दि. १९ सप्टेबर २०२४


शॉर्ट सर्किटने आग…
दोन म्हैशी जखमी तर गोठा भस्मसात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरातील आमराई गल्ली येथे बुधवारी दुपारी शॉर्टसर्किटने इमाम नालबंद यांच्या गोठ्याला आग लागून गोठा आगीच्या भक्षस्थानी पडण्याबरोबरच दोन म्हैशीही जखमी झाल्या आहेत. नगरपंचायतीच्या अग्निशमन विभागाकडून आग विझवण्यासाठी प्रयत्न केले गेले.
दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास गोठ्याच्या वरील बाजूस असणाऱ्या विद्युत वाहिनीच्या तारांमध्ये अचानक शॉर्टसर्किट झाल्याने आगीच्या ठिणग्या गोठ्यावर पडून गोठ्याने पेट घेतला असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.गोठ्यामध्ये वाळलेले गवत असल्याने बघता बघता गोठा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. अमित खेडेकर व स्थानिक मंडळींनी तातडीने गोठ्यातील जनावरे इतरत्र हलवली. दरम्यान दोन म्हैशी जखमीही झाल्या आहेत.
आगीमध्ये सुमारे एक लाख रुपयांची नुकसान झाले आहे.

‘मृत्युंजय’कारांना अभिवादन…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
‘मृत्युंजय’ कार शिवाजीराव सावंत यांच्या स्मृतिदिनानिमित्त श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन व मृत्युंजयकारांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक अण्णा चराटी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, जनता बँकेचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई, डॉ. अंजनी देशपांडे, डॉ. अशोक बाचूळकर, पत्रकार ज्योतिप्रसाद सावंत, सुनील पाटील आदींच्या हस्ते सदर कार्यक्रम पार पडला.
याप्रसंगी संभाजीराव इंजल, विनायक अमनगी, रवींद्र हुक्केरी,आय. के. पाटील, सुभाष विभूते,सौ.गीता पोतदार ,सौ.विद्या हरेर,चंद्रकांत कोंडुसकर, मधुकर खवरे,विठोबा चव्हाण, विजय राजोपाध्ये, तातूअण्णा बटकडली, निखिल कळेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
नावलकर सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

बांबूचे अर्थकारण शेतकऱ्यांनी समजावून घ्यावे : समीर माने
आजरा महाविद्यालयात बांबू दिन, शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
बांबूचे पर्यावरणीय व सांस्कृतिक महत्व मोठे आहे. बांबूतून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांनी बांबूचे अर्थकारण समजावून घ्यावे. असे आवाहन तहसीलदार समीर माने यांनी केले.
येथील आजरा महाविद्यालयामध्ये आज पंधरावा जागतिक बांबू दिवस साजरा झाला. यानिमित्त शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात तहसीलदार माने यांनी मार्गदर्शन केले. कोल्हापुरच्या प्रकल्प संचालक (आत्माच्या) श्रीमती रक्षा शिंदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. अण्णा भाऊ संस्था समुहाचे प्रमुख अशोक चराटी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. गटविकास अधिकारी संजय ढमाळ, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, बांबू तज्ज्ञ अरुण वांद्रे, आशपाक मकानदार आदी उपस्थित होते.

मल्लिकार्जुन शिंत्रे यांनी स्वागत केले. बांबू अभ्यासक सतीश कांबळे यांनी प्रास्ताविक केले. श्री. चराटी म्हणाले, बांबूचे महत्व शेतकऱ्यांनी समजावून घ्यावे. बांबूच्या संस्थांसाठी आवश्यक ते आर्थिक सहकार्य केले जाईल. शेतकरी वसंत तारळेकर म्हणाले, बांबूबाबत शेतकऱ्यात गैरसमज आहेत. ते दूर करून बांबूचे क्षेत्र वाढीसाठी प्रयत्न करावे लागतील. श्रीमती शिंदे म्हणाल्या, बांबू उत्पादक शेतकऱ्यांना शासनाकडून आवश्यक ती मदत करू.
या वेळी आजरा अर्बन बँकचे अध्यक्ष रमेश कुरुणकर, डॉ. अनिल देशपांडे, प्राचार्य डॉ. अशोक सादळे, पेरणोलीच्या सरपंच सौ. प्रियांका जाधव, राजेश चौगले, योगेश पाटील, महादेव पोवार, विजयसिंह दळवी, जी. एम. पाटील, इंद्रजीत देसाई, डॉ. रणजित पोवार, टी. एस. गडकरी, बाबासाहेब पाटील, धनाजी राणे,सौ. सुनिता कालेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
रणजित कालेकर यांनी आभार मानले.

२७ सप्टेंबर रोजी आजरा आगारात प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिनाचे आयोजन

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा आगारामध्ये २७ सप्टेंबर रोजी प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रवासी व कामगार यांच्या समस्यांचा स्थानिक पातळीवर निपटारा करण्याच्या पार्श्वभूमीवर सदर उपक्रम राबवला जाणार आहे.
या दिवशी प्रवाशांच्या लेखी तक्रारी स्वीकारल्या जातील व त्यावरील उपाय योजनां बाबत विभाग नियंत्रण आदेश देखील, तर याच दिवशी एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यक्तिगत अथवा संघटनात्मक समस्या ऐकून घेऊन त्यावर तातडीने योग्य ती कार्यवाही केली जाईल. प्रवासी व कर्मचाऱ्यांनी आपल्या तक्रारी व समस्या लेखी स्वरूपात द्याव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.

आजरा केमिस्ट असोसिएशन कडून शैक्षणिक साहित्य वाटप

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा केमिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी यांच्याकडून राज्य संघटक सचिव आणि कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मदन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आजरा तालुक्यातील दुर्गम भागातील विद्या मंदिर गणेशवाडी या शाळेच्या विद्यार्थ्यांना वह्या,पेन,कंपासपेटी,रंगपेटी अशा प्रकारचे साहित्य वाटप करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे संचालक संजय हरेर,आजरा तालुका केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष अमर पाटील,उपाध्यक्ष महादेव घोरपडे,सचिव इरफान सय्यद,खजिनदार दयानंद गिलबिले,सदस्य विजय मोदर,अंथोन नोरेन आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा श्रीमती सुषमा धुमाळे आदी उपस्थित होते.
आभार मुख्याध्यापक सुरेश देशमुख यांनी मानले.





