रविवार दि.७ डिसेंबर २०२५


अभ्यासिकेतच तरुणाचा मृत्यू

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
अत्यंत कष्टातून पदवीचे शिक्षण घेतलेल्या व स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या बाजीराव मारुती कांबळे वय ३२ वर्षे राहणार पोळगाव तालुका आजरा या तरुणाचा अभ्यासिकेतच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
नेहमीप्रमाणे बाजीराव हा आजरा येथील एका अभ्यासिकेत अभ्यासाला गेला होता. अचानकपणे त्याला अस्वस्थपणा जाणवून हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने तो अभ्यासिकेतच कोसळला. दरम्यान तेथेच त्याचा मृत्यू झाला.
सामान्य कुटुंबातील बाजीराव याच्या पश्चात आई-वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. त्याच्या मृत्यूबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

पेद्रेवाडी येथील एकाची गळफास घेऊन आत्महत्या

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पेद्रेवाडी ता.आजरा येथील अरुण महादेव कबीर या ५५ वर्षीय शेतकरी कुटुंबातील व्यक्तीने रहात्या घरी गळफास घेऊन शनिवार दिनांक ६ डिसेंबर रोजी दुपारच्या दरम्यान आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबतची वर्दी रमेश महादेव कबीर यांनी आजरा पोलिसात दिली आहे. आजारपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये होती.
सुरेश कबीर व रमेश कबीर यांचे ते बंधू होत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. पुढील तपास आजरा पोलीस करीत आहेत.

चिमणेत पाच ठिकाणी घरफोडी : दोन लाखांचा मुद्देमाल लंपास

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
चिमणे ता. आजरा येथील आरळगुंडी रस्त्यावरील फिर्यादी जालिंदर बंडू मोरे, आनंदा बंडू मोरे, समीर बाळू मोरे, बळवंत दत्तू चव्हाण, चंद्रकांत लक्ष्मण शिंदे यांच्या बंद घरांचे कुलुप उचकटून अज्ञात चोरट्यानी सोन्याचे व चांदीचे दागिने, रोख रक्कम ॲल्युमिनियमची भांडी असा एकूण एक लाख पच्च्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. सदर चोरी ही रेकी करून केल्याचे समजते.
घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. तर ठसे तज्ञाकडून ठसे घेण्यात आले.
चोरीची फिर्याद उत्तूर दुरक्षेत्र येथे देण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धोंडे करीत आहेत.

आर्दाळजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत गव्याचा मृत्यू

उत्तूर मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उत्तूर – आजरा मार्गावर आर्दाळ गावाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत गवा रेड्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी समोर आली. रात्रीच्या सुमारास अज्ञात वाहनाची धडक किंवा एकमेकांत झालेल्या भांडणातून गवा जखमी होऊन रक्तस्त्रावाने मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पशुवैद्यकीय विभागाने व्यक्त केला आहे.
शनिवारी सकाळी आजऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना गवा रेडा शेतात पडलेला दिसला. त्यावेळी तो जिवंत होता; मात्र दुपारपर्यंत त्याची प्रकृती गंभीर बनली. अल्पावधीतच त्याचा मृत्यू झाला.

राजे फाउंडेशनच्या मोफत आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
५१८ जणांची तपासणी.

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मडिलगे (ता.आजरा) येथे राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन व राजे विक्रमसिंह घाटगे बँकेच्यावतीने आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबिरामध्ये ५१८ जणांची तपासणी करण्यात आली.
या आरोग्य शिबिरामध्ये हृदयविकार, मूत्रविकार,डोळे तपासणी ,जनरल तपासणी तसेच मोफत रक्त तपासणी करण्यात आली. रक्तदाब तपासणी, शुगर तपासणी, इसीजी तसेच निशुल्क औषध वाटप केले.याचा लाभ मडिलगे तसेच परिसरातील नागरिकांनी घेतला.अध्यक्षस्थानी के.व्ही.येसणे होते.
शाहू कारखान्याचे संस्थापक राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या ७७ व्या जयंतीनिमित्त शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे, राजे बँकेचे अध्यक्षा नवोदितादेवी घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली राजे फाउंडेशन,राजे बँक व लोकमान्य समुहाच्यावतीने या शिबिराचे आयोजन केले होते.
या आरोग्य शिबिरामध्ये सिद्धिविनायक नर्सिंग होम कोल्हापूर , प्राथमिक आरोग्य केंद्र भादवण,मोरया हाॕस्पिटल कोल्हापूर,केदारी रेडेकर हाॕस्पिटल गडहिंग्लज व संकल्पसिद्धी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल कागल येथील तज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभास शाहू साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे ,राजे बँकेचे उपाध्यक्ष उमेश सावंत,संचालक रविंद्र घोरपडे,रणजीत पाटील,सुशांत कालेकर,कार्यकारी संचालक अरुण पाटील भादवणच्या सरपंच माधुरी गाडे, मडिलगेचे सरपंच बापू नेऊंगरे, माजी सभापती भिकाजी गुरव आजी माझी सैनिक संघटनेचे अध्यक्ष कृष्णा पाटील मुख्याध्यापक सावंत मुख्याध्यापिका माधुरी मोरे संदीप गुरव सूर्यकांत पाटील, प्रविण लोकरे, डी. बी. सावंत, मंदार हळवणकर, चंद्रकांत देसाई, सुदाम सावर्डेकर, जालंदर येसणे शाळा समिती अध्यक्ष, मारुती येसणे, हिंदूराव कांबळे उपस्थित होते.
लोकमान्य समुहाचे संस्थापक जनार्दन नेऊंगरे यांनी स्वागत केले. विजय परुळेकर यांनी आभार मानले.

सावधान…
बिबट्याने दिले दर्शन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा – महागांव मार्गांवर शनिवारी सायंकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास बिबट्याने वाहन चालकांना दर्शन दिले.
कानोली येथील साखर कारखाना कर्मचारी रणजित भोसले हे ड्युटीला जात असताना चाफ्याच्या विहिरी नजीक वन विभागाच्या निलगिरीजवळ बिबट्या दिसला. सदर बिबट्या मोटारसायकलच्या प्रकाश झोताने सरळ दिशेने आजऱ्याकडे जाताना उजवीकडील शेतात जाणाऱ्या रस्त्याच्या दिशेने जंगलात पळाला.
या मार्गावरील वाहन चालकांनी रात्रीच्या वेळी प्रवास करताना दक्षता घेण्याची गरज आहे.

निधन वार्ता
पांडुरंग देवरकर

पेद्रेवाडी ता.आजरा येथील पांडुरंग गोविंद देवरकर (वय ७५ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले, एक मुलगी, सूना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख सुनील डोंगरे यांचे ते मामा होत.
रक्षा विसर्जन उद्या सोमवारी आहे.



