mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या


आजरा शहरासह तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ…

सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रकमा, जनावरे व संसारोपयोगी साहित्य लंपास

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     आजरा शहरासह तालुक्यामध्ये चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला असून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कमा, बांधलेल्या शेळ्या, यांच्यासह संसारोपयोगी तांब्या पितळेचे पाण्याचे हंडे, बंब लंपास केल्याच्या घटना उघडकीस येऊ लागल्या असून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

भादवण येथे पावणेचार लाखांची चोरी…

     आजरा तालुक्यातील भादवण येथील काकासाहेब गणपतराव पाटील यांच्या घराच्या दरवाज्याचा कडीकोयंडा उचकटून तीन लाख रुपये किंमतीचे पाच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व ३२ तोळे चांदीसह ५० हजार रुपये इतकी रोख रक्कम लंपास केली आहे.

       याबाबतची फिर्याद काकासाहेब पाटील यांनी आजरा पोलिसात दिली असून काल दिवसभर या चोरी प्रकरणी पोलीस अधिकारी व कर्मचारी भादवण तळ ठोकून होते. श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले.

आजऱ्यात ४२ हजारांच्या दागिन्यांवर डल्ला

      आजरा येथील शेख कॉलनीत राहणाऱ्या आदम मुस्तफा हेरेकर यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरातील लोखंडी तिजोरीचे कुलूप फोडून सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम दहा हजार रुपयांवर चोरट्यांनी डल्ला मारला. याबाबतची फिर्याद आदम हेरेकर यांनी पोलिसांत दिली आहे.

बहिरेवाडी येथून शेळ्या पळवल्या…

    बहिरेवाडी ता. आजरा येथून बहिरेवाडी ते बाळेगोल रस्त्यावर असणाऱ्या रामचंद्र भैरू आयवाळे यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये बांधलेल्या चार शेळ्या अज्ञात चोरट्यांनी शेडचे कुलूप उचकटून लंपास केल्या. याबाबतची फिर्याद रामचंद्र आयवाळे यांनी पोलिसात दिली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

आजरा येथून पाण्याचे बंब लंपास

      आजरा शहरातील परोली मार्गावर असणाऱ्या रहिवाशांसह शहरातील अनेक घरालगत ठेवलेले पाण्याचे बंब व गॅस सिलेंडरही चोरट्यांनी लंपास केल्याच्या घटना घडल्या आहेत.

शिकारीच सापडले वनखात्याच्या जाळ्यात

गुन्हा नोंद

         आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     रानडुक्कर या वन्यप्राण्याची शिकार करून तस्करी करताना दुचाकीस्वार वनविभागाच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना आढळले. सदर दुचाकीस्वार यांना चौकशीसाठी अडवले असता त्यांनी शिकार केलेल्या रानडुक्करास रस्त्यावर टाकून पलायन केले.

       सदर शिकारीबाबत वनपाल धनगरमोळा यांनी अधिक चौकशी केली असता देवर्डे येथील अशोक परसू गुरव यांचे शेतामध्ये तारेने विजेचा शॉक लावून रानडुक्करास मारले असल्याचे कबूली अशोक परसू गुरव रा. देवर्डे यांनी दिली आहे. दुचाकीस्वार यांचेबाबत चौकशी केले असता संबंधित दुचाकीस्वार चांदेवाडी येथील असलेचे त्यांनी सांगितले.

     त्यानुसार चांदेवाडी येथील विशाल विलास जाधव व अशोक जानबा गिलबिले यांना चांदेवाडी गावातून ताब्यात घेणेत आले असून त्यांचेकडून १ मृत रानडुक्कर, मोटर सायकल, मोबाईल साहित्य ताब्यात घेण्यात आले आले.
त्यांचेवर वन्य प्राणी हत्या कलमांतर्गत गुन्हा नोंद करून सदरचे साहित्य जप्त करणेत आले असल्याची माहिती परिक्षेत्र वन अधिकारी स्मिता डाके यांनी दिली.


मोटरसायकलने धडक व शिवीगाळ…
एका विरोधात गुन्हा नोंद

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      धामणे ता. आजरा येथील सुनील आण्णाप्पा लोहार याने मोटरसायकलने समोरून येणाऱ्या मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने प्रवीण दशरथ कांबळे वय २६ वर्षे हे जखमी झाले. या घटनेनंतर सुनील यांना शिवीगाळही केल्याची फिर्याद प्रवीण यांनी पोलिसात दिली आहे .

      या फिर्यादीवरून सुनील आण्णाप्पा लोहार यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

हात्तिवडे येथील सेवानिवृत्त जवानाचे निधन

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     भारतीय सैन्य दलामध्ये सेवा बजावलेल्या कै.उत्तम राजाराम शेडगे या ४२ वर्षीय सेवानिवृत्त जवानाचे बेळगाव येथे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने आकस्मिक निधन झाले.

      २०१७ साली सैन्य दलातून सेवानिवृत्त झाल्यानंतर ते बेळगाव येथे राहण्यासाठी होते. शुक्रवारी दुपारी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुले, आई-वडील असा परिवार आहे. हात्तिवडे  या त्यांच्या मूळ  गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आंदोलकांची तब्येत बिघडली

आरोग्य विभागाने केले उपचार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

      आजरा येथील भूमी अभिलेख कार्यालयाच्या कारभाराची चौकशी व दोषींवर कार्यवाही व्हावी या मागणीसाठी आजरा तहसील कार्यालयासमोर चार दिवसापासून आंदोलन चालू आहे. वारा, पाऊस, बदलते वातावरण यामुळे आंदोलनास बसलेल्या शेतकऱ्यांची तब्येत अचानक बिघडली. त्यानंतर तहसीलदार समीर माने  व पोलीस प्रशासन यांनी आरोग्य विभागास पाचारण केले व उपचार केले.

     मात्र भूमी अभिलेख कार्यालयाच्या  चुकीचे काम करणाऱ्या मोजणीदार यांच्यावर कार्यवाही झाल्याशिवाय व इतर तालुक्यातील मोजणीदार लावून शेतकऱ्यांना फेर मोजणी करून न्याय मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. उपचारानंतर आंदोलकांनी तहसीलदार व आरोग्य विभाग यांचे मार्फत तातडीने केलेल्या हालचाली बाबत समाधान व्यक्त केले.

      दरम्यान विविध सामाजिक संघटना व लोकप्रतिनिधी यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन पाठिंबा दिला आहे.

ताबा मिळालेल्या जमीनीचा नकाशा न मिळाल्यास जलसमाधी घेणार

सर्फनाल्यातील धरणग्रस्तांचा इशारा

 प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

           आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

      सर्फनाला धरणग्रस्ताना शेळपमधील गट नं. ११० मधील जमीन देण्यात आली आहे. या जमीनीत सातबारा पत्रकी नाव नोंद झाली आहे, ताबाही मिळाला आहे, मात्र या जमीनीचा योग्य नकाशा बनविण्यात आलेला नाही. या गटातील जमीनीचा योग्य तो नकाशा तात्काळ मिळावा अन्यथा दि. ३१ ऑगस्ट रोजी सर्फनाला धरणात जलसमाधी घेणार असल्याचा इशारा सर्फनाला धरणग्रस्त तुकाराम गुंजाळ यांच्यासह चार धरणग्रस्त शेतकऱ्यांनी दिला आहे.

      सर्फनाला धरणग्रस्त म्हणून शेळप मधील गट क्रमांक ११० मधील ८० आर जमीन आपल्याला मिळाली आहे. या क्षेत्राचा वहीवाटीप्रमाणे नकाशा तयार करून मिळावा यासाठी आपण २०१७ पासून प्रशासनाकडे पाठपुरावा करीत असून कोणत्याच स्तरावर आपली दाखल घेतली जात नसल्याचा आरोप गुंजाळ यांनी केला आहे, त्यामुळेच १५ ऑगस्ट रोजी जलसमाधी घेण्याचा इशारा दिला मात्र या इशाऱ्यानंतर प्रांताधिकारी आजरा-भुदरगड यांनी पुढील १५ दिवसात नकाशा देण्याची हमी दिल्यानंतर जलसमाधी आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले होते.

    आपल्या मागणीप्रमाणे वहिवाटीनुसार नकाशा देण्याबाबतचा बदली प्रस्ताव तयार करून नकाशा न मिळाल्यास ३१ ऑगस्ट रोजी जलसमाधी घेणार आहे. त्यावेळी निर्माण होणाऱ्या परिस्थितीस प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही गुंजाळ यांनी निवेदनातून दिला आहे.


 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

रामतीर्थ यात्रा अखेर रद्द

mrityunjay mahanews

हाजगोळी बंधाऱ्यात महिलेचा मृतदेह आढळला…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आज-याची कन्या झाली आमदार… आजऱ्यात जल्लोष

mrityunjay mahanews

कारण नसताना विरोधकांनी जिल्हा बँकेची निवडणूक लादली:ग्रामविकासमंत्री मुश्रीफ… मुरुडे येथे भांडण प्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा नोंद.

mrityunjay mahanews
error: Content is protected !!