mrityunjaymahanews
अन्य

BREAKING

दि. २३ सप्टेबर २०२४


सरपंच व उपसरपंचांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, राज्य मंत्रिमंडळाने सरपंच आणि उपसरपंचांच्या मानधनात दुपट्या वाढीचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ग्रामविकास विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या निर्णयामुळे सरपंच आणि उपसरपंचांचे मानधन लोकसंख्येच्या वर्गीकरणानुसार वाढवले जाणार आहे, ज्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रोत्साहन मिळेल.

      ग्रामपंचायतींच्या लोकसंख्येनुसार, 2000 पर्यंतच्या लोकसंख्येस असलेल्या सरपंचांचे मानधन 3000 रुपयांवरून 6000 रुपयांवर पोचेल, तर उपसरपंचांचे मानधन 1000 वरून 2000 रुपये करण्यात येईल. त्याचप्रमाणे, 2000 ते 8000 लोकसंख्या असलेल्या सरपंचांचे मानधन 4000 रुपयांवरून 8000 रुपयांपर्यंत वाढेल, आणि उपसरपंचांचे मानधन 1500 वरून 3000 रुपयांपर्यंत वाढवले जाईल. याशिवाय, 8000 पेक्षा जास्त लोकसंख्येच्या ग्रामपंचायतींमध्ये सरपंचांचे मानधन 5000 वरून 10000 रुपये करण्यात येईल, तर उपसरपंचांचे मानधन 2000 वरून 4000 रुपये होईल. या निर्णयामुळे राज्यावर वर्षभरात 116 कोटी रुपयांचा आर्थिक भार पडेल.

      याशिवाय, मंत्रिमंडळाने ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी यांना एकच पद म्हणून मान्यता दिली आहे. यामुळे प्रशासनिक कार्यक्षमता वाढणार असून, या दोन्ही पदांचा कार्यभार एकत्रितपणे हाताळला जाईल. याशिवाय, मंत्रिमंडळाने ग्रामपंचायतींना 15 लाख रुपयांपर्यंतच्या विकासकामांसाठी एजन्सी म्हणून काम करण्यास मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे ज्या ग्रामपंचायतीचे वार्षिक उत्पन्न 75,000 रुपये आहे, त्या ग्रामपंचायतींना 10 लाखांपर्यंतची कामे करण्याची परवानगी मिळेल.

ग्रामसेवक बनणार ग्राम विकास अधिकारी…

     ग्रामसेवकांचे पदनाम बदलून यापुढे ग्रामसेवक हे ग्रामविकास अधिकारी या नावाने ओळखले जाणार आहेत.

राजकारणाचा ‘कचरा’

 


कचरा व पाणी प्रश्नी
अन्याय निवारण समितीचे आज आंदोलन…

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

        आजरा नगरपंचायत कार्यक्षेत्रात कचरा उठाव यंत्रणेचा उडालेला बोजवारा व शहरवासीयांकडून उमटत असणाऱ्या संपर्क प्रतिक्रिया यामुळे कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून ऐन नगरपंचायत निवडणुकीच्या तोंडावर राजकारणाचाच ‘कचरा’ झाल्याचे पहावयास मिळू लागले आहे.

         गेले तीन महिने कचरा उठाव यंत्रणा व कित्येक दिवसापासून पाणीपुरवठा वेळापत्रक कोलमडल्याने शहरांमध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचू लागले आहेत. डेंग्यू मलेरिया, विषमज्वर यासारख्या आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. तर दुसरीकडे पाणीपुरवठाही विस्कळीत झाला आहे. यामुळे साहजिकच शहरवासीयांच्या तक्रारीत वाढ झाली असल्याने अन्याय निवारण समितीने कचरा उठावसह पाणीपुरवठ्याचा प्रश्न हाती घेतला आहे. यासंदर्भात नगरपंचायती विरोधात आंदोलनाचा एक भाग म्हणून आज सोमवारी शहरातील कचरा नगरपंचायतीसमोर आणून टाकण्याचे अनोखे आंदोलन हाती घेतले आहे.

      शहरवासीय यामध्ये कितपत सहभागी होणार ? यावर अन्याय निवारण समितीच्या या आंदोलनाचे यशापयश अवलंबून आहे.

एक तारखेपासून कचरा प्रश्न मार्गी लागणार… माजी नगरसेवकांची पत्रकार बैठकीत माहिती

     नगरपंचायतीच्या निधी बाबत तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने कचरा उठाव टेंडर प्रक्रिया राबवण्यास विलंब झाला. परिणामी अपुऱ्या कर्मचारी वर्गावर कचरा उठाव यंत्रणा राबवली जात असल्याने कचरा उचलताना मर्यादा येत असल्याचे अशोकअण्णा चराटी व माजी नगरसेवकांनी पत्रकार बैठकीत स्पष्ट केले. कचरा उठावाची टेंडर प्रक्रिया सुरू असून कोणत्याही परिस्थितीत एक ऑक्टोबर पासून पुन्हा एक वेळ ही यंत्रणा सक्रिय होईल असा विश्वास नगरसेवकांनी व्यक्त केला.

      याबाबत ठेकेदार नियुक्ती निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. २८ सप्टेंबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होऊन १ ऑक्टोबर पासून आजरा शहरातील कचरा उठाव नियमित होणार आहे. शहराच्या विकासासाठी सुमारे १२५ कोटींचा निधी मिळाला आहे. कांही कामे पूर्ण झाली असून कांही १५ ऑक्टोबर नंतर सुरु होतील. यामध्ये शहरातील रस्त्यांचा समावेश आहे. याशिवाय भाजी मार्केट पत्रे बसवणे, सी.डी. फार्मजवळील तळ्याची दुरुस्ती, शहरात ५ ते ७ बगीचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, नगरपंचायतीसाठी नवीन इमारत, ही कामे मंजूर असून त्याला निधीही आला आहे. आजऱ्यातील नविन पाणी पुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पाणी चाचणी सुरु आहे. येत्या कांही दिवसात ही योजना पूर्ण होणार असून शहरातील नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा होणार आहे असेही यावेळी सांगण्यात आले.

     यावेळी माजी नगरसेवक किरण कांबळे, संभाजी पाटील, अनिरुध्द/बाळ केसरकर, अर्बन बँकचे अध्यक्ष रमेश कुरुणकर, तानाजी देसाई, दशरथ अमृते, निवृत्ती शेंडे, राजेंद्र सावंत, सुरेश गड्डी उपस्थित होते.

 अनेकांचे राजकारण ‘कचऱ्यात’ जाणार…

     कचरा उठाव प्रश्नासह आजऱ्यातील नूतन नळ पाणीपुरवठा योजनेबाबत प्रचंड तक्रारी असून या तक्रारींना सामोरे जाताना अनेकांची दमछाक होणार असून हे दोन प्रश्न येत्या नगरपंचायत निवडणुकीत ऐरणीवर येऊन अनेकांच्या राजकीय भवितव्याचा ‘कचरा’  होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आज-यात रक्तदान शिबिर उत्साहात 

६७ बॅग्ज रक्तसंकलन

            आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

     श्री. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवड्यानिमित्त भारतीय जनता पार्टी आजरा तालुका यांच्या मार्फत रक्तदान शिबीर पार पडले . यावेळी ६७ बॅग्ज रक्त संकलन करण्यात आले.

      ‘ मृत्युंजय ‘ कार शिवाजीराव सावंत यांच्या प्रतिमेचे पूजन करून अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

     यावेळी जिल्हा अध्यक्ष नाथाजी पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अशोकअण्णा चराटी, तालुका अध्यक्ष अनिरुद्ध/ बाळ केसरकर, व्यापारी सेल जिल्हा अध्यक्ष जनार्दन टोपले, दशरथ अमृते,अनिल पाटील, अनिल नार्वेकर,सी.आर. देसाई, संभाजी सरदेसाई, अतिशकुमार देसाई, विकास बागडी,संतोष चौगुले,भास्कर भाईंगडे,संदीप पाटील,महेश पारपोलकर,अभिजीत रांगणेकर,संग्राम पाटील, समीर देसाई व कार्यकर्ते उपस्थित होते.

एकता गृहतारण’ ला पहिल्याच वर्षी नफा…
८% लाभांश

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      पेरणोली येथील एकता गृहतारण सहकारी पतसंस्थेला स्थापनेनंतर पहील्याच वर्षी ७० हजार रुपयांचा नफा झाला आहे. संस्थेने २ कोटी रुपयांपर्यंत ठेवीचे उद्दीष्ट गाठले आहे. यंदा आठ टक्के लाभांश देणार असल्याचे संस्थेचे संस्थापक संतोष जाधव व अध्यक्ष राजेंद्र कळेकर यांनी सांगीतले.

     एकता गृहतारण पतसंस्थेची वार्षिक सभा उत्साहात झाली. अध्यक्ष श्री कळेकर अध्यक्षस्थानी होते. श्री. जाधव, उपाध्यक्षा व लोकनियुक्त सरपंच सौ. प्रियांका जाधव प्रमुख उपस्थित होते.

     संचालक अविनाश जोशीलकर यांनी श्रध्दांजली ठराव मांडला. सल्लागार रविंद्र देसाई यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. श्री. कळेकर म्हणाले, संस्थेकडे आर्थिक वर्षांत १ कोटी ७९ लाखांच्या ठेवी असून कोटी ५० लाखाच्या कर्जाचे वितरण केले आहे. ३९ लाखांची गुतवणूक केली आहे. श्री. जाधव यांनी नफा तोटा व आर्थिक पक्कांचे वाचन करून संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. गुणवंत वि‌द्यार्थी, विशेष कामगीरी केलेल्यांचा सत्कार झाला. मारुती वरेकर, संजय मोहिते, अनुष्का गोवेकर यांनी मनोगत व्यक्त केली. सभेला संचालक, सल्लागार ,सभासद उपस्थित होते. सुरेश दास यांनी सूत्रसंचालन केले.

     संचालक दत्तात्रय सावंत यांनी आभार मानले.

संवेदना मेडलाईन ग्लोबल स्कूल’ प्रकल्पांतर्गत तालुक्यातील शाळांना लॅपटॉप वितरण

            आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     विद्यामंदिर कोळींद्रे येथे ‘संवेदना मेडलाईन ग्लोबल स्कूल’ प्रकल्पांतर्गत आजरा तालुक्यातील ९ शाळांमध्ये ८० लॅपटॉपचे वितरण करण्यात आले.

      कार्यक्रमात मेडलाईन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे एचओडी कृष्णा पाटील यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी संगणकीय ज्ञानाची गरज व्यक्त केली. यावेळी संवेदना फाऊंडेशनचे कार्यकारी अध्यक्ष पी. एस. मोहिते यांनी या प्रकल्पात स्थानिक संगणक तज्ज्ञ आणि शिक्षकांनी योगदान देण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी या लॅपटॉपचा प्रभावी वापर करून आपली प्रगती साधावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

      यावेळी शाळेचे शिक्षक व संवेदनाचे पदाधिकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

(Advt.)

लवकरच आपल्या सेवेत… आजच ॲडव्हान्स बुकिंग करा..

     तुमच्या स्वप्नातील घर, तुमच्या बजेटमध्ये…”आपलं घर* ” शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सर्व सोयीनीयुक्त

       ✅ शाळा, कॉलेज, बॅंका , स्टँड, हॉस्पिटल, होटेल्स, भाजी मार्केट, पेट्रोल पंप, मेन मार्केट फक्त 2 मिनिटांवर
        ✅ 1 आणि 2 BHK फ्लॅट्स
        ✅ इतर अनेक सुविधा

🏡साईटचा पत्ता :

समर्थ कृपा रेसिडेन्सी , भगवा रक्षक चौक, सोमवार पेठ, दत्त मंदिरा समोर, आजरा
        ☎️ संपर्क –
              +91 9527 97 3969


निधन वार्ता…
तुळसाबाई सुतार

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     हंदेवाडी ता.आजरा येथील  पत्रकार पुंडलिक लोहार/सुतार यांच्या मातोश्री श्रीमती तुळसाबाई बंडू सुतार लोहार ( वय ७१ वर्षे) यांचे रविवार दि.२२ रोजी अल्पश: आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात मुलगा,सून,नात, असा परिवार आहे.


 

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

पोळगाव येथील तरुणाची आत्महत्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!