सोमवार दि. ७ जुलै २०२५


पावसाचा जोरच…
आता लक्ष उचंगी प्रकल्पाकडे

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यात पावसाचा जोर असून सततधार पावसामुळे चित्री प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर आता उचंगी प्रकल्पाकडे तालुकावासीयांचे लक्ष लागून आहे. प्रकल्पातील पाणी साठ्यामध्ये झपाट्याने वाढ होत असून आज प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता पाटबंधारे विभागाकडून वर्तवली जात आहे. काल दुपारनंतर पुन्हा एक वेळ साळगाव बंधारा पाण्याखाली गेला .
सध्याचे वातावरण श्रावण सदृश्य असले तरी पावसाच्या जोरदार सरीही कोसळताना दिसतात. पावसामुळे पश्चिम भागातील अनेक घरांमध्ये पाण्याच्या उगळी सुरू झालेल्या आहेत. घरांची पडझडही अद्याप थांबलेली नाही.
आता नवीन पुलाला पर्याय नाही…
पावसामुळे तालुक्यात जोरदार फटका साळगावकरांना बसू लागला आहे. वेळेआधीच सर्फनाला प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने पावसामध्ये थोडीशी वाढ झाली तरीही आता साळगाव बंधाऱ्यावर पाणी येत असल्याने बंधारा वाहतुकीकरता प्रशासनाने वेळोवेळी बंद ठेवण्याचे सत्र सुरू केले आहे. ऐनवेळी बंधारा वाहतुकीस बंद केला जात असल्याने साळगावकरांना चांगलीच अडचण होऊ लागली आहे. कोणत्याही परिस्थितीत आता नवीन पुलाशिवाय साळगावकरांना पर्याय दिसत नाही.

तालुकाभर विठूनामाचा गजर...

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरासह तालुक्यात आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. ठिकठिकाणी पहाटेपासूनच विठ्ठल मंदिरे भक्तांनी भरून गेली होती. एकादशीनिमित्त भजन, कीर्तन, दिंडी आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
शाळकरी मुलांनीही वारकऱ्यांच्या पारंपारिक वेशभूषा करून विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवला. येथील शिवाजी नगर मधील विठ्ठल मंदिरामध्ये ह.भ. प. लक्ष्मणबुवा मोरजकर महाराजांच्या समाधीपासून टाळ मृदंगाच्या गजरात दिंडी काढण्यात आली.

आजऱ्यात धार्मिक, पारंपरिक भक्तिभावाने पीर-पंजाचे विसर्जन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरांमध्ये पारंपरिक भक्तिभावाने आणि धार्मिक सलोख्याच्या वातावरणात पीर पंजाचे विसर्जन मोठ्या उत्साहात व शांततेत पार पडले. वाडा गल्ली मशिदीतून मिरवणुकीला सुरुवात झाली. शहरातील एकूण ११ पंजांच्या भेटी रविवारी आजरा येथील संभाजी चौकात भाविकांच्या उपस्थितीत झाल्या.
या भेटी शहरातील प्रमुख बाजारपेठेतून सवाद्य मिरवणुकीद्वारे करण्यात आल्या. दर्शनानंतर पीर-पंजांचे भाविकांनी ठीक ठिकाणी स्वागत केले. धूप घालून गुळाचा प्रसाद वाटून पूजन करण्यात आले.

शिवाजीनगर येथील घाट परिसरामध्ये पंजाचे विसर्जन करून मिरवणुकीची सांगता करण्यात आली. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांसह गृह रक्षक दलाच्या जवानांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
पावसाचा व्यत्यय…
मिरवणुकीच्या अंतिम टप्प्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने भाविकांच्या उत्साहावर मर्यादा आल्या.

एक दिवस माझ्या बळीराजासाठी … उत्तूरला ऊस पाचट व्यवस्थापनाला भेट

उत्तूर मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमा अंतर्गत उत्तूर ता . आजरा येथे प्रयोगशील शेतकरी संभाजी कुराडे यांच्या ऊस पाचट व्यवस्थापन केलेल्या शेतावर शिवार फेरी घेण्यात आली.
यावेळी घेण्यात आलेल्या चर्चा सत्रात सहाय्यक कृषी अधिकारी . शिवाजी गडकरी यानी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची उपस्थिती शेतकऱ्यांना माहिती दिली तसेच शेतकऱ्यांना शेती करताना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या
यावेळी समन्वय श्री. विवेक आगवणे , सरपंच किरण आमणगी , मंडळ अधिकारी प्रविण खरात , तलाठी एकनाथ मिसाळ,राजेंद्र खोराटे, संभाजी कुराडे, मिलिंद कोळेकर, बाळासो सावंत, विठ्ठल उत्तूरकर, व्यंकटेश मुळीक,चंद्रकांत भोसले, दत्तात्रय चव्हाण, रोजगार सेवक दादु चव्हाण, कोतवाल, स्नेहल कुंभोजकर, कृषि सखी अश्विनी मोहीते, तेजल पाकले , ज्ञानेश्वर करवळ ग्रामपंचायत कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.
आभार संभाजी कुराडे यानी मानले.

अजित तोडकर आजरा हायस्कूलचे नूतन मुख्याध्यापक

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
श्री अजित तोडकर यांची आजरा हायस्कूलच्या मुख्याध्यापकपदी नेमणूक झाली आहे. श्री अजित तोडकर सर हे गणित अध्यापक असून त्यांनी एन.सी.सी ऑफिसर म्हणून काम पाहिले आहे. ते अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचे संगीत विशारद आहेत. त्याचप्रमाणे सौ. हेमलता कामत यांची उपमुख्याध्यापकपदी बढती झाली असून श्री आनंद व्हसकोटी यांची पर्यवेक्षकपदी नेमणूक झाली आहे.

रोझरी इंग्लिश स्कूलमध्ये दहावीच्या यशवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
रोझरी इंग्लिश स्कूल मध्ये दहावीच्या परीक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या विदयाथ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याचे अध्यक्ष मा. प्रकाश कर्व्हालो तर प्रमुख पाहुणे श्री. मारियन रॉड्रीग्ज व श्री. वामन सामंत उपस्थित होते.
कु. मृणाली तेजम हीने ९६.८० % मार्कस मिळवून आजरा केंद्रात प्रथम स्थान मिळवले.
तर कु. अर्पित्ता स्वामी व हर्ष शिंत्रे यांनी ९५.४०% गुण मिळवून द्वितीय व सिद्धी देसाई हिने ९४.६० %, गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला. सर्व यशस्वी विव्यार्थ्यांचा सत्कार व पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.
या कार्यक्रमासाठी प्राचार्य फादर अँथोनी डिसोझा, मुख्याध्यापक श्री मनवेल बार्देस्कर, पर्यवेक्षक विजय केसरकर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. श्री. डॉमनिक डिसोझा यानी सुत्रसंचालन, निशात चाँद यांनी पारितोषिक वाचन आणि शैलजा कांबळे यांनी आभार मानले.

आजरा महाविद्यालयात जात पडताळणी कार्यशाळा संपन्न

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
महाविद्यालयातील समान संधी व शिष्यवृत्ती विभाग आणि बार्टी, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आजरा महाविद्यालयात जात पडताळणी कार्यशाळा घेण्यात आली.
राजर्षी शाहू महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन सम्मेलन सप्ताह निमित्त महाविद्यालयात बार्टीच्या विविध योजना व शाहू महाराज यांच्या विषयी सौ.प्रतिभा सावंत बार्टी, कोल्हापूर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यामध्ये शिक्षण, व्यवसाय, नोकरी, उद्योजकता यातील विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी जात पडताळणी करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. तसेच जात पडताळणीसाठीची ऑनलाइन व ऑफलाइन प्रक्रिया त्यांनी समजावून सांगितली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए .एन. सादळे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेण्यासाठी वेळेत जात पडताळणी प्रस्ताव सादर करणे गरजेचे आहे असे सांगितले.
याप्रसंगी उपप्राचार्य श्री. डी. पी. संकपाळ , कार्यालयीन अधीक्षक श्री. योगेश पाटील, प्रा. व्ही. डी. हक्के, सौ. आर. एस. पिळणकर तसेच व्यंकटराव ज्युनिअर कॉलेजचे प्रा. एस. व्ही. कांबळे आणि विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा.व्ही.जी. चव्हाण यांनी केले. तसेच सूत्रसंचालन सौ.जे.एन. कुंभार यांनी तर आभार सौ. एस.व्ही. फड यांनी मानले.

चित्रकला स्पर्धेमध्ये उत्तूर विद्यालयाचे यश…

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती पंधरवडा निमित्त शासनाने घेतलेल्या आजरा तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेमध्ये येथील उत्तूर विद्यालय उत्तूर मधील अस्मिता नारायण येडूरकर या विद्यार्थिनीने लहान गटात प्रथम क्रमांक पटकाविला. छत्रपती शाहू महाराज यांचे छंद या विषयावर तिने चित्राची मांडणी केली. शिक्षण विस्तार अधिकारी माननीय विलास पाटील यांच्या हस्ते तिला बक्षीस देण्यात आले. तिच्या चित्राची निवड जिल्हा स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी झाली आहे.
तिला शाळेचे मुख्याध्यापक श्री. आर.डी महापुरे, कलाशिक्षक इंद्रजीत बंदसोडे यांचे मार्गदर्शन लाभले.

फोटो क्लिक

ऋतू बदलला… व्यवसायही बदलला





