mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या


पुन्हा एका युवकाचा मृत्यू…

                      आजरा:प्रतिनिधी

      आजरा तालुक्यात तरुणांच्या अपघाती व आकस्मिक मृत्यूंची मालिका सुरूच असून हात्तीवडे येथील अजय संजय कांबळे या २२ वर्षीय तरुणाचा काल सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. महिनाभरातील बावीस वर्षीय वयाच्या सहाव्या तरुणाचा हा मृत्यू आहे

      अचानकपणे प्रकृती बिघडल्याने त्याला पंधरा दिवसापूर्वी उपजिल्हा रुग्णालय, त्यानंतर सीपीआर रुग्णालय कोल्हापूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले होते. अत्यंत खिलाडू व मनमोकळ्या स्वभावाच्या अजय याचा काल सकाळी मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई व भाऊ असा परिवार आहे.


आजरा तालुक्यात शिवजयंती उत्साहात


                   आजरा:प्रतिनिधी

       आजरा शहरासह तालुक्यात पारंपारिक पद्धतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली, लेझीम, वारकरी दिंडी, हलगी यासारखे विविध पद्धतीने जयंती साजरी करण्यात आली.

       आजरा येथील शिवतीर्थवर सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन तहसीलदार समीर माने यांच्या हस्ते करण्यात आले. शिवजयंतीचे औचित्य साधून मराठा महासंघाच्या आजरा शाखेच्यावतीने महिलांच्या लेझीम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत तालुक्यातील विविध गावातील महिलांच्या लेझीम पथकांनी सहभाग नोंदविला.

       छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत कोवाडे येथील सातेरी कन्या महिला लेझीम संघाने प्रथम क्रमांक पटकाविला, लाकूडवाडी संघाने द्वितीय तर देवकांडगांव संघाने तृतीय क्रमांक पटकाविला. या संघांना अनुक्रमे ७ हजार, ५ हजार, व ४ हजार रुपयांचे रोख पारितोषिक व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. तर हाजगोळी, मसोली व देवर्ड येथील लेझीम संघांना प्रत्येकी २ हजार रूपये व सन्माचिन्ह देऊन उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला.

      विजेत्या संघांना मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष मारूती मोरे, तालुकाध्यक्ष बंडोपंत चव्हाण, अमर त्रिभुवणे, महादेव पोवार, गीता नाईक, सुनंदा मोरे, गौरी भोसले, रचना होलम, धनश्री देसाई आदि मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.

व्यंकटराव’ परीवार…

       येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा या प्रशालेमध्ये युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून त्यांच्या मूर्तीचे पूजन आजरा महाल शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी यांचे हस्ते पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. यावेळी बोलताना शिंपी यांनी आपल्या भाषणात महाराजांबद्दल आपले विचार मांडले.

      महाराजांच्या बालपणी त्यांच्यावर आई-वडिलांनी घडविलेले संस्कारच त्यांना पुढे स्वराज्य स्थापनेच्या कार्यात मोलाचे ठरले.
केवळ मराठीच नव्हे तर समस्त हिंदुस्थानच्या मनामनावर गेली ३९४ वर्ष राज्य करणारे धैर्य, साहस, पराक्रम, शक्ती- भक्ती साक्षेप व मर्यादा, कुलीन व शालीन ,प्राचीन व अर्वाचीन, ज्ञान, भक्ती ,वैराग्य, विवेक आणि कलेचा धनी असणारे हा जाणता राजा होता.

      या कार्यक्रमासाठी संचालक पांडुरंग जाधव, सचिन शिंपी, अभिषेक शिंपी, प्राचार्य आर. जी. कुंभार, सर्व विद्यार्थी,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

पंडित दीनदयाळ विद्यालय..

       अखंड महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

     सुरुवातीला विद्यालयाचे मुख्याध्यापक देसाई एस. वाय. यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले.समीर कांबळे यांने छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर पोवाडा सादर केला.

       यावेळी प्रशालेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.


महामार्ग बाधित शेतकऱ्यांची मेसकाटी नुकसानीसाठी फरफट

                    आजरा:प्रतिनिधी

        संकेश्वर-बांदा महामार्गाचे काम सध्या सुरू आहे या महामार्गामध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये मेसकाठी हे पीक आहे.या पिकापासून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते असते.असे असताना सदरील महामार्ग बाधित झालेल्या मेसकाठीचे पंचनामे व मूल्यांकन करण्यासाठी भूसंपादन अधिकारी व उपविभागीय अधिकारी आजरा भुदरगड विभाग यांनी वन विभागामार्फत पंचनामे करून पाठवले आहेत. त्या काठींची होणारी नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही. यामुळे शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहणार आहे.

       सदरील अहवाल भूसंपादन अधिकारी यांच्याकडे पाठवला असता हे गवत पिक आहे असा प्रस्ताव वन विभागाने दिलेला आहे.यामुळे सदरील मेसकाठी पीक हे गवत पिकामध्ये शासनाने वर्ग केलेले असल्यास हा शेतकऱ्यांच्यावर अन्याय आहे.

       त्यामुळे तातडीने मेसकाठीची नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे सविस्तर निवेदन परिक्षेत्र वन अधिकारी, आजरा यांना देण्यात आले असून यावेळी शिवाजी इंगळे, आप्पासो पाटील, गिरीश चव्हाण, दिगंबर होरंबळे, विलास गोडसे, शिवाजी डोंगरे ,यांच्यासह नुकसान ग्रस्त शेतकरी उपस्थित होते.


हजरत दावल मलिक यांचा उद्यापासून उरूस

                     आजरा : प्रतिनिधी

       हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणारा आजरा येथील हजरत दावल मलिक यांचा उरूस बुधवार दिनांक २१ व गुरुवार दिनांक २२ रोजी आयोजित करण्यात आला आहे. बुधवार दिनांक २१ रोजी रोजी संदल व गंधरात्र मिरवणूक तर गुरुवार दिनांक २२ रोजी भर उरूस व गलेफ मिरवणूक समाधान हॉटेल, संभाजी चौक येथून निघणार आहे अशी माहिती दावल मलिक उरुस कमिटीच्या वतीने देण्यात आली आहे.


संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

बहिरेवाडी येथे बैलाचा “लम्पी’ ने मृत्यू… गडहिंग्लज उपविभागातील पहिला बळी

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!