दि. २९ सप्टेबर २०२४


शाळा अंगलट आली…
गुन्हाही नोंद झाला… ऐंशी हजारांचा गांजाही गेला…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सूडबुद्धीने एकाला अंमली पदार्थ विरोधी गुन्ह्यामध्ये अडकवण्यासाठी चाललेले प्रयत्न चौघांच्या अंगलट आले. याप्रकरणी हे प्रयत्न करणाऱ्या चौघांविरोधातच गुन्हा नोंद तर झालाच परंतु ८० हजाराचा गांजा देखील पोलिसांना फारसे कष्ट न घेता ताब्यात घेण्यात यश आले. आता चौकशीचा ससेमिरा या चौघांच्या मागे लागला आहे
याप्रकरणी पोलिसातून मिळालेली माहिती अशी…
उत्तुर – जखेवाडी मार्गावर विश्वनाथ आनंद रायकर (वय ३४, रा. शिप्पूर तर्फ आजरा), प्रवीण सुभाष भाटले (वय ३२ रा. करंबळी, तालुका गडहिंग्लज), अभिषेक गजानन जाधव (वय २२ वर्षे राहणार शिप्पूर तर्फ आजरा तालुका गडहिंग्लज) व अविनाश गजानन जाधव ( रा. शिप्पूर तर्फ आजरा तालुका गडहिंग्लज) या चौघानी पांडुरंग हरी गुरव या बटकणंगले ता. गडहिंग्लज या ५३ वर्षीय व्यक्तीस अंमली पदार्थ विरोधी गुन्ह्यात अडकवण्याच्या हेतूने त्याच्याकडे ८० हजार १०० रुपये किमतीचा गांजा असलेली सॅक दिली. त्यानंतर त्यांनी पोलिसांना गुरव यांच्याकडे अंमली पदार्थ असल्याची माहिती पुरवली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी गुरव यांना ताब्यात घेऊन जागेची सॅकची झडती घेतली असता त्यामध्ये गांजा आढळून आला. परंतु पोलिसांनी अधिक चौकशी करता गुरव यांना अंधारात ठेवून त्यांना गुन्ह्यात अडकवण्यासाठी संगनमताने सदर बनाव केल्याचे उघडकीस आले.
पोलिसांनी याबाबत विश्वनाथ रायकर, प्रवीण भाटले, अभिषेक जाधव व अविनाश जाधव यांच्या विरोधात विश्वनाथ विलास देवलकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद केला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर पुढील तपास करीत आहेत.
अशी झाली शाळा…
अभिषेक जाधव याने उत्तूर हायस्कूल पासून थोड्या अंतरावर मोटरसायकल ठेवून गुरव यांच्याकडे आपल्याकडील गांजा असलेली सॅक देऊन जरा ती सांभाळा आपण प्रवीण भाटले याला घेऊन लगेच येतो असे सांगून तो बाजूला झाला. दरम्यान अभिषेक याने विश्वनाथ रायकर याच्या माध्यमातून पोलिसांना गुरव यांच्याकडे असलेल्या सॅकमध्ये अंमली पदार्थ असल्याची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने गुरव यांना ताब्यात घेतले पण हा सर्व प्रकार पोलिसांना संशयास्पद वाटल्याने त्यांनी कसून चौकशी केली असता सर्व सत्य प्रकार उघड झाला. गुरव यांनी संबंधितांकडून दाम दुप्पटीच्या अमिषाने मोठ्या रकमा घेतल्या व त्या परत न केल्याच्या रागापोटी चौघांनी सदर प्रकार केल्याचे पुढे येत आहे.

जीवनात सत्व, तत्व ठेवलं तर अस्तित्व ठळक होते : सागर बगाडे
युवा महोत्सवाचे दणक्यात उद्घाटन
. आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
हार जीत सगळीकडं असते. हार झाली म्हणून हताश होवून जावू नका. सातत्य, जिद्द, चिकाटी, निष्ठा, परिश्रम व अभ्यास याच्या जोरावर जिंकता येतं. जीवनात सत्व, तत्व ठेवलं तर अस्तित्व ठळक होत. युवा महोत्सव हेच शिकवते. असा सल्ला राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त कला शिक्षक सागर बगाडे यांनी विद्यार्थी कलाकारांना दिला.
येथील आजरा महाविद्यालयात चव्वेचाळीसाव्या मध्यवर्ती युवा महोत्सवाचे आज थाटात उद्घाटन झाले. श्री. बगाडे यांचे उद्घाटकीय भाषण झाले. शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे प्रमुख पाहूणे तर जनता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक चराटी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात शिवाजी विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या कोल्हापुर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील जवळपास दोनशे महाविद्यालयांमधील विद्यार्थी सहभागी झाले आहेत. ३५ वेगवेगळ्या कलाप्रकारांमध्ये ही स्पर्धा होत आहे.

आजरा महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. अशोक सादळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कुलसचिव डॉ. शिंदे म्हणाले, या स्पर्धेत भाग घेतलेल्या कलाकारांनी मन प्रफुल्लीत ठेवून व अंतकरणापासून कला सादर करावी. आपल्याकडील सर्वोत्कृष्ट ते द्यावे. कलाही आयुष्यभर साथ देते. पूर्वीपेक्षा सध्या तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने स्पर्धा वाढली आहे. स्वतःबरोबर महाविद्यालयाचे, गावाचे नाव मोठ करण्यासाठी धडपडावे. यातून अनेक कलाकार घडले. ऑस्कर पर्यंत जाण्यासाठी प्रयत्न करावेत. विद्यार्थी विभागाचे प्रभारी संचालक प्रा. टी. एम. चौगले म्हणाले, कला गुणांना वाव देण्यासाठी, कल्चर टॅलेंट पुढे नेण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन होते. श्री. चराटी यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी शिवाजी विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. डॉ. आर. डी. ढमकले, ॲड, स्वागत परुळेकर, पी. टी. गायकवाड, सुरेखा आडके, विनोद ठाकूर देसाई, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनिल देशपांडे, सचिव रमेश कुरुणकर, आजरा सूतगिरणीच्या अध्यक्षा अन्नपुर्णादेवी चराटी, माजी नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, डॉ. दीपक सातोसकर, सुरेश डांग,ॲड.सचिन इंजल, विजयकुमार पाटील,आय.के.पाटील यांच्यासह संचालक, सल्लागार, विद्यापीठातील मान्यवर, विविध महाविद्यालयाचे प्राचार्य उपस्थित होते. प्रा. डॉ. अशोक बाचुळकर यांनी सुत्रसंचालन तर युवा महोत्सवाचे समन्वयक प्रा. डॉ. आनंद बल्लाळ यांनी आभार मानले.
आजचे कार्यक्रम…


पोळगाव येथून गोवा बनावटीच्या दारू जप्त. : एका विरोधात गुन्हा नोंद

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पोळगाव, ता. आजरा येथे विक्रीच्या उद्देशाने गोवा बनावटीची दारू जवळ बाळगल्या प्रकरणी पोलिसांनी बंडू तुकाराम सुतार ( वय ५०, रा. पोळगाव ता. आजरा) याला रंगेहात पकडून त्याच्याकडून विविध कंपन्यांची दहा बॉक्स दारू ताब्यात घेऊन गुन्हा नोंद केला आहे.
या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर, पोलीस उपनिरीक्षक शंकर कळकुटे, अनिल सरंबळे, विक्रम लाखे, विशाल कांबळे, सूर्यकांत सुतार यांनी भाग घेतला.

आजऱ्यात ग्रामपंचायत संघटनेकडून काम बंद आंदोलन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यात ग्रामपंचायत संघटनेने आपल्या विविध मागण्यांसाठी आज सोमवार (ता. ३०) पासून काम बंद आंदोलनाला पुकारले आहे. याबाबतचे निवेदन कोल्हापुर जिल्हा ग्रामपंचायत कामगार संघ, आजरा यांच्यावतीने आजरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना दिले आहे.
निवेदनात म्हंटले आहे, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करावी. ५४ महीन्याचा वेतनाचा फरक लागू करावा. वसुलीची अट रद्द करावी, दहा ऑगस्ट २०२० ला मान्य केलेल्या वाढीव किमान वेतन मार्च २०१८ पासून लागू करावे. त्याचा वरील फरक मिळावा. यासह विविध चौदा मागण्या करण्यात आल्या आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापुर, सरपंच परिषद यांना निवेदन दिले आहे. अध्यक्ष अशोक गेंगे, उपाध्यक्ष तुकाराम कांबळे, सचिव काशिनाथ कुंभार, सदस्य राजू कोकीतकर, गणपतराव कडाकणे यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.
अखिल भारतीय सरपंच परिषदेचे पाठिंबा...
ग्रामपंचायत संघटनेच्या आंदोलनाला अखिल भारतीय सरपंच परिषदेने पाठिंबा दर्शवला आहे. सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायतीच्या मागण्याबाबत ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेन पाठिंबा दिला होता. त्यानुसार पाठिंबा दिल्याचे अखिल भारतीय सरपंच परिषदेचे आजरा तालुका अध्यक्ष संजय पाटील यांनी सांगीतले.

वाटंगी येथील गिलबिले कुटुंबीयांकडून शाळेला साऊंड सिस्टीम

आजरा मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वाटंगी येथील ज्येष्ठ नागरिक कै.जानबा रामू गिलबिले यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त पारंपारिक कार्याला फाटा देत गिलबिले कुटुंबीयांनी प्राथमिक शाळेला साऊंड सिस्टिम भेट देऊन वडिलांच्या स्मृती अनोख्या पद्धतीने जपण्याचा एक आदर्श समाजासमोर घालून दिला . शाळेविषयी असणारी आपुलकी व ऋणानुबंध जपण्याचा त्यांनी प्रयत्न केला .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना सरपंच संजय पवार म्हणाले , “आज वृद्धाश्रम संस्कृतीमुळे घरातील आई वडील वृद्धापकाळामुळे अडगळीचे ठरत आहेत . काही जण त्यांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवतात किंबहुना त्यांना घरातच वेगळ्या पद्धतीची वागणूक देऊन अनादर करतात अशावेळी गिलबिले कुटुंबीयांनी निर्माण केलेला एकत्र कुटुंब पद्धतीचा आदर्श आज समाजाने घेण्याची गरज आहे त्याच जाणिवेतून आपल्या वडिलांच्या स्मृती चिरंतन जपण्यासाठी शाळेला भेट वस्तू दिली ही एक कौतुकास्पद व प्रेरणादायी गोष्ट आहे .
स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक सुनील कामत यांनी केले . यावेळी अनिल तेजम,शिवाजी गिलबिले , मधुकर जाधव ,शंकर गिलबिले आदींनी कै. जानबा गिलबिले यांच्या आठवणी सांगितल्या . कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य स्वाती गुरव, इंदुबाई कुंभार, मनीषा बिरजे, सदस्या शितल बिरजे, प्रमिला कुंभार , नंदा पारसे , अनिता जाधव ,रेखा देवलकर,अर्जुन नांदवडेकर , महादेव कसलकर, यशवंत कांबळे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन रंजना हसुरे यांनी केले तर आभार अनुजा केने यांनी मानले .


(Advt.)
लवकरच आपल्या सेवेत… आजच ॲडव्हान्स बुकिंग करा..
तुमच्या स्वप्नातील घर, तुमच्या बजेटमध्ये…”आपलं घर* ” शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सर्व सोयीनीयुक्त…
✅ शाळा, कॉलेज, बॅंका , स्टँड, हॉस्पिटल, होटेल्स, भाजी मार्केट, पेट्रोल पंप, मेन मार्केट फक्त 2 मिनिटांवर
✅ 1 आणि 2 BHK फ्लॅट्स
✅ इतर अनेक सुविधा
🏡साईटचा पत्ता :
समर्थ कृपा रेसिडेन्सी , भगवा रक्षक चौक, सोमवार पेठ, दत्त मंदिरा समोर, आजरा
☎️ संपर्क –
+91 9527 97 3969



