बुधवार दि. २५ डिसेंबर २०२४


नव्या युगाला आदर्श वाटेवर नेणारी चळवळ उभा करण्याची गरज : डॉ. ज्ञानेश्वर मुळे
झेप ॲकॅडमी चे आज-यात उद्घाटन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सत्ता, संपत्तीसह संसाधनांचे विकेंद्रीकरण म्हणजे लोकशाही असून सद्यस्थितीत तरुणांवर मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. करिअरच्या अनेक संधी व पर्याय तरुणांसमोर उभे आहेत. नव्या युगाला आदर्श वाटेवर नेणारी चळवळ सुरू करण्याची गरज प्राधान्याने पुढे येत आहे. तरुणांच्या पंखांमध्ये बळ देण्याचे काम ज्ञानदिप प्रबोधिनीच्या एम.एल. चौगुले व त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘झेप’ अकॅडमी सुरू करून केले आहे. झेपने ज्ञानाची ज्योत चेतवली असून ती सतत पेटती ठेवणे ही येथील तरुणांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन भारताचे माजी राजदूत व विदेश मंत्रालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी केले.
ज्ञानदीप प्रबोधिनी, गडहिंग्लज संचलित झेप अकॅडमीच्या आजरा येथील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व अभ्यासिकेचे उद्घाटन डॉ. मुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
डॉ. मुळे म्हणाले स्पर्धा परीक्षांमध्ये कांही वेळा अपयश येण्याची शक्यता असते परंतु अपयशालाही सौंदर्य आहे.अपयशही प्रेक्षणीय असावे व त्यातून पुन्हा यशस्वी होण्याची जिद्द निर्माण झाली पाहिजे. आज विविध क्षेत्रांमध्ये संधीची कमतरता निश्चितच नाही स्थानिक पातळीवरही मोठ्या संधी उपलब्ध होत आहे ही समाधानाची बाब आहे. विद्यार्थ्यांनी केवळ नोकर न बनता सक्षम नागरिक बनण्याची गरजही त्यांनी बोलून दाखवली. ज्ञानाचे पीक उत्तम यायचे असेल तर बिजारोपणही चांगले होण्याची गरज आहे व हे बीजारोपण करण्याचा ‘ झेप ‘ चा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
‘रवळनाथ हौसिंग’ चे संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले म्हणाले, विद्यार्थ्यांची गरज ओळखून चांगल्या देणगीदारांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना झेप ॲकॅडमीने करियर घडवण्याचे दालन आज पासून खुले केले आहे. त्याचा स्थानिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. या अभ्यासिकेला मिळणारा प्रतिसाद पाहून भविष्यामध्ये सुसज्ज अशी भव्य अभ्यासिका उभा करण्याचा आपला संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर म्हणाले, करिअर आणि संघर्ष यांचे अनोखे नाते आहे. करिअर घडवताना संघर्ष हा अटळ आहे. हा संघर्ष ५० टक्के कमी करण्याचे काम झेप ॲकॅडमीने केले आहे. आता चांगले प्रशासकीय अधिकारी तयार होण्यासाठी विद्यार्थ्यांनी कष्ट घेण्याची गरज आहे.
आजरा महाल शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी व जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अशोकअण्णा चराटी यांनी यावेळी शुभेच्छापर मनोगते व्यक्त केली.
मुंबई येथील बोट दुर्घटना घटनेवेळी अनेकांना जीवदान देणाऱ्या अमोल सावंत यांच्या कुटुंबीयांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम प्रसंगी माजी आरोग्य उपसंचालक बाळासाहेब नाईक, डॉ. अनिल देशपांडे, डॉ.दीपक सातोसकर,के. व्ही. येसणे, प्रा. किरण प्रधान, जितेंद्र शेलार नूरजहाँ सोलापुरे, डॉ . नवनाथ शिंदे, प्रा.दिलीप भालेराव, प्रा.जे.डी.दळवी,प्रा.व्ही.के.मायदेव यांच्यासह रवळनाथ हाउसिंग फायनान्स सोसायटीचे पदाधिकारी,अधिकारी, कर्मचारी, ज्ञानदीप प्रबोधिनीचे पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण पाटील यांनी केले. स्वागत मीना रिंगणे यांनी तर उपाध्यक्ष बी.एस. पाटील यांनी आभार मानले.


नवीन वर्षाची सुरुवात उपोषणाने करण्याचा ‘अन्याय निवारण ‘ चा इशारा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीने ,आजरा नगरपंचायतीने संकेश्र्वर- बांदा महामार्गावरील पथमार्गावरील अतिक्रमणे काढून पादचाऱ्यांना खुला करून ध्यावा व समर्थ कॉलनी व बळीराम देसाई नगरचे पाणी नियमित व योग्य दाबाने करण्यासाठी दिलेली मुदत दि. २६ डिसेंबर रोजी संपत आहे, जर मूदतीत काम नाही झाले तर नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी १ जानेवारी २०२५ पासून नगरपंचायत ऑफिस समोर बेमुदत उपोषणाला बसण्याची नोटीस वजा पत्र दिले असून त्याची प्रत जिल्हाधिकारी कोल्हापूर, प्रांताधिकारी भूदरगड, तहसीलदार ऑफिस आजरा, यांना ई-मेलद्वारे कळवण्यात आले आहे.
नगरपंचायत व आजरा पोलीस स्टेशन यांना प्रत्यक्षात पत्र देऊन त्याची पोच घेतलेली आहे. तसेच आजऱ्यातील नवीन होणारी पाण्याची स्कीम नगरपंचायतीने दिलेल्या लेखी मूदतीत न झाल्यास संपूर्ण आज-यातून मोठे आंदोलन छेडण्याचा ही इशारा देण्यात आला.
यावेळी अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे, उपाध्यक्ष गौरव देशपांडे, सचिव पांडुरंग सावरतकर,जोतिबा आजगेकर, वाय. बी. चव्हाण , जावेद पठाण , दयानंद भोपळे , बंडोपंत चव्हाण ,मदन तानवडे, हेमंत गिलबिले, निळकंठ उपस्थित होते.


जनरेशन गॅप कमी करण्यासाठी काळानुरूप होणारे बदल स्वीकारण्याची गरज : कपिल लळीत

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
काळानुरूप होणारे बदल स्वीकारून नव्या पिढीशी सुसंवाद साधल्यास पिढयांमध्ये निर्माण झालेली जनरेशन गॅप कमी होण्यास मदत होईल असे मत सांगली येथील प्रसिध्द मानसतज्ञ कपिल लळीत यांनी व्यक्त केले. आजरा येथील श्रीमंत गंगामाई वाचन मंदिराच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेत ‘आमच्या वेळी असं नव्हतं… अर्थात जनरेशन गॅप ‘ या विषयावर बोलत होते.
आजकालच्या धकाधकीच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात मानसिक गुंतागुंत वाढल्याने मनुष्य तणावपूर्ण जीवन जगत आहे. त्यामुळे मानसशास्त्र हे केवळ मनोरूग्णांसाठी नसून ते प्रत्येकाने समजून घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगीतले. कुटुंबात आणि समाजात एकमेकांशी परस्पर अनुबंध निर्माण केल्यास जनरेशन गॅप ही गोल्डन गॅप मध्ये रूपांतरीत होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
नव्या पिढीच्या इच्छा, आकांक्षा आणि जगण्याची उद्दिष्टे बदलत आहेत. दोन पिढयांच्या विचारात झालेला बदल, पालकत्वाची बदललेली पध्दत, कुटुंबाच्या संकल्पना यामुळे निर्माण झालेली गुंतागुंत सामंजस्य व परस्पर अनुबंध या तत्वांचा अवलंब केल्यास हे अंतर कमी होईल. नात्यांमधे व्यवहार आला की नाती संपुष्ठात येतात त्यामुळे नात्यांमध्ये व्यवहार आणू नका. आपण कितीही स्वावलंबी होण्याचा प्रयत्न केला तरी प्रत्येकजन परस्परावलंबी आहे आणि हे परस्परावलंबन स्वीकारणे ही काळाची गरज आहे हे त्यांनी उदाहरणांसह समजावून सांगीतले .
कार्यक्रमाला व्याख्यानाचे प्रायोजक उद्योजक महादेव पोवार, संदिप वाटवे, मुकुंददादा देसाई, जयवंतराव शिंपी, अनिकेत चराटी, डॉ. रश्मी राऊत, डॉ. गौरी भोसले, अध्यक्ष वामन सामंत, उपाध्यक्षा विद्या हरेर, कार्यवाह कुंडलिक नावलकर, सहकार्यवाह रविंद्र हुक्केरी, संभाजीराव इंजल, बंडोपंत चव्हाण, सुभाष विभुते, महंमदअली मुजावर, डॉ. अंजनी देशपांडे, गिता पोतदार, सुचेता गड्डी उपस्थीत होते. 

सध्याचे युग हे फसव्या जाहिरातीचे : सी. आर. देसाई
आजरा तहसिलदार कार्यालयात ग्राहक दिन संपन्न

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
ग्राहकांना योग्य तो न्याय मिळावा या उदात्त हेतूने १९८४ साली ग्राहक निवारण कायदा करण्यात आला. त्यामध्ये ग्राहकांना डोळ्यासमोर ठेऊन नवनवीन कायद्यात बदल करण्यात आले आहेत. कायद्याने सर्व उत्पादक घटकांना व सेवांना तक्रार निवारण कक्ष स्थापन करणे बंधनकारक आहे. पंरतू सद्याचे युग हे फसव्या जाहिरातीचे असून ग्राहक त्यांच्या अमिषांना व फसव्या जाहिरातीना भुलून अडचणीत येत असल्याचे मत कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व माजी प्राचार्य सी. आर. देसाई यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायब तहसिलदार म्हाळसाकांत देसाई होते.
प्रारंभी ग्राहक चळवळीचे प्रणेते बिंदू माधव जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक पुरवठा विभागाचे अधिकारी संदीप पाटील यांनी केले. यावेळी काशिनाथ मोरे यांनी आर्थिक उलाढालीसाठी ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी कायदा पारित झाला आहे. हॉटेल व पेट्रोल पंपावर ग – ाहकासाठी मोफत पिण्याचे पाणी व शौचालयाची सोय असणे बंधनकारक आहे. आरोग्य विभागातील खाजगी दवाखान्यातील असणारे दर दर्शनी भागात लावले पाहिजे. ग्राहकांची फसवणूक होत असेल तर ग्राहक पंचायत व ग्राहक चळवळीकडे तक्रार दाखल करावी असे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय मनोगतात देसाई यांनी आजरा तालुक्यातील सर्व विभागातील अधिकाऱ्यांना पत्र देऊनही आजच्या ग्राहक दिनाला उपस्थीत राहिले नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त करून ग्राहक चळवळीला योग्य दिशा देण्यासाठी जानेवारीमध्ये सर्वांच्या उपस्थितीत ग्राहक मेळाव्याचे नियोजन करण्याचे आश्वासन दिले. यावेळी कॉ. शांताराम पाटील, अजय देशमुख आमानुल्ला आगलावे यांनी वेगवेगळ्या सूचना व तक्रारी उपस्थित केल्या. यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुकाध्यक्ष रामदास चव्हाण, ग्राहक कल्याण फौंडेशनचे तालुकाध्यक्ष बंडोपंत चव्हाण, ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे तालुकाध्यक्ष महादेव सुतार व संजय येसादे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी अखिल भारतीय वारकरी मंडळाचे तालुकाध्यक्ष गौरव सुतार, कॉ. संजय घाटगे, व्ही. डी. जाधव, सुमन कांबळे, शिवाजी इंजल, सुभाष मोरजकर, नारायण भडांगे, जालंदर कांबळे, यशवंत दोरूगडे, संभाजी गुरव यांच्यासह ग्राहक पंचायतीचे पदाधिकारी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. तलाठी वंदना शिंदे यांनी सूत्रसंचलन करून आभार मानले.

प्रकाश नावलकर यांच्या “बांधावरची बाभळ” या कथासंग्रहाचे प्रकाशन

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उत्तूर गावचे लेखक प्रकाश नावलकर यांच्या “बांधावरची बाभळ” या दुसर्या कथासंग्रहाचे प्रकाशन पुणे बुक फेस्टिवल येथे विद्यापरिषद सदस्य पुणे विद्यापीठ व मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप सांगळे व एक भाकर तीन चूली या बहुचर्चित कादंबरीचे लेखक देवा झिंजाड यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी लेखकांनी प्रथम माणूस वाचायला शिकले पाहिजे व माणूस ओळखायला शिकले पाहिजे.त्यात निरिक्षण व कल्पनाशक्ती असली तर तो चांगले लेखन करू शकतो,’ असे प्रतिपादन पुणे विद्यापीठ व मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप सागळे यांनी केले.तर देवा झिंजाड यांनी प्रकाश नावलकर सारख्या नवोदित साहित्यिकांना लिहीण्यासाठी बळ देण्याची गरज आहे.
चांगले लेखन असूनही प्रकाशकांतर्फे जास्त पैशाच्या मागणीमुळे काही लेखक पुढे येऊ शकत नाहीत.अशावेळी न्यू इरा सारखी. प्रकाशन संस्था या नवोदित लेखकांना मदतीचा हात पुढे करते असे मत मांडले.
या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास लेखिका संगीता लोटे ,व न्यु इरा पब्लिकेशनचे सदस्य अनिल माणे, सिद्धी पवार तसेच सिनेपञकार ज्ञानराज कुलकर्णी , लेखक श्री शाम कुंभार , सौ.पुजा सामंत,लेखिका डॉ. विद्या निखाळजे, संतोष कुंईगडे,राजेंद्र गावडे यांच्यासह वाचक उपस्थित होते .
प्रकाश नावलकर हे दोहाकतारच्या कतार नॅशनल लायब्ररीत गेल्या पाच वर्षापासून काम करत असुन त्यांनी गावगाड्यातल्या आठवणींच गाठोड “बांधावरची बाभळ” या कथासंग्राद्वारे वाचकांसमोर आणले आहे.

आजरा महाविद्यालयात बारावीच्या पालक-शिक्षक-विद्यार्थी सहविचार सभा संपन्न

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा महाविद्यालयात कनिष्ठ व व्होकेशनल विभागातील १२ वी वर्गातील विद्यार्थी पालक व शिक्षक सहविचार सभा संपन्न झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाने प्राचार्य डॉ. ए.एम. सादळे होते.
कॉपीमुक्त व भयमुक्त परीक्षा घेणे हे एच.एस. सी. विभागीय बोर्ड, कोल्हापूरचे मुख्य उद्दिष्ट आहे, त्यामुळे विद्यार्थीनी कॉपीचा अवलंब परीक्षेत करु नये. कॉपी केल्यास कडक शिक्षेची तरतूद केली आहे. त्यामुळे विद्यार्थानी अभ्यास करूनच परीक्षेस सामोरे जावे. गैरप्रकारांचा अवलंब घातक ठरु शकतो असे मत उपप्राचार्य दिलीप संकपाळ यांनी व्यक्त केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. सादळे यांनी परीक्षा जवळ असल्याने अभ्यासाशिवाय पर्याय नाही. कठोर परिश्रमातून पूर्णत्वास गेलेले शिक्षण निश्चितच आयुष्याला वेगळे वळण देते असे स्पष्ट केले.
प्रा.पी.जी. पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले तर प्रा. विनायक चव्हाण यांनी आभार मानले.

शुभांगी मोहिते यांना पीएच. डी.

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शुभांगी कृष्णात मोहिते यांनी शिवाजी विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागात “डायव्हर्सिटी ऑफ बटरफ्लाय ऑफ आजरा तहसील कोल्हापूर डिस्ट्रिक्ट महाराष्ट्रा विथ स्पेसिअल रेफरन्स टू फॉरेस्ट अँड एग्रीकल्चर इकोसिस्टीमस् ” विषयाचा शोधप्रबंध सादर केला आहे. या शोध प्रबंधासाठी त्यांना शिवाजी विद्यापीठाकडून पीएच.डी. जाहीर झाली असून त्यांना डॉ. एल. पी. लंका यांचे मार्गदर्शन लाभले.शुभांगी ह्या कोरीवडेचे अमोल भोसले/कांबळे यांच्या पत्नी आहेत.

भादवण हायस्कूलमध्ये राष्ट्रीय गणित दिन विविध उपक्रमांनी साजरा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
थोर गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन जयंती निमित्त भादवण हायस्कूल, भादवण येथे गणित विभागाच्या वतीने विविध उपक्रम राबवले गेले. रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन भादवण गावाच्या लोकनियुक्त सरपंच सौ. गाडे यांच्या हस्ते करण्यात आले गणितीय साधनांची मांडणी केलेल्या गणित दालनाचे उद्घाटन ही त्यांच्या हस्ते करण्यात आले .
गणितीय मॉडेल इयत्ता नववीचे विद्यार्थी शुभम तोरगले , सृष्टी कोलते, ओमकार उंडगे यांनी तयार केली होती. कार्यक्रमाची सुरुवात गणित गीताने झाली . गणित विषयक रांगोळी स्पर्धांचे आयोजन केले होते. इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने भाग घेऊन रांगोळी द्वारे गणितीय संकल्पना स्पष्ट केल्या. वर्तुळ त्रिकोण ,काटकोन चौकोन,आयत इत्यादी मानवी प्रतिकृती तयार करून मुलांनी माहिती दिली. गणितीय उखाणे, गणित दिनाचे महत्त्व या विषयावर भाषणेही झाली. विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाची भीती निघून जावी. गणित विषयाची आवड निर्माण करण्यात यावी या हेतूने गणित विषयाच्या शिक्षिका सौ. ए. डी. पाटील यांनी नियोजन केले. मुख्याध्यापक एस. एन. पाटील यांनी स्वागत केले व प्रास्ताविक आर. पी. होरटे यांनी केले. सूत्रसंचालन सृष्टी कोलते हिने केले. आभार सौ. बी. पी. कांबळे यांनी मानले.
यावेळी श्रीमती एस. एस. नाईक, एम. एम. येलगार, वडर , सर्व विद्यार्थी उपस्थित होते.





