शनिवार दि. २६ जुलै २०२५

यश मिळवण्यासाठी जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणाची गरज : दत्तात्रय मोहिते
शिवाजी सावंत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये कारगिल विजय दिन साजरा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
विद्यार्थ्यांनी जीवनात प्रामाणिकपणा जपला पाहिजे.आई-वडिलांच्या आज्ञेमध्ये राहिले पाहिजे. देश प्रेम कायम अंगी बाळगावे. जिद्द चिकाटी व प्रामाणिकपणामुळे जीवनात यश मिळते. असे प्रतिपादन माजी सुभेदार व आजरा तालुका माजी सैनिक कल्याण समितीचे सदस्य दत्तात्रय मोहिते यांनी केले. येथील शिवाजी सावंत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये कारगिल विजय दिन साजरा झाला. यावेळी श्री.मोहिते यांनी मार्गदर्शन केले. स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महादेव पोवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
सदस्य मानसिंग देसाई, अमोल मुरकुटे, श्री .आर.आय.चिमणे, माजी सुभेदार दिनकर जाधव आदी प्रमुख उपस्थित होते.
प्राचार्य संदीप देसाई यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. श्री.मोहिते म्हणाले, विद्यार्थ्यांनी जीवनात शिस्त बाळगली पाहिजे. आई-वडिलांचे सुसंस्कार आयुष्यभर विसरू नये. अभ्यासू वृती जोपासण्याबरोबरच कष्ट व परिश्रम घेण्याची तयारी ठेवावी. यावेळी त्यांनी अग्निवीर ,सैन्य दल याविषयी माहिती दिली. आयटीआय मधील सर्व अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना सैन्यदलात विविध पदावर काम करण्याची संधी असल्याचे सांगितले.
शिक्षक श्री.आर.एस. गवई यांनी कारगिल युद्धात भारतीय सैन्याने गाजवलेल्या पराक्रमाची माहिती दिली. यशवंत कुमार यांनी बेंगलोर येथील सोशल इकॉनोमिक चेंज या संस्थेच्या कार्याची माहिती दिली. श्री. पोवार यांनी, आयटीआयच्या कौशल विकास कार्यक्रमाबद्दल माहिती दिली. आयटीआय मध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना रोजगार व व्यवसायामध्ये काम करण्याची संधी असल्याचे सांगितले. यावेळी माजी सैनिकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला. यावेळी माजी सैनिक श्री.गिलबिले, श्री. कांबळे, श्री.सावंत,श्री. चौगुले,यांच्यासह शिक्षक विजयकुमार मंगल, शिकलगार , रणजीत पोवार, अमित ढवळ, रणजीत कालेकर आदी उपस्थित होते.
धनश्री मंगल यांनी सूत्रसंचालन केले.

आजरा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा…
सरपंच परिषद आक्रमक

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
यावर्षी साधारणपणे १२ मे पासून पावसाची संततधार हजेरी आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना पेरणीपूर्व मशागत करण्यासाठी तसेच खरीप पिके पेरण्यास संधीच मिळाली नाही. भाताची तरवे, नाचण्याची ल्हवे,भुईमूग, सोयाबीन, ज्वारी यासारखी पिके घेताना अडचण निर्माण झाली. त्यामुळे आजरा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा असे निवेदन आजरा तहसीलदार समीर माने यांना सरपंच परिषदेने दिले आहे.
वेळेत पेरणी न झाल्याने पिकांची शेतकऱ्यांनी खरेदी केलेली बियाणे पेरणीविना पडून आहेत. ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत त्यांची उगवण कमी झाली आहे. तर काही ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे बियाणे कुजून गेली. त्यांना दुबार पेरणी करावी लागत आहे. सद्यस्थितीला माहे मे, जून आणि जुलैमध्ये पावसाने घातलेल्या थैमानाने शेतकऱ्यांना पेरण्या करणे अशक्य झाले. अन्नधान्याचे उत्पादन कमी होऊन ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होणार आहे.
शेतकऱ्यांच्या रोजी रोटीचा प्रश्नही निर्माण होणार आहे. सद्यस्थितीच्या हंगामाचा आढावा घेऊन शासनाने आजरा तालुक्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सहकार्य करण्याची विनंती या निवेदनातून करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी कोल्हापूर, कृषिमंत्री आणि पालकमंत्री यांनाही देण्यात आल्या.
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जी. एम. पाटील, तालुकाध्यक्ष पांडुरंग तोरगले , तालुकाध्यक्षा प्रियांका जाधव , युवराज पाटील , समीक्षा देसाई, विलास जोशीलकर, रत्नप्रभा भुतुर्ले, धनाजी दळवी, लहू वास्कर, अनिल पाटील, पांडुरंग खवरे, वैषाली गुरव, सुनील बागवे, संकेत सावंत, वसंत कोंडूस्कर, आनंदा कांबळे आदी उपस्थित होते.

जिल्हा सहकार बोर्डाच्या संचालक पदी संभाजी तांबेकर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
जिल्ह्यातील सहकारी संस्थांची मातृ संस्था अशी ओळख असणाऱ्या कोल्हापूर जिल्हा सहकार बोर्डाच्या संचालकपदी संभाजी मारुती तांबेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे .
तांबेकर हे आजरा तालुक्यातील चिमणे गावचे माजी सरपंच,राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष व तालुका खरेदी विक्री संघाचे विद्यमान संचालक आहेत .
त्यांच्या या निवडीसाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसन मुश्रीफ, गोकुळचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ, माजी खासदार संजय मंडलिक, जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने, सुधीर देसाई यांनी विशेष प्रयत्न केले.

कृष्णा कदम यांचे निधन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
दाभिल येथील प्रतिष्ठित नागरीक व दाभिल ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच कृष्णा कदम (वय ७५) यांचे शुक्रवारी सकाळी हृदय विकाराच्या धक्याने निधन झाले. त्यांनी जनता सहकारी बँक आजराचे व्हा. चेअरमन, दाभिल येथील शंभू महादेव दूध संस्थेचे चेअरमन म्हणून काम पाहिले आहे. तर शंभू महादेव विकास संस्थेचे ते विद्यमान चेअरमन म्हणून काम पाहत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन विवाहीत मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे.

शासनाकडून व्हळतकर कुटुंबीयांना आर्थिक मदत

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा वन परीक्षेत्र मधील मौजे साळगाव येथील श्री.धोंडिबा हरी व्हळतकर हे गव्याच्या हल्यात मृत झाले होते. त्यांना शासकीय नियमानुसार देय होणाऱ्या रक्कमेचा धनादेश त्यांच्या वारसदारांना पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य मंत्री नाम. श्री.प्रकाशराव आबिटकर यांचे हस्ते प्रदान करण्यात आले.
यावेळी वन क्षेत्रपाल आजरा, वनपाल व वनरक्षक उपस्थित होते.

पालेभाज्याने आठवडा बाजार बहरला
मटण चिकन दुकानात मात्र शुकशुकाट

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
श्रावण महिन्याची सुरुवातच आजरा येथील आठवडा बाजाराने झाल्याने काल आठवडा बाजार पालेभाज्यांनी बहरून गेला होता.कांही चिकन व मटणाची दुकाने सुरू होती, परंतु त्यामध्ये शुकशुकाट दिसत होता तर अनेक व्यावसायिकांनी ही दुकाने बंद ठेवण्यास प्राधान्य दिले.
मोठ्या प्रमाणावर पालेभाज्यांसह फळभाज्या आठवडा बाजारात आल्याने शेपू, कांदा, पालक, कोथिंबीर, मेथी यासारख्या पालेभाज्यांचे दर अगदी पाच रुपये पेंडीपर्यंत खाली आले होते.
बऱ्याच दिवसांनी प्रथमच बाजारात भाज्यांचे दर आवाक्यात आल्याने सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणावर भाज्या खरेदी करताना दिसत होते.

रस्त्यावरील खड्डे…
प्रवाशांसह लाल परीचे हाल

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा – देव कांडगाव मार्गाची ठिकठिकाणी दुर्दशा झाली असून सर्वत्र खड्डे व पाण्याची डबकी तयार झाल्याने वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
दुचाकी वाहनांचे तर छोटे-मोठे अपघात होतच आहेत. मोठ्या वाहनधारकांनी आता पर्यायी मार्ग शोधण्यास सुरुवात केली आहे. याचा सर्वात मोठा फटका एसटी बसेसला बसत असून खड्ड्यातून बस घालावी लागत असल्याने आतील प्रवाशांचे हाल तर होत आहेतच परंतु त्याचबरोबर एसटी बसेस नादुरुस्तही होताना दिसत आहेत.
किमान हे खड्डे तरी मुजवून घ्यावेत अशी मागणी प्रवासी वर्गाकडून होत आहे.

अभिनंदनीय…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथील आर्किटेक्ट कु. रितू जितेंद्र शेलार हिने गोवा विद्यापीठाच्या शासकीय वास्तुकला/आर्किटेक्ट महाविद्यालयात अर्बन डिझाइनमध्ये स्पेशलायझेशनसह वास्तुकला विषयात पदव्युत्तर पदवीमध्ये प्रथम क्रमांक पटकावला.
ती येथील सुप्रसिद्ध इंजिनिअर जितेंद्र शेलार यांची कन्या आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
आज शहरात…
♦ दूरदुंडेश्वर कार्यालय आजरा येथे शहरातील सर्व व्यापाऱ्यांचा ‘ व्यापारी स्नेह मेळावा ‘ आयोजित करण्यात आला आहे….
♦आधार हॉस्पिटल व स्मिता क्लिनिक यांच्या वतीने सकाळी ११ ते 2 या वेळेत स्मिता क्लिनिक, सोमवार पेठ येथे मोफत मुतखडा प्रोटेस्ट व लेसर द्वारे व्हेरिकोज व्हेन्स उपचार शिबिर आयोजित करण्यात आले आहे.


