


देवर्डे येथे तरुणाची आत्महत्या…

आजरा : प्रतिनिधी
देवर्डे ता. आजरा येथील श्रावण शिवाजी बुरूड या २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन रविवारी सायंकाळी आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत स्थानिक ग्रामस्थ व श्रावण यांच्या नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी…
श्रावण हा इलेक्ट्रॉनिक अभियंता होता. सध्या तो घरीच होता. घरातून बाहेर गेल्यानंतर तो घरी न परतल्याने त्याचा शोध घेतला असता देवर्डे गावाशेजारी गायरानातील हिरडीच्या झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत त्याचा मृतदेह आढळला.
बुरुड व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या व बेताची परिस्थिती असणाऱ्या बुरुड कुटुंबीयांमधील उच्चशिक्षित श्रावण याच्या निधनाने देवर्डे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबतची वर्दी वडील शिवाजी धोंडीबा बुरुड यांनी आजरा पोलीस स्टेशनला दिली असल्याचे सांगण्यात आले. त्याच्या पश्चात आई,वडील, भाऊ असा परिवार आहे.
आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.



आता ऊस पेटवायचा का…?
तालुक्यातील शेतकऱ्यांचा उद्दीग्न सवाल

आजरा: प्रतिनिधी
दिवसेंदिवस भेडसावणारी पाण्याची समस्या, जंगली जनावरांपासून पिकांचे संरक्षण करताना होणारी दमछाक ,कारखान्याचा अपुऱ्या तोडणी ओढणी यंत्रणांमुळे वेळेत उसाची न होणारी उचल, तोडणी यंत्रणेकडून ऊस काढण्यासाठी केली जाणारी भरमसाठ खुशालीची मागणी या पार्श्वभूमीवर आजरा तालुक्यातील शेतकरी आता संतप्त होत असून आता ऊस पेटवायचा का ? असा उद्धिग्न सवाल करू लागला आहे.
फेब्रुवारी महिन्याचा पहिला आठवडा संपत आला तरी तालुक्यातील बहुतांशी ऊस हा अद्याप शेतातच उभा आहे. ऊस तोडणी साठी यंत्रणेची मागणी करण्याकरता आजरा साखर कारखान्यासह विविध कारखान्यांच्या सेंटर ऑफिसचे उंबरे तालुकावासीय शेतकरी झिजवू लागला आहे. नेहमीप्रमाणे यावर्षीही तोडणी ओढणी यंत्रणेने बहुतांशी कारखान्यांना चुना लावल्याने ऊस आहे पण यंत्रणा नाही अशा विचित्र संकटात कारखाना व्यवस्थापन सापडले आहे. बीड, मध्य प्रदेश येथून यंत्रणा उपलब्ध करण्यासाठी केलेला करोडोंचा खर्च वाया जाण्याची भीती कारखाना व्यवस्थापनासमोर आहे. यातून पुढे कोर्ट-कचेऱ्या करून तोडणी- ओढणी यंत्रणांमध्ये अडकलेल्या रकमा कदाचित मिळतीलही परंतु सध्या शेतकऱ्यासमोर यंत्रणा उपलब्ध नसल्याने उभे ठाकलेले संकट गंभीर रूप धारण करू लागले आहे.
एकीकडे पिकासाठी घेतलेल्या कर्जाची व्याजे वाढू लागली आहेत तर दुसरीकडे वेळेत उचल न झाल्याने उसाच्या वजनातही घट होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे अपेक्षित उत्पन्न मिळण्याची शक्यता दुरावत चालली असल्याचेही शेतकरी वर्गाकडून सांगितले जात आहे.
या सर्व प्रकाराला ऊस उत्पादक शेतकरी वर्ग आता वैतागला आहे. शेतातील उभा ऊस आता पेटवायचा का ? असा सवाल नाईलाजाने शेतकरी वर्ग करत आहे.
किमान पुढील वर्षी तरी दक्षता घ्यावी…
तोडणी -ओढणी यंत्रणांकडून होणारी फसवणूक आता नित्याची झाली आहे. या फसवणुकीमध्ये भागातील कारखान्यांचे कांही अधिकारी व कर्मचारी सहभागी असल्याचे बोलले जाते. किमान पुढच्या वर्षीकरीता हे करार करत असताना आवश्यक ती दक्षता घ्यावी अशी मागणी काही जाणकार शेतकरी मंडळी करत आहेत.
ज्यांचा वशिला… त्यांचा ऊस गेला…
विविध कारखान्यातील संचालकांसह, अधिकारी व कर्मचारी वर्गांशी ज्यांचे लागेबांधे आहेत अशा मंडळींचा ऊस वेळेत उचल झालेला दिसतो तर सर्वसामान्य शेतकरी मात्र यंत्रणा मिळवण्यासाठी हतबल झालेला दिसत आहे.



उत्तूर विद्यालयात ‘फाली ‘अंतर्गत व्यवसाय योजना स्पर्धा उत्साहात संपन्न

आजरा: प्रतिनिधी
माध्यमिक शिक्षण घेतानाच विद्यार्थ्यांनी कृषिविषयक ज्ञान आत्मसात करून भविष्यात शेती आणि शेती व्यवसायाकडे सकारात्मक बघावे यासाठी फालीने शेतीचे धडे गिरवण्याचा उपक्रम २०१४ मध्ये सुरू केला आहे शाळांत शेतीच्या प्रात्यक्षिकांचे धडे गिरवण्याचे काम सुरू झाले आहे.फाली अंतर्गत उत्तूर विद्यालयामध्ये कृषी व्यवसाय परियोजना स्पर्धा उत्साहात पार पडल्या. यामध्ये इयत्ता ८ वी व ९वी च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
भारताच्या कृषी क्षेत्रातील भविष्याचे नायक असणाऱ्या या विद्यार्थ्यांकडून कोरफडी पासून आरोग्य पूरक लाडू, कोरफडी पासून लोणचे, खाऊच्या पानापासून मोदक, नारळाची बर्फी,शेंगदाणा चिक्की आदी कृषीपूरक व्यवसायांची निर्मिती व सादरीकरण अतिशय उत्कृषटपणे करण्यात आले.विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमाशिवाय एक व्यावसायिक कौशल्याची आजच्या युगात अत्यंत आवश्यकता आहे . त्यातून विद्यार्थी व पालकांचा शेती व शेती व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होऊ लागला आहे.
यासाठी फालीचे कृषी शिक्षक प्रथमेश शेळके, मुख्याध्यापक शैलेंद्र आमणगी यांचे मार्गदर्शन लाभले.याप्रसंगी आर. डी. महापुरे,संदीप बादरे, इंद्रजीत बंदसोडे व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती.



निधन वार्ता…
राजेंद्र गुरव

खानापूर ता. आजरा येथील राजेंद्र यशवंत गुरव (वय ४२) यांचे अल्पश: आजाराने कोल्हापुर येथे उपचारादरम्यान निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, आई, मुलगा ,मुलगी असा परिवार आहे.




