चराटी यांचे आरोप बालिशपणाचे…
तालुका संघाच्या सत्ताधारी संचालकांचा आरोप

अनिकेत चराटी हे आजरा तालुका खरेदी विक्री संघाचे वैयक्तिक सभासद नाहीत असे असतानाही त्यांनी अपुऱ्या माहितीच्या आधारे सभासद मतदारांची कच्ची यादी प्रसिद्ध होण्यापूर्वीच सभासदांना मतदानापासून वंचित ठेवले जात असल्याचा केलेला आरोप म्हणजे निव्वळ बालिशपणा आहे. आजरा तालुका खरेदी विक्री संघ म्हणजे टायटॅनिक जहाज नव्हे तर विश्वस्त म्हणून सभासदांनी सत्ताधाऱ्यांकडे लोकशाही पद्धतीने कारभार दिलेला आहे. त्यामुळे हे आरोप बिन बुडाचे व अपुऱ्या माहितीवर आधारित असल्याचे संघाचे अध्यक्ष एम.के. देसाई व जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.
चराटी यांनी केलेल्या चार दिवसांपूर्वीच्या आरोपासंदर्भात बोलताना देसाई पुढे म्हणाले, तालुका संघ कोणत्याही संस्थांचे ठराव करत नाही. तर सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या सूचनेनुसार संस्था ते ठराव करून तालुका संघाकडे पाठवतात. यामुळे तालुका संघाने ठराव करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याने आम्हाला नाहक या ठराव प्रक्रियेत गोवू नये. सन २०१४-१५ च्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये संघाचे भाग भांडवल वाढवण्यासाठी सभासद वर्गणी वाढवण्यासंदर्भातील ठराव मंजूर करण्यात आला आहे व या ठरावाला सहाय्यक निबंधक कार्यालयाकडूनही रीतसर मंजुरी देण्यात आली आहे. यानंतरच्या प्रत्येक सभेमध्ये सभासदांना आवाहन करून उर्वरित वाढीव सभासद वर्गणी भरावी असे सांगण्यात आले होते.
या आवाहनाला बहुतांशी सभासदांनी प्रतिसाद देत आपली सभासद वर्गणी पूर्ण करून घेतली यामध्ये अशोक चराटी व जयवंतराव शिंपी यांचाही समावेश आहे असे असताना सभासदांना याची कल्पना दिली नाही असे म्हणणे निश्चितच योग्य नाही. विशेष म्हणजे या ठराव मंजुरीच्या वेळी जयवंतराव शिंपी वार्षिक सभेस स्वतः उपस्थित होते. त्यांनी या ठरावाला कोणत्याही प्रकारचा विरोध केला नाही. तालुक्यातील शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून सर्वांना विश्वासात घेऊन संघाचा कारभार सुरू आहे. तालुका संघ म्हणजे काही संस्थाप्रमाणे टायटॅनिक जहाज नाही. संघाच्या जडणघडणीत अनेकांचे योगदान आहे. या योगदानावर व अनेक ज्येष्ठ मंडळींच्या आशीर्वादावर संघाचा कारभार यापुढेही चालू राहील असेही त्यांनी स्पष्ट केले.
उपस्थितांचे स्वागत अध्यक्ष देसाई यांनी केले. पत्रकार बैठकीस उपाध्यक्षा सौ. माया पाटील, ज्येष्ठ संचालक नारायण सावंत, विठ्ठलराव देसाई, भीमराव वांद्रे, मुकुंदराव तानवडे, डॉ.सौ. राजलक्ष्मी देसाई ,श्रीपती यादव, महादेव हेब्बाळकर, मधुकर येलगार, निवृत्ती कांबळे, व्यवस्थापक जनार्दन बामणे उपस्थित होते.
संचालक गणपतराव सांगले यांनी आभार मानले.

आजऱ्यात शिवजयंती उत्साहात साजरी करणार
आजरा तालुका मराठा महासंघाच्या तालुका कार्यकारणी बैठकीमध्ये १९ फेब्रुवारी २०२३ रोजी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यातचे ठरले.
शिवजयंतीनिमित्त तालुक्यातील महिलांच्या लेझीम स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या संघाने पदाधिकाऱ्यांकडे दोनशे रुपये प्रवेश फीसह सहभागाची नोंद करावी. विजेत्या संघांना अनुक्रमे रुपये पाच हजार, चार हजार, तीन हजार रोख व शिल्ड देण्यात येणार असून सहभागी संघांना रुपये १०००/- चे प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येणार असल्याचेही संघटनेचे तालुकाध्यक्ष बंडोपंत चव्हाण यांनी सांगितले.
कोरीवडे येथे आज विकास कामांचा लोकार्पण सोहळा…
राधानगरी- भुदरगडचे आमदार प्रकाश आबीटकर यांच्या विशेष प्रयत्नातून कोरीवडे (ता. आजरा) येथे मंजूर झालेल्या विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा व नवीन विकास कामांचा शुभारंभ अशा संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन आज शनीवार दिनांक २८ रोजी सायंकाळी सहा वाजता करण्यात येणार असून या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख व जिल्हा बँकेचे माजी संचालक अशोकअण्णा चराटी, जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक प्रा. अर्जुन आबीटकर यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.




