साळोखे, सचिव श्री. प्रकाश यादव, सल्लागार समिती प्रमुख मा. श्री. कृष्णा यादव, संजय पाचवडेकर यांच्यासह सर्व संचालक मंडळ आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वीर शिवा काशिद यांच्या पुण्यतिथीनिमित्त नाभिक समाजातर्फे विनम्र अभिवादन.

उत्तूर : स्वराज्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणारे शूरवीर वीर शिवा काशिद यांच्या पुण्यतिथीनिमित्त उत्तूर येथील नाभिक समाजातर्फे अभिवादन करण्यात आले. यावेळी वीर शिवा काशिद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या शौर्य, त्याग आणि स्वराज्यनिष्ठेला विनम्र अभिवादन करण्यात आले. तसेच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेलाही पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी वीर शिवा काशिद यांचे बलिदान आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले स्वराज्य हे भावी पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगत त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा संकल्प व्यक्त केला. या कार्यक्रमास नाभिक समाजाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, खजिनदार विकास जाधव, सचिव रवी जाधव तसेच संघटनेचे ज्येष्ठ सदस्य वसंत जाधव, सातापा चव्हाण, मारुती यादव, सुरेश जाधव, मारुती जाधव आणि सुभाष जाधव उपस्थित होते.

नगरपंचायतीच्या मासिक सर्वसाधारण सभेची सूचना प्रसारमाध्यमांद्वारे जाहीर करण्याची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा नगरपंचायतीच्या मासिक सर्वसाधारण सभेची सूचना स्थानिक वृत्तपत्रे, दूरदर्शन तसेच मान्यताप्राप्त प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना वेळेवर देण्यात यावी, जेणेकरून ते सभेला उपस्थित राहून नगरपंचायतीच्या कामकाजाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवू शकतील, अशी मागणी लोकनियुक्त नगरसेवक व नगरसेविकांनी मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदन उपनगराध्यक्ष सौ. अश्विनी डोंगरे, नगरसेवक श्री. परशुराम बामणे, नगरसेवक श्री परेश पोतदार. नगरसेविका डॉ. सौ. स्मिता कुंभार, नगरसेविका सौ. आसावरी खेडेकर, नगरसेविका श्रीमती कलावती कांबळे, नगरसेविका सौ. रेश्मा बुढेखान, नगरसेविका सौ. अन्वी केसरकर, नगरसेविका सौ. निशात समीर चाॅंद यांच्या स्वाक्षरीने मुख्याधिकारी, आजरा नगरपंचायत यांना सादर करण्यात आले आहे.

निवेदनाचा सकारात्मक विचार करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात याव्यात, अशी अपेक्षाही निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आली आहे.

आजरा हायस्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थी-शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा हायस्कूल येथे एस.एस.सी. मार्च २०२६ परीक्षेत आजरा तालुक्यातील ५३०१ व ५३०२ परीक्षा केंद्रांमधील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने झाली. मुख्याध्यापक श्री. ए. एल. तोडकर यांनी प्रास्ताविकात शिक्षक-विद्यार्थ्यांच्या परिश्रमांचे कौतुक केले. शं. गु. भुसारी शैक्षणिक निधी, द. वि. ताम्हणकर ट्रस्ट व दात्यांच्या वतीने गुणवंतांना पारितोषिके, सन्मानचिन्हे व प्रमाणपत्रे देण्यात आली. इंग्रजी, गणित, विज्ञान, समाजशास्त्र यांसह १००% निकाल देणाऱ्या शिक्षकांचा व तालुका-केंद्रात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान झाला.

यावेळी पाचवी-आठवी शिष्यवृत्ती यशस्वी विद्यार्थी-शिक्षकांचा सत्कार, शैक्षणिक साहित्य वाटप तसेच आजरा महाविद्यालय व पगारिया फाउंडेशनतर्फे दोन व्हाईट बोर्ड भेट देण्यात आले.

डॉ. अशोकअण्णा चराटीसो यांच्या डॉक्टरेट व नूतन संचालक अनिकेत चराटी, आय. के. पाटील यांचाही सत्कार झाला. शिक्षक श्री. जी. डी. कांबळे यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कारा’बद्दल गौरवण्यात आले. संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सोहाळे, उत्तूर, हारुर येथे’माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ उपक्रमास उत्स्फूर्त

सोहाळे व सोहाळेवाडी येथे १,५०० रोपांचे वृक्षारोपण

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

“माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी” या अभिनव उपक्रमांतर्गत आज मौजे सोहाळे येथे शेतकरी श्री. रणजित देसाई यांच्या शेतात भात रोपलावणी कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमातून शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करत शेतीची कामे प्रत्यक्ष करून कृषी क्षेत्राशी बांधिलकी जपण्याचा संदेश देण्यात आला.

यावेळी सोहाळे गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ. भारती डेळेकर, सामाजिक वनीकरण गडहिंग्लजच्या वनक्षेत्रपाल श्रीमती कल्याणी गोडसे , पंचायत समिती आजराचे विस्तार अधिकारी श्री. बी. टी. कुंभार, ग्रामसेवक श्री. अजित रणदिवे, वनपाल श्री. संजय निळकंठ, श्री. दिपक कदम वनरक्षक, विद्या मंदिर सोहाळेचे श्री. मायकल फर्नांडिस, सौ. निकम मॅडम, सौ. आजगेकर मॅडम तसेच शालेय विद्यार्थी यांनी प्रत्यक्ष शेतात उतरून रोपलावणीच्या कामात सहभाग घेतला.

यानंतर हरित महाराष्ट्र अभियान अंतर्गत मौजे सोहाळेवाडी येथे सामाजिक वनीकरण विभाग, गडहिंग्लज व ग्रामपंचायत सोहाळे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत विविध प्रजातींची १,५०० रोपे लावून पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.

उत्तूर येथे वृक्षारोपण व जीवामृत प्रात्यक्षिक

उत्तूर : महाराष्ट्र शासनाच्या ‘एक दिवस बळीराजासाठी’ या उपक्रमांतर्गत उत्तूर येथे पर्यावरण संवर्धन आणि सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

उत्तूर ग्रामपंचायतीच्या वतीने नवकृष्ण व्हॅली शाळेजवळील पाणंद रस्त्याच्या दुतर्फा २५० विविध जातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. तसेच तालुका कृषी विभाग, आजरा यांच्या वतीने शेतकऱ्यांसाठी जीवामृत या सेंद्रिय खताच्या निर्मितीचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले. सहाय्यक कृषी अधिकारी शिवाजी गडकरी यांनी शेण, गोमूत्र, गूळ, बेसन आणि बांधावरील मातीच्या साहाय्याने जीवामृत तयार करण्याची पद्धत प्रत्यक्ष दाखवून त्याचे शेतीतील महत्त्व स्पष्ट केले.

या उपक्रमास जिल्हा परिषद सदस्य शिरीष देसाई, सरपंच किरण आमणगी, उपसरपंच सुनिता हतिरगे, ग्रामपंचायत सदस्य महेश करंबळी, संभाजी कुराडे, संदेश रायकर, समीक्षा देसाई, अनिता घोडके, सविता सावंत, आशा पाटील, सुनिता केसरकर, सरिता कुरूणकर, ग्रामपंचायत अधिकारी पी. के. पाटील, पंचायत समितीचे अधिकारी बी. टी. कुंभार, नवकृष्ण व्हॅली शाळेचे मुख्याध्यापक रामकृष्ण मगदूम, कृषी सखी, पुंडलिक पाटील,भैरू सावंत, दादू सावंत, शिक्षक, विद्यार्थी, ग्रामपंचायत कर्मचारी, शेतकरी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 हारूर येथे संवेदना फलोद्यानमध्ये वृक्षारोपण..

संवेदना फलोद्यान हारूर येथे एक दिवस बळीराजा साठी योजनेअंतर्गत पंचायत समिती आजराचे गटविकास अधिकारी सुभाष सावंत , सहाय्यक गटविकास अधिकारी पुजारी विस्ताराधिकारी बी. टी. कुंभार यांची भेट व वृक्षारोपण करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कानोली – हारूर च्या सरपंच सौ. सुषमा सुभाष पाटील होत्या यावेळी अधिकारी यांनी कामकाजाची पाहणी केली.

संवेदना फाउंडेशनच्या वतीने हारूर येथील संवेदना फलोद्यान मधील त्यांनी वृक्षारोपण, पाणी व्यवस्थापन, कुंपण, स्वच्छता आणि देखभाल यांची पाहणी करून समाधान व्यक्त केले. पर्यावरण संवर्धनासाठी सुरू असलेल्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.

यावेळी त्यांनी ग्रामस्थ आणि संवेदना फाउंडेशनच्या सदस्यांशी संवाद साधून फलोद्यान अधिक समृद्ध करण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या. वृक्षसंवर्धन, नियमित पाणीपुरवठा आणि स्थानिक सहभाग वाढविण्यावर भर देण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी स्नेहदीप सरदेसाई ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल आर्दाळकर, यांच्यासह

गावातील विलाससुतार , सयाजी सावंत, अमोल रेडेकर,अमर आर्दाळकर ,सचिन नलवडे, दिग्विजय भोसले साहिल पाथरवट आणि स्थानिक संवेदना सदस्य उपस्थित होते.

निधन वार्ता
सौ.अश्विनी निकम

मलिग्रे येथील सौ. अश्विनी श्रीधर निकम ( वय वर्ष ३८ ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले . त्या बेळगांव येथे शिक्षिका होत्या . पती श्रीधर हे लँब टेक्निशियन असून त्यांना एक मुलगी आहे.

त्यांच्या पश्चात पती, सासू, सासरे, दिर असा परिवार आहे.

रक्षा विसर्जन उद्या बुधवारी सकाळी होणार आहे.

शैलेश फर्नांडिस

साळगाव ता. आजरा येथील शैलेश बाबू फर्नांडिस यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात आई आहे.

आजचे पंचांग

वार : मंगळवार

दि.१४/७/२०२६

माह (अमावस्यांत) : ज्येष्ठ
माह (पूर्णिमांत) : आषाढ
ऋतु : वर्षा
आयन : दक्षिणायन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : अमावस्या तिथी (दुपारी ०३.१२ पर्यंत) त्यानंतर प्रथम तिथी
नक्षत्र : पुनर्वसू नक्षत्र (१५ जुलै रात्री १२.०९ पर्यंत) त्यानंतर पुष्य नक्षत्र
योग : व्याघात योग (सकाळी ११.५६ पर्यंत) त्यानंतर हर्षण योग
करण : नागवा करण (दुपारी ०३.१२ पर्यंत) त्यानंतर किंस्तुघना करण
चंद्र राशी : मिथुन राशी (सायंकाळी ०६.४८ पर्यंत) त्यानंतर कर्क राशी
सूर्य राशी : मिथुन राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सायंकाळी ०४.०१ ते सायंकाळी ५.४० पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१८ ते दुपारी ०१.११
सूर्योदय : सकाळी ०६.१०
सूर्यास्त : सायंकाळी ०७.१९
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

बुधवार – सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

गुरुनाथ यांचा अखेर मृत्यू….

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

अखेर डॉ. झाकीर हुसेन हायस्कूलच्या मुख्याध्यापकासह लिपिकाविरोधात गुन्हा नोंद…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!