दि. २१ सप्टेबर २०२४


खाजगी ट्रॅव्हल्स चालकांची मनमानी थांबवा…
विविध संघटनांचे तहसीलदारांना निवेदन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यातील अनेक नागरिक मुंबई पुण्यामध्ये वास्तव्यास राहण्यास गेलेले आहेत. शेतीची कामे व अन्य कामांसाठी ही त्यांना गावी यावे लागते. मुंबई साठी खाजगी ट्रॅव्हल्स सुरू झालेल्या असल्यामुळे एसटी महामंडळाच्या बसेस पूर्णपणे बंद पडलेल्या आहेत. त्यामुळे खाजगी बसेसचे मालक त्यांच्या दरांमध्ये मनमानी पद्धतीने वाढ करत असतात. कधी कधी तर यात्रांच्या वेळी, गणपतीच्या वेळी व इतर सणांच्या वेळी एका एका तिकिटाची किंमत २०००/- ते ३०००/- रु च्या घरात जाऊन पोहोचते. यामुळे नागरिकांची खूपच आर्थिक लूट होत आहे. सदर खाजगी बसेसनाही पूर्ण वर्षभर एकच दर असावा जेणेकरून नागरिकांची आर्थिक लूट होणार नाही. अशा आशियाचे निवेदन आजरा तहसीलदारांना देण्यात आले आहे.
वर्षभर एकच दर निश्चित केल्याने लोकांनाही प्रवासास अडचण होणार नाही व प्रवाशांची फसवणूक सुद्धा होणार नाही. घालावा. सदर निवेदनानंतर आपल्याकडून यावर कोणतीही कारवाई न झाल्यास बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने दिनांक २७ सप्टेंबर २०२४ रोजी शुक्रवारी एक दिवसीय धरणे आंदोलन तहसील कार्यालयासमोर करणार असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई यांनी येत्या तीन-चार दिवसात सर्व ट्रॅव्हल्स मालकांसोबत बहुजन मुक्ती पार्टीशी लावण्याचे आश्वासन दिले.
यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे युवा आघाडी जिल्हाध्यक्ष किरण के के, राहुल मोरे, रवी देसाई, काशीनाथ मोरे, शरद कुंभार, अमित सुळेकर , प्रसाद पिळणकर,अरविंद लोखंडे,संजय घाटगे, द्वारका कांबळे, सुमन कांबळे,डॉ. धनाजी राणे,तुकाराम कांबळे इत्यादी वेगवेगळ्या संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.


मोरजकर महाराज पालखी नगर प्रदक्षिणा उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथे शुक्रवारी रोजी ह.भ.प. लक्ष्मणबुवा मोरजकर महाराजांच्या पालखी नगरप्रदक्षिणा सोहळा उत्साहात पार पडला. दुपारी १२ वाजता महाराजांचे पालखीने समाधीस्थळी प्रयाण झाले. त्यानंतर दुपारी २ वाजता प्रसाद वाटप करण्यात आला. तर २.३० वाजता पालखी नगर प्रदक्षिणा सोहळ्याला सुरूवात झाली.
येथील नबापुर, शिवाजीनगर, मेन रोड, सुभाष चौक, आजरा अर्बन बँक चौकातून सायंकाळी ६ वाजता किल्ल्यातील विठ्ठल मंदिर, ६.३० वाजता राम मंदिर, ७ वाजता ग्रामदैवत रवळनाथ मंदिरातून पालखी विठ्ठल मंदिरात पोहोल्यानंतर ९.१५ वाजता वीणा उतरविण्याचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी विविध गावातील भजनी मंडळ व भक्तजन मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. पालखीचे ठिकठिकाणी उत्साहात स्वागत करण्यात आले.
आज शनिवारी दुपारी बारा ते तीन या वेळेमध्ये महाप्रसाद होणार असून रात्री साडेनऊ वाजता तांदळाचा प्रसाद होणार आहे.

टोल प्रश्नी शुक्रवारी व्यापक बैठक

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पुढच्या शुक्रवारी २७ सप्टेंबरला आजरा येथे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची व्यापक बैठक घेऊन चळवळीची पुढील दिशा ठरविण्याचा निर्णय आजरा येथे झालेल्या टोल मुक्ती संघर्ष समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
सुरवातीला कॉ. संपत देसाई यांनी आतापर्यंतच्या आंदोलनाचा आढावा घेतला. ते म्हणाले दोन मोर्चे आणि धरणे आंदोलनानंतर प्रशासनाने उच्चपदस्थ अधिकारी यांच्या सोबत बैठक घेण्याचे लेखी पत्र दिले होते. त्यांच्याशी संपर्क झाला असून पुढील आठवड्यात आपल्याला बैठकीची तारीख आणि वेळ समजेल. बैठकीत काय निर्णय होतोय, याबरोबर केंद्र शासनाने अलीकडे टोल संदर्भात घेतलेला निर्णयाचा जी. आर.काय निघतो ते बघून पुढील दिशा ठरवू.
यावेळी परशुराम बामणे म्हणाले, तालुक्यातील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांची व्यापक बैठक शुक्रवारी २७ तारखेला बोलावून या आंदोलनाबाबत त्यांची भूमिका समजावून घेऊया. तानाजी देसाई म्हणाले, हे आंदोलन केंद्र आणि राज्याच्या धोरणाविरोधात असल्याने कुणी सहज घेऊ नये. त्यासाठी खूप ताकद लावावी लागणार आहे.
यावेळी प्रकाश मोरुस्कर, रवींद्र भाटले, काशिनाथ मोरे, डॉ. धनाजी राणे, यशवंत चव्हाण, पांडुरंग सावरतकर, संजय घाटगे यांनीही चर्चेतल्या सहभाग घेतला.

लवकरच आपल्या सेवेत… आजच ॲडव्हान्स बुकिंग करा..
तुमच्या स्वप्नातील घर, तुमच्या बजेटमध्ये…*”आपलं घर* ” शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सर्व सोयीनीयुक्त
✅ शाळा, कॉलेज, बॅंका , स्टँड, हॉस्पिटल, होटेल्स, भाजी मार्केट, पेट्रोल पंप, मेन मार्केट फक्त 2 मिनिटांवर
✅ 1 आणि 2 BHK फ्लॅट्स
✅ इतर अनेक सुविधा
🏡साईटचा पत्ता : समर्थ कृपा रेसिडेन्सी , भगवा रक्षक चौक, सोमवार पेठ, दत्त मंदिरा समोर, आजरा
☎️ संपर्क –
+91 9527 97 3969
‘मुख्यमंत्री सुंदरशाळा’ स्पर्धेत शंकरलिंग विद्यामंदिर प्राथमिक गटात तालुक्यात प्रथम

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
‘मुख्यमंत्री माझी शाळा… सुंदर शाळा’ स्पर्धेत मडिलगे येथील शंकरलिगं विद्यामंदिरने प्राथमिक गटात तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला.
शाळेची गुणवत्ता, भौतिक सुविधांची उपलब्धता, विविध शासकीय योजनांची प्रभावी अमंलबजावणी, शाळा सुशोभिकरण, पर्यावरण विषयक जाणीव जागृती, शिष्यवृत्ती यासारखे विविध उपक्रम शाळेने राबविले. जिल्हास्तरीय मूल्यमापनासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर, शिक्षण विस्तार अधिकारी मे. एस. आय. सुतार जिल्हा समन्वयक आम्रपाली दिवेकर, अरविंद कापसे यांनी भेटून मार्गदर्शन केले.
यावेळी गटविकास अधिकारी संजय ढमाळ, गटशिक्षणाधिकारी बसवराज गुरव, सुनीत चंद्रमणी, विलास पाटील, सदाशिव कोरवी, अनिल बामणे, आनंदा भादवणकर यांच्यासह शाळा कमिटी, ग्रामस्थ, पालक यांचे मार्गदर्शन लाभले. अभियान यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक श्रीधर मांगले, शिक्षक धनवंती आजगेकर, संतोष आमणगी, संगिता शिंदे, अनिल कांबळे, सुवर्णा पवार, राजश्री सुतार, तानाजी पावले यांनी परीश्रम घेतले.

गौतम भोसले यांचा सत्कार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
श्री.संत सेना नाभिक समाज आजरा तालुका अध्यक्ष पदी निवड झालेबद्दल श्री.गौतम भोसले यांचा सत्कार सुधीर उर्फ आप्पा शिवणे,राहुल शिंदे, साखरे ,अनिरुद्ध उर्फ बाळ केसरकर, बाळासाहेब पाचवडेकर, ज्योतिप्रसाद सावंत ,आकाश शिंदे, तुफेल आगा व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.

निधन वार्ता…
शिवाजी रेडेकर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सरंबळवाडी ता. आजरा येथील शिवाजी दत्तू रेडेकर ( वय ५८ वर्षे ) यांचे अल्पश: आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सून असा परिवार आहे. उद्योजक रमेश रेडेकर यांचे ते बंधू व माजी जि. प. सदस्या सौ. सुनिता रेडेकर यांचे दीर होत.
रक्षा विसर्जन रविवारी सकाळी सरंबळवाडी येथे आहे.


