अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची ताबडतोब भरपाई द्या: जि.प.उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी यांची मागणी
आजरा तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने थैमान घातले असून या कालावधीमध्ये जोरदार पाऊस होत असल्याने हातातोंडाशी आलेली पिके वाया जात आहेत त्याचबरोबर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर होत चालला आहे. शासनाकडून झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याबरोबरच शेतकरी वर्गाला आर्थिक मदतीचा हात द्यावा अशी मागणीही शिंपी यांनी केली आहे.या बाबतचे स्वतंत्र निवेदन तहसीलदार विकास अहिर यांना देण्यात आले असून यावेळी नगरसेवक अभिषेक शिंपी, विश्वास जाधव, विलास पाटील, प्रभाकर कोरवी, प्राचार्य सुनील देसाई यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात ४१ टक्क्यांची वाढ;कर्मचाऱ्यांचे निलंबनही रद्द
गेल्या महिन्याभरापासून चालू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाची दखल घेऊन आज परिवहन मंत्री अनिल परब यांनी मोठ्या घोषणा केल्या. यात १० वर्ष सेवेपर्यंतच्या कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारामध्ये पाच हजारांनी तर एकूण पगारामध्ये सात हजार रुपयांनी वाढ करण्याची घोषणा अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत केली. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात ४१% वाढ झाली आहे. १२०८० वेतनावरून १७३९५ एवढी पगारवाढ झाली आहे.
यात पगारवाढीबरोबरच कर्मचाऱ्यांचा पगार १० तारखेच्या आत होईल, अशी घोषणा देखील त्यांनी केली आहे. तसेच ज्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे, ते कामावर हजर झाल्यावर त्यांचे निलंबन रद्द केले जाईल.
परंतु जे हजर होणार नाहीत, त्यांच्यावर शासन कडक कारवाई केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देखील परब यांनी दिला आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी ताबडतोब आपला संप मागे घ्यावा, असे आवाहन अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना केले आहे.
पगारवाढ केल्यामुळे शासनाला दरमहिना ६० कोटीचा अतिरिक्त बोजा स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे एसटी महामंडळासाठी दरमहिना ३६० कोटीचा बोजा शासन स्वीकारत आहे. कोरोनाच्या महामारीमुळे गेली दोन वर्षे एसटी मोठ्या आर्थिक खाईत अडकलेली आहे. त्यामुळे एसटी कामगारांनी आपला संप मागे घेऊन पुन्हा एकदा एसटी पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करावा. विलनिकरणावर विचार करण्यासाठी नेमलेल्या समितीने विलनिकरणाचा मार्ग सांगितल्यास तो राज्य शासनाला मान्य असेल, असेही परब यांनी म्हटले आहे. एसटी कर्मचाऱ्यांबाबतच्या याा निर्णयाबाबत नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. परंतु एसटी कर्मचाऱ्यांमध्ये ही या शासनाच्या निर्णयाबाबत उलटसुलट प्रतिक्रिया उमटत असल्याने विलीनीकरणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत पुन्हा एक वेळ हा संघर्ष सुरूच राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
कळसगादे येथील गायरान खुले करुन बांधकामाची चौकशी करावी – ग्रामस्थांची निवेदनातून जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे मागणी
कळसगादे (ता. चंदगड) येथील ग्रामपंचायत गायरान गट नं. ११९ व इतर गायराने जनावरे चरण्यासाठी त्याचा वापर होता. मागील काही वर्षात २०१५ ते २०२० या कालावधीत गट नं. ११९ मध्ये पदाचा गैरवापर करुन कळसगादे येथील गायरान खुले करुन बांधकामाची चौकशी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनातून जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे केली आहे . सदर गायरानमध्ये पोल्ट्री शेड बांधण्यात आले आहे. लोकांना त्या जमिनीमध्ये गुरे चारण्यासाठी अडवणूक करून धमकी देण्यात येत आहे. सदरील जमिनीची आपल्या स्तरावर चौकशी होवून कळसगादे ग्रामस्थांना न्याय मिळावा व गायरान खुले करून मिळावे अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

खासगी ट्रॅव्हल्सच्या मनमानी कारभाराविरोधात कारवाईची मागणी
एसटी बस बंद असल्याने खासगी बसेसकडून जादा भाडे आकारले जात आहे. तसेच खासगी बस वाहतूक मालकांच्या मनमानी वर्तनामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे प्रवासामध्ये खूप असंतोष आहे. तरी या सर्व खाजगी बस चालकांची बैठक बोलावून शिस्त लावावी अशी मागणी चंदगड केली आहे. याबाबतचे निवेदन एन.एस पाटील, ऍड. संतोष मळविकर, नितीन फाटक यांनी आज पोलीस प्रशासनाला दिले.
चंदगड तालुक्यातून मुंबई, पुणे प्रवासासाठी अनेक खासगी ट्रॅव्हल्सच्या बसेस चंदगड तालुक्यातून कार्यरत आहेत. या बस मालकांच्या मनमानी वर्तनामुळे प्रवाशांना अनेक प्रकारचा त्रास सहन करावा लागत आहे. या सर्व बसेस फिरून गारगोटी मार्गे पुण्या-मुंबईकडे जातात. हा प्रवास खूप त्रासाचा व कंटाळवाणा आहे. शिवाय यासाठी जादा प्रवास भाडे द्यावे लागते. तसेच प्रवासाला वेळ खूप लागत असून बसेस वेळेत पोहोचत नाहीत. कधी उशिरा तर कधी रात्रीअपरात्री पोहचतात. त्यामुळे अनेक अडचणींना प्रवाशांना तोंड द्यावे लागते. तर प्रवास भाडे किती घ्यायचे यावर बंधन नाही. एसटी बसेस बंद असल्याने खाजगी वाहतुकदार खूप जादा भाडे आकारत आहेत. त्यामुळे प्रवाशामध्ये खूप असंतोष आहे. तरी या सर्व खाजगी बस चालकांची बैठक बोलावून शिस्त लावावी अशी मागणी निवेदनातून केली आहे.


अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची ताबडतोब भरपाई द्या: जि.प.उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी यांची मागणी
एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात ४१ टक्क्यांची वाढ;कर्मचाऱ्यांचे निलंबनही रद्द
कळसगादे येथील गायरान खुले करुन बांधकामाची चौकशी करावी – ग्रामस्थांची निवेदनातून जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे मागणी