शुक्रवार दि. २७ डिसेंबर २०२४


लेखकाने सत्यासोबत रहावे : कृष्णात खोत
श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरच्या विविध पुरस्कारांचे वितरण

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
लेखक आपल्या लेखणीतून सत्तेच्या शहाणपणाला दुरूस्त करण्याचे काम करीत असतो. पण शहाणपणाला दुरूस्त करणारी माणसं सत्तेला आवडत नाहीत. पण अशा माणसांना पुरस्कार देऊन श्रीमंत गंगामाई वाचन मंदिराने लेखकांना बळ देण्याचे हाती घेतलेले कार्य कौतुकास्पद आहे. लेखकाने सत्तेसोबत नाही तर सत्त्यासोबत राहीले पाहिजे. सत्त्यासोबत राहणारा लेखक कोणत्याही सत्तेची तमा बाळगत नसल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक कृष्णात खोत यांनी केले. येथील श्रीमंत गंगामाई मंदिर पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष वामन सामंत होते.
आपल्या भोवताली घडणाऱ्या बऱ्या-वाईट घटनांबद्दल सर्वसामान्य माणूस सत्य बोलत असतो. त्यामुळे लेखकाने सामान्य माणसांच्या भूमिकेत राहीले पाहिजेत. लेखकाच्या लेखणीतून निर्माण होणारं साहित्य सामान्यांचा आवाज असलं पाहिजेत असे मतही त्यांनी व्यक्त केले. आपल्या मनोगतातून त्यांनी राज्यकर्ते, व्यवस्था, डिजीटल युग आदि मुद्यांबाबत सविस्तर माहिती दिली.
यानंतर कवी एकनाथ पाटील यांच्या अरिष्टकाळाचे भयसूचन या काव्यसंग्राला
मैत्र काव्य पुरस्कार, भूमीपुत्र साहित्यिक पुरस्काराने डॉ. श्रद्धानंद ठाकुर, श्रीमती पूजा तिप्पट यांना माता गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. तर क्रांतीवीर रत्नापाण्णा कुंभार वाचनालय गंगानगर, इचलकरंजी, म. गांधी वाचनालय मुगळी, ता. गडहिंग्लज, सिद्धीविनायक वाचनालय,कोवाडे या वाचनालयांना पुरस्काराने गौरविण्यात आले. तर उत्कृष्ट बालवाचक अंशुमन भोसले, अभ्यासिका वाचक पूनम नार्वेकर, महिला वाचक राजश्री गाडगीळ, पुरूष वाचक अनंत आजगेकर यांना गौरविण्यात आले.
सत्कारानंतर बोलताना कवी एकनाथ पाटील यांनी आजऱ्याला वाङमय व संस्कृतीची मोठी परंपरा असल्याचे सांगितले. काळाला भिडणारे आणि सत्तेला प्रश्न करणारे लेख तयार होणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. भूमीपुत्र पुरस्कार विजेते साहित्यिक डॉ. ठाकुर म्हणाले, पुरस्कार म्हणजे लेखकांना संजीवनी आहे. कोणत्याही कलेसाठी शिक्षणाची नाही तर संस्काराची गरज असते आणि ती आजऱ्यात असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येकाने कोणताही एक छंद जोपासला पाहिजे, तो छंदच तुम्हाला जगवित असल्याचे त्यांनी स्वतःचे उदाहरण देत सांगितले.
यावेळी कॉ. संपत देसाई, सुभाष कोरे, डॉ. अनिल देशपांडे, मुकुंदराव देसाई, अनिकेत चराटी, जी. एम. पाटील, महादेव पोवार, वाचनालयाच्या उपाध्यक्षा विद्या हरेर, कार्यवाह कुंडलिक नावलकर, सहकार्यवाह रवींद्र हुक्केरी, संचालक संभाजी इंजल, सुभाष विभुते, विजय राजोपाध्ये, विनायक आमणगी, महंमदअली मुजावर, बंडोपंत चव्हाण, डॉ. अंजनी देशपांडे, गीता पोतदार, संतोष जाधव, सुचेता गड्डी, ग्रंथपाल चंद्रकांत कोंडूसकर, रुपेश वाळके यांच्यासह आजरा शहर आणि तालुक्यातील श्रोते उपस्थित होते. रामकृष्ण मगदूम यांनी सूत्रसंचलन करून आभार मानले.


स्व.वसंतराव देसाई यांच्या पुण्यतिथीनिमित्य अभिवादन !

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा साखर कारखान्याचे संस्थापक माजी आमदार स्व. वसंतराव देसाई यांच्या १९ व्या पुण्यतिथी दिनी कारखाना कार्यस्थळावर अभिवादन करण्यात आले.
त्यांच्या पुतळयाचे कारखान्याचे अध्यक्ष श्री. वसंतराव धुरे यांचे हस्ते पुजन करून कारखाना परिवारातर्फे अभिवादन करणेत आले.
यावेळी व्हा.चेअरमन, श्री.एम.के.देसाई, जेष्ठ संचालक श्री. मुकुदराव देसाई, संचालक श्री. गोविंद पाटील, श्री. राजेश जोशिलकर, श्री. संभाजी पाटील, श्री. रशिद पठाण, श्री. नामदेव नार्वेकर, श्री. दिगंबर देसाई, व अन्य मान्यवर संचालक प्र.कार्यकारी संचालक श्री. व्यंकटेश ज्योती, तसेच कामगार संघटनेचे अध्यक्ष श्री.धनाजी किल्लेदार व कारखान्याचे खातेप्रमुख, उपखातेप्रमुख, युनियन पदाधिकारी आणि कर्मचारी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


शिकारीच्या उद्देशाने फिरणाऱ्या एका विरोधात गुन्हा नोंद

चंदगड : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
चंदगड तालुक्यातील सडेगुडवडे येथील गट क्रमांक ५६२ या पिळणी जंगलालगतच्या क्षेत्रामध्ये दिगंबर पांडुरंग अनुगडे ( वय ३४ वर्षे ) हे कपाळाला बॅटरी लावून बंदूक घेऊन शिकारीच्या उद्देशाने फिरत असताना त्याला वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हा रंगेहात पकडले त्यांच्या विरोधात वनगुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला वन कोठडी सुनावण्यात आली आहे.
वनक्षेत्रपाल न.पां. भोसले, वनपाल कृष्णा डेळेकर,वनरक्षक राजू धनवई ,सचिन होगले आदींनी सदर कारवाई केली.


युध्दनितीचा अभ्यास होणे काळाची गरज :
राम यादव

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
महाराजांच्या युद्धनीतीचा अभ्यास करताना फक्त इतिहास माहिती असून चालणार नाही तर त्यासाठी तेथील भूगोल सुद्धा माहिती असावा. अनेक लढाया ह्या गनिमी काव्याने बुद्धी चातुर्याने आणि निर्णय क्षमतेने महाराजांनी जिंकल्या. त्यांच्या युध्दनितीचा अभ्यास होणे काळाची गरज आहे. असे प्रतिपादन इतिहास तज्ञ राम यादव यांनी केले.
येथील शिवाजीराव सावंत स्मृतीदालनात श्रीमंत गंगामाई वाचन मंदिराच्या व्याख्यानमालेमध्ये ‘ छत्रपती शिवरायाची युध्दिनिती ‘ हा विषय मांडत तिसरे पुष्प गुंफले. वाचनालयाचे अध्यक्ष वामन सामंत अध्यक्षस्थानी होते.
श्री. यादव म्हणाले, छ. शिवरायांना राजमाता जिजाऊ यांचे खऱ्या अर्थाने मार्गदर्शन भेटले. अनेक शत्रूना एकाच वेळी हरवण्यासाठी जी युद्धनीती वापरली जाते त्यासाठी महाराजांनी त्या प्रदेशाचा आणि गड किल्ल्यांचा सखोल अभ्यास केला होता. महाराज एकाच वेळी अनेक युद्धकलेत पारंगत होते त्यांना विविध प्रकारची शस्त्रे चालविता येत होती. त्याचा अभ्यास होणे गरजेचे आहे. या वेळी इतिहासातील अनेक दुर्मिळ शस्त्रे, नाणी आणि विविध फोटो यांचे प्रदर्शनही मांडण्यात आले होते. डा. अनिल देशपांडे, जयवंतराव शिंपी, डा धनाजी राणे, मधुकर क्रमित, उपाध्यक्षा विद्या हरेर, कार्यवाह कुंडलिक नावलकर आजरा शहरातील शिवप्रेमी नागरीकासह वाचनालयाचे संचालक, कर्मचारी उपस्थित होते.


किणे ते पोश्रातवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण कामाचा शुभारंभ

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
२५ लाख ६५ हजार रुपये मंजूर रकमेच्या रस्ता खडीकरण डांबरीकरण कामाचा शुभारंभ आजरा साखर संचालक व पंचायत समितीचे माजी सभापती श्री .विष्णूपंत केसरकर यांच्या हस्ते किणे येथे संपन्न झाला .
यावेळी उपसरपंच श्री .विजय केसरकर , यांच्यासह श्री .अरुण पाटील, श्री . नारायण केसरकर , सौ . मनिषा केसरकर , सौ . गुलाबी केसरकर , सौ .अलका बामणे , श्री . विष्णू कुंभार , श्री .राजाराम देसाई , श्री . गंगाराम घोळसे , श्री .पिराजी केसरकर, श्री . गोविंद केसरकर, श्री . तानाजी पत्ताडे श्री .सदशिव केसरकर , पत्रकार श्री . राजाराम कांबळे , श्री .संजय पाटील , श्री .रवळू कुंभार , कॉन्ट्रॅक्टर श्री . आण्णापा पाथरवट, श्री .जगदिश पाथरवट व ग्रामस्थ उपस्थित होते.

निधन वार्ता
दनवेल डायस

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
ग्रुप ग्रामपंचायत वाटंगीचे माजी सरपंच, रोजरी इंग्लिश स्कूलसह विविध संस्थांचे संस्थापक श्री.दनवेल उर्फ डॅनियल जॅकी डायस (वय ८७ वर्षं ) यांचे गुरुवारी पहाटे निधन झाले.
आज शुक्रवार दिनांक २७ रोजी दुपारी ३.३० वाजता वाटंगी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
डायस यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुले,दोन विवाहित मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.



आजरा आगारात प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिनाचे आयोजन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
३० डिसेंबर रोजी आजरा आगारात प्रवासी राजा दिन ” व ” कामगार पालक दिन ” साजरा करणेत येणार आहे. प्रवासी व कामगारांच्या समस्यांचा स्थानिक पातळीवर निपटारा करणेसाठी सदर उपक्रम राबवणेत येणार आहे.
दिनांक ३० रोजी सकाळी १० ते २ वाजेपर्यंत प्रवाशांच्या लेखी तकारी स्विकारल्या जातील व त्यावरील उपाययोजनांबाबत, मा.विभाग नियंत्रकसो आदेश देतील.
दुपारच्या सत्रात दुपारी ३ ते ५ या वेळेत आगारातील एस.टी कर्मचा-यांच्या व्यक्तीगत अथवा संघटनात्मक समस्या ऐकुन घेवून त्यावर तातडीने योग्य ती कार्यवाही केली जाईल. प्रवाशी व कर्मचा-यांनी आपल्या तक्रारी अथवा समस्या लेखी स्वरुपात नेमून दिलेल्या वेळेत आगारात देणेत याव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.



