

आजऱ्यात पावसाची संततधार सुरुच…
घरांची पडझड

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाची संततधार सुरुच असून हिरण्यकेशी व चित्रा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. शेतवडीत पाणीच पाणी झाले आहे. पावसाच्या माऱ्याने घरांची पडझड सुरु झाली आहे.

निंगुडगे (ता. आजरा) येथे काशिनाथ रामू चौगुले यांची घराची भिंत कोसळली असून पन्नास हजारांचे नुकसान झाले आहे. तालुक्यात सात घराची पडझड झाली आहे. महसुल विभागाकडून पंचनामे सुरु आहेत. गेल्या चोवीस तासात ७० मिलीमीटर पावसासह शहर व परिसरात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

पावसाचा जोर कायम राहिल्यास साळगाव बंधारा पाण्याखाली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर पावसाचा जोर वाढल्याने मूर्तिकारांची चांगलीच धांदल उडाली आहे.

देवर्डेत वीजेचा धक्का बसून म्हैशीचा मृत्यू

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
देवर्डे (ता. आजरा) येथे वीजेचा धक्का बसून म्हैशीचा मृत्यू झाला आहे. रविवारी सकाळी आठ वाजता ही घटना घडली.
भिवा शंकर मळेकर यांची म्हैस असून त्यांचे सुमारे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. येथील हनुमान सेवा सोसायटी जवळील रोहीत्रा जवळ म्हैशीला वीजेचा धक्का बसला.

महामार्गावरील पुलानजीकचे खड्डे भरण्याची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
संकेश्वर- बांदा महामार्गावर आजरा येथील व्हिक्टोरिया पुलाशेजारी बांधण्यात आलेल्या नवीन पूलाजवळ मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून हे खड्डे वाहन चालकांच्या दृष्टीने डोकेदुखी बनत आहेत.त्यामुळे तातडीने ते भरावेत अशी मागणी वाहन चालक करीत आहेत .
नव्याने बांधण्यात आलेला हा पूल संपताच सर्वत्र खड्डे पडले आहेत. मुळातच पुलाच्या दोन्ही बाजूचा भराव सखल असल्याने पूल ओलांडणाऱ्या गाड्या येथील सखलपणामुळे जोरात आदळतात. भरीस भर म्हणून समोरच खड्डे पडले असल्याने वाहन चालकांना या मार्गावरून प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे.
तातडीने सदर खड्डे भरून घ्यावेत अशी मागणी केली जात आहे.

श्रीमंत गंगामाई वाचन मंदिराच्या नूतन इमारतीचे गुरुवारी भूमिपूजन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथील शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करीत असणाऱ्या श्रीमंत गंगामाई वाचन मंदिराच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा गुरुवार दिनांक २९ ऑगस्ट रोजी आमदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. अशोक बाचूळकर यांनी दिली.
आजरा तालुक्याला समृद्ध वाचनाची परंपरा असून यामध्ये या वाचनालयाचा मोठा वाटा आहे. आज-याचा वैभवात भर टाकणाऱ्या या इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यास तालुकावासीयांनी उपस्थित रहावे असे आवाहनही डॉ. बाचुळकर यांनी केले आहे.
फोटो क्लिक…



