मंगळवार दि. ३१ मार्च २०२६


घरफोडीचे सात गुन्हे उघडकीस…
हात्तिवडे, कोरीवडेसह मिरजेतील एकाकडून शंभर ग्रॅम सोन्यासह २० लाख ८५ हजारांचा मुद्देमाल ताब्यात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
चंदगड, आजरा, गडहिंग्लज, भुदरगडसह दोडामार्ग येथे दिवसाढवळ्या घरफोड्या करणे, मोटरसायकल्स, ट्रॅक्टर चोरणे यासारख्या गुन्ह्यामध्ये सहभागी असणाऱ्या आजारा तालुक्यातील हात्तिवडे येथील विनायक सिताराम हरेर, कोरीवडे येथील तेजस तानाजी पाटील व नांद्रे/ मिरज येथील रजाक मुजावर यांच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांना यश आले असून त्यांच्याकडून सात घरफोड्यांमधील शंभर ग्रॅम सोने, २३० ग्रॅम चांदी यासह ट्रॅक्टर, महिंद्रा मॅक्स, तीन मोटरसायकली असा एकूण २० लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागा्या वतीने दिलेली माहिती अशी…
कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी होणाऱ्या घरफोड्या, मोटरसायकली चोरी, ट्रॅक्टर चोरी यासारख्या चोऱ्यांचा तपास करण्याच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेनुसार विशेष मोहीम राबवण्यात आली. याकरिता नेमण्यात आलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या तपास पथकांना विविध गुन्ह्यातील चोरीचे दागिने विक्री करण्याकरता संशयित आरोपी पुणे बेंगलोर महामार्गावरील भारती विद्यापीठाकडून येणार असल्याचे गोपनीय बातमीदारांकडून पोलीस अंमलदार समीर कांबळे व राजू कोरे यांना समजले.
या माहितीच्या आधारे २५ मार्च रोजी सापळा रचून पोलिसांनी रजाक अस्लम मुजावर, तेजस तानाजी पाटील यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून विक्रीसाठी नेत असलेले सोन्याचे दागिने हस्तगत केले.
त्यांना पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर विनायक सिताराम हरेर रा. हत्तीवडे ता. आजरा याचा देखील या गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे आरोपींनी सांगितले. तिघाही आरोपींना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार सात घरफोडीच्या गुन्ह्यांसह चारचाकी व दुचाकी वाहने चोरीमध्ये त्यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरजकुमार, अण्णासाहेब जाधव, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, शेष मोरे, समीर कांबळे, राजू कोरे, सतीश जंगम, योगेश गोसावी, विशाल चौगुले, वैभव पाटील, महेंद्र कोरवी, संजय देसाई, सतीश सूर्यवंशी, अनिल जाधव, सचिन पाटील, महेश आंबी, अमित मर्दाने, संजय हुंबे, सचिन दुधाने, सुरेश राठोड यांनी तपास प्रक्रियेत भाग घेतला.
‘मृत्युंजय महान्यूज ‘ कडून आठ दिवसापूर्वी वृत्त प्रसिद्ध
‘ मृत्युंजय महान्यूज ‘ कडून वेगवेगळ्या चोऱ्यांसह विविध गुन्ह्यातील आजरा तालुक्यातील कांही संशयित तरुणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून कसून चौकशी सुरू असून अनेक गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली होती. आज या प्रकरणावरचा पडदा उठला आहे.
रजाक की ‘ राम ‘
यातील आरोपी रजाक हा आजरा परिसरात राहावयास होता. तो ‘राम’ या नावानेच वावरत होता व तसाच तो परिचित होता असे स्पष्ट झाले आहे. अटकेनंतर तो रजाक असल्याचे त्याच्या सहकाऱ्यांना समजले.
गुन्हे उघडकीस येण्यास मर्यादा…
ठिकठिकाणी झालेल्या अनेक चोऱ्यांसंदर्भात पोलिसात फिर्यादी/ तक्रारी दाखल न झाल्याने अनेक गुन्ह्यांमध्ये समावेश असूनही कांही गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांवर मर्यादा येत असल्याचे स्पष्ट आहे.
दोघेही अट्टल…
या प्रकरणात अटक करण्यात आलेले विनायक व तेजस हे दोघेही अट्टल चोरटे आहेत. यापूर्वीही मोटरसायकल चोरी, घरफोडी, वन्य प्राण्यांची शिंगे विक्री अशा अनेक गुन्ह्यांमध्ये त्यांचा समावेश होता. वैशिष्ट्य म्हणजे नातेवाईकांच्याच घरी चोरीचा त्यांचा विशेष फंडा होता.

वन्यप्राण्यांचा वाढता त्रास,मनसे आक्रमक…. आंदोलनाचा इशारा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यात वन्यप्राण्यांचा वाढता त्रास शेतकरी व नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेत वन विभागाला धडक निवेदन दिले. तालुकाध्यक्ष आनंदा घंटे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले.
हत्ती, गवे व रानडुक्कर यांसारख्या वन्यप्राण्यांकडून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत आहेत. दुसरीकडे, खासगी मालमत्तेलाही फटका बसत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
नुकत्याच सिरसंगी येथे हत्तीने दुचाकी व चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान केले. मात्र अशा प्रकारच्या खासगी मालमत्तेच्या नुकसानीस भरपाई मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. वन्यप्राणी थेट गावात येऊन नुकसान करत असताना भरपाई न देणे अन्यायकारक असल्याचे मनसेने स्पष्ट केले आहे.
शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीस १०० टक्के भरपाई द्यावी, भरपाई प्रक्रिया सुलभ करावी व विलंब टाळावा, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. तसेच जंगलालगतच्या शेतकऱ्यांना सौर कुंपण देणे व वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी किंवा मृत्यू झाल्यास भरपाई वाढवावी, अशी मागणीही करण्यात आली. याशिवाय रस्त्यालगतची धोकादायक झाडे हटवण्याचीही मागणी करण्यात आली आहे.दरम्यान, मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास वन विभाग कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मनसेतर्फे देण्यात आला आहे.
हे निवेदन देताना उपतालुका अध्यक्ष सुशांत पोवार
विभाग अध्यक्ष विलास शिवणगेकर, विद्यार्थी सेना प्रमुख यश सुतार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आजरा ग्रामीण रुग्णालय येथे आयुष निदान व उपचार शिबिराचे आयोजन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजच्या धावपळीच्या आणि रासायनिक युगात आरोग्यासाठी आयुर्वेदाची कास धरणे काळाची गरज बनली आहे. याच उद्देशाने
आजरा ग्रामीण रुग्णालय येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत आयुष सर्व रोग निदान शिबिर व उपचार मेळाव्यास रुग्णांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर यांचे हस्ते झाले. यावेळी डॉ. श्रद्धाआनंद ठाकूर यांनी आयुर्वेदाचे महत्त्व या विषयावर व्याख्यान दिले.
डॉ. अंजनी देशपांडे यांनी दैनंदिन जीवनातील आयुर्वेद या विषयावर व्याख्यान दिले. डॉ. सागर साव्यानावर यांनी होमिओपॅथी या विषयावर मार्गदर्शन केले. नगराध्यक्ष श्री. अशोक चराटी यांनीही मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास आरोग्य आणि कुटुंब कल्याण केंद्र कोल्हापूरच्या उपप्राचार्य डॉ. वाडीकर ,आमदार प्रतिनिधी श्री विजय थोरवत, उपनगराध्यक्षा सौ.पूजा डोंगरे , जिल्हा आयुष अधिकारी डॉ. लादे , डॉ.शेवाळे उपस्थित होते.
प्रास्ताविक वैद्यकीय अधीक्षक डॉ.अमोल पाटील यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ.सुरजीत पांडव यांनी केले.
डॉ. सुनील हसूरे, डॉ. प्रशांत चौगुले, डॉ. स्वाती पाटील, डॉ. सागर तेउरवाडकर, डॉ.स्वाती रेडेकर. यांनी रुग्णांना आयुष उपचार दिले. या शिबिरात ४१५ रुग्णांनी आपला सहभाग नोंदवला.

स्टेट बँकेच्या आजरा शाखेचा कारभार सुधारा…
अन्याय निवारणची अधिकाऱ्यांना सूचना : तक्रारींचा वाचला पाढा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
स्थानिक नागरिकांना होत असलेल्या विविध अडचणींबाबत सामाजिक सेवा प्रतिष्ठान प्रणीत अन्याय निवारण समिती, आजरा यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया च्या आजरा शाखेकडे निवेदन सादर केले. या निवेदनामध्ये शाखेमधील कामकाजाबाबत अनेक गंभीर तक्रारी मांडण्यात आल्या होत्या.
समितीकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार, शाखेतील काही कर्मचाऱ्यांचे उध्दट वर्तन, आवश्यक कागदपत्रांबाबत अपुरी माहिती, ग्राहकांना वारंवार हेलपाटे मारण्यास भाग पाडणे, सेवेमध्ये होणारा अनावश्यक विलंब, तसेच योग्य मार्गदर्शनाचा अभाव या समस्या प्रकर्षाने समोर आल्या होत्या. याशिवाय शाखेमध्ये रांग व्यवस्थेचा अभाव व फॉर्म समजण्यात येणाऱ्या अडचणीमुळे ग्रामीण व वयोवृद्ध नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याचेही निदर्शनास आले.
या पार्श्वभूमीवर समितीच्या प्रतिनिधींनी शाखा व्यवस्थापनाशी चर्चा केली. यावेळी नगरसेवक श्री. परशुराम बामणे, डॉ. श्रद्धानंद ठाकुर, दिनकर जाधव, जावेद पठाण, बंडोपंत चव्हाण, जोतीबा आजगेकर व मिनीन डिसोझा आदी उपस्थित होते.
चर्चेनंतर शाखा व्यवस्थापनाने समितीच्या सर्व प्रमुख मागण्या मान्य केल्याचे सांगण्यात आले. यामध्ये ग्राहकांना मराठीत तसेच इंग्रजीमध्ये स्लिप (फॉर्म) भरून देण्याची सुविधा उपलब्ध करून देणे, शाखेमध्ये चप्पल बाहेर काढण्याची सक्ती बंद करणे, तसेच ग्राहक सेवा सुधारण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तात्काळ राबविण्याचे आश्वासन देण्यात आले.
समितीच्या हस्तक्षेपामुळे स्थानिक नागरिकांना दिलासा मिळाला असून, भविष्यात बँकेच्या सेवेत लक्षणीय सुधारणा होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

निधन वार्ता
सौ.मालुताई मनोळकर

मुरुडे ता. आजरा येथील सौ.मालुताई पुंडलिक मनोळकर यांचे अल्पशा आजाराने काल सोमवारी निधन झाले.
त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, तीन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

आजचे पंचांग
दिनांक : ३१ मार्च २०२६
वार : मंगळवार
माह (अमावस्यांत) : चैत्र
माह (पूर्णिमांत) : चैत्र
ऋतु : वसंत
आयन : उत्तरायण
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : त्रयोदशी तिथी (सकाळी ०६.५५ पर्यंत) त्यानंतर चतुर्दशी तिथी
नक्षत्र : पूर्वा फाल्गुनी नक्षत्र (दुपारी ०३.२० पर्यंत) त्यानंतर उत्तरा फाल्गुनी नक्षत्र
योग : गण्ड योग (दुपारी ०३.४० पर्यंत) त्यानंतर वृद्धि योग
करण : तैतुला करण (सकाळी ०६.५५ पर्यंत) त्यानंतर गराजा करण
चंद्र राशी : सिंह राशी (रात्री ०९.३२ पर्यंत) त्यानंतर कन्या राशी
सूर्य राशी : मीन राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी ०३.४७ ते सायंकाळी ०५.१९ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१८ ते दुपारी ०१.०७
सूर्योदय : सकाळी ०६.३५
सूर्यास्त : सायंकाळी ०६.५१
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

हाजगोळी येथे शुक्रवारी हिंदू संमेलन
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
हाजगोळी बु ll ता. आजरा येथे शुक्रवार दिनांक ३ एप्रिल रोजी विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
ह.भ.प.श्री.अरुण महाराज पवार (तळाशी) यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या शिबिरास ह.भ.प. श्री.प्रणवसिंग किरणसिंग राजपूत (प्रयाग चिखली/ कोल्हापूर ) हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहे. गोठण मैदान हाजगोळी येथे सायंकाळी सात ते रात्री साडेआठ पर्यंत सदर कार्यक्रमात आहेत.

राजस्थानने चेन्नईला नमवले…
बारा षटकातच गाठले लक्ष्य

आयपीएलच्या तिसऱ्या राजस्थान विरुद्ध चेन्नई सामन्यांमध्ये राज स्थानला चेन्नईने दिलेले १२७ धावांचे लक्ष केवळ १२.१ षटकातच पूर्ण केले. पावर प्ले मध्ये पंधरा चेंडूतच राजस्थानच्या १५ वर्षीय र्वैभव सूर्यवंशीने अर्धशतक ठोकले
आजचा सामना…
पंजाब विरुद्ध गुजरात
स्थळ : न्यू चंदिगड
वेळ : रात्री ७.३० पासून



