गुरुवार दि. २ एप्रिल २०२६


आजऱ्यात तरुणाईत राडा…
१ ठार दोघे जखमी
तिघे पोलिसांच्या ताब्यात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
नाईक गल्ली,आजरा येथे समवयस्क मित्रांमध्ये सुरुवातीला झालेली थट्टा मस्करी, त्यानंतर सुरू झालेला वाद व अखेर या वादातून चाकू हल्ला झाल्याने यामध्ये कैफ साजिद खतिफ (वय २३ रा. वाडा गल्ली, आजरा ) या तरुणाचा मृत्यू झाला असून सनी अब्दुल गफार तकिलदार (वय २६ रा. दर्गा गल्ली, आजरा) व आतिफ इस्माईल हिंग्लजकर ( वय १९ रा. पटेल कॉलनी आजरा) हे गंभीर जखमी झाले असून याप्रकरणी पोलिसांनी मुख्य संशयित अरकम महम्मद लमतुरे, अबु सुफियान महम्मद लमतुरे, शकील हसनअली खेडेकर ( सर्व रा. नाईक गल्ली, आजरा ) या तिघांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत स्थानिक नागरिक व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी…
बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास नाईक गल्ली येथील मरकज मस्जिद समोर हे सर्वजण एकत्र आले. सुरुवातीला वेगवेगळ्या विषयावरून त्यांच्यात थट्टा मस्करी सुरू झाली. कालांतराने त्यांच्यात वाद सुरू झाला व वादाचे पर्यवसान मारामारीत झाले. याचवेळी अरकम लमतुरे याने आपल्याजवळील चाकू काढून त्याने मृत कैफसह शमी तकिलदार व आतिफ हिंग्लजकर यांच्यावर वार करण्यास सुरुवात केली. तर अबुसुफियान व शकील यांनी तिघांना लाथाबुक्क्यांनी मारण्यास सुरुवात केले.
यामध्ये कैफ खतीफ हा गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने गडहिंग्लज येथे उपचारासाठी हलवत असताना वाटेतच त्याचे निधन झाले. तर समी तकिलदार व अतिफ हिंग्लजकर यांच्यावर उपचार सुरू आहेत.
सदर घटनेचे वृत्त समजतात नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. मयत कैफ च्या नातेवाईकांनी व मित्रपरिवाराने संशयित अरकम याच्या घरावर दगडफेक केली व त्याच्या दुचाकीची मोडतोड केली. वातावरण तंग झाल्याने तीन पोलीस अधिकाऱ्यांसह २५ जादा पोलीस बाहेरून तातडीने तैनात करण्यात आले आहेत. मरकज मस्जिद परिसरासह संपूर्ण नाईक गल्लीला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.
घटनास्थळी गडहिंग्लजचे उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले, जिल्हा रात्रगस्त विभाग, इचलकरंजीचे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड, भुदरगडचे पोलीस निरीक्षक गोरख चौधर, आजरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे तातडीने घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न केले. रात्री उशिरापर्यंत ते घटनेची माहिती घेत होते. ठाणे अंमलदार रमेश गवळी यांची कडून सदर घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.
पुन्हा ‘मृत्युंजय महान्यूज ‘च्या वृत्ताची चर्चा…
कालच मृत्युंजय महान्यूजने ‘ तालुक्यातील तरुणाईचे चाललय तरी काय ? ‘ या मथळ्याखाली तरुणाईच्या विविध गुन्ह्ंयातील सहभागावर प्रकाश झोत टाकला होता. तरुणांच्या हा सहभाग चिंताजनक असल्याचे या घटनेने पुन्हा एक वेळ अधोरेखित झाले आहे. घटनेनंतर या वृत्ताची पुन्हा एक वेळ जोरदार चर्चा सुरू आहे.
चेष्टामस्करी जीवघेणी ठरली…
मारामारीला नेमके कारण तरी काय असावे हा आता विषय गौण ठरत आहे. साध्या चेष्टा मस्करीचे रूपांतर हत्त्येपर्यंत होणे हे निश्चितच चिंताजनक आहे. मारामारी नेमकी कोणत्या कारणावरून झाली आणि यावेळी चाकू कोठून आला हे आज स्पष्ट होईल.

जख्खेवाडी तलावात पडून मुम्मेवाडीच्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
जख्खेवाडी येथील तलावात पडून मुमेवाडी ता .आजरा येथील रहिवासी सौ.सविता संतोष काटे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सविता काटे या घरातील कपडे धुण्यासाठी जख्खेवाडी येथील तलावावर गेल्या होत्या. यावेळी त्यांचा तोल जाऊन पाय घसरल्याने त्या पाण्यात पडल्या. पाण्याची खोली कमी असतानाही त्यांना पोहता येत नसल्यामुळे त्या बाहेर येऊ शकल्या नाहीत आणि त्यांचा बुडून मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत करण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
सविता काटे या मुमेवाडी येथील ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य संतोष काटे यांच्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात पती व दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

चिमणे येथे वीज कोसळून शाळेचे नुकसान ; जीवितहानी टळली

उत्तूर : मंदार हाळवणकर
चिमणे ता. आजरा येथे संध्याकाळी सुमारे पाचच्या दरम्यान वीज कोसळून कर्मवीर विद्यालयाच्या इमारतीच्या एका कोपऱ्याला फटका बसला. या घटनेत शाळेतील सीसीटीव्ही मशीन, केबल व कॅमेरे जळून अंदाजे २० ते २५ हजार रुपयांचे नुकसान झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी दोन वाजल्यापासून परिसरात विजांचा कडकडाट सुरू होता. वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊसही पडत होता. त्याचदरम्यान शाळेवर वीज कोसळली. सध्या शाळा सकाळच्या सत्रात सुरू असल्याने घटनेच्या वेळी शाळा मोकळी होती, त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
वीजेच्या कडकडाटामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेत शाळेचे नुकसान झाले असून परिसरातील शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

रामतीर्थ परिसरात पुन्हा बिबट्याचे दर्शन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
येथील रामतीर्थ परिसरामध्ये असणाऱ्या महादेव मंदिरा नजिक पुन्हा बिबट्याने काही तरुणांना काल बुधवारी सायंकाळी दर्शन दिले.
दोन पिलांसह बिबट्याला रस्ता ओलांडताना तरुणांना दिसला. त्याच्या पायाचे ठशांची छायाचित्रेही संबंधित तरुणांनी घेतली असून वनविभागाने तातडीने याबाबत माहिती घेऊन पर्यटकांसाठी नागरिकांना सावध करण्याची गरज निर्माण झाली आहे.

आजरा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला करपुर्व ११ कोटी ३५ लाखांचा नफा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. (मल्टी-स्टेट) आजरा बँकेला गेल्या आर्थिक वर्षात ११ कोटी, ३५ लाख ३५ हजार रुपये इतका कर पूर्व नफा झाला असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष अशोक चराटी , उपाध्यक्ष संजय चव्हाण व संचालक मंडळाने दिली आहे.
मार्च २०२६ अखेर ११६१ कोटी ९९ लाख रुपयांच्या ठेवी बँकेकडे असून ७९५ कोटी ४० लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.
बँकेचा एनपीए ३.११ वरून २.२० इतका झाला असून निवड सिटी ६८% इतका आहे.
आर्थिक वर्षात बँकेचे सभासद ठेवीदार, हितचिंतक, संचालक, मंडळ व अधिकारी वर्गाने केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार मानले.

जनता सहकारी बँकेला चार कोटी २५ लाख रुपयांचा निव्वळ नफा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथील जनता सहकारी बँकेला २०२५-२६ या आर्थिक वर्षात ४ कोटी २५ लाख ३३ हजार इतका निव्वळ नफा झाला असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई यांनी दिली.
३१ मार्च २०२६ अखेर बँकेकडे २० कोटी १३ हजार रुपये इतके भाग भांडवल आहे. ४७६ कोटी १० लाख २४ हजार रुपयांच्या ठेवी असून बँकेने २९२ कोटी ६६ लाख 2्२९ हजार रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. बँकेने गत आर्थिक वर्षात ७६८ कोटी ७६ लाख ५३ हजार रुपयांचा व्यवसाय केला आहे.६१.४७ इतका सिडी रेशो आहे.
बँकेच्या या प्रगतीमध्ये बँकेचे सर्व सभासद, ठेवीदार, हितचिंतक, संचालक मंडळ व अधिकारी वर्गाने केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी विशेष आभार मानले.

ख्यातनाम शाहीर संभाजी भगत यांना यावर्षीचा लोकशाहीर द.ना.गव्हाणकर पुरस्कार….

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शाहिरी ही केवळ मनोरंजनासाठी नसून समाज प्रबोधन हेच तिचे मुख्य प्रयोजन आहे हा विचार केंद्रस्थानी ठेऊन ज्यांनी आपली शाहिरी कामगार, कष्टकरी, दलित, आदिवासींच्या मुक्तीदायी राजकारणासाठी वापरली तोच वसा आणि वारसा घेऊन समाज प्रबोधन घडवणाऱ्या शाहीर संभाजी भगत यांना यावर्षीचा लोकशाहीर द. ना, गव्हाणकर पुरस्कार देण्याचा निर्णय आज झालेल्या पुरस्कार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी पुरस्कार समितीचे जेष्ठ सदस्य मुकुंदराव देसाई, जि प सदस्य सुधीर देसाई, कार्याध्यक्ष कॉ. संपत देसाई, सचिव सुनील पाटील, प्रा.डॉ. नवनाथ शिंदे, युवराज पोवार, प्रा. मीना मंगळूरकर, रावसाहेब देसाई, मनोहर गव्हाणकर, संजय घाटगे, कॉ. संजय तर्डेकर, कॉ. शांताराम पाटील, काशिनाथ मोरे, कृष्णा सावंत, रणजीत कालेकर, अमित सामंत, हिंदुराव कांबळे यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.
भरत यांनी जनप्रबोधनासाठी लोककलांचा अत्यंत प्रभावी वापर केला. त्यांचे कातळाखालचे पाणी (आत्मचरित्र), अडगळ (नाटक), तोड ही चाकोरी (गाण्याचा संग्रह), रणहलगी (लेखसंग्रह), भारुड आणि गिरणीचा वग (मुक्तनाट्य), शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला (नाटक) इत्यादी साहित्य प्रसिध्द आहे. त्यांच्या कोर्ट या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. लोकशाहीर गदर यांची अनेक गाणी त्यांनी मराठीत आणली आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत यापूर्वी त्यांना अस्मितादर्श पुरस्कार, प्रबोधनमित्र पुरस्कार, मिफ्ता पुरस्कार, संत तुकाराम पुरस्कार यासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.

जिल्हास्तरीय श्रीनिवास रामानुजन गणित प्रज्ञाशोध परीक्षेत व्यंकटरावचे यश

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
येथील व्यंकटराव हायस्कुल, आजरा या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय श्रीनिवास रामानुजन गणित प्रज्ञाशोध परीक्षा उज्ज्वल यश संपादन केले
इ.५ वी प्रज्ञा प्रमाणपत्रधारक :-
कु. स्वरा मोहन मोटे
कु. शौर्य सुनिल आजगेकर
इयत्ता ८वी :-
कु. वेदांग विद्याधर शिंदे
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना श्री. ए. वाय. चौगुले ,श्री. के. बी. खोत यांचे मार्गदर्शन लाभले.

दिल्लीने लखनौला नमवले
लखनौ येथे झालेल्या दिल्ली विरुद्ध लखनौ या सामन्यामध्ये दिल्लीने एकतर्फी विजय मिळवला . लखनौचे १४१ गावांचे लक्ष्य गाठतना सामना समीर रिजवी याने 47 चेंडूत नाबाद ७० धावा काढल्या.
आजचा सामना :-
कोलकता विरुद्ध हैदराबाद
स्थळ : कोलकता
वेळ : सायंकाळी ७.३० पासून.

आजचे पंचांग
दिनांक : २ एप्रिल २०२६
वार : गुरुवार
माह (अमावस्यांत) : चैत्र
माह (पूर्णिमांत) : चैत्र
ऋतु : वसंत
आयन : उत्तरायण
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : पौर्णिमा तिथी (सकाळी ०७.४१ पर्यंत) त्यानंतर प्रथम तिथी
नक्षत्र : हस्त नक्षत्र (सायंकाळी ०५.३८ पर्यंत) त्यानंतर चित्रा नक्षत्र
योग : ध्रुव योग (दुपारी ०२.१९ पर्यंत) त्यानंतर व्याघात योग
करण : भाव करण (सकाळी ०७.४१ पर्यंत) त्यानंतर बलवा करण
चंद्र राशी : कन्या राशी (३ एप्रिल सकाळी ०६.२८ पर्यंत) त्यानंतर तुळ राशी
सूर्य राशी : मीन राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी ०२.१४ ते दुपारी ०३.४७ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१८ते दुपारी ०१.०७
सूर्योदय : सकाळी ०६.३३
सूर्यास्त : सायंकाळी ०६.५१
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत


