mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

दि. २९ सप्टेबर २०२४


भुदरगड राधानगरीच्या नेत्यांच्या आजऱ्यात फेऱ्या वाढल्या..
 नेतेमंडळींचा भाव वधारला

       ज्योतिप्रसाद सावंत

      विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राधानगरी- भुदरगड मतदार संघातील नेते मंडळी आजरा तालुक्यातील मतदानावर लक्ष ठेवून असून यामुळे तालुक्यातील नेतेमंडळींचा भाव चांगलाच वधारला असल्याचे दिसत आहे. आईने नवरात्रोत्सवाच्या कालावधीमध्ये नेत्यांचा ‘जन’ संपर्क वाढल्याने मंडळांचा ‘धन’ संपर्कही वाढत आहे.

      आजरा तालुक्यातील स्थानिक जिल्हा परिषद मतदारसंघ हा राधानगरी-भुदरगड विधानसभा मतदारसंघाला जोडला गेला आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर यांनी विकासकामांच्या माध्यमातून मतदारांशी थेट संपर्क ठेवला आहे. परंतु लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला मिळालेले मताधिक्य हे आमदार आबिटकर यांच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे. यामुळे आमदार आबिटकर यांच्यासह जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर हे देखील आजरा जिल्हा परिषद मतदारसंघावर लक्ष ठेवून आहेत.

     माजी आमदार के. पी. पाटील यांचे चिरंजीव रणजीत व कार्यकर्ते आणि जिल्हा बँकेचे संचालक ए. वाय. पाटील यांचे कार्यकर्तेही आजरा तालुक्यातील प्रमुख मंडळींच्या गाठीभेटी घेताना दिसत आहेत.

     आमदार आबिटकर यांच्यासमोर या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे नेटके आव्हान राहणार आहे. निवडणूक प्रचंड चुरशीची होणार हे स्पष्ट असल्याने सर्वच इच्छुक आपण कोठेही कमी पडणार नाही याची दक्षता आतापासून घेताना दिसत आहेत.

      या एकंदर वातावरणाची कल्पना आल्यामुळे आज-यातील नेते मंडळींनीही सध्या तरी सर्वांच्या स्वागतासाठी पायघड्या घातल्याचे दिसत आहे. अधिकृत उमेदवा-या जाहीर झाल्यानंतर ही नेते मंडळी कुठे असतील हा भाग अलाहिदा…

नवरात्रोत्सव मंडळांचे नेटके प्रस्ताव…?

     ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर नवरात्र उत्सव आल्याने नवरात्रोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना आयती ‘ संधी ‘ चालून आली आहे. कार्यकर्त्यांकडून संभाव्य उमेदवारांसमोर महाप्रसाद, सांस्कृतिक कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम याकरिता भक्कम देणगी मागणीचे प्रस्ताव ठेवले जात आहेत. बहुतांशी इच्छुक नेते मंडळी प्रस्ताव मार्गीही लावत असल्याने नेत्यांच्या ‘जन’संपर्कमुळे कार्यकर्त्यांचा ‘धन’संपर्क  वाढला आहे. यामुळे यावर्षी नवरात्र उत्सव तालुक्यात दणक्यात होणार अशी चिन्हे आहेत.

मध्यवर्ती युवा महोत्सवाची धूम आजपासून

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

        येथील आजरा महाविद्यालयात चव्वेचाळीसाव्या तीनदिवसीय मध्यवर्ती युवा महोत्सवाचे आयोजन केले आहे.आज रविवारी (ता. २९) उ‌द्घाटन होणार आहे. शिवाजी विद्यापीठाशी संलग्न कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील जवळपास दोनशे महाविद्यालयांमधील २५०० ते ३००० विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

      ३५ वेगवेगळ्या कलाप्रकारांत स्पर्धा होणार आहेत. रविवारी सकाळी १० वाजता उद्घाटन होणार आहे. राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त कला शिक्षक सागर बगाडे उपस्थित राहणार आहेत.

                  आजचे कार्यक्रम…

१) स. ११.३० ते ३.३० लोकसंगीत लोकवाद्यवृंद
२) दु. ०३.३० ते ०४.३० मूकनाट्य
३) दु. ०४.३० ते ०९.३० लोककला
४) दु. १२.०० ते ०२.३० लघुनाटिका
५) दु. ०२.३० ते ०८.३० शास्त्रीय नृत्य
६) दु. ११.३० ते ०१.०० एकपात्री अभिनय
७) दु. ०१.३० ते ०३.३० नकला
८) दु. १२.०० ते ०५.०० शास्त्रीय गायन
९) दु. १२.०० ते ३.०० नाट्यसंगीत
१०) स. ११.०० ते ०१.००वक्तृत्त्व मराठी
११) स. ११.०० ते ०१.०० वक्तृत्त्व हिंदी
१२) स. ११.०० ते ०१.००वक्तृत्त्व इंग्रजी
१३) दु. ०२.०० ते ४.०० वादविवाद
१४) स. ११.०० पासून पुढे लघुपट
१५) दु. ०१.३० ते ०४.०० मेहंदी
१६) दु. १२.०० ते ०२.३० भित्तिचित्र निर्मिती
१७) दु. ०३.३० ते ०६.०० व्यंगचित्र

श्री. अजित तोडकर यांना नेशन बिल्डर अवॉर्ड…

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा हायस्कूलचे उपमुख्याध्यापक श्री. अजित तोडकर यांना रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रल यांनी नेशन बिल्डर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. शैक्षणिक, सामाजिक तसेच सांगितिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाब‌द्दल हा त्यांना पुरस्कार देण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्यातील शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या २० शिक्षकांना नेशन बिल्डर अवॉर्डने विशेष सन्मानित करण्यात आले.

आजऱ्यात खुल्या वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

     श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर, आजरा संचालित ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत सांस्कृतिक मंच आजरा यांच्या‌ वतीने कै. पांडुरंग दौलतराव बिडकर (गुरूजी) यांचे स्मृतिप्रित्यर्थ आयोजित खुली वक्तृत्व स्पर्धा बुधवार, दिनांक ९ ऑक्टोबर, २०२४ रोजी आयोजित करण्यात आली आहे.

            स्पर्धेसाठी विषय…

१. एक तरी बारी अनुभवावी…
२.अन्वयार्थ :-सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०२४ चा… ३. ‘मृत्युंजय’ आणि आजचा उपेक्षित युवक ‌४. शेअर मार्केट :- व्यसन की अर्थाजन ५.गडकोटांवरील अतिक्रमणे :- वास्तव आणि अपेक्ष ६.परीक्षांचा घोळ आणि भारताचे भविष्य

           बक्षीसे…

प्रथम क्रमांक :- स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र व रोख ५००१/- रु.

व्दितीय क्रमांक :- स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र व रोख ४००१/- रू.

तृतीय क्रमांक :- स्मृतिविन्ह, प्रशस्तीपत्र व रोख ३००१/- रू.

     अधिक माहितीसाठी श्रीमंत गंगामाई वाचन मंदिराशी संपर्क साधावा असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. अशोक बाचूळकर यांनी केले आहे.

चिंताजनक…

केंद्र सरकारकडून मंकीपॉक्सच्या प्रादुर्भावाविषयी राज्यांना सूचना !


            मुबई :online news service

     केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंकीपॉक्स विषाणूसंदर्भात सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सजग राहण्याचे निर्देश दिले आहेत. भारतात ‘मंकीपॉक्स क्लेड १ बी’चा नवीन रुग्ण आढळला आहे. या प्रकारचा रुग्ण आढळणारा भारत हा आफ्रिके बाहेरील तिसरा देश ठरला आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने जारी केलेल्या निर्देशानुसार मंकीपॉक्स संशयित रुग्णांना विलगीकरणात ठेवण्याबरोबरच रोग प्रतिबंधक उपाययोजना कडकपणे राबवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

     चाचणीसाठी ठरवलेल्या प्रयोगशाळांची यादीही उपलब्ध करण्यात आली आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या निर्देशांमध्ये रुग्णालयीन व्यवस्थापन, रोग प्रतिबंधक उपाययोजना आणि जनजागृतीसाठी विशेष धोरणांचा समावेश करण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने १४ ऑगस्ट रोजी मंकीपॉक्स विषाणूचा प्रादुर्भाव आंतरराष्ट्रीय आरोग्य आणिबाणी म्हणून घोषित केली असल्याचे आरोग्य मंत्रालयातील सूत्रांनी स्पष्ट केले.

     २००५ च्या आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमांनुसार भारत या घोषणेचा भाग आहे. राज्य सरकारांना आरोग्य सुविधांमध्ये तयारी करण्याचे आदेश देण्यात आले असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांना राज्य व जिल्हा स्तरावर आढावा बैठक घेण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. ‘मंकीपॉक्स क्लेड १’चे लक्षणे ‘क्लेड २’सारखीच असली तरी, ‘क्लेड १’मध्ये धोका अधिक असल्याचे आरोग्य मंत्रालयाने नमूद केले आहे.

                          (Advt.)

लवकरच आपल्या सेवेत… आजच ॲडव्हान्स बुकिंग करा..

     तुमच्या स्वप्नातील घर, तुमच्या बजेटमध्ये…”आपलं घर* ” शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सर्व सोयीनीयुक्त

       ✅ शाळा, कॉलेज, बॅंका , स्टँड, हॉस्पिटल, होटेल्स, भाजी मार्केट, पेट्रोल पंप, मेन मार्केट फक्त 2 मिनिटांवर
        ✅ 1 आणि 2 BHK फ्लॅट्स
        ✅ इतर अनेक सुविधा

                  🏡साईटचा पत्ता :

       समर्थ कृपा रेसिडेन्सी , भगवा रक्षक चौक, सोमवार पेठ, दत्त मंदिरा समोर, आजरा

                     ☎️ संपर्क –

            +91 9527 97 3969

 


 

 

संबंधित पोस्ट

गटविकास अधिकाऱ्यांना काळे फासल्याप्रकरणी विलास जोशिलकर याला तीन महिन्यांची कैद

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

लढण्याचा वारसा घेऊन निवडणूक रिंगणात : सूर्यकांत नार्वेकर

mrityunjay mahanews

अवकाळीने झालेल्या नुकसानीची भरपाई तातडीने द्यावी: आज-यात जि. प. उपाध्यक्ष शिंपी यांची मागणी

mrityunjay mahanews

आजऱ्यात आजीच्या समोरच नातीचा विहिरीत पडून मृत्यू

mrityunjay mahanews
error: Content is protected !!