खेडगे गावच्या पुनर्वसनाबाबत तातडीने निर्णय न झाल्यास १४ फेब्रुवारीला सर्फनाला धरणाचे काम बंद पडणार….
खेडगे येथील प्रकल्पग्रस्तांच्या मेळाव्यात निर्णय…

सर्फनाला प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या खेडगे गावचे पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव ताबडतोब करण्याचे निर्देश कृष्णा खोरेचे मुख्य अभियंता यानी देऊनही संबंधित यंत्रणेकडून टाळाटाळ होत असल्याने १४ फेब्रुवारी पर्यंत पुनर्वसन यंत्रणेकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास सर्फनाला धरणाचे काम बंद पाडण्याचा निर्णय आज झालेल्या मेळाव्यात घेण्यात आला. यावेळी बोलताना श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष कॉ संपत देसाई म्हणाले की आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून जी मागणी करीत आहोत त्याबद्दल जिल्हा प्रशासन गंभीर नाही. त्यांना संविधानिक भाषा कळत नसेल तर मग तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल. सर्फनाला प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी समजून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाला वेळ मिळत नाही. नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही असेच कंहिशे प्रशासनाचे झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांचा पुनर्वसन प्रक्रीयेवरचा विश्वासच उडाला आहे. आता ‘आर या पारची’ लढाई लढण्याचा निर्णय धरणग्रस्तांनी केला आहे. १३ तारखेपर्यंत जिल्हाधिकारी कोल्हापूर यांचे सोबत बैठक होऊन निर्णय न झाल्यास धरणाचे काम बंद पाडू.
मेळाव्यापूर्वी उपअभियंता एस. वाय. पाटील यांच्या सोबत खेडगे ग्रामस्थांची बैठक झाली. यामध्ये संकलन दुरुस्ती, जमीन वाटपाचे आदेश काढणे, जमीन सपाटीकरण, भूखंड वाटप इत्यादी विषयावर चर्चा झाली. त्याच्या तारखा निश्चित करून तेरा तारखे पर्यंत ते पूर्ण करण्याचे ठरविले.
यावेळी शंकर ढोकरे, हरी सावंत, गंगाराम ढोकरे, धोंडिबा सावंत, धाकू कविटकर, मारुती ढोकरे, अनिल अमुनेकर, श्रावण पोवार, वसंत राणे, यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.

चित्री प्रकल्प ग्रस्त वसाहतीतील भूखंड उचंगी प्रकल्पग्रस्तांच्या देण्यास विरोध
आजरा तालुक्यातील उचंगी धरणग्रस्तांचा पुर्नवसनासाठी लढा सुरू आहे. त्या लढ्याला आपला पाठिंबा असून उचंगी धरणग्रस्तांचे लाभक्षेत्रात जमिनी देवून विकसनशील पुर्नवसन झाले पाहिजे.
परंतू उचंगी धरणग्रस्तांना चित्री धरणग्रस्तांच्या आवंडी, चित्रानगर व रायवाडा या वसाहतीमधील भुखंड वाटप करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासन करीत असल्याचे समजते, त्यास तिव्र विरोध असल्याचे निवेदन चित्री प्रकल्पग्रस्तांनी तहसिलदारांना दिले आहे आहे. चित्री प्रकल्पग्रस्तांचे पुर्नवसन होवून आता २०-२५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे त्यांची कुटूंबसंख्या वाढलेली आहे. धरणग्रस्त वसाहतीला भविष्यात वाढीव गावठाण करण्यास कसलीही संधी नाही त्यामुळे शिल्लक भुखंड हे त्यांना वाढीव कुटूंबासाठी आवश्यक आहेत. तरी या वसाहतीतील भुखंड उचंगी धरणग्रस्तांना वाटप करू नयेत अशी मागणी केली आहे. तसा प्रयत्न केल्यास त्यांच्या विरोधात लोकशाही मार्गाने तीव्र विरोध करणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.
तसेच चित्री धरण भितींच्या खालच्या बाजूला कृष्णा खोरे महामंडळाने गरज नसताना त्यावेळी आमची जादा जमिन संपादन केली गेली आहे. जमिन संपादन झाली असली तरी ती जमिन प्रकल्पग्रस्त गेली २५ वर्षे कसून खात आलो आहोत. अशी गरज नसताना संपादन केलेली पण प्रत्यक्षात प्रकल्पग्रस्त कसून खात असलेली जमिन आता पुर्नवसन विभाग उचंगी धरणग्रस्तांना वाटप करणार असल्याचे समजते या निर्णयाला देखील आपला तीव्र विरोध आहे. कुंटूंबाच्या उदरनिर्वाहासाठी तेच एक महत्वाचे साधन राहीले आहे. ती जमिन धरणग्रस्तांना वाटप केल्याने आमच्यावर खूप मोठा अन्याय होणार आहे. तरी सदरची जमिन उचंगी धरणग्रस्तांना वाटप करण्यात येवू नये सदरची प्रक्रिया ताबडतोब थांबवावी अन्यथा ७ फेब्रुवारी २०२२ पासून स्त्री- पुरूषासंह मोठ्या संख्येने बेमूदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे याबाबतचे निवेदन आजरा तहसीलदारांना देण्यात आले असून निवेदनावर नामदेव फगरे, मारुती लाड, राजाराम लाड, नंदकुमार मिसाळ, आनंदराव देसाई, सुनील पाटील, तानाजी मिसाळ आदींच्या सह्या आहेत.

आजऱ्यात शिवजयंतीनिमित्त महिलांच्या लेझीम स्पर्धा
आजरा तालुका मराठा महासंघाच्या तालुका कार्यकारीणीची बैठक पार पडली. बैठकीत दरवर्षीप्रमाणे दि. १९ फेब्रुवारी रोजी होणारा शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे ठरले. यानिमित्त महिलांच्या लेझीम स्पर्धेचे आयोजन करण्याचे ठरले आहे.
दि. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करुन अभिवादन केल्यानंतर तालुक्यातील महिलांच्या लेझीम स्पर्धा घेण्यात येणार आहेत. स्पर्धेतील विजेत्या संघांना अनुक्रमे ५००० रु., ४००० रु., ३००० रु. व शिल्ड अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. इच्छूक संघांनी मराठा महासंघाच्या तालुका पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून प्रवेश फी भरुन नाव नोंदणी करावी असे आवाहनही यावेळी करण्यात आले. बैठकीला तालुका कार्यकारीणीमधील सर्व सदस्य उपस्थित होते.

————————–
आजरा तालुका कोरोना अपडेट्स…
दिनांक३.२.२०२२..
तीन बाधित ( मसोली, उत्तुर, पेद्रेवाडी)
१० जानेवारी पासून बाधित १४६
रूग्ण
डिस्चार्ज १०० रूग्ण
सध्या उपचाराखाली असणारे ४४ रूग्ण
मयत २
निधन वार्ता… पेदात गोम्स
आजरा येथील पेदात झेविअर गोम्स( वय ७२ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले, मुलगी, सुना, जावई, नातवंडे पत्नी असा परिवार आहे.
शांता बारदेस्कर..
उत्तूर मधील शांता पावलो बारदेस्कर (वय वर्ष ८०) यांचे आज सकाळी निधन झाले. त्याच्या पश्चात दोन मुले,तीन मुली, सूना नातवंडे असा परिवार आहे. शांती केमिकल चे मालक शांप्रास बारदेस्कर यांच्या त्या मातोश्री होत.







