गुरुवार दि. २६ डिसेंबर २०२४


महिला बेपत्ता…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यातील पोवारवाडी/हाळोली येथून सौ. गोपिका गोपाळ पोवार ही ६६ वर्षीय महिला बेपत्ता झाली आहे. दिनांक २२ डिसेंबर पासून राहत्या घरातून ती निघून गेलेली असून अद्याप परतलेली नाही.
याबाबतची वर्दी गोपाळ महादेव पोवार यांनी आजरा पोलिसांत दिली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करीत आहेत.


पाच वर्षात अपूर्ण कामे पूर्ण करणार : हसन मुश्रीफ
उत्तूरमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांचा भव्य सत्कार

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
विधानसभा निवडणुकीत राज्यांमध्ये महायुतीला मिळालेल्या प्रचंड यशामुळे अपेक्षांचे ओझे वाढले आहे.मागील १३ महिने मिळालेल्या मंत्री पदाच्या कालावधीत विविध शाश्वत विकास कामे करण्याची संधी मिळाली त्यामधील अपूर्ण राहिलेली कामे येत्या पाच वर्षात पूर्ण करणार असल्याचे प्रतिपादन मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. ते येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व ग्रामपंचायत उत्तुर यांच्या वतीने आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी आजरा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन वसंतराव धुरे होते. तर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उमेश आपटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मुंबई समुद्र बोट दुर्घटनेत जीवाची पर्वा न करता बचाव कार्य केल्याबद्दल चव्हाणवाडी गावचे सुपुत्र अमोल सावंत यांचा सपत्नीक सत्कार तसेच निरज दोरूगडे (सोहाळे) यांची सीआरएफ मध्ये व अनिकेत जांभळे (चव्हाणवाडी) यांची आर्मीमध्ये भरती झाले बद्दल मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी मारुतीराव घोरपडे, शिवलिंग सन्ने, दीपक देसाई, शिरीष देसाई यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सौरभ वांजोळे यांनी तर आभार संभाजी तांबेकर यांनी मानले.


पांडुरंग ढोकरे यांचे निधन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मडिलगे तालुका आजरा येथील पांडुरंग विठोबा ढोकरे (वय ७७ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे.


सोमवारी आजऱ्यात निषेध मोर्चा

आजरा ; मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळयासमोरील संविधान प्रतिकृतीची मोडतोड करून विटंबना केलेल्या घटनेच्या निषेधार्थ आजरा येथे तहसील कार्यालयावर निषेध मोर्चाचे सोमवार दिनांक ३० रोजी आयोजन करण्यात आले आहे.
या सर्व प्रकरणाची मुळापर्यंत जाऊन सखोल चौकशी करावी व संबंधितावर देशद्रोहाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात यावा राष्ट्रीय गौरव सन्मान अधिनियम २००५ अंतर्गत कारवाई करण्यात यावी.
दिवगंत सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मारहाण करून झालेल्या मृत्युबाबत संबंधितावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. सर्व संबधितांना अटक करण्यात यावी. दि. ११/१२/२०२४ रोजी संविधान प्रतिकृती विटंबना प्रकरणी निदर्शने ,निवेदनही जनतेची उत्स्फर्त प्रतिक्रिया होती. त्यावेळी घडलेल्या घटनेच्या आधारे ज्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, हे सर्व गुन्हे मागे घेण्यात यावे. उत्स्फूर्त प्रतिक्रिया केलेल्या घटनेवरून पोलिसांनी जे कोंबिगं ऑपरेशन करून तरूणांसह निरपराध महिला व लहान मुले मुली वयस्कर इसमांना तसेच बाळंतीण महिलेला तिच्या बाळासह घरात घुसून मारहाण करण्यात आली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितावर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात यावी. तरी वरील सर्व प्रकरणाची या घटनेशी संबंध नसलेल्या अशा दुसऱ्या विभागाच्या वरिष्ठ पोलिस अधिकांऱ्या मार्फत सखोल चौकशी करून संबंधितावर तात्काळ गुन्हे नोंद करून अटक करण्यात यावी.
या मोर्चासाठी आजरा, गडहिंग्लज, चंदगड व भुदरगड या तालुक्यातील तमाम संविधानप्रेमी, आंबेडकरवादी आणि शिव, फुले, शाहू, आंबेडकर विचारांच्यावर प्रेम करणारे तमाम भारतीय नागरीकांनी या निषेध मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


‘व्यंकटराव’ चे महाराष्ट्र राज्य श्रीनिवास रामानुजन गणित प्रावीण्य परीक्षेत यश

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ कोल्हापूर व गणित विषय समिती यांच्या वतीने घेण्यात आलेल्या गणित प्राविण्य परीक्षा २०२४-२५ यामध्ये व्यंकटराव हायस्कूलचे तब्बल २१ मुलांनी यश संपादन केले आहे त्यामध्ये जिल्ह्यात प्रथम पंचवीस विद्यार्थ्यांमध्ये प्रशालेचे तीन विद्यार्थी आहेत त्याचप्रमाणे प्रज्ञा परीक्षेसाठी १८ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे
बक्षीस पात्र विद्यार्थी :-
पाटील विवेक धनाजी,
निंबाळकर स्वराज प्रवीण, पुंडपळ सौश्रुती अमित
प्रज्ञा परीक्षेसाठी निवड झालेले विद्यार्थी :-
जावळे विभावरी विक्रम, दळवी कार्तिक रमेश,तेजम संस्कार संजय,कांबळे सुमेध दशरथ,देसाई धनश्री महेश,चौगुले सानवी लक्ष्मण ,इलगे संस्कृती धनाजी,पाटील श्रावणी शिवाजी, चौगुले स्वराली प्रशांत ,गुरव रुद्र विशाल, कांबळे आर्या अशोक , पाटील स्वरांजली उत्तम ,गिरी आयुष ओंकार, हरमळकर ध्रुव राजाराम, जाधव अर्णव समीर, कुंभार पियुष संजय ,कातकर रुद्र राहुल, कदम सृष्टी दशरथ
या सर्व विद्यार्थ्यांना गणित विषय शिक्षिका ए. डी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
श्रीनिवास रामानुजन तालुकास्तरीय गणित प्राविण्य परीक्षा २०२४ प्रज्ञापात्र विद्यार्थी :- इयत्ता पाचवी प्रतीक प्रकाश कोलते, स्वर्णिका संदीप खामकर, अद्वैत महादेव पाटील, गुण यशराज देवानंद देसाई,निहार संजय तेजम
या विद्यार्थ्यांना ए. वाय. चौगुले यांनी मार्गदर्शन केले.
वरील सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी, सर्व संचालक मंडळ,प्राचार्य आर. जी. कुंभार, पर्यवेक्षिका सौ. व्ही. जे. शेलार यांचे प्रोत्साहन लाभले.







