mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

बुधवार २० मे  २०२६

कृषी सहाय्यकांनी शेतकऱ्यांपर्यंत योजनांची माहिती पोहचवावी : जि.प.सदस्य सुधीर देसाई
कृषी विभागाची आढावा बैठक

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

शासनाच्या कृषी विभागाच्या सर्व योजना ऑनलाईन असलेने लोकांनीही जागरूक राहिले पाहिजे. ग्रामपंचायत, ग्रामसेवक, सरपंच यांची संयुक्त बैठक लावून प्रत्येक आठवड्याचा वार ठरवून कृषी सहाय्यकांनी शेतकऱ्यांपर्यंत योजनांची माहिती पोहचवावी असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य सुधीर देसाई यांनी केले. ते
कृषी विभागाच्या आढावा बैठकीत अध्यक्षस्थानावरून बोलत होते.या बैठकीत विभागीय कृषी सहसंचालक जालिंदर पांगरे व जिल्हा कृषीचिकित्सक प्रमोद लोंढे उपस्थित होते.

प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी भूषण पाटील यांनी केले यामध्ये त्यांनी उपलब्ध कर्मचारी व कामाची माहिती याबरोबरच सन २०२५-२६ मध्ये तालुका कृषी अधिकारी कार्यालय आजरा मार्फत शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या योजना, अनुदान वितरण, बियाणे वाटपाचा आढावा घेतला व सन २०२६-२७ मधील प्रस्तावीत नियोजन त्याचबरोबर मागेल त्या नवीन लाभार्थ्याना काजू कलमे देणेबाबत माहिती दिली. विभागीय कृषी सहसंचालक कोल्हापूर जालिंदर पांगरे यांनी महाडिबीटी कृषी विभागाच्या विविध मोहिमा, फळबाग लागवड, विमायोजना बियाणे अनुदान, प्रक्रिया योजनेसाठी देण्यात येणारे अनुदान अशा विविध योजनांची माहिती दिली.

हरिभाऊ कांबळे म्हणाले, वरिष्ठांनी कामाचे नियोजन योग्य पद्धतीने केल्यास खालचा कर्मचारी वर्ग व्यवस्थित काम करु शकतो. त्याचप्रमाणे प्रत्येक योजनेची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचवली पाहिजे, शेतकऱ्यांना कृषि कार्यालयात सन्मान आणियोग्य वागणूक देणे गरजेचे आहे असे म्हणाले. समीर चांद यांनी आजऱ्याची ओळख असलेल्या घनसाळचा दर्जा टिकवण्यासाठी प्रयत्न व्हावेत असे सांगितले यावर अधिकारी यांनी घनसाळ शासनामार्फत खरेदी विक्री करून यावर उपाययोजना अखण्यात येतील असे सांगितले. दिनेश कांबळे यांनी करपेवाडी बाग, नारायण बाग तसेच सिडफार्म शेतीखात्याच्या जमिनी भांडवलदारांना देऊ नये याबाबत ठराव करा असे संगितले.

कॉ. काशिनाथ मोरे म्हणाले, प्रत्येक ग्रामसभेला कृषीसहाय्यक जाणे गरजेचे आहे. उपसभापती यशोदा पोवार यांच्यामुळे आज सर्व अधिकाऱ्यांना पाहण्याची संधी मिळाली असेही नमूद केले.

यावेळी पंचायत समिती सभापती जयश्री गाडे, शिवसेना तालुकाप्रमुख युवराज पोवार, दीपक मुळे (कृषी अधिकारी) मोने (मंडळ कृषी अधिकारी), फुले (मंडळ कृषी अधिकारी, उत्तूर), यमगेकर (कृषी विभाग आजरा ), सर्व उपकृषी अधिकारी, सहाय्य्क कृषी अधिकारी, पीएम किसान डाटा एंट्री ऑपरेटर, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा तसेच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपसभापती सौ. यशोदा युवराज पोवार यांनी आभार मानले. 

आजरा नगरपंचायत सभा

कचरा, पाणी प्रश्नावरून अधिकारी धारेवर

आजरा : मृत्यूंजय महान्यूज वृत्तसेवा

नगरपंचायतीच्या गाळेधारकांची केलेली भाडेवाढ गाळेधारकांच्या विरोधामु‌ळे मागे घेण्यात आली आहे. यासाठी नेमलेल्या नगरसेवकांच्या विशेष समितीने ३० टक्के भाडेवाढ सुचवली. याचा अहवाल सभेपुढे मांडण्यात आला. सभेत ३० टक्के भाडेवाढीला मंजूरी देण्यात आली. याबाबतचा ठराव संमत करण्यात आला. शहरात अस्ताव्यस्त पडलेला कचरा, विस्कळीत झालेल्या व लांबलेल्या पाणीपुरवठा योजने बाबत नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. कचऱ्याचा प्रश्न तातडीने निकाली काढावा. पिण्याचे पाण्याचा पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी केली.

आजरा नगरपंचायतीची सभा कचरा व पाणी प्रश्नावरून गाजली. नगराध्यक्ष अशोक चराटी अध्यक्षस्थानी होते. उपनगराध्यक्षा पूजा डोंगरे, मुख्याधिकारी सूरज सुर्वे प्रमुख उपस्थित होते. प्रशासकिय अधिकारी निहाल अत्तार यांनी विषय मांडले.

बहुचर्तीत शहरातील नगरपंचायत मालकिच्या गाळ्यांच्या भाडेवाढीचा प्रश्न पुन्हा एकदा सभेत चर्चेत आला. या वेळी तीन वर्षाकरीता तीस टक्के प्रमाणे भाडेवाढ करण्याचे सर्वानुमते ठरले. शहरात कचरा अस्ताव्यस्त पसरला आहे. असे असतांना माझी वसुंधराचा पुरस्कार कसा मिळाला ? असा खोचक सवाल नगरसेवक परशराम बामणे यांनी केला.

परेश पोतदार म्हणाले,शहरातील कचरा व पाण्याबाबत अधिकाऱ्यांना गांभिर्य नाही. आम्ही जनतेतून निवडून आलो आहोत. जनतेने आम्हाला कशासाठी निवडून दिले आहे ? हा प्रश्न आमच्या समोर आहे. गेले सहा- सात महीन्यात कोणतेही विकास काम झालेले नाही. शासनाकडून सहजरित्या मिळणाऱ्या निधी व्यतिरिक्त अतिरिक्त निधी मिळण्यासाठी पाठपुराव्याची गरज आहे. अभिषेक शिंपी म्हणाले, हेतुपुरस्सर राजकीय, व्यक्ती‌द्वेषातून बांधकामाबाबत नोटीसा लागू केल्या जात आहेत हे चुकीचे आहे. खात्री करूनच संबंधीताना नोटीसा लागू कराव्यात. व्यंकटराव हायस्कूल परिसरात मनमानी पध्दतीने गाळे उभारले जात आहेत. त्यांनाही नोटीसा लागू करून त्यांचे क्षेत्र ठरवून द्यावे. पाणी प्रश्न गेली चार वर्ष रेंगाळला आहे. शहरवासीयांच्या सहनशीलतेचा अंत न पहाता प्रश्न मार्गी लावण्यासाठी संबंधीत ठेकेदार व नियंत्रण ठेवणाऱ्या पीएमसी कंपनीला नोटीसा लागू कराव्यात. नगरसेविका प्रा. पूनम लिचम, डॉ. स्मिता कुंभार यांनी गांधीनगर येथील कचरा डेपोतील कचऱ्यामु‌ळे स्थानिक रहिवाशांना त्रास होत असून तो कचरा व्यवस्थित टाकण्याबाबत संबंधीताना सूचना कराव्यात असे सांगीतले. तर नगरसेविका बड्डेखान यांनी दर्गा गल्लीतील पाणी योजनेचे काम व रस्त्याचा प्रश्न मांडला. या वेळी झालेल्या चर्चेत विक्रम पटेकर, असिफ पटेल, निसार लाडजी, डॉ. इंद्रजीत देसाई, अनिकेत चराट्री, निशांत चांद, अश्विनी चव्हाण यांनी भाग घेतला. यावेळी नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते.

महत्त्वाची चर्चा…

♦ शहरात वाहनाचे सम विषम पार्किंग करावे…

♦ बाजारपेठेत वारचाकी वाहन्नासाठी वनवे मार्ग करावा…

♦ बाजारपेठेतील कचरा उचलण्यासाठी विशेष नियोजन करावे…

♦ प्लास्टिक बंदी करण्याबाबत विचार व्हावा…

♦ आरोग्य निरीक्षकांनीच्या शहरातच रहावे व जमत नसेल तर बदली करून घ्यावी…

♦ यावर्षी कोणत्याही प्रकारची नक्की वाढ करू नये अशी सूचना नगरसेवक अभिषेक शिंपी यांनी केली.

आजऱ्यात लोकशाही दिनात विविध प्रश्नांवर चर्चा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा तहसील कार्यालयात लोकशाही दिन निमित्त बैठक घेण्यात आली.विविध प्रश्नांवर चर्चा झाली.अध्यक्षस्थानी तहसिलदार समीर माने होते.

सोहाळे येथील रस्त्याच्या संदर्भात एकच लेखी अर्ज दाखल झाला होता.त्यावर चर्चा झाली.हाजगोळी येथील बंधाऱ्याचे काम सुरु असल्याने हा रस्ता आठवडाभर बंद करण्यात आला आहे मात्र या ठिकाणी बॅरेकेट लावून पर्यायी मार्गाच्या उल्लेखाचा फलक लावावा अशी सूचना तहसिलदार यांनी केली.

गॅस टंचाई बाबतचा प्रश्न विजय थोरवत,इंद्रजित देसाई व संतोष भाटले यांनी उपस्थित केला. आजऱ्यातील नागरिकांना ओटीपी येवून देखील सिलेंडर दिले जात नाही.याची चौकशी करावी.घरगुती गॅस सिलेंडर हाॅटेलात लावलेले असून अडीच हजार पर्यंत याची  विक्री होत असल्याचे इंद्रजित देसाई यांनी सांगितले.असे आणल्यास कारवाई करण्यात येईल असे आश्वासन तहसिलदार माने यांनी दिले.याचबरोबर गॅस वितरकांची बैठक बुधवारी लावण्याची सूचना पुरवठा विभागाला केली.

कर्जमाफी बद्दल फायबर आयडी व बाकीचे मुद्दे सोडवून घ्या जेणेकरुन वंचित राहणार नाही किंवा तक्रारी येवू नयेत अशी सूचना सहकार खात्याला देण्यात आली.या बैठकीला सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिन निमित्त बैठक होणार असून नागरिकांनी आपले प्रश्न विहीत नमुन्यात द्यावे असे आवाहन तहसिलदार समीर माने यांनी केले.

अन्यथा रास्ता रोको करणार
पेरणोली- गारगोटी रस्ता प्रकरणी पेरणोलीकरांचा इशारा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

पेरणोली – गारगोटी रस्त्याचे पेरणोली ते नावलकरवाडी पर्यंतचे काम बरेच दिवसांपासून काम थांबले असून रस्त्यावर पाणी साचून अपघात होत आहेत. पावसाळ्यापूर्वी तातडीने सदर रस्त्याचे काम पूर्ण करावे अशी मागणी ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम उपअभियंता यांच्याकडे केली आहे. याचबरोबर काम मार्गी न लागणल्यास रास्ता रोकोचा इशाराही दिला आहे

यापूर्वी २२ एप्रिल रोजी ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले होते. या निवेदनाला सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रतिसाद दिला नाही. सद्यस्थितीत वळवाचा पाऊस पडत आहे. काही दिवसात पावसाळा चालू होणार तत्पूर्वी अपूर्ण कामे पूर्ण करावीत. यामुळे येणाऱ्या चार-पाच दिवसात उर्वरित रस्त्याचे काम चालू करावे व होत असलेले अपघात थांबवावेत अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे.

या निवेदनावर युवराज लोंढे, स्वप्निल फगरे, राजेंद्र भोसले, औदुंबर हवालदार, संजय दळवी, संजय जाधव शिवाजी कांबळे पांडुरंग दोरुगडे, सागर सावंत यांच्यासह ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

 महत्त्वाच्या बातम्या

♦ पेट्रोल व डिझेलचे दर आठवड्यात दुसऱ्यांदा वाढले असून प्रति लिटर ९० पैशांची वाढ करण्यात आली आहे शुक्रवारी तीन रुपयांनी वाढ केल्यानंतर मंगळवारी पुन्हा ९० पैशांनी प्रति लिटर वाढ झाली आहे.

♦ शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा शक्तीपीठ महामार्ग सरकार जबरदस्तीने उभा करू पाहत आहे. कोणत्याही परिस्थितीत एक इंचही जमीनीची मोजणी होऊ देऊ नका असे आवाहन आमदार सतेज पाटील व माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे.

♦ कोल्हापूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था आबादीत राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार अप्पर जिल्हा जिल्हाधिकारी यांनी संपूर्ण जिल्ह्यात मंगळवार सकाळी ६ वाजल्यापासून ते दोन जूनच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत बंदी आदेश लागू केला आहे.

♦ भारतीय शेअर बाजारात गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या घसरणीचा मोठा फटका देशातील आघाड्यांच्या कंपन्यांना बसत असून प्रथमच जगातील सर्वाधिक बाजारमूल्य असलेल्या टॉप १०० कंपन्यांमध्ये एकाही भारतीय कंपनीला स्थान मिळालेले नाही.

आयपीएल न्यूज

काल झालेल्या राजस्थान विरुद्ध लखनऊ सामन्यांमध्ये राजस्थानने लखनौला सात गड्यांनी नमवले.

३८ चेंडूत सहा चौकार व दहा षटकारासह ९३ धावा काढणाऱ्या वैभव सूर्यवंशीला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

गुण तक्ता

बंगळूर १८
गुजरात १६
हैदराबाद १६
राजस्थान १२
पंजाब १३

चेन्नई १२
दिल्ली १२
कोलकाता ११
मुंबई. ०८
लखनौ ०८

आजचा सामना

कोलकाता विरुद्ध मुंबई
वेळ : सायंकाळी ७.३० पासून

आजचे पंचांग

दिनांक : २० मे २०२६
वार : बुधवार
माह (अमावस्यांत) : अधिक ज्येष्ठ
माह (पूर्णिमांत) : अधिक ज्येष्ठ
ऋतु : ग्रीष्म
आयन : उत्तरायण
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : चतुर्थी (सकाळी ११.०६ पर्यंत) त्यानंतर पंचमी तिथी
नक्षत्र : आर्द्रा नक्षत्र (सकाळी ०६.१२ पर्यंत) त्यानंतर पुनर्वसू नक्षत्र
योग : शूल योग (दुपारी ०२.०९ पर्यंत) त्यानंतर गण्ड योग
करण : विस्ती भद्रा करण (सकाळी ११.०६ पर्यंत) त्यानंतर भाव करण
चंद्र राशी : मिथुन राशी (रात्री १०.३८ पर्यंत) त्यानंतर कर्क राशी
सूर्य राशी : वृषभ राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी १२.३५ ते दुपारी ०२.१३ पर्यंत
सूर्योदय : सकाळी ०६.०४
सूर्यास्त : सायंकाळी ०७.०७
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

मतदानात टोकाची ईर्षा… प्रस्थापितांना धक्का…?

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा मार्गे वर्षा पर्यटकांची संख्या रोडावली…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!