mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

रविवार  दि.१८ जानेवारी २०२६

चिकोत्रा धरणाच्या पाण्यात पडून एकाचा मृत्यू


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

चिकोत्रा धरणाच्या पाण्यामध्ये पडून संतोष कुंडलिक खेडेकर ( वय ४० वर्षे  रा. चिमणे ता. आजरा ) यांचा बुडून मृत्यू झाला.

याबाबत पोलीसांतून मिळालेली माहिती अशी…

संतोष यांना दम्याचा आजार असल्याने त्यांच्यावर उपचार चालू होते. गेल्या वर्षभरापासून आजार बळावल्याने ते आजाराला कंटाळले होते. शनिवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास गावातून फिरून येतो एक घरातून निघून गेले व बराच उशीर झाल्याने त्यांचा शोध घेतला असता चिकोत्रा धरणाच्या पाण्यात त्यांचे प्रेत आढळून आले. आजाराला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे.

याबाबतची वर्दी जोतीराम श्रीपती चव्हाण रा. चिमणे यांनी आजरा पोलिसात दिली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

जळीतग्रस्त व्यावसायिकांसाठी
आजऱ्यातील व्यापारी एकवटले
२ लाख ३० हजारांची मदत


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा शहरात जळीत झालेल्या दहा दुकानदारांना आजरा एकसंघ व्यापारी असोसिएशनच्या वतीने आर्थिक मदत करण्यात आली. असोसिएशनच्या वतीने प्रत्येकी २३ हजार रुपये देण्यात आले.

यावेळी बोलताना असोसिएशनचे अध्यक्ष महेश नार्वेकर म्हणाले, मानवतेच्या दृष्टिकोनातून आजऱ्यातील लहानमोठ्या सर्व व्यापाऱ्यांनी मदतीचा हात पुढे केला.आम्ही जळीतांना सर्व मदत करु शकलो नसलो तरी आधार देण्याचा प्रयत्न केला आहे.त्यांना भेटून धीर दिला.उभे राहण्याची हिंमत दिली. एकसंघ राहिल्यास आपण अडचणीतील व्यापाऱ्याला मदतीचा हात देऊ शकतो याचे हे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी जळीतग्रस्त दुकानदार विजय नेवरेकर म्हणाले, रक्कम किती मिळाली याला महत्त्व नाही मात्र असोसिएशनने दिलेल्या दिलाशामुळे नुकसान झालेल्या व्यावसायिकांमध्ये नवीन उमेद निर्माण झाली आहे.या उमेदीने पुन्हा उभा राहण्याचे बळ मिळाले आहे.

यावेळी एकसंघ व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष वाय.जी. इंजल, संजय हरेर, सचिन इंदुलकर, मल्लिकार्जुन तेरणी, शिवाजी गुडूळकर, दयानंद भोपळे, मुन्ना लमतुरे, संगम गुंजाटी,मनोज गुंजाटी, तोफिक आगा, बाळासाहेब पाचवडेकर, संजय त्रिभुवणे, निलेश घाटगे,राजू विभुते, वृषाल हुक्केरी, रफिक दिडबाग, बाळासाहेब पाचवडेकर, तौफिक आगा, अमित करवळ यांच्यासह दुकानदार उपस्थित होते.

 निलेश गुरव यांचे निधन


उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

उत्तुर ता. आजरा येथील निलेश सुभाष गुरव (वय ३०) यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

अत्यंत मनमिळावू  स्वभावामुळे ते सर्वांच्या परिचयाचे  होते. त्यांच्या निधनाने मित्र परिवारासह कुटुंबीयांवर  शोककळा पसरली आहे.

त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ व एक विवाहित बहीण असा परिवार आहे.

श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरातर्फे महिलांकरिता सुगम गायन स्पर्धेचे आयोजन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरातर्फे कै. उर्मिला श्रीपाद मायदेव यांच्या स्मृतिप्रित्यर्थ महिलांकरिता तालुकास्तरीय सुगम गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

शनिवार दिनांक २४ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता डॉ. जे. पी. नाईक सभागृहात कार्यक्रम होणार आहे.विजेत्या प्रथम तीन क्रमांकांना रोख रक्कम व प्रशस्तीपत्र अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या महिलांनी अधिक माहितीसाठी वाचनालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन वाचन मंदिराचे अध्यक्ष वामन सामंत, उपाध्यक्षा विद्या हरेर, कार्यवाह कुंडलिक नावलकर व सहकार्यवाह रवींद्र हुक्केरी यांनी केले आहे.

निधन वार्ता
सौ.सुनीता भुईंबर


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

शिवाजीनगर, आजरा येथील सौ. सुनीता बाळासाहेब भुईंबर ( वय ६३ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने शनिवारी निधन झाले.

त्यांच्या पश्चात पती, दोन विवाहित मुले, सूना, एक विवाहित मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

रक्षा विसर्जन सोमवारी सकाळी नऊ वाजता आहे.

आज शहरात

श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट यांच्या पादुका पालखीचे आगमन सायंकाळी सहा वाजता होणार असून पालखी दर्शन व महाप्रसादाचे दूरदुंडेश्वर मंगल कार्यालय, लिंगायत गल्ली येथे सायंकाळी आयोजन करण्यात आले आहे.

निवडणूक विशेष…

जिल्हा परिषद पं.स. करीता काल शनिवारी १० व एकूण ३३ अर्जांची कालअखेर विक्री झाली असून अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आडवी बाटली उभी होणार…

mrityunjay mahanews

विधानपरिषद जोडणीसाठी राज्यमंत्री सतेज पाटील आजऱ्यात

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!