mrityunjaymahanews
अन्यआजरा तालुका विशेषकोल्हापूरक्रीडागुन्हाजीवनमंत्रटेक्नोलॉजीठळक बातम्यादेशबिझनेसभारतमनोरंजनमहाराष्ट्रराजकीयरोजगारविदेशसामाजिकस्थानिक

सातच्या बातम्या

मंगळवार दि. ९  डिसेंबर २०२५

उत्तूरमध्ये लांडग्यांची दहशत कायम : चार शेळ्या मृत्यूमुखी

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

उत्तूर येथे लांडग्यांच्या हल्ल्यांची मालिका सुरूच असून, शनिवारी संध्याकाळी एका शेळीचा बळी गेल्यानंतर रविवारी पहाटे पुन्हा झालेल्या हल्ल्यात चार शेळ्या मृत्यूमुखी पडल्या. या सलग घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

इंदिरानगर येथे राहणारे तानाजी जानबा कुंभार यांच्या धामणे रस्त्यालगतच्या गल्लीत घर आहे. त्यांनी परड्यात शेळ्या बांधल्या होत्या. रात्रीच्या सुमारास लांडग्यांनी परड्यात घुसून शेळ्यांवर हल्ला चढवला. यात चार शेळ्या ठार झाल्या. आवाज आणि गोंधळ ऐकून घरातील मंडळी जागी झाली. लोकांच्या ओरडण्यामुळे लांडगे कळपाने पळून गेले.

घटनेची माहिती मिळताच वनक्षेत्रपाल सागर पोवार, वनरक्षक आर. बी. पाटील आणि वनसेवक आनंदा कुंभार यांनी घटनास्थळी भेट दिली. पशुवैद्यकीय अधिकारी निखिल यादव यांनी राजू खोराटे व अशोक पाटील यांच्या उपस्थितीत पंचनामा केला असून अहवाल वनविभागाकडे सादर करण्यात आला आहे.

वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या नुकसान भरपाईच्या पार्श्वभूमीवर नवीन प्रणाली तयार करणार : उपवन संरक्षक धैर्यशील पाटील

आजरा येथे बैठक


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा तालुक्यामध्ये हत्ती, गव्यांसह रान डुकरे, बिबट्या व वानरांचा मोठा त्रास सुरू आहे. वन्य प्राण्यांच्या त्रासामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून या पार्श्वभूमीवर नुकसान भरपाई तातडीने देण्याच्या उद्देशाने नवीन प्रणाली अमलात आणणार असल्याची माहिती उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी दिली. पंचनामे प्रक्रिया सुलभ करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येतील त्याचबरोबर जंगलानजीक असणाऱ्या जमिनीमध्ये सौर कुंपण घालण्याकरीता शंभर टक्के अनुदान मिळावे असा धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करू असे आश्वासनही त्यांनी दिले. आजरा येथे कॉ. संपत देसाई यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

यावेळी कॉ. संपत देसाई यांनी शास्त्रीय पायावर जंगल समृद्धी करणे आवश्यक आहे यासाठी वनविभागाने आवश्यक ते प्रयत्न करावेत व वन्य प्राणी शेत जमिनी व मानवी वसाहतीमध्ये येणार नाहीत याकरिता पथदर्शी प्रकल्प राबवण्याची सूचना केली. प्रकाश मोरुस्कर, कॉ. संजय तर्डेकर, काशिनाथ मोरे, युवराज पोवार आदींनी विविध मुद्दे सुचवले. यामध्ये प्राधान्याने नुकसान भरपाई प्रक्रिया, अकेशिया वृक्षांमुळे वन्य प्राण्यांच्या चाऱ्यांचा उपलब्ध होणारा प्रश्न, वन समित्या व वन विभागाचे कर्मचारी यामध्ये असणारे अंतर, जंगलांना लावल्या जाणाऱ्या आगी यावर लक्ष केंद्रित केले.

यावेळी झालेल्या चर्चेत संजयभाऊ सावंत, सहाय्यक उपवनसंरक्षक विलास काळे, परिक्षेत्र वनाधिकारी सचिन सावंत, डॉ .धनाजी राणे यांनी भाग घेतला.

बैठकीस भीमराव माधव, दत्ता कांबळे, मारुती पाटील, संजय घाटगे, जोतिबा चाळके, शकील मुजावर आदी उपस्थित होते.

आजरा – पोळगाव रस्त्यावरील अयोग्य ठिकाणी व्हॉल्व्ह बसविण्याचा प्रकार; अन्याय निवारण समितीची तातडीच्या कारवाईची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

अमृत जल जीवन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत आजरा शहरात सुरू असलेल्या पाईपलाईन बसविणे व चाचणीसंदर्भातील कामांमध्ये गंभीर अनियमितता आढळत असल्याची माहिती आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीने दिली आहे.

आजरा–पोळगाव मुख्य रस्त्यावर एकता कॉलनीसमोरील चढाव व तीव्र वळण असलेल्या ठिकाणी व्हॉल्व्ह बसविण्यासाठी करण्यात आलेले खोदकाम हे पूर्णपणे अयोग्य असल्याचे समितीने निवेदनाद्वारे नमूद केले आहे.

समितीने स्पष्ट केले की पेट्रोल पंपानंतरच्या चढावातूनच एकता कॉलनीकडे तीव्र वळण जात असल्याने त्या संवेदनशील ठिकाणी व्हॉल्व्ह बसविणे हे वाहतुकीस गंभीर अडथळा निर्माण करणारे आहे. अशा ठिकाणी केलेले खोदकाम अपघातास आमंत्रण देणारे असल्याने आठ दिवसांच्या आत सुरक्षित पर्यायी जागेची निवड करून तेथे व्हॉल्व्ह बसविण्याची आवश्यकता असल्याचे निर्देश समितीने दिले आहेत. निर्धारित मुदतीत हे काम पूर्ण न झाल्यास वाहतुकीचा धोका टाळण्यासाठी संबंधित खड्डा समितीकडून बुजवण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

दरम्यान, राईस मिल परिसरात दीर्घकाळ सुरू असलेल्या पाण्याच्या गळतीबाबतही समितीने नाराजी व्यक्त केली आहे. अनेकवेळा दुरुस्ती करूनही समस्या कायम असल्याने संबंधित विभागाने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात , अशी मागणी समितीकडून करण्यात आली आहे.

नवीन पाईपलाइन टाकल्यावर व गळती दुरुस्तीच्या कामानंतर शहरातील विविध ठिकाणी उघडे राहिलेल्या खड्ड्यांमुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होत असून अपघातांचा धोका वाढत आहे. ही कामे तात्काळ पूर्ण करून रस्ते मूळ स्थितीत आणण्याची आवश्यकता समितीने अधोरेखित केली आहे.

रवळनाथ कॉलनी व शिव कॉलनी परिसरात सुरू असलेल्या पाणीपुरवठा चाचणीसंदर्भात समितीने सांगितले की, पुरेशा दाबाने आणि अपेक्षित प्रमाणात पाणीपुरवठा होत असल्याची खातरजमा झाल्यानंतरच रस्त्यांची दुरुस्ती किंवा डांबरीकरणाची कामे हाती घ्यावीत. अन्यथा पुन्हा खोदकाम करावे लागण्याची शक्यता असल्याचे समितीचे म्हणणे आहे.

नवीन पाईपलाइन बसविताना रस्त्याच्या मधोमध असणारी चेंबर न बांधल्यामुळे वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच, दर्गा गल्लीतील पाईपलाइनचे काम पूर्ण झाले असल्याने तेथील गटारीची कामे पूर्ण होईपर्यंत रस्ता डांबरीकरण न करण्याची सूचना समितीने केली आहे.

लिंगायत गल्ली बोगद्याजवळ नवीन पाण्याची लाईन ही गटारी मध्ये जॉईंट आल्यामुळे सर्व सांडपाणी पिण्याच्या पाण्याच्या पाईप मध्ये जाण्याची शक्यता आहे व साथीचे रोग पसरण्याची ही शक्यता आहे तसेच रस्त्याच्या मधोमध मोठा पडल्यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता आहे कृपया याच्याकडेही गांभीर्याने पाहावे. वरील सर्व बाबींवर तात्काळ व गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना द्याव्यात, अशी मागणी अन्याय निवारण समितीने नगरपंचायतीकडे केली आहे.

पेरणोली येथील प्राथमिक शाळेचा शताब्दी महोत्सव साजरा करण्याचा ग्रामस्थांचा निर्णय
गावकरी एकवटले

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

१९२५ साली सुरू झालेल्या पेरणोली केंद्रशाळेला यावर्षी शंभर पूर्ण होत असून यानिमित्ताने पेरणोली केंद्रशाळेचा शताब्दी महोत्सव लोकोत्सवच्या स्वरूपात साजरा करण्याचा निर्णय ग्रामस्थ व माजी विद्यार्थ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. दि. २४, २५ व २६ जानेवारी तीन दिवस महोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

पेरणोली केंद्रशाळेने गेल्या शंभर वर्षात पेरणोलीसह साळगाव, हरपवडे, कोरिवडे, देवकांडगाव या गावातील अनेक विद्यार्थी घडवले. अनेक क्षेत्रात त्यांनी स्वतःचा असा ठसा उमटवला आहे. इंजिनियर, डॉक्टर, वकील, शिक्षक, पत्रकारांसह सामाजिक, राजकीय क्षेत्रातील अनेकांनी शाळेचे नाव उंचावले आहे.

याबरोबरच अनेक सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. येणाऱ्या पाच वर्षांचा रोडमॅप बनवून त्याआधारे शाळेच्या भौतिक आणि शैक्षणिक सुधारणेसाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी एक व्यापक समिती बनवली असून वेगवेगळ्या उपसमित्याही बनवल्या आहेत. समन्वयक म्हणून उदय कोडक यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

बैठकिला उदय पवार, कॉ. संपत देसाई, तानाजी देसाई, पांडुरंग लोंढे, राजेंद्र सावंत, उदय कोडक, मारुती वरेकर, इनांस फर्नांडिस, वंदन जाधव, कृष्णा सावंत, काका देसाई, आदेश गुरव, अविनाश वर्धन, अविनाश जोशीलकर, संतोष येरुडकर, सुरेश कालेकर संजय मोहिते, पांडुरंग दोरुगडे, सचिन देसाई, संकेत सावंत, दीपक देसाई, विठ्ठल मस्कर, सुभाष देसाई, अमित सावंत, रणजित फगरे, रणजित कालेकर, व्ही.डी. जाधव, अरुण जाधव यांच्यासह ग्रामस्थ व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निंगुडगे येथे रस्ता कामाचा शुभारंभ


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

निंगुडगे ता. आजरा येथील गावातून पाटणे वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ गोकुळच्या संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर यांच्या हस्ते झाला.

या वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्याची फार दुरावस्ता झाली होती. गोकुळ संचालिका अंजनाताई रेडेकर यांच्या प्रयत्नाने खासदार श्रीमंत शाहू महाराज यांच्या फंडातून १० लाख रुपये या कामासाठी मंजूर झाले आहे. या रस्त्यामुळे या वसाहतीतील लोकांच्या रहदारीचा प्रश्न निकाली निघणार आहे. या कार्यक्रमाला बसवंत पाटणे, सरपंच के. बी. कुंभार, गणपती पाटणे, रवींद्र देसाई सर, प्रमोद देसाई, आप्पासाहेब देसाई, ग्रामपंचायत सदस्य वंदना देसाई, सेवा संस्था चेअरमन रविंद्र निंबाळकर, नेताजी पाटणे, सुनिल देसाई यांच्यासह गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

वाटंगी शाळेचे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत यश

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये विद्यामंदिर वाटंगी शाळेच्या विद्यार्थ्यांनी कौतुकास्पद यश संपादन केले .

कु. श्रावणी जानबा कांबळे हिने ४०० मीटर धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांक तर कु. रुद्र अंकुश सुतार याने उंच उडीत प्रथम क्रमांक पटकावला. कु. जयदीप जयवंत सावंत यांने उंच उडीत तृतीय क्रमांक कु. इंद्रनील अश्विन कांबळे कुस्ती २५ कि. वजनी गटात द्वितीय क्रमांक मिळवला. मोठ्या गटात कबड्डी (मुले) द्वितीय क्रमांक व ४×१०० रिले (मुले) द्वितीय क्रमांक मिळवला.

या विद्यार्थ्यांना श्री. सुनील कामत (मुख्याध्यापक) सौ . अनिता कुंभार, श्रीमती रंजना हसुरे व श्रीमती अनुजा केने यांचे मार्गदर्शन तर श्री. ऑस्टीन डिसोझा यांचे विशेष सहकार्य लाभले .तसेच शाळा व्यवस्थापन समितीची प्रेरणा मिळाली .

वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याची रू.३४००/- प्रमाणे ऊस बिले जमा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चालु हंगामात आजअखेर ११०००० मे.टन ऊसाचे गाळप झाले आहे. कारखान्याकडे दि.४/११/२५ ते १५/११/२५ अखेर गाळप झालेल्या ३६५९४ मे. टनाचे ऊसाची बिले प्रतिटन रु.३४००/- प्रमाणे विनाकपात होणारी रक्कम रू.१२ कोटी ४४ लाख २१ हजार ऊस पुरवठादार शेतक-यांच्या सेव्हींग खातेवरती जमा करण्यात आली असलेबाबतची माहिती कारखान्याचे चेअरमन, श्री. मुकुंदराव देसाई यांनी दिली.

कारखान्याकडे उपलब्ध असलेल्या बीड व स्थानिक तोडणी वाहतुक यंत्रणेस प्राधान्याने कारखान्याकडे करार झालेल्या ऊसाची उचल करणेचे काम सुरू आहे. कोल्हापूर जिल्हा मध्य. सह. बँकेचे अध्यक्ष मा. ना. हसन मुश्रीफसाहेब, वैद्यकिय शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेच्या सहकार्याने कारखान्याकडे गाळपास येणा-या संपुर्ण ऊसाची बिले व तोडणी वाहतुकीची बिले नियमितपणे आदा केली जाणार आहेत.

कार्यक्षेत्रातील संपुर्ण ऊस प्राधान्याने गाळपासाठी आणणेचे नियोजन व्यवस्थापनाने केलेले आहे. ज्या भागात यंत्रणा कमी आहे अशा ठिकाणी यंत्रणा उपलब्ध करून शेतक-यांचे ऊस कारखान्याकडे गळीतास आणुन ऊस उत्पादकांची अडचण होणार नाही याची दक्षता घेत आहोत. त्यामुळे कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतक-यांनी आपला ऊस अन्य कारखान्यांना न घालता थोडे थांबुन व्यवस्थापनास सहकार्य करावे व आपला संपुर्ण ऊस आपल्याच कारखान्यास गाळपास पाठवावा असे आवाहन कारखान्याचे चेअरमन श्री. मुकुंदराव देसाई यांनी केले.

यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन श्री. सुभाष देसाई यांच्या सर्व संचालक आणि कार्यकारी संचालक श्री.एस. के. सावंत उपस्थित होते.

निधन वार्ता

आनंदा आपगे


कानोली ता.आजरा येथील आनंदा मुरारी आपगे (वय ६८ वर्षे) यांचे ह्रदयविकाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा,विवाहित दोन मुली असा परिवार आहे. कानोली ग्रामविकास मंडळ मुंबई चे सचिव चंद्रकांत आपगे यांचे ते बंधु होत.

विनायक पाटील


किटवडे ता. आजरा येथील विनायक पाडुरंग पाटील ( वय ३८ वर्षे ) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, दोन भाऊ, भावजय असा परिवार आहे.गेले काही दिवस ते आजारी होते.

मधुकर पंडित

हात्तीवडे ता. आजरा येथील मधुकर जानू पंडित ( वय ६१ वर्षे ) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगी, जावई, मुलगा, नातवंडे असा परिवार आहे. येथील सरस्वती हायस्कूलचे ते सेवानिवृत्त लिपिक होते.

 

संबंधित पोस्ट

सिरसंगी येथे नवविवाहितेची आत्महत्या…नामदार मुश्रीफ यांच्यावरील चराटी यांचे आरोप म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’….. ना. मुश्रीफ समर्थक कारखाना संचालकांचा पत्रकार बैठकीत आरोप

mrityunjay mahanews

पोळगाव येथील तरुणाची आत्महत्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

Big Breaking….

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!