mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

दि. १८ सप्टेबर २०२४


आजरा तालुक्यात भावपूर्ण वातावरणात बाप्पांना निरोप…

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा शहरासह तालुक्यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मुर्त्यांचे विसर्जन भावपूर्ण वातावरणात करण्यात आले. विसर्जन मिरवणुकांमध्ये विविध पारंपारिक कार्यक्रमांसह संगीत व आतषबाजीला प्राधान्य देण्यात आले.

      आजरा शहरातील प्रथम मूर्ती विसर्जनाचा मान नेहमीप्रमाणे यावर्षीही रवळनाथ मंदिर परीसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पटकावला.

      जय शिवराय गणेशोत्सव मंडळासह भाजी मंडई गणेशोत्सव मंडळ, लिंगायत गल्ली मंडळ, सुभाष चौक गणेश उत्सव मंडळ या विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

     शिवाजीनगर घाट परिसरामध्ये रात्री उशिरापर्यंत गणेश मूर्त्यांचे विसर्जन करण्यात येत होते.

      मिरवणूक कालावधीमध्ये गृहरक्षक दलाचे जवान व पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी तालुक्यात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.‌

आज-यात सलून व्यावसायिक आक्रमक…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     आजरा शहरामध्ये परप्रांतीय सलून कामगार आणून नाभिकेतर समाजातील मंडळी सलून दुकाने चालू करत आहेत यामुळे
तालुक्यात पिढ्यानपिढ्या वडीलोपार्जीत
बलुतेदार पध्दतीने गावोगावी नाभिक बांधव व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा वर्ग अडचणीत येत असल्याने या प्रश्नी तालुक्यातील स्थानिक सलून व्यावसायिक आक्रमक झाले आहेत.

      आजरा शहरांमध्ये गेल्या काही दिवसात परप्रांतीय कामगार आणून दुकाने सुरू करण्यात आली आहेत .यामुळे स्थानिक सलून व्यवसाय करणार याचा जबर फटका बसत असून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. परप्रांतीय सलून कारागिरांना शहरात कदापिही स्थान दिले जाणार नाही. याबाबत तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा आजरा तालुका नाभिक समाजाचे अध्यक्ष गौतम भोसले यांनी दिला आहे.

      या प्रश्नी सलून व्यावसायिकांची बैठक आयोजित करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. बैठकीमध्ये या विषयावर सविस्तर चर्चा होऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.

सोहाळे येथे वृक्षलागवड उपक्रम

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या सौजन्याने सोहाळे येथे वृक्षलागवड उपक्रम पार पडला .

      महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यामधील आज-याजवळील सोहाळे ( सोहाळेवाडी) येथे डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी, रायगड भूषण डॉ. सचिनदादा दत्तात्रय धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे ३३० वुक्ष लागवड करण्यात आले.

      सध्या सर्वत्र जागतिक तापमान वाढीचा प्रश्न भयानक पद्धतीने वाढत आहे ज्यामुळे संपूर्ण निसर्ग चक्र बदलत आहे त्यामुळे सर्वत्र असमाधान तसेच शारीरिक आजार उत्पन्न होत आहे ज्यामुळे सर्वत्र प्रदूषण होत असून त्यावर उपाय योजना करणे गरजेचे आहे याचाच विचार करून या समस्येवर उपाय म्हणुन डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे संपूर्ण जगभरात खुप मोठ्या प्रमाणत वृक्ष लागवड तसेच वृक्ष संवर्धन करण्यात येत आहे, त्याचाच एक भाग सोहाळे येथे वृक्ष लागवड व संवर्धन हा उपक्रम राबवण्यात आला आहे.

       संपूर्ण झाडांना टॅग नंबर दिला आहे
 वृक्ष लागवड केलेली संपूर्ण झाडे ग्रामपंचायतीला सुपूर्द करण्यात आली आहेत.शास्त्रीय पद्धतीने वृक्ष लागवड करण्यात आली. यामध्ये सेंद्रिय पद्धतीने जांभूळ, करंज, चेरी ईत्यादी वृक्ष लावण्यात आले आहेत.

      या उपक्रमासाठी सोहाळे गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ. भारती डेळेकर, श्री. वसंत कोंडूसकर (उपसरपंच), व ग्रामपंचायत सदस्य व नागरिक उपस्थित होते. त्याचप्रमाणें सुमारे १२० श्री सदस्य आजरा, निपाणी, संकेश्वर, गडहिंग्लज, नेसरी, कणगला इत्यादी ठिकाणाहून सहभागी झाले होते.

बैठक ‘गोपनीय ‘…
पण  चर्चा ‘गावभर.’..?

             आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       आता विधानसभा निवडणुकांचे नगारे वाजू लागले आहेत म्हटल्यावर आजरा तालुक्यातील ‘त्यांच्या समूहाची ‘ लॉबी सक्रिय होणे स्वाभाविक आहे.

     यापूर्वीही त्यांच्या अनेक गोपनीय (?) बैठका पार पडल्या. तशीच बैठक नुकतीच वरच्या मजल्यावर (?) चार भिंतीच्या आत पार पडली आणि नेहमीप्रमाणे बैठक संपण्यापूर्वीच या ‘गोपनीय’ बैठकीत झालेल्या सर्व चर्चेचा वृत्तांत चौका -चौकामध्ये ऐकावयास मिळत होता.

     ‘त्यांच्या ‘ विषयी बैठकीत उलट- सुलट चर्चा केलेली मंडळी मात्र या सर्व प्रकारामुळे चांगलीच धास्तावली आहेत. कारण बैठक संपते न संपते तोच ज्यांच्या संदर्भात बैठक होती ते नेते थेट ‘ गडा ‘ वरुन वरच्या मजल्यावर हजर झाले. म्हणजे निश्चितच नेत्यांच्या कानापर्यंत या गोपनीय बैठकीचा इतिवृत्तांत पोहोचला हे सांगण्याची गरज नाही.

     आता तो कसा पोहोचला याचा शोध घेण्याचे नवे आव्हान स्थानिक नेत्यासमोर आहे.

कोरोनानंतर आता या महामारीचा जगाला धोका !

४ कोटी जणांचा मृत्यू होण्याची भीती !


     चीनच्या वुहान शहरातून जगभर पसरलेल्या कोरोना व्हायरसचा (Corona Virus) संहार साऱ्या जगानं अनुभवला आहे. या आजारानं सर्व जग ठप्प केलं. कित्येकांचा जीव गेला. तसंच जगातील प्रत्येक क्षेत्रावर कोरोनाचा परिणाम झाला. कोरोनाच्या तडाख्यानंतर जग आता सावरत आहे. त्यातच आणखी एका आजाराची भीती वैद्यानिकांनी व्यक्त केली आहे.

      ‘सुपरबग’ असे या नव्या महामारीचे नाव आहे. ज्या बॅक्टेरियांवर अँटी-बायोटिक औषधांचाही परिणाम होत नाही. त्यांना सुपरबग असं म्हणतात. याबाबतच्या ताज्या संशोधनानुसार पुढच्या २५ वर्षांमध्ये (२०५० पर्यंत) या आजारामुळे जगभरात ४ कोटी जणांचा मृत्यू होऊ शकतो. या आजारावर आत्तापासूनच संशोधन केलं नाही, तर याचे आणखी गंभीर परिणाम होतील, अशी भीती या संशोधनात व्यक्त करण्यात आलीय. ‘द लॅसेंट’ जर्नलच्या रिपोर्टनुसार सुपरबगमुळे १९९० ते २०२१ या कालावधीमध्ये १० लाख जणांचा मृत्यू झाला आहे.

      सुपरबगमुळे १९९० ते २०२१ या कालावधीमध्ये ७० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांच्या मृत्यूच्या प्रमाणात ८० टक्के वाढ झाली आहे. २०२१ साली तर हे प्रमाण दुप्पट झाले आहे. त्यावरुन हे संक्रमण किती जीवघेणे आहे, याचा अंदाज येऊ शकेल.

      ‘सुपरबग’ च्या जागतिक प्रभावाचा मागोवा घेऊन पुढे काय होऊ शकते याचा अंदाज व्यक्त करण्यासाठी पहिल्यांदाच या प्रकारचे संशोधन करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये नवजात मुलांमध्ये या आजाराचे संक्रमण होण्याच्या प्रमाणत घट झाल्याची माहिती या अहवालात देण्यात आलीय. पण, मुलांमध्ये हे संक्रमण झालं तर ते रोखणे अतिशय अवघड असेल, असा इशाराही यामध्ये देण्यात आला आहे.

         २०४ देशांमधील ५२ कोटी लोकांच्या वैयक्तिक माहितीच्या आधारे हे संशोधन करण्यात आले आहे. २०५९ पर्यंत सुपरबगमुळे होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणात ६७ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. या जीवघेण्या संक्रमणापासून रोखण्यासाठी आत्तापासूनच प्रभावी उपाय करणे आवश्यक आहे. आत्तापासून सर्व प्रकारचे प्रयत्न झाले तर २०५० पर्यंत ९ कोटी २० लाख जणांचा जीव वाचवता येईल, असं या अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

( News source:online news service )


 

 

संबंधित पोस्ट

Breaking News

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

वाघाच्या हल्यात बैल ठार

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!