गुरुवार दि. १९ डिसेंबर २०२४


पतीच्या निधनानंतर महिनाभरातच पत्नीचे निधन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
महिनाभरापूर्वी पतीचे निधन झाल्यानंतर बुधवारी पत्नी लक्ष्मी तुकाराम हवालदार हिचेही निधन झाल्याची घटना पेरणोली ता. आजरा येथे घडली आहे. या विचित्र योगायोगाची चर्चा पेरणोली पंचक्रोशीत आहे.
तुकाराम हवालदार यांचे २० नोव्हेंबर रोजी विधानसभा मतदानादिवशीच निधन झाले होते. या दुःखातून हवालदार कुटुंबीय सावरते न सावरते तोच मंगळवारी लक्ष्मी हवालदार यांचे निधन झाले. निधन समयी त्यांचे वय ७५ वर्षे होते.
त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुली, एक मुलगा, सून, जावई, नातवंडे असा परीवार आहे.

देशाचा आत्मनिर्भर निर्देशांक वाढविण्याची जबाबदारी नवपिढीची :
प्र. कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
साहित्य, कला, संस्कृतीचे सुवर्णयुग ठरलेला भारताचा प्राचीनकाळ समृद्ध आणि संपन्न होता. आता या पार्श्वभूमीवर नवपिढीसमोर विकसित भारत २०४७ चे ध्येय आहे. त्यासाठी भारताचा उज्वल इतिहास समजून घेणे महत्वाचे असून देशाचा आत्मनिर्भर निर्देशांक वाढविण्याची जबाबदारी त्यांची असल्याचे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांनी आभासी माध्यमाद्वारे आजरा महाविद्यालयात आयोजित पाच दिवसीय हिंदितर नवलेखक निवासी कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनता एज्युकेशन संस्था अध्यक्ष अशोकअण्णा चराटी होते.
डॉ पाटील म्हणाले, कोणतीही नवनिर्मिती सकारात्मक आणि शास्वत असली पाहिजे. साहित्यही त्याला अपवाद नाही. समाजाला भेडसावणाऱ्या समस्यांची आणि त्यांच्या निराकरणाची मांडणी लेखनातून झाल्यास देशाचा नवोदय फार दूर नाही. त्याचे तंत्र अशा शिबिरातून नव्या पिढीने आत्मसात करावे.उच्च शिक्षण, संशोधन, साहित्य, कला, क्रीडा आदी क्षेत्रात मुल्यात्मक भरीव कामगिरी करणे ही भारतीय नवलेखक आणि नवसंशोधकांची जबाबदारी मोठी असेल. त्यामुळेच देशाचा आत्मनिर्भर इंडेक्स वाढेल. चीनसारख्या विकसनशील देशानेही या प्रक्रियेतून सुपरपॉवरचे ध्येय गाठले आहे. अशा प्रकारच्या उपक्रमांतून क्वालिटी एज्युकेशन आणि ट्रांस्फॉर्मेशन ऑफ एज्युकेशन घडविन्यासाठी प्रयत्नशील राहा, असे आवाहनही त्यांनी केले.
प्रास्ताविकात निदेशालयाचे सहायक निदेशक रत्नेश मिश्र म्हणाले साहित्य केवळ समाज दर्पण नाही, तर ते वैश्र्विक मूल्य मांडणी करणारे परिवर्तनाचे साधन आहे. म्हणूनच असे जगभरातील रचनाकार देश आणि भाषा ओलांडून अजरामर झाले आहेत. यासाठीची प्रेरणा या शिबिरातून आपणास निश्चित मिळेल. श्री चराटी यांचेही भाषण झाले.
स्वागत डॉ. अशोक बाचुळकर यांनी केले. या शिबिरात महाराष्ट्र, दिल्ली, केरळ, गोवा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या ठिकाणाहून नवलेखक सहभागी झाले. वरिष्ठ रचनाकार श्याम नंदन, डॉ. महेंद्र ठाकूर, शिबिर संयोजक रत्नेश मिश्र, सीईओ डॉ. अनिल देशपांडे, विजयुमार पाटील, के. व्ही. येसणे, माजी नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, प्राचार्य डॉ.अशोक सादळे, योगेश पाटील, आय.के. पाटील, प्रा. मनोज पाटील,प्रा. दिलीप भालेराव आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन तेजस्विनी पाटील यांनी तर आभार संजीवनी कांबळे यांनी मानले.

नगरपंचायतीचे फिरते शौचालय एकाच जागी सडते आहे…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा नगरपंचायतीने आठवडा बाजारासह जेथे सार्वजनिक शौचालय नाही व शौचालयाची गरज आहे अशा ठिकाणी आवश्यक म्हणून तैनात करण्यात आलेले फिरते शौचालय एकाच जागी उभे असून वापरा अभावी हे शौचालय भंगारात जाण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे.
गांधीनगर येथील पंप हाऊसच्या ठिकाणी हे फिरते शौचालय गेले कित्येक दिवस एकाच ठिकाणी उभे आहे. ही सुविधा वापरासाठी आहे की शोभेसाठी असा सवालही आता उपस्थित होत आहे. 
पं. दीनदयाळ विद्यालय येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पंचायत समिती शिक्षण विभाग आजरा व पंडित दीनदयाळ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा यांच्या संयुक्त विद्यमाने ५२ वे ‘शाश्वत भविष्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान ‘ या विषयावर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन दिनांक २३ व २४ डिसेंबर २०२४ रोजी पंडित दीनदयाळ हायस्कूल येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती मुख्याध्यापक संजीव देसाई यांनी दिली.
मंगळवार दिनांक २३ डिसेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता नाम. प्रकाशराव आबिटकर यांच्या हस्ते व प्रा. डॉ. सुधीर मुंज यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी शिवराज महाविद्यालयाचे प्रा. गौरव पाटील, तहसीलदार समीर माने, गटविकास अधिकारी संजय ढमाळ यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पारितोषिक वितरण व समारोप समारंभ नाम. हसन मुश्रीफ, आम. शिवाजीराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार दिनांक २४ डिसेंबर रोजी दुपारी ३-०० वाजता होणार आहे.
दोन दिवसाच्या या कालावधीमध्ये ग्रंथ प्रदर्शन,प्राथमिक अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्य, माध्यमिक अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्य, प्रयोगशाळा सहाय्यक व परिचरनिर्मित शैक्षणिक साहित्य उद्घाटन, विज्ञान प्रश्नमंजुषा याच्यासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचेही मुख्याध्यापक देसाई यांनी सांगितले.

आजरा तालुका सेवानिवृत्त प्राथ. शिक्षक संघटनेचे ३० वे वार्षिक अधिवेशन उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुका सेवानिवृत्त प्रा शिक्षक संघटनेचे ३० वे वार्षिक अधिवेशन आनंदराव नादवडेकर प्राथमिक शिक्षक पतसंस्था आजरा येथे उत्साहात पार पडले . अध्यक्षस्थानी आजरा साखर कारखान्याचे माजी संचालक मारूती देसाई (भादवण) हे होते .
कार्यक्रमास ज्येष्ठ सेवानिवृत्त मनोहर नाईक, शिवाजी बिरजे,शिवाजी पंडित,आजरा साखर कारखान्याचे संचालक शिवाजी नांदवडेकर, गडहिंग्लज तालुका सेवानिवृत्त संघटनेचे सचिव सदाशिव कवणेकर व आजरा तालुक्यातील सेवानिवृत्त शिक्षक उपस्थित होते.
मान्यवरांचे हस्ते प्रतिमा पुजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. शिवाजी गिलबिले यांनी स्वागत केले. त्यानंतर प्रास्ताविकातून वर्षभरात संघटनेने सेवानिवृत्त शिक्षकांच्या आर्थिक प्रश्नांचा पाठपुरावा व अनेक समस्या निरसन कसे केले याचा आढावा संघटना अध्यक्ष विष्णु मोरे यांनी घेतला.
संघटनेच्या वतीने ७५ वर्षे पुर्ण झालेल्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. तसेच या सालात सेवानिवृत झालेल्या २० शिक्षकांचे संघटनेत सामील झालेबद्दल स्वागत करण्यात आले. त्यानंतर सेवानिवृती नंतरचे आर्थिक प्रश्न , सेवापुस्तक अपडेट , निवडश्रेणी प्रस्ताव अशा विविध विषयावर निर्मळकर यांनी मार्गदर्शन केले . त्याचबरोबर ‘ सेवानिवृती नंतरचे जीवन कसे जगावे ‘ याविषयी माजी मुख्याध्यापिका सौ. रजपुत यांनी विचार मांडले. सचिव जनार्दन पाटील यांनी संघटनेचा वार्षिक अहवाल व संघटनेने केलेल्या सेवापुस्तक नामावली,सेवानिवृत्त माहिती रजिस्टर, थकित आर्थिक रक्कम प्राप्त,निवड श्रेणी,कुटुंब निवृत्ती वेतन,वयानुसार वाढीव पेन्शन प्रस्ताव,अपंग पेन्शन इ.कार्याचा आढावा सादर केला. या पुढील काळात संघटनेचे शिक्षक भवन उभारण्यासाठी सर्व सेवानिवृत्तांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले सुभाष केसरकर , म्हंकाळी चौगले , प्रकाश देऊसकर ,बंडु पाटील , शिवाजी गिलबिले , मारुती वरेकर , संभाजी पाटील ,बाळासाहेब पाटील ,रघुनाथ येसणे , भिमराव कोरवी , सिंधु माळवकर , सुचिता लाड ,शीला देसाई अधिवेशन यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एकनाथ गिलबिले यांनी केले तर मारुती वरेकर यांनी आभार मानले .

निधन वार्ता
सचिन सावंत

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गणपत गल्ली, आजरा येथील सचिन रामचंद्र सावंत (वय ४० वर्षे) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी व भाऊ असा परिवार आहे.
येथील भगवा रक्षक तरुण मंडळाचे ते कार्यकर्ते होत.
महत्त्वाच्या हेडलाईन…
♦ माजी मंत्री छगन भुजबळ भाजपाच्या वाटेवर …?
♦ मुंबईत नौदलाची स्पीड बोट प्रवासी बोटीला धडकून १३ ठार
♦ कांचनताई परुळेकर यांना रत्नमाला घाळी नारी शक्ती पुरस्कार जाहीर
♦ आर.अश्विनची क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
♦ सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी चौथ्या आरोपीला अटक





