mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

बुधवार  दि. १ एप्रिल २०२६

तालुक्यात तरुणाईचे चाललय तरी काय…?
विविध गुन्ह्यांमध्ये बिनधास्त सहभाग

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

समृद्ध निसर्गसंपदेने नटलेल्या आजरा तालुक्यातील तरुणाई गुन्हेगारीकडे वळू लागली असून गेल्या वर्षभरामध्ये अनेक गुन्ह्यात तरुणाईचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे तालुक्यात तरुणांचे नेमके चाललंय तरी काय ? असे म्हणण्याची वेळ आली आहे.

उत्तूर पंचक्रोशी परिसरातील चोऱ्या, पेद्रेवाडी येथे बाहेरच्या व्यक्तीला आणून घडलेले हत्याकांड, निंगुडगे येथील चोरी प्रकरणात असणाऱ्या आजूबाजूच्या गावातील तरुणांचा सहभाग, ठीक-ठिकाणी होत असणाऱ्या मारामाऱ्या, चोऱ्या, गांजा सेवन व यामध्ये भरीस भर म्हणून दोन दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने उघडकीस आणलेल्या कोरीवडे, हात्तिवडे येथील तरुणांकडून करण्यात आलेल्या घरफोड्या, दुचाकी, चारचाकी सह ट्रॅक्टर चोरी. या सर्वांमध्येच तरुणांचाच सहभाग दिसत आहे.

हिरण्यकेशी नदी काठावरील अनेक गावात गांजाचा धूर निघत आहे. बेरोजगारी, व्यसनाधीनता व चैनीखोर स्वभावामुळे तरुणाई गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी होऊ लागली आहे. आता यासाठी प्रबोधनाची गरज प्रकर्षाने जाणून लागलेली आहे.

पालकांचे दुर्लक्ष…

या सर्व प्रकारांना पालकही जबाबदार आहेत असे बोलले जाते. मुळात पालक आपल्या पाल्यावर लक्ष ठेवत नसल्याने तो कोणाच्या संगतीत राहतो ? काय करतो ? रात्री उशिरा का येतो ? तो दिवसभर कुठे असतो ? त्याच्याजवळ पैसे कोठून येतात ? या प्रश्नांची उत्तरे पालकांनाही माहीत नसतात हे वास्तव नाकारता येत नाही.

जिद्दीला नियोजनाची जोड दिल्यास यश हमखास : डॉ. संजय चराटी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

विद्यार्थ्यांनी चांगले करिअर घडविण्याची जिद्द बाळगली पाहीजे आणि या जिद्दीला योग्य नियोजनाची जोड दिल्यास आपल्याला यश हमखास मिळते, त्यासाठी अभ्यासाचे योग्य नियोजन कसे करता येईल याकडे विशेष लक्ष द्यावे, असा सल्ला पुणे येथील गरवारे टेक्निकल फायबर्सचे अध्यक्ष डॉ. संजय चराटी यांनी विद्यार्थ्यांना दिला.

गडहिंग्लज येथील ज्ञानदीप प्रबोधिनी संचलित, झेप अकॅडमीच्या आजरा येथील शाखेस सदिच्छा भेटीप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ज्ञानदीप प्रबोधिनीचे संस्थापक अध्यक्ष श्री. एम. एल. चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. संजय चराटी म्हणाले, झेप अकॅडमीमुळे गडहिंग्लज व आजरा परिसरातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची स्पर्धा परिक्षेच्या तयारीसाठी मोठी सोय उपलब्ध झाली आहे. आजरा तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या शासकीय सेवेतील करिअरसाठी प्लॅटफॉर्म उभा राहीला आहे त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा व आपले करिअर घडवावे

श्री. एम. एल. चौगुले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. श्री रवळनाथ हौसिंग फायनान्स सोसायटीचे संस्थेचे आजरा शाखेचे चेअरमन प्रा. जनार्दन दळवी यांनी आभार मानले. जनसंपर्क अधिकारी श्री. बाबासो मार्तंड यांनी सुत्रसंचलन केले. यावेळी रवळनाथचे आजरा शाखेचे शाखाधिकारी श्री. दिपक शिंदे यांच्यासह झेपचे विद्यार्थी, प्रशिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

उत्तूर आठवडी बाजाराचा लिलाव ८.५० लाखांत; दर कपातीमुळे रक्कमेत घट


उत्तूर : मंदार हाळवणकर

उत्तूर येथील ग्रामपंचायतीचा १ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीसाठीची आठवडी बाजार लिलाव प्रक्रिया पार पडली असून अभिजित कलागते यांनी ८ लाख ५० हजार रुपयांची सर्वाधिक बोली लावून लिलाव मिळवला.

ही लिलाव प्रक्रिया सरपंच किरण आमणगी, उपसरपंच सुनिता हत्तरकी, ग्रामसेवक प्रकाश पाटील व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडली. सचिन फाळके यांनी लिलावाच्या अटी व शर्तींचे वाचन केले.लिलावासाठी बुट्टी १० रुपये, ५ फुट जागा ५० रुपये, १० फुट जागा ९० रुपये व बकरीस २० रुपये अशा आकारणीवर बोली लावण्यात आली.

एकूण सहा जणांनी लिलाव प्रक्रियेत सहभाग घेतला.यावेळी व्यापाऱ्यांसाठी पाणी, पार्किंग व इतर सुविधांबाबत चर्चा करण्यात आली. महिंद्र मिसाळ यांनी यासंदर्भात सूचना मांडल्या.

दरम्यान, ग्रामपंचायतीने आकारणीचे दर कमी केल्यामुळे यंदाचा लिलाव मागील वर्षाच्या तुलनेत कमी रकमेवर झाल्याचे स्पष्ट झाले.

या प्रसंगी नजीर लमतुरे, संजय हत्तरकी, सुभाष पाटील, मिलिंद कोळेकर, प्रदीप लोकरे, संभाजी कुराडे, अमित येसादे, अनिकेत आमणगी, जावेद लमतुरे, कय्यूम मकानदार, सविता सावंत, लता गुरव, भैरू कुंभार, धोंडिराम कलागते, आनंदा सावंत आदी उपस्थित होते.

कानोलीतील आपतीग्रस्त दुध उत्पादकास गोकुळचे  संचालक चेतन नरके यांची आर्थिक मदत

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

कानोली ( ता. आजरा ) येथील दुध उत्पादक सभासद सौ. माया सतिश पाटील यांच्या कुटूंबातील दुभती म्हैस, बकरी आणि कोंबडी गोठ्यात सर्पदंश झाल्याने महिन्याच्या सुरवातीस दगावले होते, त्यामुळे पाटील कुटूबियांचे सव्वा लाखाचे नुकसान झाले होते, सर्वसामान्य व पशुधनावर आधारित असलेल्या या कुटुंबावर अचानक आलेल्या आपतिमुळे मोठा आघात झाला होता, या बाबतची बातमी सोशल मीडिया व वृत्तपत्राच्या माध्यमातून प्रसिद्ध झाली होती, याची दखल घेऊन गोकुळचे संचालक चेतन अरुण नरके यांनी कानोली येथे कुटुंबियांची भेट घेऊन विचारपूस केली, आणि आपल्याकडून व्यक्तिगत रु. १० हजाराची आर्थिक मदत देऊन नवीन म्हैस घेण्यासाठी सांगितले, गोकुळ कडूनही आर्थिक मदत मिळवून देण्याचे जाहीर केले.

यावेळी सरपंच सौ. सुषमा पाटील, गजानन दुध संस्थेचे चेअरमन बाजीराव पाटील, संचालक सुभाष पाटील अनिल पाटील सोसायटी चेअरमन दिलीप पाटील चित्रा पाटील उपस्थित होते.

बोलकेवाडी येथे आज जोतिबा यात्रा उत्सव


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

बोलकेवाडी ग्रामस्थ मंडळ बोलकेवाडी व मुंबई यांच्या वतीने ३१ वा जोतिबा यात्रा महोत्सव आज बुधवार दिनांक १ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे.

उत्सवानिमित्त दुपारी तीन वाजता श्रींची पालखी व सासनकाठी मिरवणूक निघणार आहे. सायंकाळी पाच वाजल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. सर्व कार्यक्रम जोतिबा मंदिर बोलकेवाडी येथे आहेत.

भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन बोलकेवाडी ग्रामस्थ मंडळ मुंबई ग्रामस्थ मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

रवळनाथ कॉलनी मध्ये काँक्रीट रस्त्याचे उद्घाटन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

पालकमंत्री प्रकाश अबिटकर यांच्या फंडातून मंजूर झालेल्या काँक्रीट रस्त्याचे रवळनाथ कॉलनी येथील एकनाथ बामणे यांच्या घरापासून ते कृष्णा पाटील यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामास शुभारंभ करण्यात आला. या कामाचे उद्घाटन नगरसेवक श्री. परशुराम बामणे यांच्या हस्ते संपन्न झाले.

या प्रसंगी श्री. दयानंद वर्टेकर, श्री. विनायक दंडगे, श्री. अतुल पाटील, श्री. जोतिबा आजगेकर , श्री. चंद्रकांत देसाई , विश्वास हेरेकर, दिलीप डोंगरे, तसेच इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निधन वार्ता

दत्ताजीराव देसाई

उचंगी ता.आजरा येथील दत्ताजीराव बळवंतराव देसाई (सरकार) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. निधन समयी त्यांचे वय ९० वर्षे होते

उचंगीचे पोलिस पाटील श्री. दिलीप दत्ताजीराव देसाई यांचे ते वडील होत.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, चार मुली, जावई,सुन, नातवंडे असा परिवार आहे.

उत्तर कार्य मंगळवार दिनांक ७ एप्रिल रोजी आहे.

सौ. रुक्मिणी कसलकर

वाटंगी ता. आजरा येथील सौ. रुक्मिणी विठोबा कसलकर (वय ७३ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने काल मंगळवारी बदलापूर /मुंबई येथे निधन झाले.

त्यांच्या पश्चात पती, विवाहित मुलगी, मुलगा, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

मर्चंट नेव्ही मध्ये मास्टर शेफ म्हणून काम करणाऱ्या संतोष कसलकर यांच्या त्या आई होत. आज बुधवारी सकाळी दहा वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

रंगतदार सामन्यात पंजाबने गुजरातला नमवले

न्यू चंदिगड येथे झालेल्या पंजाब विरुद्ध गुजरात या अटीतटीच्या सामन्यामध्ये पंजाबने गुजरातला नमवले. पंजाबच्या बिल कूपर कॉनलीने ४४ चेंडूत नाबाद ७३ धावा घेत विजय सोपा केला.

आजचा सामना :-

लखनौ विरुद्ध दिल्ली

स्थळ : लखनौ

वेळ : सायंकाळी ७.३० पासून.

आजचे पंचांग 

दिनांक : १ एप्रिल २०२६
वार : बुधवार

माह (अमावस्यांत) : चैत्र
माह (पूर्णिमांत) : चैत्र
ऋतु : वसंत
आयन : उत्तरायण
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : चतुर्दशी तिथी (सकाळी ०७.०६ पर्यंत) त्यानंतर पौर्णिमा तिथी
नक्षत्र : उत्तरा फाल्गुनी नक्षत्र (दुपारी ०४.१६ पर्यंत) त्यानंतर हस्त नक्षत्र
योग : वृद्धि योग (दुपारी ०२.५० पर्यंत) त्यानंतर ध्रुव योग
करण : वाणीजा करण (सकाळी ०७.०६ पर्यंत) त्यानंतर विस्ती भद्रा करण
चंद्र राशी : कन्या राशी
सूर्य राशी : मीन राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी १२.४२ ते दुपारी ०२.१५ पर्यंत
सूर्योदय : सकाळी ०६.३४
सूर्यास्त : सायंकाळी ०६.५१
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

 

 

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा तालुका खरेदी-विक्री संघासाठी आज मतदान

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

रमेश राठोडला लाच घेताना रंगेहात पकडले:महसुलमध्ये खळबळ

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!