शनिवार दि.६ डिसेंबर २०२५

‘मेसेज’ वॉर…
सायबर गुन्हे विभागाचे लक्ष
आजऱ्यात तरुणाईला घेतले फैलावर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम च्या माध्यमातून एकमेकांना आव्हानात्मक व धमकीवजा संदेश देऊन वातावरण बिघडवणाऱ्या मंडळींवर पोलीस दलाच्या सायबर विभागाचे चांगलेच लक्ष असून काल तालुक्यातील एका गावात असेच एक प्रकरण घडल्यानंतर पोलिसांनी संबंधित तरुणांना चांगलेच फैलावर घेतले. विशेष म्हणजे याबाबतची माहिती जिल्हा पोलीस दलाच्या सायबर विभागाकडून स्थानिक पोलिसांना देण्यात आली याचाच अर्थ आता तरुणाईकडून व्हायरल केले जाणाऱ्या संदेशांवर सायबर गुन्हे विभागाचे चांगलेच लक्ष आहे हे अधोरेखित झाले आहे.
तुला बघून घेतो, करेक्ट कार्यक्रम करतो, सावज टप्प्यात येऊ देत अशा आशयाचे संदेश तरुणाईकडून व्हायरल केले जातात. या मंडळींना फॉलो करणारी इतर मंडळी मंडळीही याला जबाबदार असतात. यातूनच पुढे गुन्हेगारीला वाव मिळतो असे गृहीत धरून काल सायबर विभागाने असेच एक प्रकरण स्थानिक पोलिसांकडे चौकशी करता पाठवले. यामुळे संदेश प्रसारित करणाऱ्या तरुणांसह इंस्टाग्राम वर त्याला फॉलो करणाऱ्या इतर तरुणांनाही पोलिसांनी चांगलेच झापले.
अखेर संबंधित तरुणांच्या माफीनाम्यानंतर सदर प्रकरणावर पडदा पडला आहे. यामुळे विशेषतः तरुणाईने असे चिथावणी देणारे मेसेज व्हायरल करताना खबरदारी घेण्याची गरज आहे अन्यथा पोलीसी कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

किटवडे येथे पिण्याच्या पाण्याच्या टाकीवर आढळला कुजलेला साप

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
किटवडे ता.आजरा येथील ग्रामपंचायतीच्या पाण्याच्या टाकीवर कुजलेल्या अवस्थेतील साप आढळल्याने खळबळ उडाली आहे.
गावाला पाणीपुरवठा करणारी गावाशेजारी दोन हजार लीटरची पाण्याची टाकी आहे. या टाकीतूनच गावाला पिण्यासाठी पाण्याचा वापर केला जातो. दोन दिवसांपूर्वी ग्रामस्थांना कुजलेल्या अवस्थेत साप आढळला. किमान आठ दिवसांपूर्वी आढळलेला साप मृत झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
सुदैवाने टाकीतील पाण्याचा या कुजलेल्या सापाशी संपर्क आला नाही.

आजरा वनपरिक्षेत्र कार्यालयावर २३ डिसेंबर रोजी ठिय्या…
वन्यप्राण्यांपासून नुकसानभरपाईसह मानवी आणि वन्यप्राणी संघर्ष टाळण्यासाठी आंदोलन
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वन्यप्राण्यांपासून नुकसानभरपाई मिळण्यासाठी व मानवी आणि वन्यप्राणी संघर्ष टाळण्यासाठी मंगळावर दि २३ डिसेंबर रोजी ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय येथील सर्वपक्षीय व विविध संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला. काँ. संपत देसाई अध्यक्षस्थानी होते.
यावेळी काँ. देसाई म्हणाले, येथील संभाजी चौकात आजरा तालुक्यातील विविध पक्ष संघटनांच्या वतीने ६ नोव्हेंबर २०२५ रोजी ठिय्या आंदोलन केले होते. यावेळी आजरा परिक्षेत्र वनाधिकारी यांनी पंधरा दिवसाच्या आत उपवनसरंक्षक यांचे उपस्थितीत बैठक लावण्याचे लेखी पत्र दिले होते. त्याला आता महिना उलटून गेला तरी अजूनही बैठक झालेली नाही.त्यामुळे आंदोलन केल्याशिवाय वनविभागाला जाग येणार नाही.
यावेळी ठाकरे सेना तालुकाप्रमुख युवराज पोवार, रविंद्र भाटले, प्रकाश मोरूसकर आदींनी चर्चेत भाग घेतला. यावेळी काँ. शांताराम पाटील, बाबू येडगे,दशरथ घुरे,संजय घाटगे, दिनेश कांबळे, मारूती पाटील,काँ.दत्ता कांबळे, परशुराम शेटगे आदी उपस्थित होते.

गवसे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची तातडीने भरती करावी
शिवसेना उबाठाची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
प्राथमिक आरोग्य केंद्र गवसे येथे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रविंद्र गुरव यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना पदाधिकारी व विभागातील नागरिक यांची संयुक्त बैठक झाली. यामध्ये शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील यांनी गेल्या एक वर्षापूर्वी कोटी रुपये खर्चून ही प्राथमिक केंद्राची इमारत बांधून त्याचे दिमाखात उद्घाटनही केले. काही दिवस दुसरीकडील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी आणून हे केंद्र चालू होते. पण गेले एक वर्ष झाले यामध्ये ही कायमस्वरूपी भरती केलेली नसल्याने या विभागातील रुग्णांचे हाल होत आहेत असे स्पष्ट केले.
तालुकाप्रमुख युवराज पोवार यांनी या प्राथमिक केंद्रात किती कर्मचारी आहेत त्याचबरोबर या केंद्राला किती उपकेंद्र जोडलेले आहेत याची माहिती मागितली तसेच रुग्णवाहिका का नाही ? त्याचबरोबर आजच जे वैद्यकीय अधिकारी हजर झालेत ते प्रसूती करू शकतात का? तसेच हा ग्रामीण भाग असल्याने एखाद्या शेतकऱ्याला साप चावला तर त्याला उपचार करता येणार का ? यासह विविध प्रश्न उपस्थित केले.
यावर तालुका आरोग्य अधिकारी रवींद्र गुरव यांनी साधनसामुग्री नसल्याने आम्हाला यांच्यावर उपचार करता येत नाही असे उत्तर दिले तसेच या ठिकाणी तेरा पद भरणे गरजेचे आहे पण अजूनही एकही पद भरलेले नाही कारण हे प्राथमिक आरोग्य केंद्र शासन दरबारी नोंद नसल्याने पद निर्मिती होत नाही अशी माहिती दिली . गवसे येथील नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्राचा नाम फलक देखील मुख्य रस्त्यावर लावलेला नाही तो ताबडतोब लावावा अशी मागणी केली.
या विभागातील नागरिकांनी सुद्धा अनेक प्रश्नांचा भडीमार केला. पुढील काळात प्रशासन व आरोग्य मंत्री यांनी तात्काळ यामध्ये लक्ष घालून हे प्राथमिक आरोग्य केंद्र लोकांसाठी सेवा देईल याची खबरदारी घ्यावी अशा सूचना यावेळी उपस्थितांनी केल्या.
या बैठकीला शेतकरी सेना तालुकाध्यक्ष दिनेश कांबळे, माजी सरपंच तातोबा पाटील प्रकाश मोरुसकर, उपतालुकाप्रमुख शिवाजी आढाव, उपसरपंच अविनाश हेब्बाळकर, दत्ता कांबळे, भिकाजी पाटील, महादेव गुरव, सागर नाईक, चंद्रकांत व्हरकटे, गणपती पेडणेकर, जयवंत पाटकर, परशुराम शेंडगे, रवींद्र घेवडे, जोतिबा नवार, मयूर पाटील, संजय पाटील, राऊ जाधव आदी उपस्थित होते.

हलकर्णी – चंदगड महामार्गावरील पेद्रेवाडी नजिकचे वळण काढा
आंदोलनाचा इशारा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांचेमार्फत हलकर्णी- महागाव-मलिग्रे- शृंगारवाडी- चंदगड- इब्राहिमपूर या मार्गाचे रुंदीकरणासह मजबुतीकरणाचे काम जोरात सुरु आहे. हा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ते विकास महामंडळाकडे वर्ग केला आहे, मात्र महामंडळाकडून या रस्त्यावरील वळणे काढली जात नाहीत फक्त आहे त्याच मार्गाने रुंदीकरण चालू आहे, मात्र पेद्रेवाडी फाट्यापासून कांही अंतरावर रेडेकर पोल्ट्री फार्म जवळ एस आकाराचे धोकादायक वळण आहे, ते वळण काढले जात नसल्याबद्दल नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत या भागातील मलिग्रे, कानोली, हात्तीवडे, होनेवाडी, या गावच्या ग्रामपंचायतीनी पत्र लिहून वळण काढण्याची मागणी केली आहे. सदर वळण काढले नाही तर येथे अपघात होण्याची शक्यता नाकरता येत नाही. तसेच सिमेंट काँक्रिट रस्त्यावर पाणी मारले जात नसल्याबद्दल याबाबत निवेदन सार्वजनिक बांधकाम खात्याकडून वरिष्ठ कार्यालयाला कळविणे संदर्भात मागणी केली आहे, सहायक अभियंता पी. बी. सुर्वे यांचे मार्फत हे निवेदन आजरा कार्यालयात देण्यात आले, व वरिष्ठ कार्यालयाला कळविण्यात यावे अशी मागणी केली तोपर्यंत काम थांबविण्यासाठी सांगितले आहे. याबाबत महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी यांना कळविण्यात आले आहे. यावेळी अशोक शिंदे, सुभाष पाटील,संजय कांबळे, प्रकाश सावंत, संजय घाटगे, धनराज बुगडे, शिवाजी निऊंगरे उपस्थित होते.हे धोकादायक वळण काढले नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

स्वच्छतेकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष..?
मनसेने केली तात्काळ कारवाईची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मुम्मेवाडी,महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा मुम्मेवाडी यांच्या वतीने ग्रामपंचायत मुम्मेवाडीला स्वच्छता व सांडपाणी निचरा व्यवस्थेतील होत असलेल्या निष्काळजीपणाबाबत लिखित निवेदन देण्यात आले.
मनसेचे शाखा अध्यक्ष चंद्रकांत इंगळे, उपाध्यक्ष निवृत्ती कडाकणे, सचिव सचिन माध्याळकर व कार्यकर्ते सुनील पाटील यांच्या स्वाक्षरीसह देण्यात आलेल्या निवेदनात, जिल्हा परिषद कोल्हापूर व महाराष्ट्र शासनाकडून ग्रामपंचायतीला मिळालेल्या लाखो रुपयांच्या निधीचा योग्य उपयोग न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.गावातील सार्वजनिक ठिकाणी गटारीचे व ड्रेनेजचे पाणी साचून दलदल निर्माण होत असून, त्यामुळे साथीच्या रोगांचा धोका वाढल्याचे मनसेने नमूद केले आहे. नागरिकांच्या आरोग्याकडे होत असलेले दुर्लक्ष गंभीर असून, तत्काळ गटारी स्वच्छ करून औषध फवारणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मनसेने ग्रामपंचायतीला येणाऱ्या आठ दिवसांत काम सुरू न केल्यास ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्व जबाबदारी ग्रामपंचायतीची राहील, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

निधन वार्ता
सोनाबाई जाधव

हंदेवाडी ता.आजरा येथील रहिवासी सोनाबाई नारायण जाधव ( वय ८२ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा, सुन, जावई ,नातवंडे असा परिवार आहे.
सलग ४७ वर्षे पायी पंढरपूर वारी करणाऱ्या त्या भागातील प्रथम महिला होत्या.एलआयसी विभागीय अधिकारी पांडुरंग जाधव यांच्या त्या आई होत.
रक्षा विसर्जन शनिवार दि ६ रोजी सकाळी आहे.
महादेव चौगुले

कोवाडे ता.आजरा येथील महादेव धोंडिबा चोगुले यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात एक मुलगा व पाच मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे.



