

शिकार प्रकरणी पुन्हा दोघांविरोधात गुन्हा नोंद…
शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
परिक्षेत्र वनअधिकारी, आजरा यांचे सुचनेनूसार वनपाल, गडहिंग्लज, वनरक्षक, गडहिंग्लज, वनरक्षक मलिग्रे, वनरक्षक साळगांव व वनमजूर यांनी बेलेवाडी हुll येथील भावेश्वरीकडे जाणाऱ्या रोडवर सापळा लावला असता शिकारीच्या उद्देशाने फिरत असणाऱ्या दोन दुचाकीवरून चौघेजण संशयीतरीत्या फिरत असलेचे दिसुन आले. त्यांना तपासणीकरीता थांबविले असता वनविभागाचे अधिकारी असल्याचे चाहूल लागताच दोघे ऊस शेतामधून पळुन गेले व उर्वरीत संदीप श्रीपती जाधव, रा. केळेवाडी, ता. भूदरगड, वय ३२ वर्षे, योगेश आनंदा गोते, रा. केळेवाडी पैकी तोंदलेवाडी, ता. भूदरगड, वय ३४ वर्षे याना पॅशन मोटरसायकल क्र.MH09 FE- 0103 व MH09 DY- 8804 या वाहनांसह ताब्यात घेण्यात आले आहे.
संबंधितांचे मोबाईल तपासले असता मोबाईलमध्ये १५ फेब्रुवारी २०२४ रोजी २ रानडुक्करांची शिकार केलेचे दिसुन आले आहेत व साळींदर या वन्यप्राण्याच्या बिळासभोवती काट्या लावल्याचे दिसून येत आहे. त्यांचेवर वनरक्षक गडहिंग्लज यांनी कलम वन्यजीव (संरक्षण) अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करून त्यांना अटक करून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आजरा यांचे न्यायालयात हजर केले असता दिनांक २६/०८/२०२४ रोजी पर्यंत फॉरेस्ट कस्टडी देण्यात आली आहे. तसेच सदर गुन्हेप्रकरणी पुढील तपास चालु आहे.
शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया…
सलग दोन दिवस वन विभागाने केलेल्या या कारवाईबाबत शेतकरी वर्गातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
एकीकडे वन्य प्राण्यांच्या उच्छादांमुळे शेतकरी वर्ग वैतागला आहे. ठिकठिकाणी हत्ती, गवे, रानडुकरे, वानरे, मोर यासारख्या वन्यजीवांकडून हातातोंडाला येणारी पिके नष्ट होत असताना वन विभाग मात्र बघ्याची भूमिका घेताना दिसतो. गेल्या दोन वर्षात तालुक्यामध्ये झालेली वृक्षतोड सर्वश्रुत आहे. वृक्षतोडीला कोणताही पायबंद घातला जात नसल्याने सदर वन्यजीव शेती पिकामध्ये येत आहेत हे वास्तव नाकारता येत नाही. त्यामुळे हतबलतेतून शेतकरी वर्गाकडून वन्यजीवांच्या बंदोबस्तासाठी विविध प्रयोग केले जात आहेत. हे प्रयोग जरी कायद्याच्या चौकटीत बसणारे नसले तरीही वन्यजीवांच्यापासून थोडाफार दिलासा देणारे आहे असे स्पष्ट मत काही मंडळी व्यक्त करत आहेत.
या प्रकारावर पायबंद घालायचे असतील तर वन विभागानेच त्रासदायक वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणीही होत आहे.

रानडूक्कर शिकार प्रकरणी तिघांना वनकोठडी
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
रानडुक्कराची शिकार करणाऱ्या तिघांना मंगळवार पर्यंत वनकोठडी मिळाली आहे. आजरा न्यायालयात हजर केले असता त्यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी तीन दिवसाची वनकोठडी सुनावली आहे. अशोक गुरव ( रा. देवर्डे ता. आजरा) विशाल विलास जाधव, अशोक गिलबिले ( रा. चांदेवाडी ता. आजरा) अशी त्यांची नावे आहेत.

दम ‘धार’ पाऊस
नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरासह तालुक्यात शुक्रवारी रात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून अद्याप पाऊस सुरू आहे.
सदर पाऊस पिकांच्या दृष्टीने उपयुक्त समजला जात असून शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. पावसामुळे पुन्हा एकदा नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. चित्री, सर्फनाला, आंबे ओहोळ व उचंगी मध्यम प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रामध्येही जोरदार पाऊस सुरू आहे.

निधन वार्ता
श्रीमती गंगुबाई बुरुड

रामदेव गल्ली आजरा येथील श्रीमती गंगुबाई बाळकू बुरुड (वय ८७ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
वीज वितरण चे सेवानिवृत्त मुख्य अभियंता श्री. राजाराम बुरूड व रमेश बुरुड यांच्या त्या मातोश्री होत.त्यांच्या पश्चात तीन विवाहित मुले, विवाहित मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.


